गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

Submitted by पराग१२२६३ on 6 April, 2024 - 12:19

5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस लॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतात प्राचीनकाळी जहाजबांधणीसाठी वापरल्या जात असलेल्या शिलाई पद्धतीचं पुनरुज्जीवन करून एक शिडाचं जहाज बांधलं जात आहे.

प्राचीन तंत्रावर आधारित जहाजबांधणीच्या या प्रकल्पासाठी 9 कोटी रुपये खर्च येणार असून तो संपूर्ण खर्च संस्कृती मंत्रालय करणार आहे. अशा प्रकारच्या जहाजाच्या बांधणीतील शिलाईचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले बाबू संकरन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे. प्राचीन तंत्रानुसार या जहाजाच्या लाकडी फळ्यांना सांगाड्याच्या आकाराशी सुसंगत बनवण्यासाठी पारंपारिक वाफेच्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक फळी दोराने दुसऱ्या फळीशी शिवली जाईल. त्या फळ्यांमधील फटी बुजवण्यासाठी नारळाचे फायबर, राळ आणि माशाच्या तेलाच्या मिश्रणाचा वापर केला जाईल. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर प्राचीन दिशादर्शक तंत्राच्या मदतीनं भारतीय नौदल या जहाजाला प्राचीन सागरी व्यापारी मार्गांवरून प्रवास घडवेल.

शिलाई जहाजबांधणीत खिळ्यांपेक्षा दोराने लाकडी फळ्या एकत्र जोडलेल्या असल्यामुळं ती जहाजं लवचिक, वेगवान आणि अतिशय टिकाऊ असत. अशा जहाजांचं उथळ समुद्रात आणि समुद्रातील वाळूच्या पट्ट्यांपासून संरक्षण करता येत असे. युरोपियन सत्तांच्या भारतातील आगमनानंतर येथील पारंपारिक जहाजबांधणीचा व्यवसाय लोप पावला असला तरी आजही काही ठिकाणी छोट्या मासेमारी बोटी शिलाई तंत्रज्ञानानं बनवल्या जात आहेत.

शिलाई जहाजाचं भारतीय तंत्रज्ञान सुमारे 2,500 वर्षे जुनं आहे. भारताच्या इतिहासात, जडणघडणीत समुद्राचा, त्याद्वारे चालणाऱ्या व्यापाराचा वाटा बराच मोठा राहिला आहे. भारताच्या सागरी व्यापाराचे लिखित पुरावे सिंधू संस्कृती आणि गुजरातमधील लोथल येथील प्राचीन गोदीच्या उत्खननात सापडलेले आहेत. ते पुरावे इसवीसन पूर्व 2,500 वर्षांपूर्वीचे आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, अन्य प्रदेशांशी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अन्वेषणात शिलाई जहाजांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आजही भारताचा 90 टक्के व्यापार सागरी मार्गानंच होतो आहे.

प्राचीन तंत्रावर आधारित या जहाजाची बांधणी करण्यासंबंधीचा करार भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय आणि मेसर्स होडी इनोव्हेशन यांच्यात 18 जुलै 2023 ला करण्यात आला होता. त्या करारनुसार 22 महिन्यांमध्ये या जहाजाची बांधणी पूर्ण केली जाणार आहे.

link
https://avateebhavatee.blogspot.com/2024/04/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users