आवर्त

Submitted by Abuva on 9 April, 2024 - 12:34
Gemini generated version of Starry Nights by Van Gogh

"खरं बोलू? बुरा मत मानना"
"बोला ना. आम्हाला तुमचा फीडबॅक हवाच आहे."
"कुत्रं विचारणार नाही या यूआयला."
या अचानक झालेल्या हल्ल्यानं चित्रांगदा एकदम बॅकफूटला गेली. "काय?...”
"पण का? आम्ही स्टॅन्डर्ड्स फॉलो केली आहेत." मीटिंगला जमलेल्या टीमकडे बघत तिनं करणला प्रतिप्रश्न केला.
"असतील, पण मार्केटला स्टॅन्डर्ड हवं आहे असं कोणी सांगितलं?"
"सांगायला कशाला पाहिजे? जे वापरायला सोपं ते चांगलं. सगळ्यांना हा यूआय ओळखीचा आहे. त्यामुळे सगळ्यांना सोयिस्कर पडणार, हे आंधळासुद्धा सांगेल."
"दुर्दैवानं आपण आंधळ्यांसाठी नाही तर खऱ्या यूजर्स साठी सिस्टम बांधतोय. त्यांच्या गरजा तुम्हाला माहिती आहेत? स्मार्टफोनवर चालेल?"
आता चित्रांगदाला प्रतिहल्ल्याची संधी मिळाली.
"तुम्ही नवीन आला आहात. यापूर्वी जे प्रॉडक्ट डिझाईन डिसीजन घेतले आहेत त्यांची नीट माहिती करून घेतलीत तर बरं होईल. सगळ्यांचाच वेळ वाचेल."
करणचं उत्तर नमतं घेणारं होतं.
"ठीक आहे. मी वाचतो, समजावून घेतो. जर चुकीच्या समजुतींवर अवलंबून घेतलेले निर्णय असतील तर ते बदलावे लागतील. आणि येस, परत भेटू या. तुमचा वेळ वाया गेला असेल तर क्षमस्व. पण आपली ओळख झाली हे महत्त्वाचं आहे. कारण प्रॉडक्ट आकार घेईल तो या चर्चांमधूनच."
पण चित्रांगदा जुळवून घ्यायला इतक्यात तयार नव्हती. तिनं करणला झटकला, "वेल, नाईस मीटिंग यू."

---

चित्रांगदा चिडून तावातवानं या प्रोजेक्टच्या एक्झिक्युटिव्ह स्पॉन्सरकडे गेली.
"कोण आहे हा करण? का आणला ह्याला मार्केटींग मॅनेजर म्हणून? साधं बोलायची पद्धत नाही? का ऐकून घ्यायची आम्ही असली बहकलेली बडबड? समजतो कोण स्वतःला? एवढा माज?"
बॉसनं शांतपणे काय झालं ते समजावून घेतलं. मग हसला. "म्हणजे योग्य माणसाला आणलंय तर..."
चित्रांगदा गारच पडली. दुसऱ्या क्षणी ताडकन उठली आणि...
ती काही रागात बोलणार तोच त्यानं हात वर केला आणि तिला थांबवलं. सावकाश आपल्या जागेवरून उठला आणि त्याच्या रूममधल्या कॉन्फरन्स टेबलाजवळ जाऊन बसला. चित्रांगदेला ये बस म्हणाला.
कॉर्पोरेट जगतात छोट्या छोट्या कृतींतून फार महत्त्वाचे संदेश जात असतात. खरं तर किती साधी गोष्ट - टेबलापलीकडून उठून मीटिंग टेबल वर येऊन बसणे. पण यात बॉसनं किती खुबीनं दर्शवलं होतं, की आता आपण बरोबरीच्या नात्यानं चर्चा करणार आहोत! तो जेव्हा टेबलामागच्या आपल्या खुर्चीत असतो, तेव्हा त्याचं काम असतं निर्णय द्यायचं. ती खुर्ची सत्तेचं निदर्शक आहे. पण इथे या डिस्कशन टेबलवर? येथे चर्चेस वाव आहे! या एका कृतीनं वातावरण निवळलं. या पाच-सात सेकंदात तिच्या डोक्यात गेलेली तिडीक काहीशी ओसरली होती.
"चित्रांगदा, तू करणचा सीव्ही बघितला आहेस?"
"नीट नाही. पण माहिती आहे की, आपल्या कॉम्पिटीटर कडून आपण त्याला रिक्रूट केला आहे. आणि त्याचे अगोदरचे प्रॉडक्ट फेल गेले आहेत."
"खरंय. त्याचे गेले दोन स्टार्टअप्स बंद पडले आहेत ही गोष्ट खरी आहे. त्याचं वय फार नाही. पण त्याचा प्रॉडक्ट मार्केटिंगचा अनुभव जबरदस्त आहे. मी करणला शॉर्टलिस्ट करण्याआधी बराच अभ्यास केला. त्याच्या दोन कंपन्या फ्लॉप गेल्या हे खरंय. पण त्यानं ज्या ज्या कस्टमरना कॉन्टॅक्ट केला नं, ते आजपर्यंत त्याचं नाव घेतात. त्याच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचं कौतुक मी भल्या भल्यांकडून ऐकलंय. मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा मलाही त्याच्यात वेगळा स्पार्क जाणवला. ही सीज दी जंगल व्हेअर अदर्स गेट स्टक विथ ट्रीज. दोन निअर मिस फेल्युअर्स मुळे तो खचला नाहीये, तर त्याची भूक वाढली आहे.
आपला प्रॉडक्ट एसएपीवर अवलंबून आहे, त्याला कॉम्प्लिमेंटरी आणि कंपॅटीबल आहे. मी त्यांच्या इंडिया डेव्ह रिलेशनशिप टीमशी बोललो. का? तर करण हा गेल्या दोन्ही प्रॉडक्ट्समध्ये याच मॅनेजर बरोबर काम करत होता. ही रेकमेंडेड करण रेडीली. या पेक्षा मोठी रेकमेंडेशन काय असणार आहे?"

चित्रांगदाला आता चित्र स्पष्ट होऊ लागलं होतं.

"आय सेन्स सिमीलर हंगर इन यू. तू टेक्निकल बाजू संभाळ, तो नॉन-टेक्निकल बाजू बघेल. जितक्या जास्त फ्यूचर कस्टमर्स पर्यंत आपण पोहोचू शकू तितका आपला प्रॉडक्ट फीचरसेट तगडा बनेल. आणि यासाठी करण आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे."

याच धर्तीवर त्यांचा संवाद झाला. चित्रांगदाला पुढच्या वाटचालीचा अंदाज आला होता.

---

चित्रांगदा बॉसशी बोलून परत आली. अर्जुन नव्हता, पण उलुपी वाट बघत होती. ती मगाशी करणनं केलेल्या हल्ल्यामुळे अस्वस्थ होती. ती मीटिंग नव्या प्रॉडक्ट मार्केटिंग मॅनेजर म्हणून जॉईन झालेल्या करण बरोबर होती. टीम आणि प्रॉडक्टची ओळख असा अजेंडा होता. आणि पहिल्या घासालाच माशी शिंकली होती!
चित्रांगदेचा चेहेरा बघून उलुपीला अंदाज आला की चित्रांगदेच्या मनात काही तरी घोळतंय. चित्रांगदा म्हणाली, "चलतेस कॉफीला?" दोघीही कॅफेटेरियात गेल्या. नवीनच बांधलेल्या टॉवरच्या सातव्या मजल्यावरून कोरेगाव पार्कच्या हिरव्या गर्द झाडीच्या नजाऱ्याकडे बघताना चित्रांगदेचा चेहेरा विचारमग्न होता. "आपल्याला वाटतंय तितकं मॅटर साधं नाहिये. करणला प्रॉडक्टचा चांगलाच अनुभव आहे, आणि सेन्स आहे. त्याला बॉसचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आय बिलिव्ह, की त्याला, म्हणजे त्याच्या मताला, जास्त भाव मिळणार. आपलं जरा कमी ऐकलं जाईल. ठीक आहे. पण वी शुड पुट अवर फूट डाऊन ऑन अवर टॉपिक्स. लेट मी डू सम रिसर्च. तू पण बघ यूआयवर. त्याचा यूआयला इतका ड्रास्टिक रिस्पॉन्स का आला ते शोधलंच पाहिजे. ॲन्ड नेक्स्ट टाईम वी शुड बी रेडी.."
उडुपी म्हणाली, "हा रेडीमेड यूआय वापरणं आपल्यासाठी ॲडव्हान्टेजस होतं. पण आता जर बदल करावा लागला तर दुप्पट‌ काम पडेल. ॲट लीस्ट सुरूवातीला."
"हं..."
"देणार आहेत का आपल्याला तेवढा जास्तीचा वेळ?"
"बघू. पण पुढच्या आठवड्यात सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे हे खरं."

---

उलुपीनं चित्रांगदेला हाकारलं. तिचा चेहेरा खुलला होता. "हे बघितलं का?" तिनं एका यूआयची काही स्क्रीन स्क्रोल केली.
"काय आहे? कुठलंय प्रॉडक्ट?"
"ते सांगते, पण यूआय कसा आहे ते सांग."
"व्हॉट्स डिफरन्ट? आपल्या सारखाच तं आहे"
"हेच करणचं जुनं प्रॉडक्ट आहे."
"इतकं ढक्कण?!"
दोघी खिदळायला लागल्या. ते ऐकून अर्जुनही आला. मग त्यांनी त्याला सगळी स्टोरी सांगितली. ते ऐकून अर्जुन म्हणाला, "तुम्ही करा चेष्टा पण मला वाटतं, वी नीड टू लुक फर्दर. त्याला हाही यूआय आवडला नसणार. पण तिथे लोकांनी त्याला महत्त्व दिलं नसेल. आणि मग तेच प्रॉडक्टच्या फेल्युअरचं कारण असेल."
"कोणास ठावूक..."
"आणि तसंही किती घिसापिटा लूक-ॲन्ड-फील आहे आपल्या प्रॉडक्टचा." त्यानं उलुपीकडे बघत नाक मुरडलं...
"ए, तू तुझा शहाणपण सर्व्हर-साईडला वापर.." हे म्हणताना खरं तर उलुपीचा आवाज आणि चेहेरा पडला होता. सगळेच विचारात गढले. यूआय हा उलुपीचा प्रांत होता, तरी प्रॉडक्ट या तिघांचा होता.
"तसं नाही गं, पण मला जे खरं वाटलं ते सांगतोय."
चित्रांगदा गंभीर झाली, "उलुपे, अर्जुना, अपनी इज्जतका सवाल है. पण ढांसू काही तरी शोधलं पाहिजे. मार्केटिंग समोर कमी पडून चालणार नाही."

---

करण हिट द ग्राऊंड रनिंग. म्हणजे काय तर त्यानं पुढच्या दोन आठवड्यात तीन कस्टमर मीटिंग घडवून आणल्या! धडाधड! आणि कुणी तरी मारून मुटकून आणलेली लोकं नाहीत, तर जे या प्रोसेसेस आणी रिक्वायरमेंट रोज खेळत होते अशी मंडळी. त्यातला एक कस्टमर तर एसएपी न वापरणारा होता. चित्रांगदा चक्रावली. करण म्हणाला, "आपण एसएपी बरोबरच इतर ईआरपी समजावून घेतल्या पाहिजेत. आपल्या रोडमॅपसाठी उपयुक्त ठरतील. " झालं तसंच. त्यांच्या ओरॅकल ईआरपीमधे यांचा प्रॉडक्टमधल्या काही खुब्या होत्या, त्यामुळे यांना रेडिमेड आयडिया मिळाल्या! कस्टमर कधी, कुठे आणि काय वापरणार आहे याच्या आयडिया पक्क्या झाल्या. आणि त्यांना नवीन यूआयची गरजही कळली अन् पटली!
रोजच्या प्लॅन्ड मीटिंग्ज, कॉफी स्टेशनजवळच्या अनौपचारिक गप्पा, कस्टमरकडे जाता येतानाच्या गप्पा... कलाकलानं चित्रांगदा आणि टीम यांची करणशी उत्तम घसटण झाली. गोष्टी अरे-तुरेवर आल्या.
बॉसची निवड योग्यच आहे असं एकमेकांविषयी त्यांना वाटू लागलं होतं!

----

मुंबईला एका मोठ्या कस्टमरबरोबर मीटिंग होती. त्यासाठी करण आणि चित्रांगदा बॉसबरोबर पुण्याहून मुंबईला चालले होते. गाडीत विषय निघाला. करण म्हणत होता "मार्केटिंगचा फोकस कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे, हे ठरल्यानंतर ती 'कशी' आहे ह्यावर जास्त असतो."
चित्रांगदा म्हणाली, "प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून ती रिक्वायरमेंट 'का' आहे हे कळणं आवश्यक असतं."
करण मान डोलवत म्हणाला, "आमचं काम, एखादं ओपनिंग मिळालं ना की आणखी खोदत खोदत जायचं हे असतं. याच्या मागचा विचार असा असतो की, एकमेकांत गुंतलेली फंक्शन्स असतात. त्या माध्यमातून एखादी शेजारची, ॲडजसंट गरज दिसू लागते."
चित्रांगदा म्हणाली, "आम्ही 'का'चा मागोवा घेतो ना तेव्हासुद्धा इतर कारणं दिसतात. पण आम्हाला ती नजरेआड करावी लागतात. कारण गुंता सोडवून रूट कॉज शोधणं हे क्लीन सिस्टीम डिझाईन करण्यासाठी आवश्यक असतं."

बॉस हे बघत होता, ऐकत होता.

करण हसला, "आमचा फोकस हा शेप ऑफ द टार्गेट प्रॉब्लेम याच्यावर जास्त असतो". चित्रांगदा उत्तरली, "आम्हाला महत्त्वाचा असतं - शेप ऑफ द सोल्यूशन!"
करण म्हणाला, "तो सोल्यूशनचा शेप कळला नं की आम्ही कस्टमरच्या दुखऱ्या नसा कशा दाबायच्या ते ठरवू शकतो. तिथेच मग प्रॉडक्ट प्रायसिंग ठरायला सुरुवात होते".
चित्रांगदा म्हणाली, "आम्हाला सोल्यूशनचा शेप कळला नं, की मग डिटेलिंग, प्लॅनिंग, केपेबिलिटी ॲनालिसिस सुरू होतं.”

तिच्या यिनला त्याच्या यांगची जोड मिळत होती.
एका मनोज्ञ नात्याची सुरुवात होत होती.

----

कॉन्फरन्सला प्रॉडक्ट लॉन्च ठरला. त्या वर्कलोडखाली उलुपी आणि अर्जुन प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधे आकंठ बुडले. तिकडे चित्रांगदा सगळ्या स्टेकहोल्डर्सची एक्स्पेक्टेशन्स मीट होताहेत हे जमवून आणायच्या मागे लागली. (हे मराठी वाक्य आहे?! Lol ) आणि एकदा चित्रांगदा आणि टीम ठरलेले मुद्दे डिलीव्हर करणार म्हटल्यावर सगळे प्रॉस्पेक्ट्स कॉन्फरन्सला कसे हजर होतील याच्या मागे करण हात धुवून लागला..

बॉसनं कॉन्फरन्स प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रीत केलं होतं. लय हुशार माणूस तो (उगाच का बॉस झाला!) त्यात त्यानं करण आणि चित्रांगदा यांच्यातल्या कारमधल्या यिन-यांग संवादाचा संदर्भ घेऊन त्यांना रोल दिले होते.

----

मुंबईत एसएपीची तीन दिवसांची कॉन्फरन्स झाली. रॉकिंग कॉन्फरन्स झाली. कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशी आपला प्रॉडक्ट लॉंच झाला. ॲन्ड इट वॉज सेन्सेशनल! करण कस्टमरांच्या डोळ्यासमोर त्यांचे प्रॉब्लेम्स उभे करत होता, आणि चित्रांगदा त्याला प्रॉडक्ट फीचर्स मधून उत्तरं देत होती! इट वॉज एक ग्रेट टॅंगो बाय करण ॲन्ड चित्रांगदा. त्या प्रेझेन्टेशनला एक लय होती, एक ऊर्जा होती, एक झिंग होती... आणि कस्टमर्स त्या आवर्तात खेचले जात होते!

----

त्या प्रेझेन्टेशन नंतर मात्र करणला श्वास घ्यायला वेळ नव्हता इतके मार्केटिंग कॉल्स ठरले. इकडे अर्जुन आणि उलुपी यांची टीमही नवीन इंप्लेमेंटेशन्स, नवीन फीचर रिक्वेस्ट्स यात बिझी होती. काही विचारू नका, नुसता धुमाकूळ चालला होता. पुन्हा नवीन कस्टमर येणार. मग त्यासाठी कस्टमर मीटिंग्ज, फॉलोअप्स, डॉक्युमेंटेशन, साईनऑफ्स, नवी रिक्रूटमेंट... पुन्हा नवीन कस्टमर... जणु चक्रीवादळ घोंघावत होतं. साधारणतः महिन्याभरानं कुठे प्रॉडक्ट सक्सेस पार्टी ठेवायला वेळ मिळाला, म्हणजे बघा!

----

जवळपास वर्षभर हे धुमशान चालू होतं. भरपूर कस्टमर मिळत होते, रेव्हेन्यू वेगे वेगे वाढत होता. पण कामाबरोबरच जबाबदाऱ्याही वाढत होत्या. अर्जुन आणि उलुपी यांच्या लग्नाचं पहिलंच वर्ष होतं. पण त्यांना श्वास घ्यायलाही फुरसत नव्हती. जॉईन झाल्या दिवसापासून जे काम अंगावर पडलं होतं ते संपतच नव्हतं. त्यांच्या रोजच्या कामातून वेळ मिळालाच तर उरलेला काळ थकव्यात जायचा. आणि या दुष्टचक्रातून सुटका होण्याची चिन्हं दिसत नव्हती. बॉस या दोघांना इतक्या लवकर अशा तावात आलेल्या प्रॉडक्टमधून कोणालाही बाजूला होऊ देणं शक्यच नव्हतं. उलुपी या सगळ्याला खरं तर मनापासून वैतागली होती.
एकमेकांना वेळ देता येत नव्हता. नवं घर, नवे नातेवाईक, खरं तर दोन्हीकडचे सासू-सासरे-नणंद-मेहुणी असा वाढलेला परिवार या दोघांकडे अपेक्षेनं बघत होता. संसाराची म्हणून जी गृहितकर्तव्यं आहेत ती पार पाडण्याची वाट पहात होती. पण हे दोघं घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे रात्रंदिन कामातच मग्न होते. अर्जुनाला या परिस्थितीचं भान असो वा नसो, पण उलुपी मात्र या प्रती सजग होती. आणि तेच तिच्या वैतागाचं कारण होतं.

----

चित्रांगदा आणि करण दोघेही नुसते सुटले होते. महिन्याचे निम्मे दिवस तरी कस्टमर, डेमो, इंप्लेमेंटेशन या कारणानं भारतभर फिरत होते. कधी एकत्र, कधी आपापले. करण एखादा कस्टमर गाठायचा. मग त्याला डिटेल डेमो दोघं मिळून द्यायचे. कधी टेक्निकल डेमो लागला तर चित्रांगदा एकटीच जायची. मग करण तिच्या रहाण्या-खाण्याची काळजी घेऊ लागला. कुठे रहायचं, कसं जायचं, याचा त्याचा अनुभव दांडगा होता. त्याचा चित्रांगदेला चांगलाच फायदा झाला.
या साहचर्यातून जवळीक निर्माण झाली. जवळकीतून आत्मियता. आणि त्या आपलेपणाचं रूपांतर अस्फुट प्रीती मध्ये कधी झालं ना चित्रांगदेला कळलं, ना ही करणला!

----

अर्जुन-उलुपीच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टी होती. खरं तर टीममध्ये ॲनिव्हर्सरी साजरी करायला उलुपी थोडी नाखुष होती. पण चित्रांगदेनं तिला घोड्यावर बसवलं होतं. अर्जुन - उलुपीचे जवळचे असे काही लग्नाळलेले टीम मेंबर होते. अशी चार-पाच जोडपी एका हॉटेलात डिनरला जमली होती. चित्रांगदेबरोबर करण आला होता. आता तो ही या टीमचा मेंबरच झाला होता म्हणा!
सेटिंग तर मस्त होतं. पूलसाईडला एका बाजूला थोडा प्रायव्हेट असा एरिया होता. त्यात टेबलं मांडली होती. आजूबाजूला खोट्या फुलांचीच पण कलात्मक आरास होती. झगमग नव्हती, तरीही उत्साही असं लायटिंग होतं. मंद आवाजात इंस्ट्रुमेंटल म्युझिक झरत होतं. माहौल झाला होता! अर्जुन आणि उलुपीनं केक कापला आणि उपस्थितांनी जल्लोष केला. आता मंडळी केक खाण्याकडे लक्ष वळवणार तोच करणनं एका काचेच्या ग्लासवर चमचा आपटून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
"माय डिअर गर्ल्स ॲन्ड गाईज, मे आय हॅव युवर अटेन्शन प्लीज?"
करण थोडा ताणाखाली दिसत होता. चेहेऱ्यावर नेहेमीचे कॉन्फिडन्ट भाव नव्हते. हळूहळू सगळे शांत झाले.
"आज आपण अर्जुन आणि उलुपीच्या ॲनिव्हर्सरीला जमलो आहोत. कॉंग्रॅच्युलेशन्स टु देम! सब अपने लोग है. कितना प्यारासा, इंटिमेट, रोमॅन्टिक गेट-टुगेदर है ये! यही मौका है के..." असं म्हणून तो थांबला. समोरच्या फुलदाणीत एक सुंदर गुलाबाचं फूल होतं. ते काढून त्यानं हातात घेतलं. मान खाली घालून एक सेकंद त्या गुलाबाकडे एकटक पहात राहिला. सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली. नक्की काय घडणार आहे याचा अंदाज कुणालाच आला नाही.

करण दोन पावलं पुढे सरकला, चित्रांगदे समोर उभा राहिला. चित्रांगदेचा श्वास क्षणभर कोंडला. झपकन तो एका गुडघ्यावर बसला आणि हातातला गुलाब चित्रांगदेसमोर धरून त्यानं भावभरल्या आवाजात विचारलं, "चित्रांगदा, विल यू मॅरी मी?"

पिन ड्रॉप सायलन्स!

त्या अनपेक्षित घटनेनं चित्रांगदेला क्षणभर भोवंडलं.
मॅरी मी? तिचा चेहेरा पांढरा पडला.
हे कोणाला म्हणतोय हा, मला? लग्न? करण बरोबर?
पण ती क्षणार्धात सावरली.

समोरच्या तरण्याबांड, गोऱ्यापान युवकाच्या परिचित चेहेऱ्याला कधी नव्हे ते मृदु, कोमल भावनांचा वेढा पडला होता. कस्टमरशी बोलताना असायचा तो आत्मविश्वास या क्षणी कुठे पळाला होता? निगोशिएट करतानाचा त्याचा ठसका कुठे गेलाय? हाच मोहक विभ्रम गेल्या आठवड्यात आपण हैदराबादला होतो तेंव्हा डिनरच्यावेळी त्याच्या चेहेऱ्यावर पाहिला होता, नाही का? म्हणजे... म्हणजे तेंव्हापासून त्याला हे प्रश्न विचारायचा आहे! आणि मला? मी कधी अनुरक्त झाले, आठवतंय?

अनेक महिने कळत-नकळत मनात रुजलेल्या, उमलणाऱ्या भावनांना मूर्त रूप येताना जाणवत होतं. जे शब्दांत पकडता आलं नव्हतं ते प्रत्यक्षात घडत होतं. मनातल्या विचारांचे कवडसे चित्रांगदेच्या चेहेऱ्यावर उमटत होते, विरत होते. भूत-वर्तमान-भविष्य यांचा एक स्वप्नील पट तिच्या मनश्चक्षुंसमोरून झर्रकन तरळून गेला. विचारांच्या आवर्तात ती हरवली...

आता श्वास रोखण्याची पाळी पब्लिकची होती. त्या शांततेत प्रत्येकाला आपल्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. सेकंद-सेकंद युगा-युगाप्रमाणे भासत होता. करण तर जणु जीवनातली सगळ्यात मोठी परीक्षा देत होता!

आणि अचानक चित्रांगदेला आनंदातिशयानं उचंबळून आलं! हाच तो क्षण! मनमोराची पावलं थिरकू लागली. त्यां पैंजणांचा अनाहत नाद तिच्या मनात घुमू लागला. चेहेऱ्यावर स्मितरेषा उमटली. नखशिखांत तनु रोमांचित झाली. गालावर रक्तिमा पसरला. समोरच्या गुलाबाशी स्पर्धा करणारी ती गालावरची लाली झाकायलाच जणु तिचे हात धावून आले! तिनं मान वेळावून तोंड लपवलं.

त्याच्या काळ्याभोर नयनांचे भ्रमर तिच्या अर्धोन्मिलित चेहेऱ्याभोवती रुंजी घालत होते. त्या अनुरागी भुंग्यांच्या गुंजारवाने जणु हरखून जाऊन त्या मिटलेल्या हातांच्या पाकळ्यांमागून चित्रांगदेचं सलज्ज, सस्मित मुखकमल प्रकटलं. कापऱ्या ओठातून "येस" असा अर्धस्फुट होकार उमटला आणि एक हात गुलाबपुष्प घ्यायला तिनं पुढे केला.

करणनं निश्वास सोडत "येसऽऽ" अशी जवळजवळ आरोळीच ठोकली! हातातला गुलाब तिच्या हातात देत करणनं चटकन उठून चित्रांगदेला मिठी मारली. कमरेभोवती हात टाकून तिला उचललं आणि एक गिरकीच मारली!

तोवर बाकी सगळे शुद्धीत आले होते! "ब्राव्हो", "कॉंग्रॅच्युलेशन्स" यांची खैरात होऊ लागली. उलुपीनं तर अर्जुनाचा हात पकडून धावत येऊन चित्रांगदेला आणि करणला मिठीच मारली.

आकाशातही दुर्लभ अशी चार ताऱ्यांची युती तिथे घडली होती.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडली.... तो 'स्टारी नाईट्स'चा वापर पण आवडला.
आता उलुपी आणि अर्जुनच्या संसाराबद्दल एक कथा लिहून टाका हातासरशी. त्यातही पोटेन्शिअल आहे.

पण ते करण नाव काय जमले नाहि बाकिच्या त्रिकूटाबरोबर >>> हिंदीतला करण --> कर्ण. सो टेक्निकली बरोबर....
फक्त चित्रांगदा ही अर्जुनाची बायको होती ना? का कर्ण आणि अर्जुन प्रतिस्पर्धी म्हणुन 'इक्वली डिझर्विंग इव्हन इन अफेक्शन' असे काही?

कथा छानच जमली आहे. मला पण स्टारी नाईटस् चा वापर आवडला.
करण हे नाव म्हणून फारसे आवडले नाही तरीही बाकीच्या तिघांच्या नावाचा महाभारतातला रेफरन्स बघता, ते बरोबर वाटते.

काय मस्त आहे गोष्ट. खरं तर या फिल्डमधलं दगड कळत नाही पण ते डिटेल्स वाचून कळलं नाही तरी काsssssssही बिघडलं नाही.मस्त फ्लो असतो तुमच्या गोष्टींना. आणि कोर्पोरेट जगाची ओळखही होतेय शिवाय.
स्टेअरी नाईटस ची जोड आवडली. मध्ये खळखळून हसले पण ( "हे मराठी वाक्य आहे" ला)
ही तुमची सिरीज पूर्ण प्रेमात पाडणारी आहे. माझी तर एकदम फेव्ह.

सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद!
या सिरीजमध्ये वाचक इतके गुंतले आहेत हे बघून खरंच आनंद होतोय. सरधोपट कथानक आहे खरं तर... पण मी सुद्धा ह्या मंडळींना खेळवण्यात मग्न आहे, आनंदी आहे.
मग हा साचा सोडून लिहिलेल्या (धाडसच खरं) कॉर्पोरेट हैवानला प्रतिसाद का मिळत नाही हे कळत नाही. असो.
आता एकच स्टोरी राहिली आहे या सिरीजमध्ये, सध्या तरी...
पुनश्च धन्यवाद!

मला कॉर्पोरेट हैवान कथा म्हणून आवडली.पण त्यातलं पात्र (पात्र रंगवण्यातला प्रभावीपणा आहे हा) इतकं क्रिन्ज आहे की प्रतिसाद द्यावा वाटला नाही.(शिवाय सध्या स्पाय कॅम, cctv, मोबाईल कॅम च्या जमान्यात इतक्या उघड इतक्या लोकांशी कांड करणं सोपं नसावं.)
हल्ली खूपदा वाईटाचा विजय झालेल्या गोष्टी आपोआप डोक्याला ताप नको म्हणून मनाआड केल्या जातात.

mi_anu कॉहै घ्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.. मी दोन महिने त्या कथेवर बसलो होतो. वाचकांना आवडेल अथवा नाही हा प्रश्न माझ्या मनात होताच. घटना सत्य असली तरी, हैवानाची भूमिका प्रथम पुरूषी एकवचनी मांडणं कठीण, कठीण होतं. पण मुलीच्या दृष्टिकोनातून मांडणे तर अशक्य होते. मी त्यातला सोपा चॅलेंज उचलला.
लेखकाच्या पुढच्या प्रयत्नांना दिशा देण्याचे काम वाचकांचे प्रतिसाद देतात, यात शंकाच नाही.

इथे उल्लेख आला म्हणून आत्ता जाऊन कॉर्पोरेट हैवान वाचली. प्रभावी म्हणू शकतो पण माझा पास. खरं सांगायचं तर सिनॅरिओ आणि भाषा दोन्ही मला झेपणारे प्रकरण नाही.

या कथेत लोकं पात्रांमधे गुंततायेत. ही पात्र आजुबाजुला दिसतात. कधी आपण त्यांपैकी एक असतो. हैवान रिलेटेबल नाही वाटली. बारा वर्शाच्या अनुभवात एकही अनुभव पाहण्यात, ऐकण्यात नाही त्यामुळे ती नुसतीच कथा म्हणुन वाचली गेली आणि सगळे म्हणतात तशी अंगावर आली.

ही सिरीज वाचायला आवडते आहे. सुरुवातीच्या एका भागात मला वाटलं उलुपीचं लग्न दुसर्‍या कुणाबरोबर झालं होतं ऑलरेडी.

सुरुवातीच्या एका भागात मला वाटलं उलुपीचं लग्न दुसर्‍या कुणाबरोबर झालं होतं ऑलरेडी.>>> तसा पीळ चित्रांगदा-अर्जुन मधे मारला होता थोडा, पर वो अफसाना जिसमे अंजाम तक लाना ना हो मुमकिन.. त्याला योग्य वेळी, योग्य मोडवर आणून रस्ता बदलला... आता आठ-दहा वर्षं झाली उ-अ शुमं होऊन... माझी नवी कथा वाचा नं -चक्र (advt - ही क्लृप्ती चांगलीये Lol )

मस्त आहे कथा. ही सीरिज आवडली. समागम जास्त आवडली.
एकुणात तुमची या क्षेत्रातील (IT) निरीक्षण शक्ती अफाट आहे, तुमचा त्यात अनुभव ही दांडगा असणार हे दिसून येतंय.
मला ह्या क्षेत्रातील अ का ठ कळत नाही पण कार्पोरेट अनुषंगाने वाचायला रेलेट होतेय.
आजच्या स्पर्धात्मक युगातील तरुणाईच्या उमेदीच्या काळातील भावनिक कंगोरे छान उलगडता.
कोर्पोरेट हैवान वाचली नाही अजून...वाचतो

छान लिहिली आहे . आयटी क्षेत्राची काही माहिती नाही त्यामुळे काही संज्ञा कळत नाहीत . पण वाचायला मजा येते.