गुप्तहेर रॉबिन आणी कुटीरोवांचं शस्त्र - भाग ७

Submitted by रुद्रसेन on 18 April, 2024 - 01:41

हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणी औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल्या केबिनमध्ये आलेले होते आणी नंबरनुसार पेशंट्सना तपासत होते. अशाच एका केबिन बाहेर रॉबिन आपला नंबर येण्याची वाट पाहत बाकावर बसला होता. त्याच्या आजूबाजूला जास्त पेशंट्स न्हवते कारण डॉक्टरांची तपासायची वेळ अजून सुरु झालेली न्हवती. डॉक्टर येण्याची वेळ पाहूनच रॉबिनने तातडीने दिवसाची पहिली अपोइन्टमेंट घेतली होती. डॉक्टरांनी अजून पेशंट तपासायला सुरुवात केली न्हवती त्यामुळे रॉबिनला पटकन आत जाऊन डॉक्टरांची भेट घेता येणार होती.

एवढ्यात केबिन मधून एक गलेलठ्ठ बाई डोळ्यावरचा चष्मा सावरत बाहेर आली आणी तिने आवाज दिला.
“ मिस्टर रॉबिन, कोण आहेत” असं म्हणत बाकावरच्या २-३ लोकांकडे शोधक नजरेने पाहू लागली.
“ अ ..मीच आहे रॉबिन” जागेवरून उठत रॉबिन म्हणाला.
“ डॉक्टरांनी बोलावलंय आतमध्ये.” एवढ म्हणत ती बाई बाहेर रिसेप्शनिस्टच्या टेबलाकडे निघून गेली.
रॉबिन पुढे होत डॉक्टरांच्या केबिनजवळ आला. केबिनच्या दारावर ठळक अक्षरात पाटी होती.
“ डॉ. सचित पटवर्धन, न्युरोलॉजी तज्ञ. रॉबिनने केबिनच्या दारावर टकटक केली. तसा आतून आवाज आला
” प्लीज कम इनसाईड”
रॉबिन आतमध्ये गेला. एका मोठ्या टेबलाच्या समोर मोठ्या खुर्चीत डॉक्टर सचित पटवर्धन एकटेच हलकंसं स्मित करत बसले होते. बाजूलाच पेशंटला तपासायचा बेड होता आणी मागच्या शेल्फमध्ये काही औषधांचे बॉक्सेस ठेवलेले होते.

“ हेल्लो डॉक्टर, सर्वप्रथम धन्यवाद मला तातडीने वेळ दिल्याबद्दल” रॉबिन पुढे झुकत हात जोडत म्हणाला.
“ अहो रॉबिन धन्यवाद कसले, आम्ही जशी समाजाची सेवा करतो, तशीच तुम्ही सुद्धा समाजाची सेवा करता. तुम्हाला वेळ द्यावाच लागला.. या या बसा..” डॉ. सचित समोरच्या खुर्चीत निर्देश करत हसत म्हणाले.
डॉक्टर सचित यांचा नम्र वागण्याने रॉबिनला खूप बरं वाटलं. डॉक्टर सचित पटवर्धन यांना रॉबिनबद्दल माहिती होती आणी तो सध्या देसाई खून प्रकरण हाताळतोय आणी त्यानिमित्तच त्याला आपली भेट हवी असं त्यांचं रॉबिनसोबत फोनवर बोलण झालेलं होतं.
“ तर तुमचा जास्त वेळ न घेता मी मुद्द्यालाच हात घालतो. म्हणजे तुम्ही पण तुमचे पेशंट्स पाहायला मोकळे आणी मी पण माझी कामं करायला मोकळा” रॉबिन म्हणाला.
“ शुअर, गो अहेड” डॉ. सचित पुढे झुकत म्हणाले.

“ ओके, खरंतर फोनवर आपलं बोलणं झालंच आहे तरीही परत एकदा सांगतो, तर तुम्ही परदेशात वास्तव्यास असताना केलेल्या मेंदूच्या तंतुंबद्दल केलेलं संशोधन माझा वाचण्यात आलं. त्याबद्दल मला काही प्रश्न आहेत.” रॉबिनने बोलायला सुरुवात केली. त्यावर डॉ. सचित यांनी फक्त मान डोलावली. त्यामुळे पुढे रॉबिन बोलू लागला.
“डॉक्टर, तुमचा सायंटिफिक मॅगझिन मधला लेख वाचला. परदेशातील काही औषध निर्मात्या कंपनीतील ज्येष्ठ शास्त्रज्ञांसोबत मिळून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीची उपचारपद्धती शोधून काढली ज्यामुळे अनेक मेंदूशी निगडीत असलेले रोग बरे होण्यास मदत तर झाली, त्याहून अधिक म्हणजे फिट्स आणी स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांवर सुद्धा हा इलाज रामबाण ठरला. परदेशातील पेशंट्स बरे होण्याचं प्रमाण जवळपास ९८ टक्के इतके आहे. अगदी जुनाट मेंदूचे रोग असलेले पेशंट्स जे कि अतिवयोवृद्ध आहेत त्यांना सुद्धा या उपचार पद्धतीने फरक पडलाय. आणी त्याच उपचार पद्धती तुम्ही इथे स्वदेशात वापरत आहात. मला त्याबद्दल जाणून घ्यायचंय.

“ तुम्ही माझे लेख अत्यंत मनापासून वाचलेले दिसतायत मिस्टर रॉबिन” डॉ. अतिशय कौतुकाने म्हणाले.
“ माझा पेशा गुप्तहेराचा असल्याकारणाने आणी माझ्या केसमध्ये याचं महत्व मला जाणवल्याने तो लेख बारकाईने वाचण भाग होतं” शांतपणे रॉबिन म्हणाला.

“ हम्म हम्म.. खरंय ते. हे बघा रॉबिन उपचार पद्धतीच म्हणाल तर, मी ज्या परदेशी शास्त्रज्ञ टीम सोबत काम करून एक औषध निर्माण केलं होतं ते औषध आणी काही रोजच्या दैनंदिन सवयी उदाहरणार्थ खाण्याचा सवयी, झोपेतून उठायच्या सवयी यांचा ताळमेळ बसवून पेशंट्सना बरे करता येऊ शकते अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो होतो. परदेशात त्याचे अफलातून रीसल्ट आलेत. तुम्ही म्हणालात तसे जवळपास ९८% इतके. आपल्या देशात सुद्धा हि उपचार पद्धती मी आणली आणी इथे सुद्धा चांगले निष्कर्ष आहेत.” डॉ सचित म्हणाले.
“ आपल्या देशात किती रुग्णांवर हि उपचार पद्धत अवलंबली गेली. आणी किती रुग्ण बरे झाले” रॉबिनने गंभीर होत विचारलं.
“माझा जवळील अधिकृत महितीनुसार या उपचार पद्धतीने तब्बल २०८ पेशंट्स मी हाताळले. त्यातले जवळपास २०५ पूर्ण बरे झालेत, उर्वरित ३ बरे न झालेल्यापैकी २ अगदीच वृद्ध होते आणी त्यांना मेंदूचे सोडून इतर दुर्धर आजार पण होतेच. त्यांच्या मेंदूची तंतू असलेली रचना सुधारत होती. पण इतर इतर दुर्धर आजारात शरीर जास्तच खंगल्यामुळे ते दगावले. डॉ. पटापट बोलले.
“ आणी तिसरा पेशंट जो बरा झाला नाही, ते म्हणजे याचं शहरातील रहिवासी असलेले आबासाहेब देसाई. बरोबर ना” हनुवटीवर दोन्ही हात ठेवत रॉबिन म्हणाला.

“ येस्स.. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून त्यांची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे. सी.टी. स्कॅनचे रिपोर्ट्स मी चेक केले. मागच्या दोन महिन्यात त्यांचा मेंदूच्या तंतूंची सुधारणा छान झालीय. ठरलेली औषधउपचार पद्धती आणी दैनंदिन सवयीसुद्धा उपचार पद्धतीप्रमाणे चालू आहेत. पण त्यांना अजून पूर्ण बरं वाटत नाहीये. त्यांची स्मृती त्यांना दाद देत नाहीये. डॉ. सचित खंत होत म्हणाले.
“ उपचार जर व्यवस्थित चालू असतील तर त्यांची स्मृती का दाद देत नाहीये अजून” रॉबिनने विचारणा केली.
“ कदाचित त्यांच्या केसमध्ये उपचारांमुळे गुण येण्यास जास्त कालावधी लागत असेल” डॉ. बोलले.
“ पण डॉक्टर तुमच्या जर बरे होणाऱ्या रुग्णांची जास्त संख्या आणी त्यावरील सकारात्मक सर्वे पाहता असं होणं थोडं विचित्र नाही का? म्हणजे देसाई हे इतके म्हातारे पण नाहीत कि त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही किंवा असपण नाही कि त्यांना इतर काही आजार आहेत, ज्यामुळे उपचारांचा गुण येण्यास वेळ लागतोय” रॉबिनने आपली शंका उपस्थित केली.

“खरंतर ते एव्हाना बरे व्हायला हवे होते. पण काही केसेस मध्ये ठराविक घटनांमध्ये पेशंट्सना मानसिक धक्का बसलेला असतो त्यामुळे रिकवरीला वेळ लागतो.” डॉ. सचित आपली बाजू मांडत म्हणाले.
“ ते आहेच..पण तुमचा संशोधन लेखाप्रमाणे असंख्य रुग्णांच्या बरे होण्याचा यादीत आबासाहेब देसाई हि केस जरा वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही.” रॉबिन स्मित करत म्हणाला.
“ हो एक अपवाद म्हणा हवं तर. पण मला खात्री आहे त्यांना आज ना उद्या नक्की पूर्ण बरं वाटेल आणी त्यांची गेलेली स्मृती सुद्धा परत येईल.” डॉ सचित खात्रीपूर्वक म्हणाले.
“ नक्कीच डॉक्टर, मला सुद्धा तुमच्याकडून याचं उत्तराची अपेक्षा होती. आज ना उद्या त्यांना नक्कीच पूर्ण बऱ वाटणार. चला मी खूप वेळ घेतला तुमचा.” रॉबिन आभार व्यक्त करत उठला. हस्तांदोलन करत रॉबिनने डॉक्टर सचित पटवर्धन यांचा निरोप घेतला आणी केबिनच्या बाहेर हलकंसं स्मित करत आणी शिळ वाजवतच पडला.

घरी पोचताच रॉबिनने आपले अंग बेडवर टाकले. रात्रभर त्याला झोप न्हवती. एकतर त्या गूढ व्यक्तीचा पाठलाग करताना सपाटून आपटल्याने त्याची पाठ चांगलीच दुखावली गेली होती आणी वाड्यावरून त्यादिवशी आणलेली प्रवासवर्णनांची पुस्तकं वाचता वाचता पहाट कधी झाली त्यालाच कळले नाही. सकळी लवकर डॉक्टर सचित पटवर्धन यांची ठरलेली गाठ घेणे भाग असल्याने झोप अपूर्णच राहिली. त्यामुळे थोडी झोप घेण्याच्या उद्देशाने रॉबिनने अंग टाकलं आणी लागलीच त्याला झोप लागली. रॉबिन झोपून काही तासच झाले असतील कि त्याची झोपमोड झाली ती टेबलावरच्या फोनच्या आवाजानेच. डोळे किलकिले करत चरफडतच रॉबिन उठला आणी फोनजवळ गेला.

“ कोण आहे” रॉबिनने त्रासिक सुरात विचारले.
“ इ. देशमुख बोलतोय रॉबिन, काय झालं एवढ वैतागायला” समोरून देशमुख बोलले.
“ अच्छा देशमुख तुम्ही आहात होय.. काही नाही हो रात्रभर झोप न्हवती नुकतीच झोप लागली, तर तेवढ्यात तुमचा फोन आला. बऱ ते सोडा तुम्ही कशासाठी फोन केला होता” रॉबिन विषय बदलत म्हणाला.
“ आशुतोषबद्दल सांगायचं होतं जरा. तू सांगितल्याप्रमाणे त्याच्या मागावर माणूस ठेवलेला होता,” देशमुख शांतपणे बोलले.
“ बऱ मग काय हाती लागलं” रॉबिन म्हणाला.

“ शहरात तो क्लासला जात असतो. तो क्लास ७ वाजता सुटतो. पण कधीकधी शहराबाहेर असणाऱ्या बारमध्ये सुद्धा आशुतोष साहेब दिसले होते. सिगरेट आणी दारू सुद्धा पितात साहेब तिथे बसून” देशमुख व्यंगात्मक पद्धतीत बोलले.
“ हम्म.. मला शंका होतीच, साधारण किती वाजता दिसला आशुतोष तिथे? ” रॉबिन म्हणाला.
“ साधारण ९ च्या आसपास होता तिथे, बार मध्ये चौकशी केली तेव्हा समजले आठवड्यातून एक दोनदा येत असतो तो बारमध्ये ९ च्या सुमारास. पण मला एक शंका आहे रॉबिन, ९ वाजता त्याला वाड्याच्या बाहेर जाताना कोणी हटकल नसेल का? कि एवढ्या रात्री कुठे जातोयस म्हणून ” देशमुखांनी विचारलं.

“ अहं.. नसेल हटकल कोणीही. कारण तो वाड्याच्या मुख्य दरवाजातून जातच नाही मुळी. बाहेर पडायला तो त्याचा खोलीतील खिडकीचा वापर करतो. वाड्यात देखील कोणाला त्याच्या व्यसनांविषयी माहिती नसावी” रॉबिन म्हणाला.
“ तू एवढ ठामपणे कस काय बोलतोस” देशमुख बोलले. त्यावर रॉबिनने आशुतोषच्या खोलीत जाऊन तिथे दिलेली भेट सांगितली. त्याच्या खिडकीबाहेर त्याने विझवलेली सिगरेट आणी त्यामुळे खिडकीबाहेर पडलेले सिगरेटचे डाग, सिगरेट विझवून खाली टाकलेलं थोटूक आणी त्याच्या कपाटामध्ये त्याने ठेवलेला तो गाठी मारलेला दोरखंड. याबाबत सविस्तर वृतांत सांगितला.
“ ओह्ह असं आहे तर... म्हणजे रात्री गुपचूप दोरीच्या सहाय्याने आशुतोष खिडकीवाटे बारमध्ये दारू प्यायला जातो तर.” देशमुख म्हणाले.
“ येस देशमुख, दोरीच्या साहाय्याने खिडकीबाहेर खाली उतरून बाजूचं पुरुषभर उंचीचं कंपाऊंड उडी मारून ओलांडायला त्याला अवघड नाहीये” रॉबिन खुर्चीत बसत म्हणाला.
“ बऱ सध्यातरी एवढचं आहे आशुतोषबद्दल. तुला काही अजून माहिती मिळाली” देशमुखांनी विचारणा केली.

त्यावर रॉबिनने त्या रात्री पाटील डॉक्टरांना दिलेली भेट, डॉक्टरांच्या घराबाहेर ठेवलेली पाळत आणी एका गूढ व्यक्तीचा केलेला पाठलाग सांगितला.
“ माय गॉड रॉबिन, एवढ सगळं झालं मग तू मला त्याचवेळी का नाही कळवलस” देशमुख मोठ्याने बोलले.
“ तितका वेळ न्हवता देशमुख आणी तसंही इतर गोष्टींची छाननी करण बाकी होतं” रॉबिन म्हणाला.
“ बऱ ठीक आहे रॉबिन, पण तुला काय वाटत कोण असावी ती व्यक्ती जी अपरात्री त्यांच्या घरात होती. काय काम असेल तिचं तिथं” देशमुख अधीर होत म्हणाले.

“ मला अंदाज आला आहे असं म्हणा हवं तर पण त्या व्यक्तीचा बुरखा लवकरच फाडणार आहे मी, खरतरं त्याचं दिवशी सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार होतो मी पण मला खात्री करून घायची होती म्हणून मी थांबलो होतो” रॉबिन शांतपणे म्हणाला.
“ म्हणजे कसली खात्री. तुला नक्की कोणावर संशय आहे. आत्ताच जाऊन त्याची चौकशी करूयात आपण” देशमुख तावातावात म्हणाले.
“रिलॅक्स देशमुख, सगळं काही करायची संधी मिळेल तुम्हाला. लगेचच देसाई वाड्यावर या सगळं काही प्रात्यक्षिक करूनच दाखवतो. आणी हो.. त्या डॉक्टर पाटलांना सुद्धा त्याचं मानगुट पकडून आणा वाड्यावर” रॉबिन जरा कडक आवाजात म्हणाला. रॉबिनच्या अशा ठाम उद्गारानंतर तर देशमुखांची खात्रीच पटली कि रॉबिनला गुन्हेगार कोण आहे ते समजलंय. देशमुख यावर भलतेच खुश झाले. आणी त्या खुशीतच त्यांनी फोन ठेवला. रॉबिन सुद्धा पटकन आवरून देसाई वाड्याकडे जाण्यासाठी निघाला.

काही वेळाने रॉबिन देसाई वाड्याच्या जवळ पोहोचला, आपली दुचाकी देसाई वाड्याबाहेर थांबवून रॉबिन इ. देशमुखांची वाट पाहत उभा होता. इ. देशमुख आल्यावरच वाड्यात प्रवेश करावा या इराद्याने रॉबिन बाहेर थांबलेला होता. रॉबिनला जास्त वाट पाहायला लागली नाही कारण थोड्या वेळातच इ. देशमुखांची गाडी देसाई वाड्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या आतमधून इ.देशमुख लगबगीने उतरले आणी त्यांची वाट पाहत असणाऱ्या रॉबिन जवळ आले. नंतर गाडीतून हवालदार म्हस्के आणी अजून दोन हवालदार उतरले. गरज पडेल म्हणून देशमुखांनी पोलिसांची जादा कुमक सोबत आणली होती.

“ बोल रॉबिन काय योजना आहे” अधीर होत देशमुखांनी विचारलं. आज देशमुख वेगळ्याच उत्साहात होते.
“ आपण दोघे आतमध्ये वाड्यात जाऊयात, हवालदार म्हस्केना सांगा त्या पाटील डॉक्टरांना उचलून वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आणून उभं करून ठेवा, आणी जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत त्यांना आत आणू नका, मी सांगेन तेव्हा त्यांना आतमध्ये आणा आणी आतमध्ये आल्यावर त्यांना मी सांगितल्याशिवाय तोंड उघडू देऊ नका. उर्वरित दोन हवालदारांपैकी एकाला मुख्य प्रवेशद्वारापाशी आणी दुसऱ्याला आतमध्ये अंगणात उभं राहायला सांगा. मी सांगितल्याशिवाय कोणीही वाड्यात येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही. रॉबिनने पटापट इ. देशमुखांना निर्देश दिले.
इ. देशमुखांनी रॉबिनच्या निर्देशानुसार सगळ्यांना आदेश दिले. हवालदार म्हस्के डॉक्टर पाटलांना आणायला गेले. उर्वरित दोन हवालदार देशमुखांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन थांबले. रॉबिन आणी देशमुखांनी वाड्यात प्रवेश केला.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults