मटकरीदीप....

Submitted by ASHOK BHEKE on 19 April, 2024 - 07:26

मटकरीदीप....
माणूस हा बोलणारा प्राणी. निर्मळ मनाची माणसं खूप बोलतात. त्यांना बोलावंस वाटतं म्हणून बोलतात. मनापासून बोलतात. अगदी हृदयातले शब्द प्रतीद्वंदित होत असतात. ते बोलत असताना आपण ऐकत राहावेसे वाटते. त्यांच्या बोलण्यात इतरांचा लाभ असतो. सामाजिक भानाचे संचित घेऊन पूढे निघालेल्या किंबहुना समाजासाठी काहीतरी देणे आहोत या उद्देशाने बोलणारा एकच माणूस मी पाहिला. अनुभवला, सहवास लाभला त्या माणसाविषयी दोन ओळी आज उद्या करता करता आज भल्या सकाळी टोकदार बोरूला शाई लावीत लिहिता झालो. वाजवी पेक्षा अधिक कौतुक नाही. परंतु दोन शब्द प्रेमाचे. तो माणूस अगदी सडपातळ देखील नाही आणि जाडजूड देखील नाही. उंचपूरा, मध्यम बांध्याचा, सफरचंदासारखा गोल चेहर्‍याचा, भाग्याचे कपाळ आपल्या केसाने झाकून ठेवणारा, वयानुसार झालेल्या पांढर्‍या केसांवर वेळोवेळी काळया रंगाचा मुलामा देऊन तरुण समजणारा, मलाईदार मिश्किलीचे हास्य म्हणजे गादीच्या पानवाल्या कडून मसाला पानाचा तोबरा भरून गोबर्‍या गालात दिसावे तसे, त्यामुळे सुरकुत्या दिसत नाहीत. बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी दर्जा आणि अधिकारी संघटनेचे काम सांभाळून आपल्या कामात कसूर न करणारा. मनापासून मैत्री करणारा एकचि तो अलकापती श्री दीपक मटकर.
भारतीय आयुर्विमा संस्थेत वडील सेवेला त्यात त्यांच्या शिस्तप्रिय राहणीमानात मुंबईच्या वरळी भागात मटकर कुटुंबात 30 सप्टेंबर 1958 साली जन्माला आल्याने जीवन धन्यतेने फुलून निघले. शालेय शिक्षण चिंचपोकळी, जोगेश्वरी, अंधेरी भागात डहाणूकर कॉलेज हा प्रवास म्हणजे अदभूत अनुभवातून न्हाऊन निघाले आहेत. जगण्याचे प्रयोजन कळले. त्यांच्या मुखातली शब्दकळा म्हणजे गोडगोजिरी. एक निराळी, समोरच्याला मनमुराद आनंदीत करणारी वल्ली. हा माणूस वेगळ्या रसायनातून निर्माण झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असं कोणतं क्षेत्र नाही की तेथे हा माणूस पोहचला नाही. प्रत्येक क्षेत्रात आपण हौशी आहोत हे सिध्द करायला ऐट न मिरविता सहजतेने डुबकी घेतात. मित्रांच्या संगतीत संगीत क्षेत्रात गीत गाताना सुरांची लड फुलवीत तल्लीन होऊन गात आनंदाची माळ गुंफीत राहावी. गीतकाराला साथ नाही म्हणून आधुनिक पध्दतीच्या कोंगो वादयावर थाप मारीत साथ देत मैफिलीच्या प्रत्येकाच्या अंत:करणातील लय डोलती करीत पायात झणकारतेपण आणणारा. डोंगरदर्‍या चढण्याचे आता त्यांचे खरोखर वय नाही. परंतु इतर तरुणांच्या हाकेला धावून जात ट्रेकिंग करीत जणूकाही डोंगर दर्‍या मऊ मऊ गालीच्यावरून पार करणारा हौशी माणूस. शेअर मार्केट मध्ये कोणत्या शेयरला तेजी येणार कोणता गडगडणार याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण यांच्या मुखातून ऐकावे. क्रीडा क्षेत्रात क्रिकेट असो फूटबॉल. कोण खेळाडू कसा आहे याचे विस्तृत वर्णन आपल्या मनाच्या कुपित बंद करून ठेवाव्यात अशाच आहेत. छक्के पंजे यांना जमत नाहीत परंतु राजकीय क्षेत्रात देखील गाढा अभ्यास. लहानपणी आई बाबांनी यांना एक प्रश्न नक्कीच विचारला असेल... तसं सर्वाचे आई बाबा मुलांना प्रश्न विचारतातच. मोठा झाल्यावर तू कोण होणार ? या दीपक मटकर यांनी त्यावेळेस काय उत्तर दिले असेल.. लहानपण ते.... बुचकळ्यात नक्कीच पडले असतील. पण त्यांनी त्यांच्या आई वडिलांना त्यावर मी लोकांच्या मदतीला धावून जाणार... असे उत्तर दिले होते. आज सर्वार्थाने ते खरे ठरत आहे. अगदी अलीकडे त्यांचे मी फोटो पाहिले वसईच्या खेड्यापाड्यात जाऊन तेथील शालेय विद्यार्थ्यांना अपेक्षित साहित्य, शाळा दुरूस्ती आणि आधुनिकीकरण, स्वामी नित्यानंद माठाचे समाजगृह, एका गावात तर त्यांनी स्थानिक गावकरी बांधवांसाठी एक बोअरवेल अशी अनेक कामे मुंबई मध्ये सर्वात अगोदर निर्माण झालेल्या लायन्स क्लब अंधेरीचे अध्यक्ष घनश्याम पूरोहित सारख्या आपल्या अनेक सहकारी मित्रांच्या मदतीने समस्त समाजासाठी झटत लोकहिताची कार्ये करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी भागातील वाडा परीसरात सॅटेलाइट प्रकल्प उभारण्याचे प्रयत्नात आहे. लवकरच हा प्रकल्प सुरू होईल आणि तेथील आदिवासी पाड्यात आनंदाचे वातावरण दिसून येणार आहे.
गेली काहीवर्षे झाली आदिवासी भागात जाऊन गरिबांच्या आयुष्यात चैतन्याची कारंजी फुलविण्याचे काम त्यांच्या हातून घडत आहे. या माणसाकडे कोणी गरजू आला तर त्यांच्या हृदयात समथिंग होत मन हेलकावत राहते. सामाजिक क्षेत्रात रमून काम करणारा आणि केवळ हौशेखातर काम करणारांमध्ये रमून काम माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहत आलो आहे. आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणार तर संकटाच्या वेळी समाजासाठी देव पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करीत धार्मिकपण जतन करणारे हे गृहस्थ मनाने फार दिलदार आहेत. दुर्बल घटकांना आधार देताना वेळप्रसंगी आपल्या खिश्याला कात्री लावणारे समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख करावासा वाटतो. माझ्यासोबत अशी अनेक माणसं आली. झाले बहू, असतील बहू, होतील बहू , पण त्यात दीपक मटकर एकची मटकरीदीप.
अशोक भेके
घोडपदेव समूह

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users