कॉर्पोरेट अभिज्ञान

Submitted by Abuva on 25 February, 2024 - 06:18
Dalle2 generated oil painting cruise in a sunset

ओ, तुम्हाला ते बिटकॉईन माहितेय का? क्रिप्टोकरन्सी, इथेरिअम, ब्लॉकचेन वगैरे? ऐकलं असेल की! अगोदरच वैधानिक इशारा देण्यात येत आहे की कथेच्या प्रवाहात हे खाचखळगे लागणार आहेत. पण काळजी करू नका. प्रस्तुत कथालेखकाला देखील यातलं काही कळत नाही. काही न कळता तो जर कथा लिहू शकतो तर तुम्हाला जरा ठेचकाळायला, म्हंजे वाचायला काय हरकतै?

कथानायक आहे दुष्यंत. सहा फुटी उंच, गोरा वर्ण, वडील परदेश सेवेत असल्याने काही काळ परदेशी शिक्षण, पण नंतर आयायटी-आयायम (कळलं ना?). विधात्यानं एवढं भाग्य त्याच्या पदरी टाकलं होतं की त्याचं चित्रं रेखाटायला भाळ काय हो आभाळ कमी पडलं असतं. तुम्हाला काय वाटलं, टक्कल होतं? नव्हे, चांगला त्या काळी फेव्हरिट असलेला आफ्रो डू होता. पब्लिक काय ते पर्मिंग का काय करून घ्यायचं?
दुष्यंत इंडष्ट्रीत आला, तो पर्यंत नारायणमूर्ती, प्रेमजी वगैरे पहिल्या शिणेची मंडळी अजून कार्यरत होती, खरं तर अजूनही नाव कमावत होती. अशाच एका थोरानं दुष्यंताचा आपल्या राज्याचा राजपुत्र म्हणून जाहीर अभिषेक केला. त्यामुळे दुष्यंत राजे झाले. राजांची प्रगती रॉकेटच्या गतीनं झाली. आम्ही पामरं बसलो टेक्नॉलॉजीत त्यांच्यावर छत्रचामरं ढाळीत. पण महाराज? ते टेक्नॉलॉजी फटक्यात पार करून, प्रीसेल्स झटक्यात आटपून, मॅनेजमेंट मधून सेल्स-मार्केटिंग मधे प्रस्थापित झाले. यथावकाश अमेरिकास्थित झाले. मग ओरिजनल कंपनीशी फारकत घेऊन आपला सवता सुभा म्हणजेच स्वतःची सर्व्हिसेस कंपनी स्थापन करून देशात दोन तीन ठिकाणी आणि परदेशात दोन तीन ठिकाणी ऑफिसेस मांडली होती. आता दुष्यंतराजे महाराज झाले! मुबलक पैसा होता हे महत्त्वाचं. बुडाखाली पोर्शा, फेरारी करत करत रोल्सरॉईसही आली. झाली, झळझळीत प्रगती झाली होती!
तर असे आमचे दुष्यंत महाराज.
(टीप: नमनाला घडाभर तेल गेलं, पण हा फ्लॅशबॅक गरजेचा होता. आता ओळखा बरं नायिकेचं नाव काय असेल?)

हां, तर दिवस बिटकॉइनचे होते. क्रिप्टोकरन्सीची आणि वेब-थ्रीची चलती होती. त्या क्षेत्रात अनेक लोकं पब्लिकको येडा बना रहेले थे. कुणी मिलीयन्स कमावत होते तर कुणाचा सुपडा साफ होत होता. या भानगडीत अनेक मध्यस्थ आपली उखळं पांढरी करून घेत होते. दुष्यंतमहाराज या प्रांती वारा कुठे वाहतोय याचा अंदाज घेत होते. त्यांचीही दोन चार ठिकाणी गुंतवणूक होती. वॉलेट्स होती, नव्याकोऱ्या एक्सचेंजमध्ये अकाउंटं होती. चार सहा टीम्स ती टेक्नॉलॉजी शिकत होत्या. कुठल्याश्या स्कॅममध्ये पैसे गमावलेपण होते. पण ते चालायचंच हो.

मग दुष्यंत महाराजांनी एका देवमाशाशी दोस्ती केली. देवमासा? व्हेल हो!
तो समुद्रात असतो तो? हाऽ भलामोठ्ठा असतो? नाकातून पाणी उडवतो? तो कसा असेल?! काहीही बॉ तुमचं.
अहो पण म्हणजे तसलाच. ज्याची क्रिप्टोमध्ये दणदणीत कमाई (वा इन्व्हेस्टमेंट) आहे अशा दिग्गजांना व्हेल असं म्हटलं जातं!
तर अशा त्या देवमाशानं दुष्यंत महाराजांना क्रिप्टो क्रूझवर यायचं आमंत्रण दिलं. भलताच दिलखेचक मामला असतो भौ! खुल्या समुद्रावर सगळ्या सुखसोयींसह राजेशाही थाटात क्रिप्टोकरन्सीवर चर्चापरिसंवाद! अथांग सागरात क्षितीजापार अस्तांचली जाणाऱ्या सूर्यदेवांच्या साक्षीनं, एका हातानं कुणा मदनिकेला कवळून, दुसऱ्या हातानं फेसाळत्या वारूणीचा चषक उंचावत, (चुंबन घेण्यात मुखरत नसल्यास) नव्या कुठल्याशा क्रिप्टोकरन्सीत अवगाहन करण्यासाठी बोली लावायची!

ओ, जरा जमिनीवर या! दुष्यंत महाराज गेले होते तिथे. तुमचा आमचा हा विषय नाही!
तर अवगाहन शब्दाचा अर्थ कळला का - म्हंजे (बुडण्यासाठी!) इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हो! ते महत्त्वाचं! इथे क्रूझवर हे सगळं तुम्हाला फुकट अशासाठी पुरवलं जातं की तुम्ही तुमचा भरलेला खिसा अल्लादपणे आमच्या हातात रिकामा करावा! आलं का लक्षात?

चला तर मग कथा पुढे घेऊन जाऊ.
महाराज चारसहा पेग डाऊन आहेत. वामांगी एक गौरकाय ललना त्यांनी लपेटलेली आहे. ती त्यांना कुठल्याशा इनिशिअल कॉईन ऑफरिंगपाशी घेऊन गेलीये, माहिती देतेय. कसंय, शेअर मार्केट मध्ये आयपीओ असतात तशा इथे आयसीओ असतात (असायच्या, सध्या कडकी असावी). "रिस्क जादा लेकीन फ्युचरका वादा! अभी नही तो कभी नही" याचं आवाहन आणि आव्हान! भविष्याच्या बिळांत हात घालायला हे दुष्यंत महाराज टाईप सीईओ आतुर असतातच, त्यात वातावरण हे असं उत्तान, बेभान, तूफान! म्हणजे या ललनांचं कामच असतं की नवशिक्या-बनचुक्यांना गळाला लावणं. (असं म्हणतात हां, आपल्याला काय माहीत?) तर हीच आपली शकुंतला! आता दुष्यंतमहाराज आहेत म्हटल्यावर तुम्ही शकुंतलेची वाट पहात असालच ना! ...आं? अहो मॉडर्न शकुंतला आहे! आता ती प्रत्येक वेळी कण्वांच्या आश्रमात मृगशावकांबरोबर खेळणारी निरागस नवयुवती असलीच पाहिजे का?

तेवढ्यात देवमासा तिथे आला.
का वो दुष्यंत्भौ, कसा काय सीझन?
एकदम झ्याक
मंग, किती लावले
नाय अजून नाय.
काय गं रंभे, काय नीट दाखव की, सायबांना! का नुस्ता घोडा लावणार?
ए, ए भुस्नळ्या रंभा कोण्ला मंथो? शकुंत्ला हाय म्या
(टीप: कायै की त्यांचं मद्यधुंद इंग्रजी संभाषण आणि त्याचे मोहक विभ्रम मांडायला मनमोकळी ग्रामीण बोली जरा बरी वाटली)

देवमासा पेटला.
च्यायची दीडदमडीची! जा तुझ्यासारख्या हजार मेनका पायल्या! मोठी लागून गेली आहे शकुंतला..
आई कोणाची काढतो रे भा...ऊ

(टीप: शकुंतलेची आई ही अप्सरा मेनकाबाई होती विसरलात का? च्यायला ते कालिदासाचं नाटक विसरलात? कुठनं, पौडावरनं आलं काय पावनं?)

आता इथे अचानक दुष्यंतला स्त्रीदाक्षिण्य आठवलं.
(टीप: शेवटी पौराणिक कथानायक आहे, राव!)

ए देवमाशा, जास्त बोलून कोस.
आं?
म्हणजे जास्त बोलू नकोस.
हां!
शकुंतला मला आत्ताच सांगत होती, की ती या कॉइनची सीईओ आहे. तिला काय अशीतशी समजलास काय?
ही कायची सीय्यो?

आता दुष्यंत महाराज पेटले.
मी आत्ता हिच्या बरोबर याच क्रिप्टो कॉईनमध्ये एक मिलियन इन्वेस्टतो. शकुंतले, आपण मल्टीसिग्नेचर कॉन्ट्रॅक्ट करू. सगळे पैशे माझे आणि प्रॉफिट फिफ्टी-फिफ्टी.आणि याची व्हॅल्यू शंभर मिलियन झाल्यावर आपण या देवमाशाच्या तोंडावर मारू.

इथे शकुंतला जागी झाली. या रशियन का कायशा बायका लय डोकेबाज असतात. म्हणजे दिसायला असतात नटमोगऱ्या पण निघतील पीएचडी आणि सिस्टीममधल्या किडी (किडे - किडी - कीड)! तर ही शकुंतला त्यातली होती. ती मिलियन डॉलर्सची किंमत चांगलीच जाणून होती, उगाच नाही सीईओ झाली.

तिनं झटक्यात हालचाल केली. एक नवीन पद्धतीची हार्डवेअर की (key) या कॉईनवाल्यांनी डेव्हलपली होती. म्हणजे पहिल्यांदा बायोमेट्रिक रिकग्निशन (थंब रिकग्निशन) आणि मगच ती यूएसबी ॲक्टिव होउन त्या द्वारे 'प्रायव्हेट की' ला ॲक्सेस. त्यातून मग इन्व्हेस्टमेंट अकाउंटला हात घालता येतो. आणि ती हरवली किंवा चुकीच्या माणसाहाती पडली तर गेले पैसे...
(टीप: आलं का ध्यानी? थोडक्यात आता कथेत दुष्यंताची मुद्रिका अवतरली आहे!)

तिनं दुष्यंताचं बायोमेट्रिक केलं. इथेरिअम ब्लॉकचेनवर कॉन्ट्रॅक्ट एन्कोडलं. त्याच्या वॉलेटमधून पैशै ट्रान्सफर केले. त्याच्या वॉलेटमधे कॉइन्स ट्रान्सफरल्या. सगळं शिस्तशीर पार पाडलं. मग देवमाशाच्याच हस्ते या दोघांना - दुष्यंत अन शकुंतला - आपापल्या किया (म्हणजे keys हो!) दिल्या.
(टीप: येथे मागे शहनाईचा पीस टाकावा. गांधर्व – किंवा कुबेर - विवाह वाटला पाहिजे ना!)
त्या क्रूझवर झालेली ती सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट होती.आणि मग दारूचा एक पूर आला. त्यात दुष्यंत महाराजांची शुद्ध हरपली!

जाग आली तेव्हा दुष्यंत महाराज त्यांच्या न्यूयॉर्कच्या हॉटेलात होते. आपल्याला काहीच आठवत नाहीये याची जाणीव होताच त्याच्या हृदयात कळ उठली. धावत त्यानं आपलं मशीन उघडून एक्सचेंजमध्ये लॉगिनून ट्रान्झॅक्शन्स उघडली. एक नवी इन्व्हेस्टमेंट दिसली खरी. पण त्याला खरा झटका बसला तो म्हणजे सगळ्या इन्व्हेस्टमेंट अन्डर-वॉटर होत्या! त्याच वेळी झालेल्या क्रिप्टोच्या (अनेक पैकी एका) स्कॅममध्ये त्याची सगळी इन्व्हेस्टमेंट पार रसातळाला गेली होती. नवी कॉईन तर दिसतही नव्हती एवढी बुडली होती! हे अवगाहन भलतंच महागात गेलं होतं. दुष्यंतानं मशीन बंद केलं आणि पुन्हा क्रिप्टोच्या नादाला न लागण्याची कसम खाल्ली. लगेच आपल्या सीओओला फोन करून सगळ्या रिसर्च टीम ज्या क्रिप्टोवर काम करत होत्या त्यांना एआय वर शिफ्ट करण्याचा आदेश दिला.
दुष्यंत महाराजांच्या भाग्यावर एक ओरखडा पडला होता, पण प्रकरण फार महागात गेलं नव्हतं.

मधे चार-सहा वर्षं उलटली. गेल्या महिन्यात घडलेली ही गोष्ट. दुष्यंत महाराजांची मीटिंग टेक्स्ट-टू-स्पीचवर काम करणाऱ्या एका एआय कंपनीच्या लीडरशिप टीमबरोबर होती. व्हेंचर इन्व्हेस्टमेंट होती. मीटींग चांगली झाली. इगॉर-युलीया अशी नवरा-बायकोंची जोडी होती. मीटिंगनंतर युलियानं त्याला दहा मिनिटे मागितली, "फॉर पर्सनल डिस्कशन्स, नथिंग टू डू विथ धिस प्रोपोजल".
ही जरा विचित्र विनंती होती. "शुअर"
मग शेजारच्या मीटिंग रूममध्ये गेल्यावर तिनं विचारलं, "दुष्यंता, मला ओळखलं नाहीस?"
"नाही"
"अमुक तमुक कॉईन आठवते का? तू त्या क्रूझवर असताना इन्व्हेस्टमेंट केली होतीस?"
"बाप रे! तुला काय माहिती?"
"मी त्या कॉईनची सीईओ होते!"
"..."
"बाकी विसर. म्हणजे मी कधीच विसरले आहे!"
"..."
"तू इतक्यात त्याचं व्हॅल्युएशन पाहिलंस?"
"..."
"तुझी इन्व्हेस्टमेंट आता प्रॉफिटेबल आहे! सध्या क्रिप्टोकरन्सीजचे दिवस बरे आहेत."
"वॉव, मी त्या मार्केट कडे परत वळूनही पाहिलं नाहिये"
"वाटलंच मला"
"पण मला एक प्रॉब्लेम आहे. माझी इन्व्हेस्टमेंट ही मल्टीसिग्नेचर आहे. आणि मला आठवतही नाही की मी कोणाबरोबर ही इन्व्हेस्टमेंट केली आहे!"
"मी! तू माझ्याबरोबर ही इन्व्हेस्टमेंट केलीयेस. दुसरी की माझ्याकडे आहे! आणि आपलं कॉन्ट्रॅक्टही ब्लॉकचेनवर आहे!"
"पण माझी की? ती गहाळ आहे..."
आता पॅनिक व्हायची वेळ युलियाची होती. तिनं विचार केला.
"त्यावेळी देवमासा तुझ्याबरोबर होता. त्याला विचार!"

लॉन्ग स्टोरी शॉर्ट...
देवमाशाकडे ती की सापडली! देवमाशानं ती एका अटीवर दिली की युलियाच्या कंपनीतल्या नव्या व्हेंचर फंडींगमध्ये त्याला वाटा मिळावा. डन!
युलिया, नव्हे शकुंतला आणि दुष्यंत यांनी ती क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट सेलली (म्हणजे विकली). आणि त्यातून त्यांनी एक नवीन एआय कंपनी काढली - भरत एआय टेक्नॉलॉजी!

दुष्यंत महाराजांचं फळफळतं भाग्य काय सांगावं!

(टीप: आता झालं का कथेच्या शीर्षकाचं ज्ञान? एवढं फिट मॉडर्न शाकुंतल तर कालिदासाला सुद्धा परत लिहिता आलं नसतं!)
(टीप २: कथेतील टेक्नॉलॉजी विषयी माहिती चुकीची असू शकते! थोडक्यात, आमचे ऐकाल तर आमचे ऐकू नका.)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लेख.
Crypto currency ची थोडी माहिती आहे म्हणून मजा आली वाचायला.

वॉव!
सुंदर ॲनालॉजी!! परफेक्ट !!