स्लॅम बूक आठवणी - शाळा कॉलेजचा शेवटचा दिवस.!

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2024 - 17:58

मागच्या एका आठवड्यात लेकीच्या शाळेचा (इयत्ता चौथी) शेवटचा दिवस होता. त्यानंतर सुट्ट्या आणि परीक्षा सुरू होणार होत्या. शेवटचा दिवस म्हणजे त्या वर्षापुरते मित्रांचा निरोप घ्यायचा. म्हणून शाळेच्या गणवेषाऐवजी छान नवीन कपडे घालायला परवानगी होती. पोरगी शाळेत जाताना उत्साहात होती. परत आली ते हातात एक कागद नाचवत आली. पगाराचा चेक जसा देवासमोर ठेवतात तसे तो कागद माझ्या हातात ठेवला. कारण आपला बाप आठवणी जतन करायला त्यांचा फोटो काढून ठेवतो हे तिला माहीत आहे. आणि ईथे मुळात तो कागदच आठवणींचा होता. शेवटचा दिवस म्हणत वर्गातल्या प्रत्येकाने असा एक कागद मित्रांमध्ये फिरवला होता, आणि प्रत्येकाने त्या कागदांवर आपल्या अकलेचे तारे तोडले होते Happy

मला तर सर्वांचे कागद बघायला आवडले असते. कारण लहान मुलांच्या विश्वात काय चालते आणि त्यांचे डोके कुठे पळते हे जाणून घेणे नेहमीच एक मजेशीर अनुभव असतो.

काही टिपिकल शुभेच्छा आणि जिव्हाळ्याची वाक्ये होती,.. जसे की वुई लव यू परुली.. कीप शाईनिंग.. आय लव यू.. आय मिस यू.. वाक्यात मध्येच एखादा बदाम बदाम बदाम.. हे जवळच्या मैत्रीणींचे काम असावे.

कोणी घर काढले होते, तर कोणी वॉशिंग मशीनचे चित्र काढून त्याला नाव दिले होते. त्यामागचे लॉजिक किंवा संदर्भ त्यांचे त्यांनाच ठाऊक.

एकाने जमाल कुडू लिहिले होते. पोरांना अ‍ॅनिमल चित्रपटापासून दूर ठेवले तरी त्यातील ट्रेंडींग गाण्यांपासून दूर ठेवणे अशक्य.

कोणी `जाने मेरी जाने मन,' तर कोणी `पंछी बनू उडता फिरू' ही गाणी(?) लिहिली होती.
तर BTS आणि Black Pink यांचा उल्लेख अनिवार्य होता.

मेस्सी v/s रोनाल्डो लिहीणारा एक फूटबॉलप्रेमी सापडला. माझे जग या वयात क्रिकेट पलीकडे नव्हते.

कोणी स्माईली फेसेस, म्हणजे हसरे चेहरे काढले होते. एकाने `कचोरी' तर एकाने `भालू कही का' असे लिहिले होते. कोणाला उद्देशून ते ठाऊक नाही.

काहींनी दिमाखात आपली स्वाक्षरी केली होती, तर काहींनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ही नक्कीच पहिल्या बाकावरची मुले असणार.

तर काहींनी आणखी तिसर्‍याच मुलाला चिडवले होते. ही नक्कीच मागच्या बाकावरची वात्रट मुले असणार.

लेकीचा वाढदिवस सुट्ट्यांमध्ये येणार हे लक्षात ठेवून कोणीतरी अ‍ॅडवान्समध्ये शुभेच्छा दिल्या होत्या.

पण या सर्वात आवडली ती एक कविता -
पेपर की रोटी, नोटस का अचार
बूक्स की चटणी, क्वेश्चन का भार(?)
टीचर्स की दुश्मनी, दोस्तों का प्यार
मुबारक हो आप को, एक्झाम का त्योहार..

IMG_20240302_203501.jpg
.

वरवर हे कितीही बालिश वाटले तरी हे सगळे आणि बरेच काही एकमेकांच्या पेपरवर लिहिताना मुलांना नक्कीच मजा आली असणार.. तो कागद पाहून मी सुद्धा नकळत माझ्या स्लॅम बूक आठवणीत शिरलो.

ज्यांना स्लॅम बूक म्हणजे काय हे माहीत नाही त्यांना थोडक्यात सांगतो, - शाळा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाला किंवा शेवटच्या आठवड्याला अशी स्लॅमबूक वर्गभर फिरायची. ज्यात प्रत्येक पानावर काही छापील प्रश्न असायचे. नाव गाव फळ फूल अश्या माहिती सोबत आवडते सेलेब्रेटी, आवडते खाद्यपदार्थ, छंद, आवडीनिवडी, माझ्याबद्दल एखादे वाक्य असे प्रश्न असायचे. ते मित्रांकडून एकदा भरून घेतले की पुढे आयुष्यात प्रत्येकाशी भेट होईल न होईल, ते आपल्यासोबत आठवण बनून कायम राहतील हा त्यामागे विचार असायचा.

खरे तर मी स्वत: कधीच वर्गात स्लॅमबूक फिरवली नाही. मला ते मुलींचे आणि ईंग्लिश मिडीयमच्या मुलांचे फॅड वाटायचे. पण भरायचो मात्र प्रत्येकाची आवर्जून. कारण गंमतीशीर उत्तरे द्यायची आवड. आणि कोणाकडे आपली आठवण राहिलीच तर ती `होता एक हटके विचार करणारा मुलगा' अशीच राहावी अशी ईच्छा होती.

डिग्रीला शेवटच्या वर्षाच्या सुरुवातीलाच एका मुलीच्या प्रेमात पडलेलो. पण माझ्या लाजर्‍या बुजर्‍या स्वभावामुळे समोरून कित्येक पिवळे-गुलाबी सिग्नल मिळूनही गाडी पुढे दामटायची हिंमत कधी झाली नाही. वर्षभर दुरून बघण्यातच समाधान मानले. त्यामुळे शेवटच्या दिवसात यापुढे मित्र भेटणार नाहीत यापेक्षा उद्यापासून ती दिसणार नाही याचेच दुख जास्त होते. म्हणून प्रत्येकाच्या स्लॅमबूकमध्ये भरभरून तिच्याबद्दलच लिहीत होतो. जणू काही आपल्या एकतर्फी प्रेमाची ईतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद करत होतो.

आज ते आठवून आपल्या बावळटपणावर कितीही हसायला आले तरी वर म्हटले तेच..
त्या क्षणांची मजा तेव्हाच अनुभवण्यात असते. ते क्षण, ते अनुभव आपण पुन्हा निर्माण करू शकत नाही, पुन्हा जगू शकत नाही.

सेम असाच सीन वालचंद कॉलेज, सांगलीहून निरोप घेताना होता. पण ती सिच्युएशन आणखी हृदयद्रावक होती.

तिथे एका वर्षाचे वास्तव्य होते, आणि सहा महिन्यांचे एकतर्फी प्रेम. त्यातले पाच महिने हळूहळू वाढत जाणारी नजरानजर, आणि सहाव्या महिन्यात कोणाची तरी त्या सुखाला नजर लागून आमच्यात झालेले गैरसमज.. झाले असे होते की कोणीतरी माझ्या नावाने तिला खोटा फोन करून बरेच वाईटसाईट बोलले होते. नाते जुळण्याआधीच फिस्कटले होते.

जेव्हा आम्हा चौघा मित्रांना वालचंद सांगली, ते विजेटीआय मुंबई असे ट्रान्सफर मिळाले आणि ती सूचना येताच चारच दिवसात निघायचे ठरले तेव्हा पहिला विचार मनात तिचाच आला.. आपण कॉलेजच नाही तर हे शहरच सोडून जात आहोत. म्हणजे उद्यापासून ती भेटणे तर दूर, पण तिला भेटायचा विचार सुद्धा करता येणार नाही याची अचानक जाणीव झाली.. आणि माझी `छन से जो टूटा कोई सपना' अशी स्थिती झाली. ज्या युनिवर्सिटी ट्रान्सफरसाठी मन लाऊन अभ्यास केला होता, क्लासमध्ये टॉपर आलो होतो, त्याचे फळ जेव्हा मिळाले तेव्हा ते चाखायच्या आधीच तोंड आंबट आणि मन खट्टू झाले होते.

जेव्हा आम्हा चौघांसाठी म्हणून वर्षाच्या मध्येच ईतर मित्रांकडून निरोपाची पार्टी ठेवली गेली तेव्हा ईतर तीन मित्र सगळ्यांशी गळाभेट घेत होते. आणि मी मात्र एका हॉस्टेलच्या मैत्रीणीला पकडून तिचा नंबर ट्राय करत होतो. ती आणि तिचे प्रेम नशीबात नसेना, किमान गैरसमज तरी दूर करावे या खटपटीत होतो. त्यामुळे त्या दिवशी माझ्याकडे कोणी स्लॅमबूक घेऊन आले नाही,.ना मी ते माझ्या नेहमीच्या शैलीत भरायच्या मूडमध्ये होतो.

शाळेत असताना मित्रांसोबत फार म्हणजे फार धमाल केली. तरीही निरोपाच्या दिवशी फार भावनिक झाल्याचे आठवत नाही.
कदाचित बोर्डाच्या परीक्षेचे टेंशन असावे. कारण तेव्हा बोर्डाच्या परीक्षेला अवाजवी महत्व देऊन ठेवले होते.
किंवा मग मित्र कुठे दूर जात नाहीत, या ना त्या कॉलेजला एकत्र भेटूच असे वाटत असावे.
आणि सध्या झालेही तसेच आहे. व्हॉटसपग्रूपमुळे सारे शाळेतले मित्र एकमेकांच्या संपर्कात आहोत, कित्येकांशी वरचेवर भेटतो. वर्षातून एकदा दोन दिवसांसाठी सारे जगभरातून एकत्र येत सहलीला जातो. शाळेचे दिवस पुन्हा जगतो.

मित्रांचा भलामोठा ग्रूप कुठे जमला असेल तर तो वीजेटीआयलाच पण डिप्लोमाला असताना. पण तिथेही कॉलेजपासून निरोप घेतोय असे कधी वाटले नाही. कारण माझ्यासारखे कोणी डिग्रीला विजेटीआयलाच राहिले, कोणी पार्ट टाईम डिग्रीला गेले, कोणी नापास झाले, तर कोणी शिक्षण थांबवून जॉबला लागले,. पण पुढचे दोन तीन वर्षे तरी ग्रूप आमचा फुटला नाही. संपर्क फारसा तुटला नाही. ज्याला जसे वेळ मिळेल तसे कट्ट्यावर हजेरी लावायचा. सुट्ट्यांमध्ये देखील आम्ही दिवसरात्र कॅम्पसमध्येच पडीक असायचो. सकाळी जिमखाना उघडायचो. दिवसभर कॅरम-टेबलटेनिस खेळून बंद करायचो. संध्याकाळी हॉस्टेल समोरच्या मैदानावर क्रिकेट खेळून झाल्यावर हॉस्टेलच्याच मेसमध्ये जेवायचो आणि रूमवर पत्ते खेळून झोपायचो.. हळूहळू एकेक जण या दिनक्रमातून गळाले, त्यामुळे अमुकतमुक निरोपाचा शेवटचा दिवस असे कधी वाटले नाही. आज मागे वळून पाहताना मात्र एखादा गळ्यात गळे घालून रडायचा दिवस तेव्हा साजरा करायला हवा होता असे वाटते.

असो,
या झाल्या माझ्या शाळा-कॉलेज जीवनाच्या, शेवटच्या दिवसाच्या, मनात ठुसठुस ठेवणार्‍या काही ठसठशीत आठवणी.
तुम्ही सुद्धा कधी "पापाऽऽ कहते है बडा नाम करेगाऽऽ" म्हणत शाळाकॉलेजचा निरोप घेतला असेल किंवा शेवटच्या दिवशी केकेच्या "यारोंऽऽ दोस्तीऽऽ बडी ही हसीन है" गाण्यावर सेंटी झाला असाल तर तुमच्याही स्लॅमबूक आठवणी जरून शेअर करा..

शेकडोऽऽ प्रतिसादांच्या प्रतीक्षेत,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!
आमच्या कॉलेजच्या दिवसात 'मी माझा' फेम चंद्रशेखर गोखले फॉर्मात होते..... त्यांच्या चारोळ्या बुकमार्क करुन ठेवलेल्या असायच्या स्लॅमबुकात लिहायला आणि फिशपॉंड द्यायला Wink

स्लॅमबुक हा प्रकार मी बारावीच्या व्हेकेशन क्लासमध्ये पहिल्यांदा बघितला होता. काही मुलींनी स्लॅमबुकं फिरवली होती मग मीपण एक आणून फिरवलं होतं. ते इंग्लिशमधे होतं आणि मी दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली. त्यातल्या काही शब्दांचे अर्थही माहिती नव्हते Lol उदा. What's your greatest asset? Who is your dearest pal? आता गंमत वाटते, पण तेव्हा asset आणि pal हे शब्द माहितीच नव्हते. (Pal हा शब्द नंतरही मी मोजून एकदाच प्रत्यक्ष बोलण्यात ऐकलाय)
त्यात एक प्रश्न असायचा. तुमचं आवडतं वाक्य काय आहे? एका मुलीने लिहिलं होतं, Life is like an ice cream, enjoy it before it melts.' तेव्हा हे वाक्य फारच भारी वगैरे वाटलं होतं!
कॉलेजला गेल्यावरही बहुतेक कुणी कुणी स्लॅमबुक आणली होती, पण तेव्हा त्याची क्रेझ पहिल्याइतकी नव्हती राहिली.

@वावे same पिंच about pal. हा शब्द slam book च्या आधी आणि नंतर कधी जन्मात ऐकला नाही. Slam book मध्ये अतिशय अवघड शब्दात english प्रश्न असायचे. Lol

@सामो yes मजा असतें स्लॅमबूक वाचणे. मी माझं slam book अंजुन सांभाळून ठेवलंय माहेरी. वाचलं की मन भराभर अंतर कापून भूतकाळात जात

सामो, स्लॅमबुक माहित नसेल तर जे माहीत आहे त्याबद्दल लिहा. निरोपाचा दिवस काहीतरी करत असालच ना.. तेव्हाचे अनुभव आणि आठवणी लिहा. कदाचित आम्हाला काहीतरी वेगळे वाचायला मिळेल जे आम्हाला माहीत नाही Happy

बिल्वा, हो.. मलाही आता वाटते की मी तेव्हा माझे स्लॅम बूक का नाही फिरवले.. तेव्हा जे एक फॅड वाटले होते त्याची किंमत आज शाळा कॉलेज आणि ते मित्र सुटून बरेच वर्षे झाल्यानंतर समजली..

@ स्वरूप
येस, चंगो यांच्या चारोळ्या तुमच्या कॉलेज वेळी फॉर्मात होत्या तर मी शाळेत असताना.. थोडा फरक असेल आपल्या बॅच मध्ये.. पण रीलेट करू शकतो.
त्यात पौगंडावस्थेतले पाहिले प्रेम झाले असल्याने अचानक मला चारोळ्या शेरोशायरी हा प्रकार खूप आवडू लागला होता Happy

धन्यवाद धनुडी
मायबोली सरासरी वय पाहता स्लॅम बूक न वापरलेले बरेच जण असू शकतात असे आता वाटतेय.
पण धागा स्लॅम बूक पुरता नाही तर निरोपाच्या आठवणीचा आहे..

इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षाला slam books बनवलेली सगळ्यांनी. मजा यायची वाचायला..
सध्या वह्या खूप छान सजवायचे, सुंदर अक्षरात लिहायचे.
मी साधीशी च छोटी रेडिमेड आणलेली..
माझी बहुदा हरवली. पण माझ्या मैत्रिणीने जपून ठेवलेली आहे, २-३ वर्षांपूर्वी तिच्या घरी गेलेले तेव्हा आम्ही दोघींनी मिळून वाचली.. खूप मजा आली तेव्हा.

एका मुलाने आवडते छंद मध्ये " bird watching" टाकलेलं.. मला ते एकदम भारी वाटलेल तेव्हा... मग लगेच कळलं की exact bird watching म्हणजे त्याला काय लिहायचं होत.

"मी माझा" आम्ही कॉलेजात असतानाही खूप लोकप्रिय होत..
ते छोटंसं पुस्तकं असल्यामुळे बरोबर ठेवायला सोपं होत.. चारोळ्या लक्षात ठेवायला ही सोप्या होत्या..
२-३ अजून लक्षात आहेत...

मस्त लिहिले आहे. Happy 'एक्जाम का त्योहार' आवडली.
वावे +१
आर्चिजच्या दुकानात भरपूर टाईमपास करून 'स्लॅम बुक' आणि फ्रेन्डशिप बॅन्ड (कुछ कुछ होता है) वगैरे घेतलं होतं. माझ्याकडे आहे बहुतेक. फार मोठे मोठे शब्द होते व वर सल्ला दिला जायचा. एकाने गयावया करून मी मराठीत लिहू का विचारलं मी म्हटलं लिही. आमची अगदी साधं इंग्रजी वाक्य लिहिताना सुद्धा तारांबळ उडायची. मग ते 'डंकी' मधला तापसीचा इंटरव्ह्यू घेताना 'जाऊ द्या, मी रोजच पराठे खाते' हे फक्त इंग्रजीत दुसरं नक्की काय खाते हे न सांगता आल्यामुळे म्हणते तशी वाक्यरचना असायची. Lol रोज सायकल वर जाणारे सुद्धा आवडता छंद adventure sports लिहायचे. रोज पंजाबी ड्रेस घालणाऱ्या मुली आवडता पोशाख 'जीन्स आणि टी शर्ट' लिहायच्या. मजा आली होती पण. आम्ही तर शेवटच्या दिवशी केले नव्हते मधेच कधीतरी केले होते.

मस्तच.

स्लॅमबुकच्या जमाना यायचा होता, त्या आधी शिक्षण पूर्ण केलेल्या काळातले अस्मादिक.

लिखाण आवडलं.
आमच्या वेळी स्लॅम बुक नव्हतं. पण एक अगदी छोटसं डायरीवजा बुक आहे. त्यात लिहिलय कुणी कुणी काही काही. कधी हाती लागलं की जुन्या आठवणी जाग्या होतात.

एकाने गयावया करून मी मराठीत लिहू का विचारलं
>>>>>
वाह गयावया Happy
मी पूर्ण वाक्यात उत्तरे द्या प्रश्न हिंदी-मराठीतच सोडवायचो. इंग्लिशच लिही असा कोणाचा आग्रह नसायचा. म्हणजे चालेल का असे कधी कोणाला विचारले सुद्धा नाही.

आमच्या वेळी स्लँम बुक च्या जागी डायरी फिरवायचो. ह्या डायर्‍या बँका नव वर्षाच्या सुरूवातीला देत असत त्यामधल्या असत बहुतेक वेळा. त्यांना प्लॅस्टिक कव्हरे असायची नि प्रत्येक दिवसाचे एक पान असायचे. मिक्स्ड टेप करायचा काळ होता तो. टेप साठी गाण्यांची लिस्ट बनवून टेप रेकॉर्ड करायला दिली जात असे. अशा टेप्स साठी लागणार्‍या विषयावर, गायका. डायरेक्टर अशा तीन चार प्रकारचे कॉम्बो असलेल्या लिस्ट चे काही कागद मी डायरीच्या कव्हरमधे घुसवून ठेवलेले नि ते तसेच राहिले जेंव्हा डायरी क्लास मधे पाठवली गेली तेंव्हा.

त्यावर " डीअर, एव्हढी गाणी ऐकशील तर बहिरा होशील" , "अजून थोडी इंग्लिश गाणी ऐकलीस, तर टॉफेल चा अभ्यास करायला लागणार नाही ", "रफीची रोमँटिक गाणी नि किशोरची हार्ट ब्रेक असलेली गाणी अशा टेप्स एकदम बनवून घेतोयस ?" असे शेरे मिळाले होते. काही जणांनी टेप्स बनवून आम्हाला रेकॉर्ड कराय्ला दे अशी लिस्ट त्याच डायरी मधे बनवून दिली होती.

स्लॅम बुक बरोबर एक ऑटोग्राफ बुक पण असायचं..
मान्यवर/ प्रसिद्ध लेखक / अभिनेते/ अभिनेत्री ह्यांच्या सह्या घ्यायच्या...

काही लोकं भाव खायचे काही जण हसत हसत द्यायचे, काही जण एखाद वाक्य वगैरे पण लिहायचे, नाव विचारायचे..

स्लॅम boook बरोबर त्याचीही आठवण झाली म्हणून लिहिले.

. टेप साठी गाण्यांची लिस्ट बनवून टेप रेकॉर्ड करायला दिली जात>> सोनी च्या कॅसेटवर .. आठवण आली.. बहुदा २ रुपयांना वगैरे करून मिळत असे का??

बहुदा २ रुपयांना वगैरे करून मिळत असे का?? >> २ रुपये ? नाहि एव्हढी स्वस्ताई पण नव्हती तेंव्हा . पन्नस ते शंभर लागत असत नि टेप चे वेगळे होते. ६० कि ९० मिनिटांवर पैसे बदलत असत.

छन्दिफन्दि @ ऑटोग्राफ बुक ..
हो पाहिलेय ते मित्रांकडे.. काही त्यात शिक्षकांच्या सह्या घ्यायचे. तर काही मुले खरेच ऑटोग्राफ बूक म्हणून वर्षानुवर्षे ते वापरायचे आणि सेलेब्रेटी असतील तरच साईन घ्यायचे. कोणाशी भेटीचा योग येणार असेल तर त्या दिवशी मुद्दाम ते शाळा कॉलेजला घेऊन यायचे.

पन्नस ते शंभर लागत असत नि टेप चे वेगळे होते.>>> हो माझ्याही माहितीनुसार असेच पन्नास शंभर रुपयाला भरून मिळायची गाणी. मी लहान असताना आमच्या ईथली मोठी मुले ईंग्लिश गाणी त्यात भरायचे, मला फार अप्रूप वाटायचे.
त्या ही आधीच्या काळात पिक्चर बघायचा असेल तर व्हीसीआरचे १००-२०० रुपये भाडे आणि १०-२० रुपयाला भाड्याने कॅसेट. पुढे ती दुकाने बंद झाली आणि जमाने के साथ चलो म्हणत त्यांनीच मोबाईलची दुकाने उघडली..

किती छान आठवणी ऋन्मेष. शाळेतले स्लॅमबूक मी आता आता पर्यंत जपून ठेवले होते. मध्ये इमोशनल पसारा कमी करायच्या नादात टाकून दिले. दुसऱ्यांच्या स्लॅम बुक मध्ये लिहायला काय काय इम्प्रेसिव्ह लिहायला लागायचे Happy
आवडता गायक/ गायिका / मुव्ही /लेखक/ आवडत वाक्य आणि खूप काही.
हे आठवत असताना शाळेतील पेन फ्रेंड हा उपक्रम पण आठवला. माझी कोणतरी जपान मधली पेन फ्रेंड होती तेव्हा.

शाळेतील पेन फ्रेंड हा उपक्रम
>>>>
हे असे काही असते हे मला कॉलेज मध्ये गेल्यावर समजले.. मराठी माध्यमाची शाळा म्हणून असेल.. हल्ली सोशल मीडियामुळे हे कालबाह्य झाले...