कोलेस्टेरॉल : Statins, बुरशी व घातकता

Submitted by कुमार१ on 31 March, 2024 - 06:34

नव्या वाचकांसाठी :
कोलेस्टेरॉलवर मूलभूत माहिती देणारा लेख इथे आहे : https://www.maayboli.com/node/64397
…………..
रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल ही गेल्या ७५ वर्षांत जाणवलेली एक मोठी आरोग्यसमस्या आहे. हृदयविकाराच्या धोका वाढवणाऱ्या गोष्टींमध्ये या घटकाचा समावेश होतो. त्या अनुषंगाने कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी करणे इष्ट असते. त्यासाठी औषध म्हणून अनेक घटकांचा वापर देश-विदेशांमध्ये होताना दिसतो. या औषधोपचारांमध्ये वनौषधी आणि आधुनिक वैद्यकातील statins या औषधांचा समावेश आहे. या औषधांचे दुष्परिणाम देखील बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे अत्यंत तारतम्याने ती औषधे वापरावी लागतात. एकदा का “आधुनिक औषधांचे दुष्परिणाम” हा मुद्दा समाजमनात खोलवर घुसला की मग पर्यायी उपायांना जवळ करण्याची प्रवृत्ती होते. अशा पर्यायांपैकी वनस्पतींचे उपाय हा एक प्रमुख पर्याय असतो.

वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असलेले अनेक घटक असतात. मात्र त्यातला कुठला घटक कोणत्या आजारावर किती प्रमाणात घ्यायचा यासंबंधीची माहिती सर्वसामान्यांना नसते. मग काही औषधी उद्योग अशा वनस्पती अथवा नैसर्गिक गोष्टींपासून गोळ्या बनवतात. या गोळ्यांच्या उत्पादनांवर आधुनिक औषधांच्या उत्पादनाइतके कठोर निर्बंध नसतात. बऱ्याचदा अशा नैसर्गिक उत्पादनांच्या गोळ्यांमध्ये संबंधित रासायनिक घटकांचे प्रमाणीकरण झालेले नसते. एवढेच नाही तर त्या मुख्य घटकाच्या बरोबरीने काही अन्य त्रासदायक/घातक रसायने (contaminants) देखील गोळ्यांमध्ये राहिलेली असतात. अशा अप्रमाणित औषधांची विक्री देखील तुलनेने सोपी असते आणि ग्राहकांना भुलविण्यासाठी त्यांच्या जोरदार जाहिराती केल्या जातात. कालांतराने अशा गोळ्यांचे दुष्परिणाम दिसू लागतात आणि काही प्रसंगी ते गंभीर स्वरूपाचे होतात.

या आठवड्यात जपानमध्ये याच प्रकारची एक आरोग्य दुर्घटना घडलेली आहे (https://www.japantimes.co.jp/news/2024/03/29/japan/science-health/kobaya...). त्यातील बाधितांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी beni-koji red yeast rice या तथाकथित ‘औषधी’ उत्पादनाचे सेवन केलेले आहे. त्यापैकी ५ जण मृत्युमुखी पडलेत आणि अन्य 114 जणांना रुग्णालयात दाखल केलेले आहे. त्या व्यतिरिक्त 680 जणांनी तब्येतीच्या त्रासामुळे डॉक्टरकडे धाव घेतलेली आहे. आता सदर औषधी कंपनीने त्यांचे ते औषध बाजारातून परत मागवले आहे.
या अनुषंगाने वरील बुरशीजन्य नैसर्गिक उत्पादन आणि वैद्यकातील statins या औषधांची तुलना करणारा आढावा घेतो.

बुरशीजन्य औषधे आणि त्यांचा विकास
बुरशी (फंगस) हा सूक्ष्मजीवांचा एक प्रकार आहे. तिचे अनेक प्रकार निसर्गात आढळतात आणि त्यांच्यापैकी बऱ्याच प्रकारांत औषधी गुणधर्म असल्याचे ज्ञान पूर्वापार होते. सन 1928 मध्ये बुरशीपासून पेनिसिलिन तयार केल्यानंतर या प्रकारच्या संशोधनाला जोरदार चालना मिळाली. बुरशीच्या अनेक प्रकारांपैकी Monascus हा प्रकार औषध म्हणून चीनमध्ये सुमारे 1000 वर्षांपासून वापरात आहे. पुढे त्याचा प्रसार होऊन त्याचा वापर जपान, कोरिया,अन्य काही आशियाई देश आणि अमेरिकेपर्यंत झाला.

या बुरशीतले एक महत्त्वाचे रसायन म्हणजे monacolin K. या रासायनिक घटकात कोलेस्टेरॉलची रक्तपातळी कमी करण्याचा गुणधर्म आढळला. कालांतराने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून या बुरशीपासून statins ही आधुनिक औषधे प्राथमिक रेणूस्वरूपात तयार केली गेली. नंतर Aspergillus आणि Penicillium या बुरशीही या उत्पादनासाठी वापरात आल्या. त्यांच्यापासून Lovastatin व Mevastatin ही औषधे (1G) तयार करण्यात आली. कालांतराने या औषधांच्या रचनेत काही रासायनिक बदल करून pravastatin and simvastatin ही पुढच्या टप्प्यातील statins (2G) तयार झाली. जसा या औषधांचा रुग्णांवर मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला तशी त्यांची उपयुक्तता, मर्यादा आणि दुष्परिणाम देखील अनुभवास आले. यावर अधिक शास्त्रीय अभ्यास करून त्यापुढच्या टप्प्यातील statins (3G) उदयास आली. ती तयार करताना त्यांची उपयुक्तता अधिक असेल आणि दुष्परिणामही कमीतकमी होतील याचा विचार झाला. 3G या श्रेणीमध्ये काही औषधे असून त्यापैकी rosuvastatin व atorvastatin ही दोन अधिक प्रचलित आहेत.

बुरशीयुक्त भात (beni-koji) : उपयुक्तता व धोके
या प्रकारच्या पारंपरिक खाद्यात मोनाकोलीन थोड्या प्रमाणात असते. मात्र या भाताचे घटक वापरुन तयार केलेली अनेक व्यापारी उत्पादने पुढे बाजारात उपलब्ध झालीत. त्यांच्यात असलेल्या मोनाकोलीनच्या प्रमाणात प्रचंड तफावत दिसून येते. काही उत्पादनांमध्ये ते अत्यंत कमी प्रमाणात तर अन्य काहींमध्ये ते भरमसाठ आहे. मुख्य म्हणजे त्याचे प्रमाण किती आहे याचा उल्लेख त्या उत्पादनाच्या लेबलवर केला जात नाही. काही उत्पादनांमध्ये तर बेकायदेशीररित्या आधुनिक वैद्यकातील lovastatin हे औषध मिसळलेले देखील आढळले. असे प्रकार लक्षात आल्यानंतर अमेरिकी औषध प्रशासनाने त्यांच्या देशातील संबंधित उत्पादकांना ताकीद दिलेली आहे. तसेच या प्रकारची उत्पादने ‘अधिकृत औषधे’ म्हणून वापरण्यास पूर्ण मनाई केलेली आहे.

आता अशा अप्रमाणित गोळ्यांचा धोका पाहू. ज्याप्रमाणे statins या अधिकृत औषधांचे दुष्परिणाम आहेत त्याच प्रकारचे दुष्परिणाम या अप्रमाणित औषधांना देखील आहेत. म्हणजेच, त्यांच्यामुळे स्नायू, मूत्रपिंड, यकृत आणि पचनसंस्थेला इजा होऊ शकते. परंतु त्याहून महत्त्वाचा मुद्दा या औषधांच्या अशुद्धतेचा (crude form) आहे. त्यांच्यामध्ये मुख्य औषधी द्रव्याखेरीज citrinin, puberulic acid, व अन्य प्रकारची घातक रसायने देखील आढळलेली आहेत. वर उल्लेख केलेल्या जपानमधील दुर्घटनेत puberulic acid मुळे रुग्णांना खूप त्रास झालेला असावा. या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता अमेरिका आणि युरोपमध्ये या प्रकारच्या बुरशी उत्पादनांना वैद्यकीय औषध म्हणून मान्यता मिळू शकलेली नाही. मुळात त्यांची उपयुक्तता बेभरवशाची असून त्यांच्यापासून वर उल्लेख केलेले धोकेही संभवतात.

Statins : उपयुक्तता व दुष्परिणाम
ही आधुनिक औषधे सुमारे गेल्या 40 वर्षांपासून वापरात आहेत. त्यांची वैद्यकतील उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. परंतु त्याच बरोबर त्यांच्यामुळे होणारे अनेक प्रकारचे दुष्परिणाम हा देखील गांभीर्याने बघण्याचा मुद्दा आहे. मुळात रक्तातले वाढलेले कोलेस्टेरॉल आणि त्यावर औषध द्यावे की नाही, हे मुद्दे सुद्धा वैद्यकीय विश्वात वादग्रस्त आहेत. तरीसुद्धा जगभरातील आधुनिक वैद्यकाच्या विविध वैद्यक संघटनांनी ही औषधे गरजेची आणि उपयुक्त असल्याचा निर्वाळा दिलेला असून त्याप्रमाणेच डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि संबंधित रुग्णांमध्ये असलेल्या अन्य हृदय-धोकादायक घटक किंवा आजारांचा साकल्याने विचार करूनच डॉक्टर ही औषधे सुयोग्य डोसमध्ये रुग्णाला देण्याचा निर्णय घेतात. रुग्णाच्या बाबतीत या औषधाने होणारा फायदा त्याच्या संभाव्य धोक्यापेक्षा बराच जास्त असतो तेव्हा हे औषध दिले जाते.

riskBenefitsTeal.gif

या औषधांचे दुष्परिणाम काय आहेत हे आता विस्ताराने पाहू.
सर्वप्रथम एक महत्त्वाचा मुद्दा. वैद्यकीय संदर्भांमध्ये दुष्परिणामांची भली मोठी यादी जरी बघायला मिळाली तरी असे परिणाम होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण टक्केवारीमध्ये बरेच कमी असते. सर्वांनाच सर्व प्रकारचे दुष्परिणाम जाणवत नाहीत. खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दुष्परिणाम अधिक प्रमाणात दिसू शकतात :
१. वय 70 वर्षांच्या वर असणे
२. अतिरिक्त मद्यपानाचे व्यसन

३. औषध चालू करण्यापूर्वीच यकृत, मूत्रपिंड अथवा थायरॉइडचा आजार असणे
४. शरीरातील आधीच्याच अन्य आजारांसाठी अनेक प्रकारची औषधे चालू असणे

५. रुग्णाचा वंश : इथे एक उदाहरण महत्त्वाचे. आशियाई वंशाच्या लोकांमध्ये स्नायूदुखी हा दुष्परिणाम अधिक प्रमाणात आढळतो.
६. सध्याच्या वेगवान संगणक संवादयुगात अजून एक मुद्दा दिसून आलेला आहे. जे रुग्ण हे औषध सुरू करण्याच्या सुमारास भरपूर ‘ गुगलगिरी’ करून त्यासंबंधी वाचन करतात किंवा समाज माध्यमांमधील संबंधित चर्चांमध्ये हिरीरीने भाग घेतात, त्यांच्या बाबतीत औषध चालू केल्यानंतर स्नायूदुखी आणि अन्य काही तक्रारींचे प्रमाण अज्ञानी लोकांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येते ! वरवर पाहता हा विनोद वाटेल, परंतु तसे नसून या प्रकारच्या परिणामाला nocebo effect असे शास्त्रीय नाव दिलेले आहे (placebo च्या विरुद्ध).

आता प्रत्यक्ष दुष्परिणाम पाहू.
औषध बाजारात सुमारे डझनभर Statins उपलब्ध असून त्या प्रत्येकाच्या गुणावगुणांमध्ये थोडाफार फरक आहे. तूर्त आपण Rosuvastatin हे 3G या श्रेणीतील औषध नमुना म्हणून घेऊ आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊ :
१. १०% हून अधिक रुग्णांच्या बाबतीत : स्नायूदुखी.
२. १-९ % रुग्णांच्या बाबतीत : बद्धकोष्ठ, सांधेदुखी, यकृताचा दाह, औषधजन्य मधुमेह (३%) आणि मेंदूकार्यावर तात्पुरता परिणाम.
३. याहून गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम हे अत्यंत दुर्मिळ असतात.

हे औषध चालू करण्यापूर्वी डॉक्टर काही प्रयोगशाळा तपासण्या करून रुग्णाच्या यकृत व मूत्रपिंडाच्या कार्याविषयी मूलभूत माहिती करून घेतात. तसेच त्यातून मधुमेह अथवा त्याची पूर्व अवस्था असल्यासही लक्षात येतेच. औषध चालू केल्यानंतर दुष्परिणाम जर सौम्य स्वरुपात दिसले तर औषधाचा इच्छित परिणाम साध्य होईपर्यंत ते सहन करता येतात. परंतु जर ते असह्य झाले तर मात्र डॉक्टरांचा तातडीने सल्ला घेणे आवश्यक.

जर दुष्परिणाम असह्य असतील तर डॉक्टर खालील प्रकारचे निर्णय घेऊ शकतात :
१. statin चा प्रकार बदलणे किंवा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे औषध देणे
२. काही काळ औषध थांबवून निरीक्षण करणे
३. औषधांचा डोस कमी करणे

सारांश
रक्तातील वाढलेल्या कोलेस्टेरॉल संदर्भातील दोन औषध पद्धतींचा हा होता लेखाजोखा. वरील विवेचनातून एक गोष्ट लक्षात येईल. जेव्हा रुग्णाने डॉक्टरांच्या सल्ल्याने मान्यताप्राप्त औषध चालू केलेले असते, तेव्हा डॉक्टर रुग्णाला संभाव्य दुष्परिणामांसंबंधी सावध करतात आणि योग्य त्या सूचनाही देतात. पुढे प्रत्यक्ष दुष्परिणाम दिसल्यानंतरही तारतम्याने विचार करून डॉक्टर रुग्णाचे हित पाहतात.

या उलट पारंपारिक ‘वनस्पती’ प्रकारातील मान्यता नसलेली व्यापारी उत्पादने जर रुग्णांनी स्वतःच्या मनानेच वापरली तर त्यातून निश्चितच धोका संभवतो. मुळात तशी उत्पादने अप्रमाणित व अशुद्ध असल्यामुळे त्यांची उपयुक्तता तर बेभरवशाची असतेच, परंतु दुष्परिणाम देखील कोणत्या पातळीपर्यंत जातील याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणूनच कुठल्याही आजाराच्या रुग्णांनी नेहमी आपापल्या पसंतीच्या अधिकृत डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठलेही औषधोपचार करावेत.
*****************************************************************************************************
संदर्भ :
https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2095809923001546
https://www.japantimes.co.jp/news/2024/03/29/japan/science-health/kobaya...
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6822657/
https://files.nccih.nih.gov/s3fs-public/Red_Yeast_Rice_11-30-2015.pdf

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि रोचक लेख.

या प्रकारच्या परिणामाला nocebo effect असे शास्त्रीय नाव दिलेले आहे (placebo च्या विरुद्ध).>>>>> महत्वाचे आहे.

वनस्पती अथवा नैसर्गिक गोष्टीपासून निर्माण करण्यात येणाऱ्या औषधांसाठी त्यांच्या मान्यतापूर्व चिकित्सालयीन चाचण्यांमध्ये औषधांच्या दुष्परिणामांविषयी अधिक कठोर नियमावली लागू केली पाहिजे.

सर्व वनस्पती विश्र्वासाठी Flora आणि प्राणी विश्वासाठी Fauna या संज्ञा वापरात आहेत. आधी बुरशी ही वनस्पती विश्वात गणली जात होती पण आता बुरशी विश्वासाठी Funga ही संज्ञा वापरतात.

छान लेख....
Rosuvastatin उपलब्ध नाही म्हणून मला Atrovastatin दिलंय...

नेहेमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख.
वैद्यकीय क्षेत्रातील तांत्रिक बाबी जनसामान्यांना समजतील अशा भाषेत उलगडून सांगण्याची तुमची हातोटी स्पृहणीय आहे.

अभिप्रायाबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
..
बुरशी विश्वासाठी Funga ही संज्ञा >>>
रोचक ! म्हणजे हा तृतीय पंथ निर्माण झाला म्हणायचा Happy

Atrovastatin दिलंय...
>>>> कालांतराने तुमचे अनुभव सांगालच.
nocebo होऊ नये ही अपेक्षा Happy

>>>>कालांतराने तुमचे अनुभव सांगालच.
nocebo होऊ नये ही अपेक्षा >>>>मी तुमचे लेख सोडून इतर काही वाचत नाही आरोग्य विषयी. घरातल्या इतर सदस्यांनाही मी काही वाचू नका असेच सांगतो. डॉक्टरांवर विश्वास ठेवायला सांगतो. Happy

धन्स....

ऋतुराज - Flora आणि Fauna माहीत होते त्यात आता Funga ची भर पडली.

समुद्रातील मस्य जिवांसाठी Fisha म्हणावे काय? Happy

मानव
खालील संदर्भ असे म्हणतोय :
Flora kingdom has plenty of variations but there is a mutual factor between its members, all of them are eukaryotic multicellular species.
https://www.biologyonline.com/dictionary/flora

Gut flora = prokaryotic and eukaryotic microbial cells
हा तो mutual factor असावा.

ऋतुराज अधिक सांगू शकतील.

कुमार सर, बरोबर.
Flora आणि Fauna ह्या संज्ञा सुरुवातीच्या काळात वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या गेल्या. कालांतराने त्यात अधिक सुधारणा होत गेल्या परंतु काही अजूनही तश्याच वापरल्या जातात.
नील हरित शैवाल व जीवाणू हे Prokaryotes मधे मोडतात तर वनस्पती ह्या Eukaryotes मध्ये मोडतात. यामुळेच कदाचित Flora ही संज्ञा पूर्वी वापरात असावी.
Gut Flora साठी आता Gut microbiota, Gut microbiome ह्या संज्ञा वापरतात.
जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

सर्वांना धन्यवाद !
..
monacolin K व statin >>>
त्या दोघांच्या रासायनिक रचनेत खूप साधर्म्य आहे. Monacolin K हा नैसर्गिक घटक आहे. त्याच रासायनिक सूत्रावर आधारित lovastatin हे प्रयोगशाळेत तयार केलेले औषध आहे.
Monacolin K is the naturally occurring form of lovastatin.

या उलट पारंपारिक ‘वनस्पती’ प्रकारातील मान्यता नसलेली व्यापारी उत्पादने जर रुग्णांनी स्वतःच्या मनानेच वापरली तर त्यातून निश्चितच धोका संभवतो. मुळात तशी उत्पादने अप्रमाणित व अशुद्ध असल्यामुळे त्यांची उपयुक्तता तर बेभरवशाची असतेच, परंतु दुष्परिणाम देखील कोणत्या पातळीपर्यंत जातील याचा अंदाज बांधता येत नाही.>>> +१००

सर, या विषयावर एक लेख लिहिलात तर खूप लोकांना फायदा होईल. कारण याचे प्रमाण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मुळे वाढले आहे. त्याला बळी पडणारे लोक बरेचदा जेष्ठ नागरिक असतात आणि कॉमन ग्रुप्स मुळे चुकीची माहिती सहजरित्या व्हायरल होते. अजून एक निरीक्षण असे आहे कि त्याला आयुर्वेदिक लेबल चिटकवले असले कि सगळ्यांना ऑथेंटिक वाटते. अगोदर काही रोगाबद्दल मनात भीती असते किंवा त्या रोगामुळे लोक जेरीस आलेले असतात, त्यांना या गोष्टी जादूची कांडी वाटते. धन्यवाद

नि पा
धन्यवाद
सवडीने विचार करतो.
यासंदर्भात एक उपसूचना करतो.

“औषधे” या नावाखाली जे काही बाजारात विक्रीला ठेवलेले असते, त्यांच्या ‘उत्पादनासंबंधीचे परवाने” या विषयावर औषधनिर्माण शास्त्रातील अभ्यासू व्यक्तीने जरूर लिहावे.
सर्वांना त्याचा उपयोग होईल

१) पहिला फोटो कशाचा आहे?
२) आधुनिक औषधे घेणाऱ्यांना नंतर वनस्पतींच्या औषधांकडे का जावे लागते? जाऊच नये. किंवा सुरवातीलाच तिकडे जात का नाहीत? सर्व पोरखेळ होतो. एकाच औषध पद्धतीवर विश्वास ठेऊन तीच उपाययोजना करावी या मताचा मी आहे.
३) कोलेस्टेरॉल ऊर्जेचा साठा आहे. परंतू आता लोक तो वापरत नाहीत हीच मुळात चूक आहे. शरीर निसर्ग नियमाने ऊर्जा साठवते पण वापरणार कोण?

१. पहिला फोटो beni-koji red yeast rice चा आहे.

२. कोलेस्टेरॉलला ऊर्जेचा साठा नाही म्हणत. ऊर्जेचा साठा Triglycerides ( म्हणजे त्वचेखाली आणि उदर पोकळीत साठवलेली चरबी) या प्रकारचा मेद आहे.

कोलेस्ट्रॉलची खरी उपयुक्तता यापूर्वीच्या ( या लेखाच्या अगदी सुरुवातीस संदर्भ दिलेल्या) लेखात सविस्तर दिलेली आहे.

कोलेस्टेरॉल कमी करायला लसूण खाण्याचा>>>> प्रश्न चांगला आहे.
या विषयावरील संशोधनांचा आढावा चाळला असता उलटसुलट निष्कर्ष वाचायला मिळतात. उपयुक्तता आहे परंतु ती संख्याशास्त्रीयदृष्ट्या पुरेशी आहे का, हा जरा वादाचा मुद्दा आहे.

या संदर्भातली काही निरीक्षणे मांडतो :
१. स्वतःच्या मनाने रोज दोन-चार लसणाच्या पाकळ्या जेवताना खाणारे लोक
२. “लसूणयुक्त औषधी गोळ्या” अशी जाहिरात वाचून दुकानातून घेऊन स्वतःच्या मनाने घेणारे लोक
३. संशोधन अभ्यासांमध्ये वापरलेल्या लसणाच्या विशिष्ट अर्कयुक्त गोळ्या
असे तीन गट या संदर्भात विचारात घ्यावे लागतील.

अनुमान
असे :
१. हे अप्रमाणित झाले = घरगुती उपाय
२. या प्रकारच्या गोळ्यांची “औषध” म्हणून अधिकृतता तपासल्यावर मगच त्यावर मत देता येईल.
३. या संदर्भात हे एक संशोधन उपयुक्त दिसले : (https://www.sciencedirect.com/science/article/pii/S002231662214784X)
त्यामध्ये त्यांनी aged garlic extract या प्रकारच्या कॅप्सूल वापरल्यात आणि त्यांना फायदेशीर निष्कर्ष दिसले आहेत.

सारांश :
जर लसूण औषध म्हणून घ्यायचे असेल, तर त्या प्रकारची वैद्यकी करणाऱ्या संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्यावा.

छान माहिती.
Pivasta 4 ही कोणत्या प्रकारच्या Statin मधे येते?

कोणतीही गोष्ट हर्बल किंवा वनस्पतीजन्य आहे म्हणून सुरक्षित आहे हे मानणारे असंख्य लोक आहेत.

अशाना मी एकच सांगतो-- अफू, गांजा आणि तंबाखू या पण वनस्पतीच आहेत आणि त्या कितपत सुरक्षित आहेत?

तेंव्हा आंधळेपणाने वागू नका.

@mandard
>>>>>
Pivasta 4 = pitavastatin
1. हे 3G गटातील औषध असून त्यांना super statins असेही म्हणतात.
2. त्याच्या बाबतीत potency and efficacy पूर्वीच्या 2Gपेक्षा अधिक असते.
3. या औषधाच्या बाबतीत, रुग्णाला अन्य औषधे चालू असली तरीही त्या दोघांच्या परिणामातून (interaction) अनपेक्षित दुष्परिणाम दिसत नाहीत.

कोलेस्टेरॉल कमी करायला लसूण खाण्याचा फायदा होतो का ?<>>>अजिबात नाही ..कृपया असले अघोरी प्रयोग कोणीच करू नयेत..

औषधामध्ये लसूण वापरताना आम्ही त्याची शुध्दी करून वापरतो..

Pages