चक्र (भाग १)

Submitted by Abuva on 11 April, 2024 - 23:38
Gemini Generated image

मी घर शोधत होतो. का, ती स्टोरी नंतर कधी तरी! ब्रोकरनं संध्याकाळची वेळ दिली होती.
बायकोही बरोबर होती. ती म्हणाली जरा दिवसा उजेडी जाऊ. बरं! आजूबाजूची वस्ती (लोकॅलिटी रे - इति पत्नी), दुकानं, असा एकंदर अंदाज घेऊन आम्ही तरीही ठरल्या वेळेच्या दहा-पंधरा मिनिटे आधीच दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचलो. चार बिल्डिंगांचा कॉम्प्लेक्स होता. तिथल्या वॉचमनच्या कृपेनं बाहेर उभं रहावं न लागता, आत पोडियमवर कट्ट्यावर बसायला मिळालं. समोरच प्ले एरिया होता. तिथे लहान मुलं खेळत होती. दोन-तीन आजी-आजोबांचे गट गप्पा मारत होते. आम्ही ती मजा बघत उभे होतो. पलिकडे स्विमींग पूल दिसत होता. सगळा चकाचक नजारा होता. बायको म्हणालीसुद्धा, "बाळ्या, हे जरा हाय सोसायटी प्रकरण दिसतंय. झेपणार का आपल्याला?"
"बघू गं. उगा घाई नको. आधी फ्लॅट तर बघू. मग हाय-लो काय ते ठरवूयात."
"नाही, नंतर हाय हाय करावं लागेल!" तशी बायको मधूनमधून विनोद-बिनोद करत असते.
"बरा होता हं, हसायला हरकत नव्हती. तुझ्या पाचकळ विनोदांपेक्षा तर बराच बरा होता." काय, आलं ना लक्षात?

पार्किंग लेव्हलचं दार उघडून एक टकाटक स्त्री हातात भाजीच्या पिशव्या वगैरे घेऊन प्ले एरियाकडे गेली. तिच्या तोऱ्याकडे पाहून बायकोनं एक सहेतुक कटाक्ष माझ्याकडे टाकला. मी चाणाक्षपणे, संभाव्य धोक्याच्या जाणिवेने, अगोदरच फोनमध्ये डोकं घातलं होतं. पण त्यामुळे त्या स्त्रीचं अवलोकन(!) करणं राहिलंच...

त्या स्त्रीनं "जाई, व्योम चला आता अंधार पडायला लागलाय.." अशी हाक दिली.
तिनं असं चक्क मराठीत म्हटल्यावर मी उलटं बायकोकडे पाहिलं. तिनं मान हलवली. "दिसतायत काही मराठी मंडळी" असा तिनं अभिप्राय दिला.
तेवढ्यात मला खाली गेटवर आलेल्या ब्रोकरचा फोन आला. मी त्याला आम्ही कुठे आहोत ते सांगितलं. येतो म्हणाला. हे होई पर्यंत त्या बाईच्या हाकाटीचा उपयोग होऊन एक चार-पाच-सहा वर्षांचा मुलगा धावत येऊन तिला बिलगला होता. तिनं परत आवाज दिला, "जाई, चल आता.."
तीन-चार आठ-दहा वर्षांच्या मुलींचं काहीतरी मेतकूट चाललं होतं. त्यातून एका मुलीनं "काय गं आई..." अशी किरकिर केली.
तेवढ्यात तिथल्या सिनिअर सिटिझनच्या ग्रुपमधल्या एका वृद्धानं उठून तिला हात करून सांगितलं, "मी आणतो तिला." मग हिनंही हात करून ठीक आहे असं दाखवलं.
मला त्या स्त्रीचा आवाज म्हणा, काही तरी ओळखीचं वाटत होतं. आता तिचं लक्ष आमच्याकडे गेलं बहुतेक. आणि तिनं "अरे, एबी सर!" असा उद्गार काढला. "आज इकडे कुठे?" बोलता बोलता तिनं डोळ्यांवरचा गॉगल काढला.
"आयला, उलुपी.. आपलं...", मला काय तिचं खरं नाव पटकन आठवलं नाही!
ती जोरात हसली, "वैदेही, सर!"
"हो, वैदेही, वैदेही,.. येस करेक्ट..." मी घोळात, बायको चक्रावलेली, आणि तेवढ्यात वर आलेला ब्रोकर दुग्ध्यात.
मग तिला थोडक्यात सांगितलं का आलोय ते. बायकोची ओळख करून दिली. तंवर तिकडे ब्रोकरचा बहूमूल्य वेळ फुकट जात असल्यानं त्याची तडफड सुरू झाली. त्याची किरकीर ऐकताच तिचा आवाज बदलला. तिनं थंड आवाजात विचारलं, "कोणता फ्लॅट दाखवणार आहात तुम्ही?"
"अमुक-तमुक"
"तो माझाच फ्लॅट आहे. एक मिनिट थांबा." तो गार.
"सर, तुम्ही फ्लॅट बघून या. पण घरी आल्याशिवाय जायचं नाही हं."
मग ते नेहमीचं नाही हो, कसचं-कसचं, नको-नको, हो-हो वगैरे बयजवार झालं.
आमच्या सगळ्या नेहेमीच्या कारणांना तिनं परफेक्ट टांगलं. येतो हे कबूल करवून मगच तिनं आम्हाला ब्रोकरबरोबर जाऊ दिलं.
"खरं तर मीच आले असते दाखवायला, पण आता याला, जाईला भूक लागली असेल. तुम्ही या, तोपर्यंत मी सगळं करून-आवरून ठेवते."

लिफ्टमध्ये बायको म्हणाली, "हीच का तुझी उलुपी? मग आता अर्जुन, चित्रांगदाही भेटतील का?" तिला काही कथा माहिती होत्या. मी फक्त खांदे उडवले. या मंडळींचा संपर्क सुटून पाच-सात वर्षं तरी झाली असतील. आता कोण काय करतंय याचा फार अंदाज नव्हता.
"बघू या."

---

आम्ही फ्लॅट बघून खाली आलो. उलुपीच्या घराचा दरवाजा उघडाच होता.

बरं, वाचकहो, आपण तिला उलुपीच म्हणणार आहोत, अर्जुन हा अर्जुनंच राहील आणि चित्रांगदाच! आता एवढ्या कथांनंतर कोण त्यांच्या खऱ्या नावांची परत नवी ओळख जोडत बसणार, नाही का? फक्त उलुपीचं गुपित फुटलं! तर ते असो.

तर, आम्ही खाली म्हणजे उलुपीच्या फ्लॅटवर आलो. बरं, एक सांगायचं राहिलं. जो फ्लॅट आम्ही पाहिला ना त्यावरची नावाची पाटी काढली होती. पण ती अक्षरं मागे ठसे सोडून जातात ना? त्यात मला चित्रांगदेचं नाव वाचता आलं होतं.

तर, ते वृद्ध गृहस्थ सोफ्यावर बसले होते. मगाशी खालती ज्यांनी उलुपीला हात केला होता ना तेच ते. बहुतेक आमची वाटच पहात होते. "उलुपी, आले गं सर" असा त्यांनी आवाज दिला. "या, या बसा." आम्ही स्थानापन्न झाल्यावर त्यांनी स्वतःच ओळख करून दिली, "मी.. म्हणजे अर्जुन माझा मुलगा. येईलच तो आता." मी माझी ओळख सांगितली, बायकोची ओळख करून दिली. नमस्कार चमत्कार झाले. उलुपीनं आतनंच सांगितलं, "बाबा, आतच घेऊन या नं त्यांना." आत गेलो. जाई आणि व्योम डायनिंग टेबलवर बसून खात होते. त्यांना उलुपी वाढत होती. तंवर बाबांनी सूत्रं हातात घेतली होती. मग "तुम्ही कोणाचे कोण, हा माहिती आहे का, कुठे रहाता, मग ते माहिती असतीलच! ते ह्यांचे ते आता काय करतात, गेले?! कधी? तुम्हाला मुलं बाळं किती? सध्याची शिक्षणपद्धती, यंदा पाऊस कमीच झालाय, गवारीपासून ते सोन्याच्या भावापर्यंत, आणि हो, तब्येत आणि डॉक्टर" वगैरे वगैरे गप्पा झाल्या! त्यात आमचा नाष्टाही आटपला! "बरंय मग, आता तुम्ही घ्या चहा उलुपीबरोबर. मी मुलांचा अभ्यास घेतो जरा" असं म्हणून ते मुलांना हाकारायला लागले. ती केंव्हाच उधळली होती. मधल्या काळात उलुपीसुद्धा माझ्या बायकोला घेऊन स्वयंपाकघरात (किचन, किचन म्हणायचं त्याला - इति बायको) गेली होती. ती बाहेर येत म्हणाली, "बाबा, मुलं काकूंकडे गेली आहेत." मग ते त्यांना बोलवायला बाहेर गेले.
उलुपी मला म्हणाली, "सर, मी सांगितलं आहे ताईला, आता तुम्ही जेऊनच जा."
मी आडवा. माझ्या बायकोची ताई झाली होती! आणि ज्या मुलीचं नाव मला तासाभरापूर्वी धड आठवत नव्हतं, तिच्या घरी जेवायचं? बायकोही मान डोलवत होती. धन्य त्या माऊलीची!
उलुपी समजुतदारपणे हसत म्हणाली, "मकरंद, म्हणजे तुमचा अर्जुन, रस्त्यातच आहे! येईलच इतक्यात. बाबा, सर आणि ताई जेवायला थांबताहेत", वाक्याचा उत्तरार्ध आत आलेल्या म्हाताऱ्याला उद्देशून होता. (अर्जुनचंही खरं नाव फुटलं की!) बाबा काही म्हणायच्या आत उलुपीनं त्यांच्याबरोबर आलेल्या जाई आणि व्योमला पुढे बोलावलं. "सर ही जाई, माझी मुलगी, आणि हा व्योम, उर्मिलेचा मुलगा... जाई, व्योम, चला नमस्कार करा काकांना आणि मावशीला!" (वाचकहो, उर्मिला म्हणजेच...? कळली का खरी नावं? काय फरक पडला? आयुष्यातलं महाभारत बदलणार आहे का?)
च्यायला, फारच कौटुंबिक होत होता मामला. काका काय, मावशी काय, कसला नमस्कार? मीच मुलांच्या हातात काही ठेवायला विसरलो...
खरं तर इव्हन जेव्हा आम्ही एकत्र काम करायचो ना, तेंव्हाही मला यांच्याशी एवढी खासगत, घसटण आठवत नव्हती हो! शेवटी मी बॉस पडलो.
"मला नं पहिली नोकरी या काकांनी दिली, आणि बाबाला सुद्धा. आणि चित्रांगदा मावशीलाही!" हे खरं होतं. पण म्हणून... असो.
"चित्रांगदा कुठे आहे सध्या?" या माझ्या प्रश्नावर उलुपीनं माझ्याकडे बघितलं, एक सेकंद थांबली, आणि म्हणाली, "सध्या बंगलोरला आहे ती."
"बरं, बरं! म्हणून तिचा फ्लॅट विकताय का?"
हे ऐकून म्हातारा मुलांना म्हणाला, "चला जाईताई, व्योमला घेऊन चला! आपल्याला होमवर्क करायचाय ना, चला, चला..."
पुढचं वाक्य मला उद्देशून होतं. "बसा हो तुम्ही गप्पा मारत. जेवताना भेटूच.."
माझा प्रश्न अनाठायी होता हे मला कळलं. नसतं कळलं तरी नीट कळवायला बायकोचे मोठे झालेले डोळे होतेच!

तेवढ्यात अर्जुन आलाच. मग मुलं बाबा, बाबा करत त्याच्याभोवती घोटाळली. त्यानं व्योमला उचलून घेतलं आणि जाई त्याचा हात धरून आत आली. "काय सर, किती वर्षांनी!" करत शेकहॅन्ड केला, बायकोला (माझ्या) नमस्कार घातला. आणि मग दोन्ही मुलांना ताटकळत उभ्या असलेल्या त्याच्या वडिलांबरोबर त्यानं पिटाळलं.
"सर, आलोच फ्रेश होऊन. जेवायला थांबताय ना?"
उलुपीनंच उत्तर दिलं, "हो, हो थांबतायत ते. तू ये पटकन आवरून"

माझी बायको किचनमध्ये उलुपीला स्वैपाकात मदत करत होती. त्यांच्या गप्पा मला ऐकू येत होत्या. त्या म्हणजे मगाशी मी आणि अर्जुनच्या बाबांनी मारलेल्या गप्पांचं बायकी व्हर्जन होतं.

च्यायला, नेमकी फोनला रेंज नव्हती, नाही तर लिंक्डईनवर बघता आलं असतं हे लोकं काय करतात आजकाल. माझ्या डोक्यात एक किडा वळवळत होता. जाई आणि व्योम दोघंही अर्जुनाला बाबा म्हणत होते! आणखी एक - आणि चित्रांगदा इथे नाही तर तिचा मुलगा इथे काय करतोय? काय नाव होतं तिच्या नवऱ्याचं?

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा मस्तच.
आता तर बब्रुवाहन, इरावन पण आले.
ही सीरिज मस्त आहे. काही बारीक निरीक्षणे छान टिपली आहेत.
छान सुरुवात! तुमच्या कथांत गुंतुन जायला होतं. >>>111

हि चौकडी छान आहे, वाचताना कुठेतरी FRIENDS किंवा दुनियादारी आठवल्या शिवाय राहत नाही
प्रत्येक कथा खूप छान आहे
पण माझा काहीतरी घोळ होतोय
मागच्या कथेत चित्रांगदा मार्केटिंग मॅनेजर करण बरोबर जाणार होती आणि उलुपी आणि अर्जुन ची फर्स्ट Anniversary होती,
त्या आधी कधीतरी चित्रांगदा आणि अर्जुन ची मैत्री वेगळ्या लेव्हल ला कॅम्प साईट वर गेली होती आणि तेंव्हा उलूपी च लग्न कुणा दुसऱ्या शी झाल्याचं ह्याच बॉस न सांगितलं होत
आणि हो ही उलुपी साऊथ इंडीयन होती ना?

असो काहिही असेल तरी प्रत्येक कथा वाचताना मजा येते. अभियांत्रिकी मधे असलेल्यांना ह्यातील संदर्भ अगदी जवळचे वाटतील पण इतरांसाठी ही ते फार क्लिष्ट नाही केलेत त्यामुळे वाचताना हरवल्या सारखं होत नाही.

येऊ दे अजून ह्या महाभारताचे अध्याय