चित्रावरून लेख : दळण

Submitted by छन्दिफन्दि on 27 February, 2024 - 01:55

झुंज मुंजु वेळ, हवेतला छान गारवा, दवात भिजलेल्या मातीत मिसळलेला प्राजक्ताचा मंद सुवास, आणि ऐकू येणारा गोड प्रेमळ स्वर..
“पहिली माझी ओवी, देवा गणरायाला …. “

अगदी शयामची आई चित्रपटातील एखादं दृश्यच समोर आल नाही? तसा तर शामची आई चित्रपट (जुना, b&w ) पूर्ण आठवतही नाहीये कारण बहुदा तो पाहिला तेव्हा जेम तें पहिली दुसरीत असेन. पण आठवतंय ते रडू... चित्रपट बघताना रडण्याचा बहुदा तो पहिलाच प्रसंग.
त्यानंतर श्यामची आई किंवा श्याम पुस्तक वाचत असतांना गळ्यात ठसठशीत पोत, साधंसं खणाच नऊवारी लुगडं ल्यालेली ती वत्सल मूर्ती आणि पहाटेच्या वेळचा तिचा तो कारुण्यमयी स्वर आणि त्या जात्यावरच्या ओव्या असच काहीस कल्पिलेलं ते चित्र …

मग पुढे शाळेत कधीतरी आठवी नववीत अजून एक नऊवारी साडीतील माऊली भेटली. तिची ती गोड वाणीतील ( शब्दांवरून वाणीही गोडच असावी हा कयास)
“खोप्या मंदी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिल्लांसाठी तिनं, झोका झाडाले टांगला … “
कविता वाचताना तिची अहिराणी बोली खूप गोड वाटली. एकाच वेळी, निसर्ग, त्याची जादू, माणसाची मर्यादा, शब्दचित्र तयार करण्याची ताकद, तत्वज्ञान एव्हढं सगळं फक्त ५०-६० शब्दात मांडणारी ही आजी मनात कुठेतरी खोल घर करून गेली. मग पुढे त्यांच्या ओव्या, कविता समजून घेत असताना खूप उशिरा कधीतरी त्यातील माय, ती घट्ट गाठ, जीवनाची क्षणभंगुरता तिनं किती खुबीनं मांडलं आहे हे हळू हळू जाणवत गेलं, पटत गेलं, भावत गेलं. आणि मन नकळत कधीतरी त्या प्रतिभेच्या भक्तीरूपी प्रेमात पाडलं..

याव्यतिरिक्त मला वाटते आपल्या पिढीतल्या कुणी “जातं “ कधी चालताना क्वचितच बघितलं असेल. त्यामुळे जात्यावरच्या ओव्या ऐकल्याचही दुर्मिळच!
नाही म्हणायला लहानपणी आमच्या गावच्या घराच्या पडवीत एका भलं मोठ जातं एका लाकडी स्टॅण्डवर ठेवलेल बघितल्याचं आठवतंय. ते जातं कधी वापरल्याचं किंवा त्यावर काही दळल्याचं अगदीच अंधुकसं काही आठवतंय.. आमच्या कडची एक उषा मावशी होती तिनं कधीतरी एखादवेळी त्यावर काही दळल्याचं बघितलेलं.. ते तेव्हढच… तेव्हा घरातली जमीन पण मातीची होती.. अशाच एखाद्या सुट्टीत ती मातीची जमीन शेणानं सरावताना बघीतल्याचही आठवतंय.. आम्ही सगळी मुलं माजघरातल्या त्या बलाढ्य झोपाळ्यावर बसायचो मांडी घालून आणि ती अक्ख माजघर सारवायची.. मग वाळेपर्यंत खाली उतरायचं नाही की त्यावर पाऊल ठेवायचं नाही . तेव्हा ती सारवतानाचे ते स्ट्रोक बघायला छान वाटायचं, पण आता हे लिहिताना जाणवतंय किती कष्टाची कामं होती ती!
नंतर जेव्हा मातीची जमीन जाऊन फरशी आली तेव्हा ते जातं ही कधी उठलं, कुठे गेलं आता काही आठवतही नाही. असू दे… त्या जात्यावर कधी आजीने काही दळल्याचं तर आठवतही नाहीय, त्यामुळे नंतर कधी आई किंवा आम्ही ते वापरण्याचा प्रश्नच उद्भवला नाही..

दळण दळून आणायचं हे सहावी सातवीत कधीतरी गळ्यात पडलेलं काम..
“जा ग जरा दळण टाकून ये… किंवा घेऊन ये … “ मग त्यावर आमची टोलवा टोलवी करूनही कधीतरी ते गळ्यात पडायचंच. त्यातून दिवाळी तोंडावर असेल तर अजून विशेष निरोप, “पीठ जाड करायला सांग.. गव्हावर टाकू नको म्हणावं .. वगैरे वगैरे …. “

कधी क्वचित तिकडे थाम्बायलाही लागे.. तेव्हा तर तंद्रीच लागे.. तो घूम घूम फिरणारा गिरणीचा पट्टा , त्याचं मधेच ते “ तडटक्क तडटक्क “ करण, … त्या फडकं लावलेल्या तोंडातून खालच्या डब्यात पडणार पीठ . मग ते गरम गरम पीठ तो आपल्याला दळणाच्या पिशवीत भरून द्यायचा.. २-५ रुपये त्याच्या हातावर टेकवून, हात जास्तीत जास्त लांब करून म्हणजेच ती पिठाने माखलेली पिशवी आपल्या ड्रेसला लागणार नाही ह्याची खबरदारी घेत अलगद ते दिव्य पार पडायचं.
१२थ फेल बघताना तो पीठाने माखलेला भैय्या, ती पिष्ठमय गिरणी आणि आमची दळणवारी सगळं लक्ख आठवल.
मग पुढे दुकानदार स्वतः पीठ दळून घेऊन घरपोच करायला लागला असावा त्यामुळे आमचं ते दळणाचं काम कायमच सुटलं येव्हढं खरं ..

मग ११- १२वीला गणिताचे सर म्हणायचे “ आता दळा दळण ,,,” इथं गणितात कुठे आलं दळण ? पण फॉर्मुला नीट नाही आठवला, थोडी काही चूक झाली, दोन स्टेप जास्तीच्या टाकल्या की यांचं सुरु “ … दळा दळण” किंवा “ तुम्ही दळण दळा.. ” किंवा “ तुम्ही दळणच दळा.. “
त्यामुळे “दळण “ आणि गणिताचे सर हे एक समीकरणच डोक्यात फिट्ट बसलय..

आत्ता जर मी कधी रागात मुलाला म्हंटल, “ अरे दळण दळू नकोस … “

की लगेच निरागस चेहऱ्याने पुढचा प्रश्न आलाच समजा , “ दळण म्हणजे काय असतं … ?”

हो बरोबरच आहे म्हणा ह्यांनी इकडे जातं वगैरे जाऊनच द्या पण पिठाची गिरणीही कधी बघितलेली नाहीये..
“सुजाता “ आटा घरी येतो एव्हढच माहित्ये त्यांना ..
तरी बर घरी पोळ्या- फुलके- चपात्या होतायत म्हणून “आटा” तरी माहित्ये.
नाहीतर मग फ्रोझन फुलका फ्रेश, आट्यापासून म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनतो, तो आटा म्हणजे गव्हाचं पीठ, हे गहू दळून बनवतात … तर दळण दळतात म्हणजे The wheat is ground into a fine powder which is then sieved and packaged for us as “Aata” वगैरे वगैरे सगळं दळण मला दळत बसायला लागत..

जात्यावरती बसलेल्या त्या माउलींच चित्र बघून लिहायला घेतलं, तर मीच हे दळणाच दळण दळत बसलीय .. पण माझ्या आता ते लक्षात आलय त्यामुळे मी माझं हे दळण आता आटोपत घेतेय..

****

चित्रकार : रीया ठोसर

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त:
हे एक पारंपरिक विषयावरील चित्र आहे.
तुम्हाला कुणाला या चित्रावरून काही लेख, ओव्या, कविता किंवा कथा सुचल्या तर कंमेंट मध्ये लिहू शकता. किंवा
"चित्रावरून कथा/ लेख/ कविता : लेखाचे नाव " अस शीर्षक देऊन नवीन धागा काढू शकता.
अजून कुणाला काही सुचले तर सान्गा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन.
आईबरोबर कधीतरी जात्यावर बसलेय. पण ओव्या नाही ऐकल्या. इतर गप्पाच चालू असायच्या तेव्हा.

छान लिहिलयं!
लहानपणी आमच्याकडे जाते होते. गिरणीत दळायला पाठवायचे नाही अशी खास पीठं दळायला ते वापरले जायचे. आमच्याकडे काम करणार्‍या आजी ते जाते मुख्यत्वे वापरत असत, जोडीला आम्ही मुलं अधून मधुन हौस म्हणून. जाते फिरवतानाची ती लय , बॉयकट आणि पीजे बॉटम कुर्त्या अवतारात दळायला बसलेली मी आणि चला बास झाला खेळ, पळा आता अभ्यासाला म्हणून खोटंखोटं रागावणारी आजी! जात्याची लय तुटू न देता घास घालत रहाणे हा ट्रिकी प्रकार मला कधीच जमला नाही पण 'मी घालते' ची हौस फार! पण मग लय तुटे. पुढे आजींच्या मुलाला नोकरी लागली व त्यांनी काम सोडले. ओळखीत कुणीतरी घरघंटी घेतली, जोडीला मिक्सर होताच. जात्याचा वापर थांबलाच. एक दिवस होस्टेलहून आले तर जाते गायब! आईने कुणाला तरी देवून टाकले होते.

https://grindmill.org/
या साईट वरती खूप/चिक्कार ओव्या होत्या. आता मला नाही सापडत पण असणार. थोड्या, शोधल्या तर मिळतील.

- https://ccrss.org/database/songs.php?semantic_class_id=H21-05-02
- https://ccrss.org/database/songs.php?performer_id=744
- https://ccrss.org/database/songs.php?location_id=211

शर्मिला तुमचं लेखनाचा प्रवास वाचून जाणवलं की पूर्वी तुम्ही जात्यावर बसल्यावर ओवी म्हणाला नसाल कदाचित,
पण तुम्ही ओव्या स्वतः लिहू/रचू शकता.. give it a try Bw

आमच्या घरी जाते होते. व त्याला बसवायचा तो लाकडी दांडु मिडिअम हाइटचा. व बरोबर एक त्रिकोणी ठकी नावाची भावली पण होती. लाकडाचीच व तिच्या अंगावर रंगानेच चेहरा हात यलो ब्लाउज वर ठिपके व हिरवा परकर होता. हा दांडू ठोकुन बसवावा लागे. मग दळण दळायचे. मी आई बरोबर दळण केले आहे. ज्वारी बाजरी. इतर काही धान्य आता आठवत नाही.

आमच्या मोठ्या खोलीत दुपारी जेवणे झाली की ही सर्व कामे देवघरासमोर करत असू. हलवा ( संक्रांतीचब) बनवणॅ, पापड पापड्या कुरडया बनवणे सर्व. ओव्या काही येत नाहीत.

बुधवार पेठेत देवांच्या वाड्यातील घरात उखळ जमिनितलाच एक खड्डा होता व मुसळ आमच्या घरी जिमखान्यात आलेले होते. फारच मजबूत लाकुड. त्या शेजारी कपडे वाळत घालायची काठी होती. ती शिड शिडीत. त्या एका घरात अनंत जुन्या नव्या वस्तु होत्या.