प्राजक्त तुझ्या आठवांचा

Submitted by Meghvalli on 21 March, 2024 - 05:01

प्राजक्त तुझ्या आठवांचा ओघळला मनात।
मंद मंद सुगंध त्याचा दरवळतो मनात ।।
अवचित ह्या सांजवेळी झाली तुझी आठवण ।
त्या सांज छटा पाहुन गहीवरले माझं मन।।
ओंजळीत घेऊन त्या स्मृतिफूलांचा मी सुगंध घेतो।
गोंजारून त्या नाजूक आठवणी हृदयांत जपतो।।
असाच अचानक कोसळला पाऊस नी भिजलिस तू पार चिंब।
डोळ्यांत आजुन साठून आहेत ते केसातुन मोत्यांचे ओघळते थेंब।।
तुझ्या गजऱ्याचा सुगंध अजून माझ्या श्वासांत भरला आहे।
निश्वास अजुनी त्या क्षणा नंतर मी कुठे सोडला आहे।।
खळ्खळ्णाऱ्या हास्याची नी निरागस डोळ्यांची तुझ्या अजून भूल आहे।
वाऱ्याशी झुंजणाऱ्या त्या पिंगट बटांची तुझ्या मज अजून ओढ आहे।।
तुझ्या मागे घुटमळतांना गेले वाया हजारो क्षण।
मानांतच मी केले मोकळे मी रोज माझे वेडे मन ।।
तु अनभिज्ञ माझ्या भावनां पासुन चुक माझीच होती।
पोचवण्यास तुझ्या पर्यंत त्या माझी छाती नव्हती।।
कॉलेज संपले, नवी स्वप्ने, स्फुरल्या मग नव्या वाटा।
नव वाटांवर चालतांना दूर झाल्या आपल्या वाटा।।
आयुष्याची ही सांजवेळ आहे आणि मीही आहे सुखांत।
तरी ही का छळते अवचित एक ती अनामिक खंत।।
ओघळतो का तुझ्या आठवांचा प्राजक्त अजूनही माझ्या मनांत।
ओघळतो का आज ही आसवांचा मोती माझ्या वृद्ध डोळ्यांत।।

बुधवार , ६/३/२०२४ , ०१:५०
अजय सरदेसाई (मेघ )

https://meghvalli.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users