'गेम ऑफ थ्रोन्स' आणि मी

Submitted by संप्रति१ on 21 February, 2024 - 08:00

१. आठ सिझन्स. त्र्याहत्तर एपिसोड्स. आठ वर्षे चाललेली सिरीज.
वेस्टरॉसच्या सेव्हन किंग्डमच्या राजधानीचं शहर -किंग्ज लॅंडिंग.
सगळ्या कटकारस्थान्यांच्या बजबजपुरीनं माजलेलं. तिथं आहे एक आयर्न थ्रोन. हजारो शत्रूंना नमवून त्यांच्या तलवारींच्या जोरावर घडवलेलं सिंहासन.
त्यासाठी चाललेला सगळ्या राजघराण्यांचा सत्तासंघर्ष, शह काटशह. पण त्याअनुषंगाने केवढं विशाल मानवी जीवन कवेत घेतलंय..! आणि माणसांच्या स्वभावांचे विपुल पैलू..! राग लोभ द्वेष ईर्ष्या क्रौर्य घृणा ढोंग पिसाटपणा सूड हेवेदावे शौर्य नीतीमूल्यं महत्वाकांक्षा स्खलनशीलता शहाणीव प्रेम दया माणुसकी सचोटी निष्ठा सभ्यता शालीनता.

२. पात्रं भरपूर भरपूर आहेत. जोरकस आहेत. आयुष्यभरावर प्रभाव टाकणारी आहेत. प्रत्येकाची जडणघडण एका वेगळ्याच मुशीतून झालेली. परफेक्ट कुणीच नाही. प्रत्येकास मर्यादा आहेत. एक पात्र एका सीझनमध्ये आवडायला लागतं तर ते तसं कायमच आवडेल असं सांगता येत नाही. त्याचं बाकीचंही 'विविधगुणदर्शन' उजेडात यायला लागतं. आवडती पात्रं डोळ्यांसमोर मरताना बघावं लागतं. तशी तयारी ठेवावी लागते.
परिस्थिती बघून नैतिकता अनैतिकता ठरवणारी पात्रं. आपापल्या कुवतीप्रमाणे, पिंडाला धरून वागणारी पात्रं. व्यवहारी पात्रं.
स्वतःच्या पायापुरतं बघणारे काही आहेत. काही धोरणी चलाख आहेत. पुढच्या दहा चालींचा आधीच विचार करून खेळणारे आहेत. मोठ्या व्यापक पटावर गोष्टी बघणारे काही आहेत. काही निव्वळ भुरटेही आहेत.
तर अशी ही सगळी पात्रं हळूहळू इव्हॉल्व होत जातात. त्यांची आयुष्यं उलगडत जातात.

३. एवढ्या सगळ्या पात्रांची आयुष्यं खेळवणं, त्यांची एकमेकांशी सांगड घालणं, त्यांतून त्यांच्या जगण्याची फिलॉसॉफी मांडणं हे अद्भुत प्रतिभा असल्याशिवाय शक्य नाही..!
जगभरातल्या कुठल्याही प्रेक्षकाला ह्यात आपलं असं काहीतरी सापडतच असावं. अनेकांनी अनेक अंगांनी याबद्दल लिहिलं पाहिजे, तरच याच्या लांबी-रूंदी-खोलीचा थोडाफार अंदाज घेता येईल..!
आणि लेखक/ दिग्दर्शक जजमेंटल कुठंही होत नाहीत. हे असं असं आहे. चांगलं/वाईट प्रेक्षकांनी ठरवावं. 'शो, डोन्ट टेल' (तुमच्याकडे जे काही म्हणणं आहे ते सरळ दाखवा, उगाच वर्णनं करत बसू नका, थेट दाखवा..!) हे जे कथानकाचं मूलभूत तत्व असतं, ते ह्यात सुरूवातीपासून शेवटपर्यंत सांभाळलं गेलंय.
आणि संवादांबद्दल तर काय बोलावं..! डायलॉग्ज, शाब्दिक जुगलबंदी- फटकारे, वन लाईनर्स, क्वोट्स, शंभर नंबरी सोन्यासारखे आहेत..! आशयघन आहेत.

४. पहिल्या सीझनमध्ये गुलछबू ऐय्याश वाटणाऱ्या टिरीयन लॅनिस्टरचं विश्र्वरूपदर्शन हळूहळू होत गेलं, आणि तोच सगळ्यात जास्त शहाणा, सेन्सीबल वाटायला लागला.
टिरीयनचं कोर्टातलं स्वतःच्या बचावाचं भाषण हे आजवर ऐकलेलं सगळ्यात प्रभावी भाषण. टिरीयन- लॉर्ड व्हॅरिस, टिरीयन- डिनेरिस, टिरीयन- जॉन स्नो यांच्यातले संवाद रिप्ले करून बघण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहेत.

५. नेड स्टार्क. सभ्य, सुसंस्कृत, धीरगंभीर. ऑनरेबल पुरुष. कट्टर शत्रूदेखील याच्याबद्दल चांगलंच बोलतात. आर्या स्टार्क तलवारबाजी शिकत असताना कौतुकानं बघणारा बाप नेड स्टार्क. दिलेल्या शब्दाची किंमत माहीत असणारा लॉर्ड एडार्ड स्टार्क.

६. टायविन लॅनिस्टर. घराण्याची लिगसी जपण्यासाठी कुठल्याही टोकाला जाणारा. विधिनिषेधशून्य. पण विनाकारणचं, मनोरंजनासाठीचं क्रौर्य मंजूर नाही. स्वार्थापोटी, काहीएका उद्दिष्टासाठी गरज पडल्यास क्रौर्याचं त्याला वावडं नाही‌. ह्या कठोर टायविनचाही एक मऊ कोपरा नकळतपणे आर्याला त्यानं ज्या पद्धतीनं वागवलं तेव्हा जाणवतो.

७. जॉन स्नो..! अंतर्बाह्य सज्जन. लव्हेबल प्रियकर. योद्धा. अंगभूत नेता. लोकांना लीड करणं म्हणजे काय असतं याची, जबाबदारीची जाण असलेला. बाकी, ब्रह्मचर्याची शपथ घेऊन बसलेल्या कोवळ्या जॉनला इग्रिट 'यू नो नथिंग, जॉन स्नो' म्हणत गुहेत नेऊन त्याचा कौमार्यभंग करते, ते रोचक आहे..!

८. शौर्य ही काही युद्धातच दाखवावायची चीज असते, असं नाही.
मॉरमॉंट हाऊसची तिखट जीभेची लेडी लियाना मॉरमॉंट. ताडताड ठिणग्यांसारखी उडत असते ही निडर पोरगी.
शिवाय लेडी ओलेना. लेडी कॅथलीन स्टार्क. सर्सेई. एका वेगळ्याच हिंमतीच्या स्त्रिया. ह्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पीळ अद्भुत आहेत.
सर्सेई कडून काही चांगल्याची अपेक्षा करण्यात अर्थ नाही, पण तरीही त्या हायस्पॅरो नावाच्या पाखंडी धर्मगुरूला त्याच्या सगळ्या गॅंगसकट ती ज्या धमाक्यात उडवते, ते बघून सुकून मिळतो.

९. जॉफ्री, रॅमसे बोल्टनसारखी शुद्ध नीच, विकृत आणि मनानं रोगट पात्रं.
आयडेंटिटी क्रायसिसनं ग्रस्त थिऑन ग्रेजॉय.
लॉर्ड व्हॅरिस, जोरा मॉरमॉंट, मिसेंडी, टिरीयन हे उत्कृष्ट डिप्लोमॅट/सल्लागार.
सर डेव्हॉस सारखा नामी वकील..! आयर्न बॅंक मध्ये स्टॅनिस बरॅथियनची बाजू मांडणारे सर डेव्हॉस, डिनेरिसच्या पहिल्या भेटीत जॉन स्नोची बाजू मांडणारे सर डेव्हॉस..!
द हाउंड, आर्या स्टार्क, ब्रॉन, लेडी ब्रिऑन, दारिओ नहारिस - हे एकांडे शिलेदार.
स्टॅनिस बरॅथियन, रॉबर्ट बरॅथियन, टायविन लॅनिस्टर, नेड स्टार्क, रॉब स्टार्क, जॉन स्नो, जेमी लॅनिस्टर- हे वॉर कमांडर्स.
सॅमवेल टार्ली- पुस्तकप्रेमी
द हाउंड- सख्त बंदा.

१०. जोरा मॉरमॉंटच्या डोळ्यांतल्या वेदना, डिनेरिसप्रतीचं अव्यक्त एकतर्फी प्रेम..! हे सगळं प्रेमाच्या निष्ठेच्या सीमा ओलांडून पार भक्तीच्या पातळीवर गेलेलंय. सगळं जगणं-मरणं तिच्यावर उधळून दिलं या माणसानं.
आणि मग टॉर्मंड..! लेडी ब्रियानचा एकतर्फी प्रियकर.‌ अजून किती उघड प्रपोज करायचं असतं राव माणसानं..!

११. स्टार्क हाऊस थोर आहे. सुरूवात त्यांच्यापासूनच, शेवटही त्यांच्यापाशीच. हा सगळा आपापला विलक्षण प्रवास करत झुंजत झगडत त्यातून शिकत शिकत एकेक स्टार्क विंटरफेलला येतात, ते प्रसंग हलवून टाकणारे आहेत..!
मधल्या काळात आर्याला मोठं होताना बघितलं. तिनं घेतलेला वॉल्डरफ्रेचा सूड बघितला. सान्साचं रूपांतर लेडी स्टार्कमध्ये, एका सुज्ञ स्त्रीमध्ये होताना बघितलं. इतरांवरची डिपेंडन्सी संपवून, शिकायचे ते धडे शिकून, स्वतःच्या आयुष्याची, विंटरफेलची कमान हातात घेण्याएवढी कणखर, धोरणी होताना बघितलं.‌ सान्साला समांतर सरकत विंटरफेलला येऊन स्वतःच्या कर्मानं संपलेला बेलिश बघितला.
ब्रॅंडनला थ्री आय्ड रेव्हन होताना बघितलं. जॉन स्नोला लोकांनी राजा मानताना बघितलं. कुठून निघाली होती, आणि कुठे पोचली ही स्टार्क भावंडं..!
ह्याच काळात तिकडे डिनेरिसचा रक्तरंजित प्रवासही बघितला. तिला हुकुमशहा होत जाताना बघितलं.
माणसाच्या जीवनाच्या अनंत शक्यता..!

१२. नियतीच्या पटावरची ही सगळी खेळणी. सगळ्यांची आयुष्यं हळूहळू सरकत लॉंग नाईटच्या महायुद्धाच्या दिशेनं चालललीयेत. तिकडे प्रेतात्म्यांचा राजा, श्री. नाईट किंग, यांनी व्हाईट वॉकर्सची सगळी भुतावळ उठवून जागी केलेलीय.

१३. गेम ऑफ थ्रोन्स ची पकड राक्षसी आहे. पंधरा-वीस दिवसांचा मोकळा स्पॅन हाताशी ठेवूनच त्यात घुसावं. कारण ते पूर्ण बघून झाल्याशिवाय चैन पडत नाही. आर या पार झाल्याशिवाय दुसरं काही सुधरत नाही. झोपेत, स्वप्नात, जागेपणी व्होलार मुघोलिस, व्होलार डोहारीस, ड्रखारिस वगैरे वगैरे व्हॅलेरियन शब्द मंत्रासारखे घुमत राहतात. बघण्यात खंड पडला की चीडचीड होते. वास्तवात परत यायला नको वाटतं, परतलो तरी ते परकं वाटतं.

१४. सगळे सीझन्स बघून संपतात, तेव्हा आपण बदललेले असतो. मानसिक, भावनिक, फिलॉसॉफीकल पातळीवर सूक्ष्म परिवर्तन झालेलं असतं.
शेकडो पात्रं, शेकडो आयुष्यं जगून झाल्यावर कसं वाटेल? तसं वाटतं. एकाच आयुष्यात खूप काही बघावं, भोगावं लागलेल्या एखाद्या मॅच्युअर माणसाचे डोळे कसे दिसतील ? तसे आपले डोळे होतात..!
तर पहिल्यांदा ही वेबसिरीज सलग बघितली होती, झपाटल्यासारखी. मग अजून एकदा बघितली, शांतपणे.
मधल्या काळात मी पाचेक वर्षांनी म्हातारा होऊन बसलेलो. पण तरीही इंपॅक्ट तसाच आहे. गारूड मनावरून उतरत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

House of dragon बघायला सुरवात करा . ती सुद्धा सुंदर कथा .. जो काही ड्रामा रचालय पहिल्या सीझन मध्ये .. मस्त एकदम

मस्त लिहिलय !
मी मेन सिरीज मध्ये जी पुस्तकं आलीयेत तितकी सगळी वाचलियेत, आणि पहिले तीन का चार सिझन उडत उडत पाहिलेत. सिरीज संपूनही मी पुस्तकाची वाट बघतोय Happy
पण इतका उशीर झाला आहे पुस्तक येण्यात की आता सहावे पुस्तक winds of winter एखाद्यावेळेस येईलही, पण शेवटचे ड्रीम फॉर स्प्रिंग येण्याची शक्यता कमी वाटते आहे.
Tales of Dunk and Egg सुद्धा भारी आहेत, लघुकथा आहेत. आणखी वेस्टेरोस हवे असेल तर परफेक्ट आहेत ह्या गोष्टी. ह्यात १०-१२ वर्षाचा राजपुत्र एगोन (हा नंतरचा, conqueror नाही) आणि तो ज्या Knight खाली स्कवायार म्हणून काम करत असतो, त्या सर डंकन द टॉल ह्यांच्या गोष्टी आहेत.

मस्त लिहिले आहे. GoT आवडती वेब सिरीज आहे. एकाच लेखात जवळपास सगळ्या पत्राबद्दल लिहिले आहे आणि जे लिहिले आहे ते त्यांना जस्टीस देणारे लिहिले आहे. सिरीजचा शेवटचा तेवढा गडबडलेला वाटला.

छान लिहिले आहे. लॉकडाऊनात बघितली मी ही पूर्ण वेबसिरीज बिंज वॉच केली. नेड स्टार्कला खरच मारले पाहुन एक दिवस पुढे पाहिलीच नव्हती. पण तिथुन पुढे चांगली ग्रिप पकडली.

श्री. नाईट किंग >> हे नजरेतून निसटलं होतं Lol Lol

मी आठवा हंगाम चालू असताना पहिल्यापासून बघायला चालू केली होती ही मालिका. फार आवडली होती.

(मला त्यातले सेक्स आणि व्हायोलंस खटकण्यापेक्षा त्यांची अत्याधुनिक वाटावी अशी बोली भाषा (मुख्यतः शिव्या या गेल्या २५-३० वर्षात सर्वतोमुखी झालेल्या; पुरातन शिव्या नाहीत) आणि जुन्या कपड्यांना घेऊन आधुनिक वाटेल असा फॅशन सेन्स अश्या गोष्टी खटकल्या होत्या. पण पहिल्या काही भागांनंतरच त्याकडे दुर्ल़क्ष होऊन कथेत आणि पात्रांमध्ये ओढला गेलो.)

खूप छान लिहिले आहे. सगळे मुद्दे पटले. सर्सी लॅनिस्टर हे माझे सर्वात आवडते पात्रं. तिचं रूप, तिची महत्वकांक्षा, तिचा गिल्ट फ्री वावर, बाहेर जगासाठी एकदम निर्दयी असणारी ही बाई स्वतःच्या मुलांच्या बाबतीत प्रचंड हळवी असते. तिन्ही मुलांचे मृत्यूनंतर देखील पुन्हा उभे राहून महत्वाकांकक्षे मागे धावणे. एक खूप कणखर स्त्री पात्रं.
सर्वात मूर्ख पात्रं मला कॅटलीन स्टार्क वाटते. नवऱ्याला न कळवता गुपचूप ती विंटरफेल मुलांच्या हाती सोडून किंग्सलँडिंगला निघून जाते. तिथे बेलीशचे ऐकून टायरियनला अटक करून पाच राजांचे रक्तरंजित युद्ध सुरू करते.असे वाटते की ह्या बाईला कोणीही सहज वेड्यात काढू शकतो. पुढे कैदी जेमी लॅनिस्टरला सोडून दिले आणि अख्खे कार्स्टार्क गमावले. ज्याने युद्ध अजून भडकले. तिने रेन्ली आणि स्टॅनिस यांच्यातल्या गोष्टी बिघडवण्यास तीच कारणीभूत.

छान लिहिलं आहे . हाउस ऑफ ड्रॅगनमधलं एकही पात्र गेम ऑफ थ्रोन्सच्या पात्रांच्या तोडीचं नाही , मिळमिळीत watered down version आहे , दूध नाही म्हणून ताक प्यावं तसं पिलं सुद्धा .. पुढचाही पाहणार आहे सिझन पण फार आतुरता वगैरे काही नाही ... गेम ऑफ थ्रोन्स एक मास्टर पीस बनून गेला प्रिडेस्टाइन्ड असल्यासारखा , आता 20 - 25 वर्षं तरी त्या लेव्हलची सिरीज बनेल असं वाटत नाही .

हाउस ऑफ ड्रॅगनमधलं एकही पात्र गेम ऑफ थ्रोन्सच्या पात्रांच्या तोडीचं नाही >> ड्रॅगन्स ! Happy तुम्ही जर मूळ शॉर्ट स्टोरीज वाचल्या तर त्यात जाणवते कि म्हातरबाने मोठा प्रीक्वेल लिहिण्यासाठी तयारी केल्याचे जाणवते . पुस्तकामधली ड्रॅगन्स वॉर (वाचताना तरी) जबरदस्त रंगवली आहेत. त्यात कुठेही अपेक्षाभंग होत नाही.

अजून मूळ माल - डान्स ऑफ ड्रॅगनस चालू झाला नाहीये. शेवटच्या एपिसोड मध्ये फक्त चुणूक मिळते.

ड्रॅगन्स ठीक आहेत Happy ते बघायला आवडतातच . पण पात्रांमध्ये काही कॉम्प्लेक्सिटी वाटली नाही फारशी .. उदा . टायविन आणि ओटोची तुलना करा , सरसी आणि ऍलिसेंटची तुलना करा .. किंवा अगदी डॅनेरिस - ह्रनेरा ..

गेम ऑफ थ्रोन्सची पात्रं रसरशीत , फोर्सफुल वाटतात , विकारांच्या अधीन होऊन प्रत्येक निर्णय घेणारी ... त्यामानाने हाउस ऑफ ड्रॅगन्समधली कंटाळवाणी आहेत ..

डायलॉग ऐकून - वा काय भारी - असं वाटलं असा एकही प्रसंग आठवत नाही हाउस .. मधला .. गेम ऑफ थ्रोन्स मध्ये असंख्य आहेत ..

गोंडस , भाबडा एगॉन 10 - 15 वर्षात एवढा निर्ढावलेला , क्रूर होतो हेही पटलं नाही .. कन्सिस्टन्सी जाणवली नाही कॅरॅक्टर मध्ये की इरिटेशन होतं . त्यापेक्षा सुरुवातीपासूनच त्याला क्रूर दाखवला असता जॉफ्री सारखा तर जास्त पटलं असतं .

अख्ख्या सिरीज मध्ये व्हेगार ल्यूक आणि त्याच्या ड्रॅगनला मारते तो एकच प्रसंग अप्रतिम वाटला , त्याचं कारण म्हणजे ती घटना म्हणजे ऍक्सिडेंट होता , मारायचा कुठलाही हेतू नसताना युद्धाला तोंड फुटायला कारणीभूत घटना घडली हे मस्त दाखवलं आहे , त्यावेळचे एमंडच्या चेहऱ्यावरचे भाव ...

स्वतंत्र बघितली , गेम ऑफ थ्रोन्सशी तुलना केली नाही मनात तर आवडण्यासारखी आहे .