पुसटलेल्या वाटा

Submitted by हौशीलेखक on 13 April, 2024 - 09:02

शाल्मली: थँक्यू! तुम्ही एवढ आलात भेटायला. अगदी अचानक ग! आम्ही दोघंही घरात नव्हतो. मी नीलच्या शाळेतल्या फंक्शनला गेले होते, आणि शेखर जर्मनीत. शेजाऱ्यांचा फोन आला, मग लगेच शाळेतून तशीच गेले ना हॉस्पिटलमध्ये. पण डॉक्टर म्हणाले काही नाही करता येणार. खूपच मोठा अटॅक! आणि कल्पनाच नाही ग. आई होती तशी; दोघंही होते. पण काय ग, गाडी चालवता येत नाही ना दोघांना. तसे बाबा चालवायचे, मुंबईत काय, इंग्लंडमध्ये काय. पण इथे त्यांना जरा भिती वाटायची. म्हणायचे, 'तुम्ही एकतर उलट्या बाजूनी चालवता गाड्या, आणि वरती एवढ्या वेगानी.' आई ना? सावरतेय थोडी; नाही म्हटलं तरी एवढ्या वर्षांचा संसार ना. कालपर्यंत अगदी गप्पच होती, सुन्न बसून रहायची; आज पहिल्यांदा थोड तरी जेवली - म्हणजे तसं बळजबरीनीच खायला लावलं. पण लक्षच नसत कुठे तिचं. खरं आहे, थोडा वेळ लागणारच. पण सावरेल, आत्ता बर म्हणजे नीलच्या शाळेला सुट्टी आहे ना उद्यापासून; त्याच्या मागे मागे राहिली की सावरेल हळू हळू. हो, माझा भाऊही असतो इथे. पण त्याच काय ग, त्याची बायको आहे गोरी आणि दोघ जातात कामावर, मुलंही नाहीत. मग आई घरी बसून कंटाळते. आणि ह्या परिस्थितीत तर तिला मुळीच एकट नको ना ठेवायला. बघतो आम्ही, हो, हो. ठीक आहे निघायला हव ना तुम्हाला? उद्याच ऑफिस डोळ्यासमोर दिसत असेल ना. अगदी नक्की, काही मदत लागली तर सांगेन. थँक्यू हं, परत एकदा.

मनोरमाबाई: कोण कुठचे लोक येउन किती वेळ बोलत बसतात! समजत नाही मला काही; एक तर अर्ध्या गोष्टी इंग्लिश मध्ये, आणि इतक कुचूकुचू हळू बोलत असतात की मला समजतच नाही. आता ही मुलगी सुद्धा निघताना जवळ येउन पाठीवरून हात फिरवून गेली. बघितल्येय मी हिला पूर्वी कुठेतरी. पण आताशा नांव काही लक्षात नाही रहात माझ्या. मावशी म्हणाली मला, पण सुमीची मुलगी तर नव्हे, ही बरीच लहान वाटत होती. कोण कुणास ठाऊक.
* * *
मनोरमाबाई: आजकाल फार हळुवार झाल्येय शमी. एवढ्या तेवढ्यावरून एकदम भडकते काय, डोळ्यातून पाणी काय काढते. हे आजचंच बघा, आधी फणफणली, म्हणे मी तिचा नेकलेस कुठे ठेवला म्हणून. मला तर बाई आठवत सुद्धा नाही हिच्याकडे तो नेकलेस होता. पण एवढ बोलायची खोटी, बाईसाहेब लागल्या रडायला - म्हणे कसा नाही आठवत तुला? तुम्ही इथे पहिल्यांदा आमच्या घरात आलात तेव्हा बाबांनी घेऊन दिला होता. बाबाचं भारी प्रेम वेडीला, लहानपणापासूनच. त्यावरून पुन्हा आणखी रडली - म्हणे बाबा गेल्यापासून पहिल्यांदाच पार्टीला जायची वेळ येत्ये. गेला म्हणजे असा कुठे गेलाय श्रीधर - लांबली खरी त्याची ह्या वेळची ट्रीप, पण येईल बहुतेक पुढच्या आठवड्यात. ह्या खुळीला केवढं दु:ख त्याचं. बोललेच नाही काही मी, म्हटलं जा ग, मजा कर. ह्या सगळ्यात वेळ गेला म्हणून तिकडे तो शेखर भडकलेला. तो भडकूच आहे एक नंबरचा! खर सांगू का, मला तो मुळात फार पसंत नव्हता, पण ह्या बाईसाहेब पडल्या न प्रेमात! मग काय, दिलं लग्न लावून मनासारख. अगदी साग्रसंगीत - गौरिहार, लज्जाहोम, सप्तपदी सगळ सगळ! नुसत्या आठवणींनी मला तो होमाच्या धुराचा वास अगदी नाकात भरल्यासारखा यायला लागलाय. डोळे मिटले की तश्शीच शमी उभी राहते डोळ्यांसमोर - हळद लावलेली, पिवळ्या साडीतली माझी छोटीशी बाहुली!

शाल्मली: बाहुली नाही तर काय! नुसत छान छान नटून यायचं, खोटं खोटं गोड हसायचं - आणि तू एक! ती हसतेय म्हणून तुझी विनोदबुद्धी अगदी उतास जात्येय. मुळ्ळीच जळत नाही मी. Oh my god! शी:, काय जळकट वास पसरलाय घरभर! सगळ्या खिडक्या उघड आधी! भाताचा करपून कोळसा झाला वाटत. आणि आई! आई तिथे सोफ्यावर डोळे मिटून बसलेली - गाढ झोपेत. हलवून हलवून जाग कराव लागल. एकदम माझा चेहराच काय ओंजळीत धरलान, आणि कानांवरून बोटं काय मोडली! म्हटलं, भात करपलेला लक्षात नाही का आला, का आधीच झोप लागली होती? तर म्हणे, मला काय माहिती भात टाकला होता. चार चार वेळा सांगून गेले होते; सगळ जेवण बाहेर काढून ठेवलंय; फक्त भात झाला की गॅस बंद कर आणि जेवून घे. वास नाही का येत जरासुद्धा! आणि भूक नाही का लागत! सकाळपासून उपाशी आहे बिचारी. खरच, बाबा गेल्यापासून आईच काही धड नाहीय लक्षण!
* * *
शाल्मली: आई, जा आता आधी आंघोळ करून घे बघू. हरताळका ना आज? गणपतीची सगळी तयारी पण करायची आहे ना? मला मोदक कसे करायचे दाखवणार आहेस तू. अगदी ढकलली तिला बाथरूम मध्ये आणि सरळ दार लावूनच घेतलं, नुसती बसून कसल्या विचारात गढली होती. हे जरा मोदकांच वगैरे काढलं, की लक्ष थोड दुसरीकडे लागेल. काय सुंदर मोदक करायची आई लहानपणी, अजून आठवतात मला. नंतर मग मी शिकायला एकटी राहिले, आई-बाबा बदलीच्या कारणांनी सारखे कुठे कुठे फिरत, त्यामुळे बरीच वर्ष मोदक खायची वेळच आली नाही.

मनोरमाबाई: होतातच माझे मोदक सुंदर! सगळेजण आठवणी काढतात. श्रीधरलाही खूप आवडतात, अजूनही म्हणतो त्याच्या आईसारखे होत नाहीत, पण खातो मात्र अगदी आवडीनी! उद्या अगदी ताव मारेल बघा. पण आता मोदक करायचे तर हे सैपाकघर तसं लहानच आहे! ही सिंक सुद्धा भांडीबिंडी घासायच्या दृष्टीनी अगदीच लहान. आणि शेगडी कुठे दिसत नाही, आता सारण परतायचं तर ते कस करणार! आणि खोबरं, साखर सगळ सामान आहे कुठे कोणास ठाऊक! एवढा मोठा तो आरसा कशाला हवाय इथे? सारण परततांना कशी दिसते, मोदक वळत असतांना कशी दिसते हे बघत बसायचंय का आता ह्या वयात! अमेरिकेतले खुळचटपणे एकेक. मला मोठी ह्या स्वैपाकघरात बंद करून, सामान आणायला गेली बहुतेक. आली की तिलाच विचारेन बाई इथे शेगडी कुठे, त्याशिवाय कस काही शिजवणार? धड उभ राहायला सुद्धा जागा नाही; हे मोढ्यासारखं काहीतरी दिसतंय त्यावरच बसून राहते आता.

शाल्मली: हसू नको ह्या: ह्या: करून! मला काळजी वाटते रे, अरे तिच्या एवढ लक्षात येऊ नये की आपण बाथरूममध्ये आहोत, एवढं विसरायला व्हाव आपण इथे कशाला आलो? वय म्हणजे काय एवढं नाही झालंय; आणि बाबांचं दु:ख तरी किती दिवस आता - सहा-सात महिने होऊन गेले! खर म्हणशील, तर तिला दु:ख वाटल्याचंच कधी जाणवलं नाही मला. ती denial मध्ये असेल का? थोतांड नको ना म्हणू, आपण डॉक्टरकडे जाऊया तिला घेऊन.
* * *
मनोरमाबाई: आज तो भूतांचा काहीतरी सण असतो ना, तो होता. भुतं कसली, ही एवढाली मुलंच! गोळ्या-चॉकलेटं दारोदार गोळा करत फिरायचं! ‘Trick or treat’ म्हणे. नील सुद्धा आला ना घरी ही एवढी चॉकलेटं घेऊन. माझे डोळेच चकाकले. कित्ती पूर्वी, त्या कॅडबरीच्या गोळ्याचं पाकीट मिळायचं - रंगीबेरंगी गोळ्या, आतमध्ये कॅडबरीच चॉकलेट! कॉलेजच्या दिवसात माझ भयानक आवडतं - लग्न ठरल्यावर श्रीधरबरोबर पहिल्यांदा फिरायला गेले होते, तेव्हा त्यानी मोठ प्रेमानी पाकीट घेऊन दिल होत, इतक्या गोड आधी कधी जाणवल्या नव्हत्या. लग्नानंतर बोलायला लागला मला, एवढ चॉकलेटं खाण चांगल नाही, वजन वाढतं वगैरे वगैरे. जाड होण्यावरून आठवलं, आम्ही युरोपात असतांना, त्याला त्या सगळ्या किडकिडीत गोऱ्या बायका सुंदर वाटायच्या. आठवडा तरी उलटून गेला असेल ना, ह्या टूरवर गेल्याला. कधी परत येतोय कोण जाणे. का भेटली तिथे एखादी चवळीच्या शेंगेसारखी गोरी?

शाल्मली: आई किती बारीक झाल्येय ना? वजन कमी होण वेगळ, आणि रोगिष्ट बारीक दिसणं वेगळ. खूप वाईट वाटत, माणूस अस कस आक्रसत जातं? नुसत शरीरानी नव्हे, मनानी! तिच्या अस्तित्वाची एवढी विस्तीर्ण आवर्तनं होती, त्यातली फक्त अगदी आतली वलयं आता शिल्लक राहिली आहेत. छोट्याशा वर्तुळातल्या काही आठवणी शाबूत आहेत. एके काळी ह्या प्रेमळ मनाच्या मायेची उब, नुसत्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा जाणवली होती. त्या मनाचे बरेच धागे विखरत चाललेत. ही माझी उबदार गोधडी ठिकठिकाणी उसवत चाललेय. आणि मी काही करू नाही शकत. थंडगार झोत आल्यावर हाताची गच्च मिठी मारून आणि गुडघे पोटाशी घेऊन सुद्धा शहारा थांबत नाही अंगावरचा!
* * *
शाल्मली: किती शिकलं सवरलं, तरी डॉक्टर म्हणजे जादुगारच वाटतो ना अजून! आणि तोच जेव्हा म्हणतो की ह्यावर काही उपाय नाही, तेव्हा पारच धीर खचून जातो. उपाय नाही म्हणजे काय, काहीतरी औषध असेलच की. अस कस माणूस एकदम सगळ विसरून जाईल? गप्पा मारेन मी तिच्याशी, मुद्दाम जुन्या आठवणी उगाळून काढेन तिच्या स्मरण शक्तीला ताण द्यायला. थोडी तरी सुधारेल ती हळू हळू. ह्या डॉक्टरांना काय, नुसता हजारातला एक पेशंट आहे ती - आई माझी आहे ती; एकुलती एक. ... कठीण आहे खर, तिला बोलतं करायचा प्रयत्न केला तरी ती फारसा सादच देत नाही. वेड्यासारखी नुसती बघत बसते माझ्याकडे - जणू तिला न कळणाऱ्या भाषेत बडबडत्येय मी.

मनोरमाबाई: शमी आजकाल फार बडबडत असते. काय सांगते काही नीट समजत नाही मला. लहानपणी नाही का, त्ता, प्पा असलं काहीतरी बरळत बसायची - लक्ष दिल नाही की राग यायचा बाईंना! आता सुद्धा तसंच कौतुकानी बघत बसते मी तिच्याकडे. काय मोठमोठाल्या गोष्टी सांगत असते - कोणीतरी लहान मुलगी म्हणे आगगाडीतून पहिल्यांदा आईबाबांच्याबरोबर गेली होती, आणि आईनी गाडीत विकायला येणारे पदार्थ घ्यायला मनाई केली पण बाबांनी घेऊ दिले. काय बोलणार ह्यावर - कोण कुठच्या मुलीची गोष्ट सांगते तेही मला माहिती नाही; मी आपली नुसती हसले. म्हटलं, कोण ही मुलगी, कुठे भेटली तुला? तर नाराज झाली बहुतेक, मग मलाही वाईट वाटल. कसलं वाईट वाटल, ते मात्र नाही समजल नीट.
* * *
मनोरमाबाई: मला शंका होतीच ह्या शेखरबद्दल पहिल्यापासून! आज अगदी जीवावरच उठला ना माझ्या शमीच्या! मी ओरडले जोरानी, म्हणून ठीक; नाहीतर ढकलली असती तिला गाडीबाहेर बहुतेक ह्याने. संतापाला सुद्धा काही मर्यादा असावी का नाही?

शाल्मली: काही सांगू नकोस मला! आईसमोर माझ्या अंगावर एवढ ओरडायला हव होत? काय एवढी मोठी चूक झाली माझी? दोन बिलं भरायची राहिली ना? काय फरक पडतो मोठा? उशीर तर नाही ना झालाय? तिच्यासमोर मला मूर्खात काढलस! बिचारी घाबरली ना ती. ओरडली म्हणजे, साहजिक आहे - तिच्या नाही लक्षात येत फरक, छोटे खटके आणि मोठी भांडणं ह्यामधला. तिची परिस्थिती तुला माहित्येय.

मनोरमाबाई: काय विचित्र परिस्थिती आहे खरच! खूप जोरात ओरडायचंय मला, पण घशातून शब्दच फुटत नाही! हे असं का होतंय, मला काही दिसत का नाहीय; मी आंधळी झाले? शमीच्या रडण्याचा आवाज येतोय, नक्की तो शेखर मारत असणारे तिला. थांब, थांब शमी; आलेच मी... मला दिसत असतं ना धड, तर दोन मिनिटात आलेच असते....

शाल्मली: आले, आले अग! किती घाबरवलस आम्हाला! काही आंधळी बिंधळी नाहीस, चांगल छान दिसतंय तुला. हा बघ दिवा लावला ना; झालं समाधान? कशाला? कसले वळ? काहीतरी काय बोलतेस आई, शेखर कशाला मला मारेल? आणि मी घेईन मारून - वेडी कुठची? अग, नवरा-बायकोची भांडण नाही का होत? म्हणजे काय कोणी कोणाला मारत नाही. झोप बघू शांतपणी!
अरे देवा, हे एक नवीनच!
* * *
शाल्मली: डॉक्टर, आजकाल तिची झोप पार उडालीय. दोन तास मुश्किलीनी झोपत असली रात्रीची तर! दिवसासुद्धा नुसती बसून असते, कळत नाही झोपेत आहे, का तंद्री लावून बसल्येय. खूपच जास्त ओढल्यासारखी वाटते ना. हो, पण सेफ आहेत ना ह्या? म्हणजे, तिला आणखी काही त्रास नको व्हायला. ठीक आहे, आधी दोन देऊन बघेन, फायदा होतो, झोप लागते अस वाटल, तर मग हळूहळू कमी करता येतील. तिला औषधांचा वगैरे अगदी भयानक तिटकारा. त्या गोळ्या तिच्या घशाखाली उतरवायच्या काही सोपं नाहीय.
* * *
शाल्मली: हो, झाला खरा फायदा त्या गोळ्यांचा. रात्री जरा शांत झोपते तरी. मी तर त्याचंच प्रिस्क्रीप्शन वाढवून घ्यायला आले होते. नाही, परवापासून एक-एकच द्यायला लागलेय.

मनोरमाबाई: आई मला मुळीसुद्धा आवडत नाही! म्हणाली होती झोपताना चॉकलेटच्या दोन गोळ्या देणार. पण आता म्हणते, नाही एकच! खोटं सांगितलं! म्हणे एवढ्या नाही खायच्या. दात किडतील ना, एकच मिळणार म्हणे. मला अगदी आवडत नाही आई. पण गम्मत माहित्येय, मला ठाऊक आहे तिनी गोळ्यांची बरणी कुठे ठेवल्येय. ...
चांगल्या मुठभर घेतल्या, आणि तोंडात टाकल्या. पटकन आली म्हणजे! घाईघाईनी उघडली ना बरणी, तर थोड्या सांडल्या. श्रीधरचा हात असाच थरथरत होता पाकीट उघडतांना, मग त्या गोळ्या सांडल्या खाली. उचलायला गेलो आम्ही दोघं... एकदम... गोळ्यांच्या ऐवजी त्याची बोटंच हाताला लागली.. इश्श्य, वेड्यासारखा बघतच राहिला माझ्याकडे. काय खुशीत होता! अगदी तस्साच, शमीला हॉस्पिटलमध्ये माझ्या कुशीत बघून, टक लावून बघत राहिला माझ्याकडे. खर तर किती त्रास झाला होता तेव्हा मला, पण त्याचा चेहरा बघितला, बाळाला बघितलं आणि सगळ विसरूनच गेले. म्हणाला तुझी मुलगी अगदी तुझ्यासारखी दिसते! म्हणजे, ... शमी मुलगी माझी? ... पण मग आता गोळ्या देते ती कोण? आई ... मुलगी... कोण? कोणाची? श्रीधर म्हणायचा ना, तसा गोंधळ आहे नुसता डोक्यात माझ्या! म्हणायचा? ... का म्हणतो? श्रीधर, श्री! कुठे आहेस तू? कुठे... आहेस... तू...
* * *
शेखर: थँक्यू! तुम्ही एवढ आलात भेटायला. शमी सावरतेय थोडी; नाही, खरं आहे, त्यांना त्रास काही नाही झाला. हो, झोपेतच. पण आम्हाला फार मोठा धक्का. कालपर्यंत अगदी गप्पच होती, सुन्न बसून रहायची; पण आज पहिल्यांदा थोड तरी जेवली - म्हणजे तसं बळजबरीनीच खायला लावलं. पण लक्षच नसत कुठे तिचं. खरं आहे, थोडा वेळ लागणारच. पण सावरेल, नीलच्या मागे मागे राहिली की हळू हळू सावरेल. अगदी नक्की, काही मदत लागली तर सांगेन. थँक्यू हं, परत एकदा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह! Sad अगदी डोळ्यासमोर उभे राहीले!
आमच्याकडे अर्ली स्टेज सुरु आहे त्यामुळे अजूनच हलायला झाले.

'जीवनात ही घडी कधी न येऊ दे', अशी प्रार्थना करावी.
आणि '...अकस्मात तो ही पुढे जात आहे' ही तर काळाची रीतच.

मुलीचं आई होणं आणि आईचं मुलगी होणं, छान मांडलंय!

हृद्य लिहिलंय, चटका लावणारं!

एक सुचवू का? जिथे पात्र बदलतं तिथे परिच्छेद पाडा, वाचायला आणखी सुलभ होईल.

प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
@स्वाती, पात्र बदलतं तिथे नवीन परिच्छेद आहेतच. कथेची रचना कालक्रमाने केली असल्यामुळे, मध्ये काही काळ लोटला आहे दर्शवण्यासाठी तीन ऍस्टरीस्क्स दिले आहेत.

@वावे, शमी त्या मार्गाने जाईल असं सुचवायचं नव्हतं; मृत्यूप्रसंगी भेटायला येणाऱ्यांशी संभाषण कसं एकाच साच्यातील होतं ते दाखवायचं होतं.

>>> पात्र बदलतं तिथे नवीन परिच्छेद आहेतच.
ओके, मग शिवाय एखादी ओळ मध्ये सोडली तर?
(तुम्ही इतकं चांगलं लिहिलंय ते वाचकांपर्यंत नीट पोचावं या प्रामाणिक कळकळीपोटी लिहीत आहे, बाकी अर्थातच तुमचा निर्णय. Happy )

हे बघा फोनवर वाचताना मला हे असं सगळं सलग दिसतंय:

IMG_0853.jpegIMG_0854.jpeg

@स्वाती: समजलं; दोन पॅराग्राफमध्ये मोकळी जागा सोडायची तुमची सूचना छान आहे. केली दुरुस्ती.