कथापौर्णिमा - पूनम छत्रे यांचा कथासंग्रह

Submitted by बेफ़िकीर on 2 April, 2024 - 11:02

कथापौर्णिमा - लेखिका पूनम छत्रे

पूनम छत्रे यांचा ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेला कथापौर्णिमा हा कथासंग्रह वाचायला मिळाला. हा कथासंग्रह वाचल्यानंतर त्याबद्दल थोडेसे लिहावे असे वाटले.

आयुष्यात कितीही भौतिक प्रगती केली तरी माणसाच्या मनात एक अतृप्त, असमाधानी कोपरा कायम तसाच वंचित राहतो. ही अतृप्तता, हे असमाधान खास वैशिष्ट्यपूर्ण यासाठी असते की ते अगदी सहजपणे, कोणासमोरही, जाहीरपणे व्यक्त करणे अवघड असते. ते व्यक्त करायला गेलो तर असे असमाधान बाळगणेच चुकीचे आहे किंवा हे असमाधान आपल्याच धारणा, वागणुकीमुळे निर्माण झालेले आहे असे ऐकवले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे माणूस ते मनातच जपून ठेवतो आणि कुढत राहतो.

या कथासंग्रहातील व्यक्तिरेखा अश्या काही अतृप्तीने प्रभावित व्यक्तिरेखा आहेत. कोणाला आपण फार सुंदर किंवा फोटोजेनिक नसल्याचे वाईट वाटते तर कोणाला आपल्याच आई वडिलांचे भावंडांवरील प्रेम असमान असल्याचे वाटते. कोणाला पैठणी जिंकूनही बोचरे बोल बोलणाऱ्या नातेवाईकांमुळे त्या गोष्टीचा धड आनंदही उपभोगता येत नाही तर कोणाला लहानपणापासून आपल्यावर असलेला चोरीचा आरोप आयुष्याच्या शेवटी शेवटी खोटा ठरल्याचे पाहून जन्मभराचे रडू येते.

साधीच माणसे, साध्याच इच्छा, साध्याच कहाण्या! मात्र वाचता वाचता आणि बघता बघता या कहाण्या आपल्या कित्येक जुन्या जखमांवर मलम लावून जातात. आपल्याही मनातील एक कोणतातरी हुळहुळता कोपरा त्या शांत करून जातात. साध्या माणसांच्या आयुष्यातील काही सुखदुःखे प्रसंगी किती पराकोटीची तीव्र ठरू शकतात हे जाणवते. कोविडने गेलेली आई आणि तिच्या पश्चात मागे राहिलेले, त्याच रोगाने ग्रस्त वडील यांच्या दुःखावर नीट रडूही न शकणारा तरुण मुलगा क्षणभर आपल्याला स्तब्ध करून जातो. पुस्तक थोडा वेळ बाजूला ठेवून विचार करायला भाग पाडतो.

या कथा सुचणे यासाठीच मुळात एक कविमन आवश्यक आहे. झगमगाट, चित्ताकर्षक वर्णने, कथेला रोचक, रंजक बनवण्यासाठी फाफटपसारा योजणे हे सगळे या कथांमध्ये टाळलेले आहे. तरीही या कथा सहजपणे मनात उतरतात. कथांची लांबी कथाविषयाच्या स्वरूपानुसार अतिशय अचूक आहे. आजूबाजूला जे घडत असतेच पण 'उगाच त्यावर विचार करण्यात कोण वेळ घालवणार' अशी भूमिका ज्याबाबत आजच्या वेगवान युगातील माणसे घेतात, ते या कथांनी नेमके हेरून समोर आणले आहे. 'मुलीला आईच्या जागी कोणीतरी असावे' म्हणून एका स्त्रीशी विवाहबद्ध होणारा नवरा, त्याची मुलगी आणि दुःखद पार्श्वभूमीवर नव्यानेच घरात आलेल्या स्रीसमोरील भावनिक आव्हाने अत्यंत सशक्तपणे चितारलेली आहेत. मुख्य म्हणजे या कथा कोणतीही एक विशिष्ट सांस्कृतिक भूमिका ठामपणे वगैरे घेत नाहीत. त्या वाचकाला अवकाश देऊ करतात व वाचक भूमिकेबद्दल विचार करण्यास स्वतंत्र राहतो.

एक आणखी आवडलेली बाब म्हणजे पात्रांची जी नावे आहेत त्या नावांमुळे कथा कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही वाटतात. या नावांची निवड स्मार्टली केली गेली आहे.

आजच्या मध्यमवर्गीय समाजात पैश्याने श्रीमंत पण मनाने एकाकी असे असंख्य ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कमालीच्या उलथापालथी अनुभवल्या आहेत. तरुणपणी आपल्या संसारासाठी झोकून देणे आणि निवृत्तीनंतर अचानक आलेल्या एकाकीपणाला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नष्ट करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणे हा संघर्ष कधी संघर्ष मानलाही जात नसेल. मात्र पूनम छत्रे यांनी तो अचूक टिपला आहे. कथेतील पात्रे कोणत्या प्रसंगी किंवा कोणत्या क्षणी चेहऱ्यावर कोणते भाव दाखवतील यावबतचे निरीक्षण स्तुत्य आहे, वाचनीय आहे.

कथासंग्रह वाचल्यावर जो अनुभव आला तो असा:

लहान लहान कथा दिसत आहेत म्हणून पुस्तक सहज वाचायला घ्यावे, अरे हा विषय तर अगदी कुठेही आढळणारा असे वाटताना कथा एका अश्या ठिकाणी थांबावी जिथे आपल्या मनात पुढील कथा सुरू व्हावी आणि 'साधेसाधेच विषय आहेत' असे म्हणता म्हणता पुस्तकात ओथंबून असणाऱ्या सूक्ष्म भावनिक कंगोऱ्यांचे वजन जाणवून थोडा वेळ अस्वस्थपणे व अबोलपणे बसावे.

पूनम छत्रे यांच्या या व आगामी पुस्तकांना उदंड शुभेच्छा!

रसिक आंतरभारतीचे हे देखणे पुस्तक रुपये दोनशे सत्तर किंमतीचे आहे व त्याला डॉ विजया वाड यांची प्रस्तावना लाभली आहे.

=====

-'बेफिकीर'!
(२ एप्रिल २०२४)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पुस्तक परिचय.

आयुष्यात कितीही भौतिक प्रगती केली तरी माणसाच्या मनात एक अतृप्त, असमाधानी कोपरा कायम तसाच वंचित राहतो.
>>>>+११११

छान पुस्तक परिचय. +1
वाचायला हवे....
कुठेतरी वाचलेलं आठवलं...unsatisfaction is common to both life and death....
असमाधान...एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून आणि ती मिळाल्यावर काही काळानंतर पुन्हा नवं हवं म्हणून...आपल्याकडं काय आहे या पेक्षा काय नाही हाच विचार सतत केला तर काही खरं नाही...

छान पुस्तक परिचय.
'असमाधान ' ह्या विषयावरचा वरुण ग्रोव्हर आणि त्याचे दोन तीन standup कॉमेडीयन मित्र ह्यांचा एक पॉडकास्ट/ youtube ऐकण्यासारखा आहे. (तो मुख्यत: त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशन चा भाग आहे.)
Link सापडली की देते.

खूप उत्तम परिचय करून दिला आहेत.

खरंच सर्व कथा छान उतरल्या आहेत. वाचल्यावर अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार्‍या आहेत. पूनम, अभिनंदन आणि खूप खूप शुभेछा.

छान परिचय!
पूनम, अभिनंदन आणि शुभेच्छा!

बेफिकीर जी , तुम्हाला परत एकदा मायबोलीवर बघून आनंद झाला.
हा कथासंग्रह कुठे मिळेल ? ऑनलाईन मागवता येईल का?

सुंदर परिक्षण्/परिचय, बेफिकीर!

हल्लीच पूनम कडून घेऊन पुस्तक वाचलं. सर्व कथा सुंदर आहेत.

सामो, हो, पूनम मायबोलीवर आहे: https://www.maayboli.com/user/19

पुस्तक पुण्यात अब चौकात रसिक साहित्य किंवा अमेझॉन वर पण आहे: https://amzn.eu/d/7oCXPA2
हे पूनमचे फेबु पेज :https://www.facebook.com/writerpoonamchhatre