सावधान.. खुलं आव्हान.. कारण आता शर्यतीत मी आलोय..

Submitted by विक्रम मोहिते on 23 February, 2024 - 08:48

इथुन सुरुवात झाली http://www.maayboli.com/node/12190
इथे पान पलटलं http://www.maayboli.com/node/1275
आणि हे आमचे प्रेरणास्थान https://www.maayboli.com/node/13017

- हॅलो, खबर पक्की आहे का?
- प्रश्नच नाही, लोकांसमोर तिघे एकदम दोस्त असतील, पण गेल्याच महिन्यात आधी विशालने कौतुकवर आणि मग चाफाने विशाल वर गेम केली याची पक्की खबर आहे मला.
- बस हेच पाहिजे होतं, आता तिघांच भांडण चौथ्याचा लाभ होणार. अजून जे काही कळेल ते सगळं मला तपशीलवार सांगत रहा.

खटक. (फोन ठेवल्याचा आवाज)
खटक. (टेबलवरचा टेबल लॅम्प चालू केल्याचा आवाज)
कर्रर्रर्रर्र(खुर्ची फिरवल्याचा आवाज)

खुर्ची फिरवून बरोबर कोनात फिरवून बसलेला माणूस, त्यामुळे जुन्या हॉलीवूड थरार सिनेमा मध्ये असल्यासारखा अर्ध्याच चेहऱ्यावर प्रकाश, त्या चेहऱ्यावरची स्मितरेषा हलकेच ठळक होत जातानाचा आभास. खलनायकाचे (की खल लेखकाचे, जाऊदे हा भाग सध्या आपण गुपित ठेवू.) स्वगत सुरू.

- साला... त्या चाफाच्या गोष्टी वाचून सगळ्यांची गाफा होते, विशल्याच्या गोष्टी वाचून भर दिवसा पण काहीतरी दिसल्यासारखं होतं आणि कौतुकच्या गोष्टी वाचल्या तर प्रत्येक आगंतुक हा संशयित असल्यासारखा वाटतो. आणि मग त्यांना मिळतं लोकांच अफाट प्रेम, फेम, ढीगानी कमेंटी वगैरे वगैरे. आणि आमच्या वाट्याला काय? सुंदर सुरवात, भाग फारच लहान, सुरू होईपर्यंत संपला. छ्या.. याला काय अर्थ आहे का! तुम्हाला सांगतो मंडळी, मी आधी असा नव्हतो, खरंच नव्हतो. एकदम सरळ साधा नाकासमोर बघून चालणारा, चालता चालता हळूच चार काड्या लावणारा आणि मग त्याच काड्यांनी झालेल्या लफड्यांच्या गोष्टी लिहिणारा माणूस मी. मग मला अवकळा सुचली आणि माबोवर आलो, इथे भलताच प्रकार. इथे आपल्या गोष्टी लिहिणं म्हणजे नागपुरात जाऊन नागपुरी माणसाला खाक्या दाखवण्यासारखा प्रकार म्हणायचा. सगळेच मातब्बर लेखक. आणि त्यात माझ्यासारख्या रहस्यकथाकारचे अजून वांदे. तीन एक्के वाली पानं असल्यासारखे विशाल चाफा आणि कौतुक एकदम टॉप वर. आमच्या सारख्याना कोण हिंग लावून विचारेना. मरो तिच्या मायला. शेवटी एक दिवस लिखाणाचा सगळा बंडल उचलून बाजूला ठेवला आणि टीव्ही लावला. नशीब इथे तरी चांगलं होतं म्हणायचं, आम्हा अभियंता लोकांच्या आयुष्यावर असलेला उदात्त चित्रपट चालू होता. थ्री इडियटस.. त्यात तो अमेर खान स्वगत करत होता –एक्झॅम टॉप करणे का एक ही फंडा था, या खुदके मार्क्स बढाओ या फिर दुसरो के कम करो. (च्यायला स्वगत मध्ये पण अजून स्वगत, मी तर inception च्या लेवलचं लिहायला लागलोय वाटतं, पण भेंचो फायदा काय, प्रसिद्धी सगळी विचाकौ साठी) काय साली आयडिया आहे, एक नंबर. एकतर स्वत:चं लिखाण खपवा, किंवा मग बाकीच्या लेखकांना खपवा. (ही आयडिया काय फक्त विशाललाच सुचू शकते का) बस... ठरलं तर! आधी या तिघांचा निकाल लावायचा आणि मग त्याचीच गोष्ट लिहायची. Freedom of speech च्या नावाखाली नाव बदलून लिहूया हवं तर, उगाच इथे पण त्यांच नाव कशाला फेमस करा, अशी गेम टाकायची की लोकांनी त्या तिघांच नाव पण घेतलं नाही पाहिजे, पार विसरून गेले पाहिजे. (उगाचच भल्लालदेव असल्यासारखा वाटलं) पण... सालं नशीब पण देवकी पंडितने लिहिलं आहे वाटतं माझं , जिथे तिथे हा पण आडवा येतो घोडे लावायला. साडेसात घोड्यांच्या शर्यतीमधल्या घोड्यांसारखा (हळूच स्वतची जाहिरात करून झाल्यामुळे गुदगुल्या झाल्याची बाहुली) तर... नेहमीप्रमाणे नमनाला घडाभर तेल घालून झाल्यावर मुद्द्याला हात घालतोय. लेखकांना खपवायचं तर सोपी गोष्ट नाही, आणि त्यांच नाव खपवायचं तर अजून अवघड, मरावे परी गोष्टीरूपी उरावे असं व्हायचं उगाच. काय करावं.. काय करावं.. हा.. आधी त्या तिघांना उकसवून बाहेर काढावं लागेल, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच पाऊलखुणा पुसून टाकायला कोणीतरी आला आहे ही गोष्ट आख्या माबो वर पसरली पाहिजे.. मग बघूया, आपण फेमस कसे नाय होत... नाहीतर सालं आयुष्यभर निनावी राहून काढावं लागेल.. निनावी!!! आयडिया.. तिघांना एक निनावी पत्र टाकतो, इतिहास साक्षी आहे, जगातल्या प्रत्येक माणसाने त्याच्या कॉलेज मधल्या आयुष्यात काही न काही कांड केलेले असतात, बस ते कांड मला माहीत पडलेत, आणि ते मी जगासमोर आणू शकतो ही अफवा पसरवून त्यांना घाबरवून सोडतो. मग ते कांड बाहेर येऊ नये म्हणून लेखक स्वत: बाहेर येणार, बाहेर येऊन अजून काही कांड करणार आणि मग स्वत:च कशात तरी फसणार ही नक्की.. बस.. हेच करायचं... चला लिहायला घेऊया..

कर्रर्रकुर्रकर्रर्र(शाईचा खराब नीब वाला पेन कागदावर चालायचा आवाज)

प्रिय कौतुक/विशाल/चाफा,
असं म्हणतात की माणसाचा भूतकाळ कधीच मरत नसतो, कायम त्याच्या माणगुटीवर भूत बनून बसलेला असतो. आज जरी तू सगळ्यांसामोर साधा भोळा बनून असशील तरी कॉलेज मध्ये तू काय सोळा भानगडी केल्या होत्या त्याचा लेखाजोगा माझ्याकडे पुराव्या सकट आहे. त्यामुळे तुला जर तुझी ही सज्जन प्रतिमा शाबूत ठेवायची असेल तर मी जे काही सांगेन ते करावं लागेल. आणि हो, माझ्या या पत्राला मस्करीत वगैरे घेण्याचा विचार करत असशील तर एकदा परत विचार कर. कारण मी फक्त एकदा संधि देतो.. फक्त एकदाच... नक्की काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे ते पुढच्या पत्रात सांगेन, आणि हो, उगाच कोणाच्या तरी बायकोचा खून वगैरे करायच्या प्लान सारखं किंवा फोन वरुन हिप्नोटाईज करण्यासारखं पांचट काम नाही आहे बरं का हे.. मी तुझ्या वर नजर ठेवून आहे ही एव्हाना कळलंच असेल तुला. आता पुढच्या पत्राची वाट बघ.
तुझाच...
XXX♥♥♥

ता. क. चाफ्याचं चेमिकल 2-2 थेंब टाकलं आहे बरं का तिन्ही पत्रांमद्धे. गुरुची विद्या गुरूलाच फळावी... आणि तुमच्या पसंतीची पावती मिळावी..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@हर्पेन धन्यवाद
@Ajnabi थोरामोठ्यांच्या कथा मालिकेचा भाग बनायचा छोटा प्रयत्न