प्रतीकं

Submitted by Abuva on 20 February, 2024 - 23:35
Google Gemini generated image of Indian woman with mangalsutra

माझा सुट्टीचा दिवस होता. सकाळच्या दूरच्या रपेटीनंतर भरपेट जेवण झालेलं. डोळ्यावर झोप अनावर झालेली. मी आडवा होणार तोच बायको उत्साहात कुठला तरी फोटो मोबाईलमध्ये दाखवत आली.
"काल मी गाडगीळांकडे गेले होते ना तिथे मला परफेक्ट कानातलं मिळालं आहे. माझ्या हिऱ्यांच्या पेंडंटला परफेक्ट मॅचिंग आहे."
प्रथम हे लक्षात घ्या गाडगीळांकडे असं म्हटल्यावर "कोण गाडगीळ" असा प्रश्न पुण्यात (आणि तात्पर्याने सकल विश्वात!) गैरलागू आहे. हे म्हणजे पुण्यात येऊन दगडूशेट म्हणजे कोण असा प्रश्न विचारण्यासारखेच आहे. ही नावे पुण्याच्या पुणेपणाची विवक्षित प्रतिकं आहेत! पुणेरी संस्कृती, तिची प्रतीकं, त्याचा जाज्वल्य वगैरे अभिमान...

तर सांगत काय होतो, लग्नसराई सुरू झालीये. त्यामुळे थोड्याफार फरकानं या आणि अशा चर्चा घरोघरी सुरू असतील! झालं, म्हणजे परत खिसा हलका होणार. आणि हिऱ्याच्या पेंडंटला मॅचिंग म्हणजे विचारूच नका. माझी झोप उडाली ती त्या विचारानं. तिनं भलत्याच आनंदात फोटो माझ्यासमोर धरला... मी अजागळपणे विचारलं, "हे असं दिसतं तुझं पेंडंट?" तिच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलले. आपला नवरा एवढा कसा ढक्कण, असा प्रश्न तिच्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट दिसला. अनेक वर्षांच्या सहवासातूनच अशी टेलिपथी घडते. "तुला आठवत नसेलच. मी बायको आहे हे तरी कसं लक्षात राहातं. नशीबच म्हणायचं माझं. सदा मेलं मोबाईल मधे डोकं घालून जगाची चिंता करायची. कोण ती सांड्रा गेली तरी किती वाईट‌ वाटतं. पण आमचं साधं पेंडंट आठवत नाही? बरं स्वस्त होतं का ते? चांगलं हिऱ्याचं आहे. एकुलतं एक. थांब आणून दाखवते."
तणतणत अन् तावातावात ती आत गेली. दागिने म्हटलं की‌ बायकांना एक वेगळाच चेव येतो. मग ते हे यानं दिलंय. (हे देणाऱ्यांत 'माझ्या माहेरचे' हा एक मोठा भाग असतो.) त्यात मग ते नव्व्या फॅशनचं कानातलं आहे ना ते माझ्या तीन भावांनी मिळून भाऊबीजेला केले होते हे अभिमानानं सांगते. (पण कमी पडले ते पैसे मी दिले हे सोयिस्कररित्या विसरते - आणि मला विसरता येत नाही)! ते दुसरं आहे नं ते तिसरं मोडून केलंय. पूर्वी आपले हे गाडगीळ, रांका, वत्तुरकर वगैरे असायचे. आता मात्र कॉर्पोरेट ब्रॅंडांचीही नावं घेतली जातात.... ते सोडा, स्वतःचे सगळे दागिने ठाऊक असतात एवढंच असतं तर ठीक. पण यांना बहिणीचे, जावेचे, सासूचे, शेजारणीचे, कोणाकोणाचे दागिने , त्यांची खरेदीची तारीख, घडणावळ, त्या वेळचा सोन्याचा भाव.. बापा! भल्लं बवाल चालू रायते नं...
मग आल्यावर अनेक प्लास्टिकच्या पिशव्यांतून अनेक दागिने बाहेर पडले. प्लास्टिकच्या पिशव्या? हे मी न विचारताच तिनं स्पष्टीकरण दिलं, "मला ती मंगळसूत्रं मोडून नवी करायची आहेत ना म्हणून सगळं घेऊन फिरावं लागतं इथेतिथे. मग जिथेतिथे त्या बॉक्सापेट्यांमधून काढण्यापेक्षा ह्या झिपलॉक बॅगा बऱ्या पडतात!"
मग हे दोन ग्रॅमचं पासून ते हे पाच-सात तोळ्यांचं अशी अनेक मंगळसूत्रं बाहेर आली. च्यायला, एका नवऱ्यासाठी मंगळसूत्रं किती बांधायची? हे मी मनात म्हटलं. पण तिला ऐकू गेलं बहुतेक. टेलिपथी!
"लागतात एवढी! हे तसं घरी घालायचंच आहे.‌ हे पण कधीकधी मी घरी घालते. आणि हे नं, ड्रेस वर छान दिसतं. आणि ह्याचं पदक मोठं आहे ना त्यामुळे हळदीकुंकवासारख्या छोट्या कार्यक्रमांना लागतं. हे फॅशनेबल पार्टीवेअर वर चांगलं जातं. ते बाहेरच्या लग्नांत घालायचं. आणि हे मात्र आपल्या घरच्या लग्नातच मी फक्त घालते."
आणि मग एकदम ती दचकली, "माझं घरी घालायचं रोजचं मंगळसूत्र कुठाय?" तिचा हात गळ्याजवळ गेला.‌ गळ्यात तर काही नव्हतं. हे असं असतं. जास्त वेळ गळ्यात काहीच नसतं पण भरमसाठ मंगळसूत्रं तर पाहिजेतच!
आता तिचा चेहेरा पडला होता. तिचे ओठ थरथरू लागले. ती आठवत होती - "काल होतं का? मग त्या सोनाराच्या दुकानात, का परवा त्या तनिष्क मध्ये आणि राम पर्ल्समध्ये..." तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघवत नव्हता. तिच्या आवाजातल्या बदलामुळे शेजारच्या खोलीत मोबाईलवर टाईमपास करणारे आमचे कुलदीपकही प्रकटले. त्यानं मुद्द्याला हात घातला. "किती किंमत असेल त्याची?"
तर ही परत ओरडली, "आणि ते कानातलं? ते कुठाय? ते पण दुरुस्त करायचं होतं. तेही त्याच्याबरोबरच होतं, आई गं!" आता ती रडवेलीच झाली होती.
"पण किंमत किती होती?" मुलगा मुद्दा सोडायला तयार नव्हता. तिच्या चेहेऱ्याकडे बघवत नव्हतं. म्हणून मी त्यालाच झाडलं, "गप रे, पैसे पैसे काय करतोयस?". तिला आता प्रश्न ऐकून गेला होता. तिचा आवाज कापत होता, "अरे मंगळसूत्र आहे ते. त्याची किंमत काय विचारतोस?"

घरी वा रोजच्या वापरात क्वचितच मंगळसूत्र घालणारी वा साधी कुंकवाची टिकलीही न लावणारी माझी बायको या एका वाक्यात मला जागं करून, हलवून गेली.‌ कमाल असते नं या बायकांची? गेल्या शंभर-सवाशे वर्षांत नवरोबांच्या तोऱ्याच्या सुंभाची जळून राख झाली आहे. पण बायकांच्या मनात त्या नात्याचा पीळ अजून बाकी आहे? कुंकवाचा धनी वगैरे सोंगं मागे पडली तरी त्या भावनेचं अस्तित्व आजही टिकून आहेय़ त्या प्रतीकांचं महत्त्व शोभेच्या, दिखाव्याच्या वस्तू एवढंच नसून त्याला भावनेचीही किनार - का काठ, का पदर, का अंग - आहे. खरंय, जेव्हा समोर पाच-सहा मंगळसूत्रं पडली होती तेव्हा कुठलं मोडायचं आणि कुठलं ठेवायचं अशी निव्वळ बेगडी, भौतिक चर्चा चालू होती. पण एक मंगळसूत्र सापडत नाही म्हटल्यावर त्याच्या नसण्यानं सगळे वरवरचे पदर दूर होऊन, त्यामागच्या खोलवर दडलेल्या भावना उसळून वर आल्या. किंवा असं म्हणू की माझ्या डोळ्यांवर आलेला पडदा दूर झाला...

मग तिला आठवलं, "काल? काल.. बरोबर कालच त्या कॅंपातल्या दुकानात काढलं होतं. अरे तेच मोडून नवं करून घ्यायचंय मला. मी आत्ताच निघते. तिथेच विसरलं असेल. सीसीटीव्हीत दिसेल सगळं". मी लगेच विचारलं, "मी येऊ का?" ती "हो, लगेच चल" म्हणाली. तेव्हढ्यात तिच्या मनात विचार आला, "एकदा पर्स पूर्ण मोकळी करून बघते." मग समोरच्या गादीवर तिनं भडाभडा सगळी पर्स उलटी केली. (त्यातून काय काय निघालं हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे!) आणि त्यातच सापडली एक पांढरी, अपारदर्शक प्लास्टिकची पिशवी! ती बघताच, बायकोचा चेहेरा हरखला, असा काही बदलला, की तिला झालेल्या हर्षवायूची तुलना कदाचित अंगावरच्या कपड्यांची ही पर्वा न करता (नव्हतेच ते) युरेका, युरेका ओरडणाऱ्या आर्किमिडीजशीच होऊ शकेल. भराभरा ती झिपलॉक पिशवी उघडताच त्यातून ते मंगळसूत्र आणि एक कानातल्याची जोडी बाहेर आली. मटकन खुर्चीत बसत बायकोने छातीवर हात घट्ट दाबत एक भला मोठ्ठा निःश्वास सोडला! आमचे कुलदीपक कधी नव्हे ते समजूतदारपणे आईला म्हणाले, "आई, तू बस, मी तुला पाणी आणून देतो!" बायकोच्या तोंडून शब्द फुटेना!

अशी ही साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण म्हणणार होतो. पण माझी शिकवणी अजून पूर्ण झाली नव्हती.

हे उरकत नाही तर आईचा फोन आला, "अरे, प्रभाच्या नातवाचे लग्न पंधरवड्यावर आलं आहे. आज तुला‌ वेळ असेल तर लॉकरमधून दागिने काढून आणायचे का?" झोपेचा बोजवारा उडाला होताच. मी म्हटलं, "येतो दहा-पंधरा मिनिटांत. तू तयार रहा, आपण जाऊ बॅंकेत." बऱ्याच वर्षांनी मी लॉकरच्या नादी लागत होतो. इतके वर्षं बाबा बघायचे, आणि त्यांच्या नंतर आजपर्यंत आईच बघायची. पण वाढतं वय कोणाला चुकलंय? तिला घेऊन गेलो बॅंकेत. मग सगळे सोपस्कार करून लॉकर उघडला. काय आईच्या मनात आलं कुणास ठाऊक, ती म्हणाली, "चल सगळंच घरी घेऊन जाऊ. एकदा बघू काय हवं-नको ते. आणि नको असलेल्या गोष्टी मोडून नवं काही तरी करू." बदलत्या काळाची, त्या बदलांची जाणीव या शब्दांत होती. घेऊन आलो.

घरी आल्यावर आता आई तिच्या दागिन्यांचा संसार उघडून बसली होती. इथे झिपलॉक नव्हतं! इथे एक जुना, जरीकाम असलेला, मखमलीचं तोंड असलेला, वेताच्या टोपलीचा, नाडी ओढून बंद होणारा, एकेकाळचा दिमाखदार पण आज जीर्णशीर्ण झालेला बटवा होता. कदाचित ह्या बटव्यानं सुद्धा दोन-तीन पिढ्या पाहिल्या असतील! दागिन्यांचे घाट जुने होते. अनेकवार घातल्याच्या, वापरल्याच्या खुणा होत्या. एखादं कानातलं झिजलं होतं, कुणाचं मळसूत्र सैल झालं होतं. कुणाला गोंडा, तर कुणाला हूक बसवायचा होता. या सगळ्या गोष्टींशी दोन-चार पिढ्या मागे जाणाऱ्या आठवणी निगडीत होत्या. एखादा चांदीचा गडू तीन पिढ्यांनी पाणी प्यायला वापरला होता. तर एखादं चांदीचं तबक पिढ्यांपिढ्या विड्याच्या पानाचं सामान ठेवायला वापरलं होतं. त्या बोंडल्यानं मी आणि माझ्या मुलानं दोघांनीही दूध प्यायलं होतं. बहिणीच्या वेळची तिच्या कानातली सुंकली अजून होती.
"हे झुबके आहेत ना ते मी खूप हौसेनं करून घेतले होते. पण माझ्या चेहेऱ्याला ते छान दिसत नाहीत." आईच्या आवाजात एक खेदाची झलक होती. आवाजातला कंप भावनेनं थोडा अधिक गडद झाला होता. झुबके धरलेला हात आता वयोमानपरत्वे कांपत होता. पण आठवणींच्या रेशमी लडी उलगडत होत्या.
"नंदाला फारच शोभून दिसतात. या वेळी मी तिला देऊन टाकीन."
"आई, दे तिला. पण आता तिचं तरी वय आहे का हे घालायचं?"
आईच्या नजरेसमोर तिच्याहून पाचच वर्षं लहान असलेली जाऊ कदाचित पन्नास वर्षांपूर्वीची असावी!

शेजारी बसलेली बहिण हे सगळं शांतपणे बघत होती. सगळ्यात शेवटी एका गुलबक्षी रंगाच्या पतंगाच्या कागदात गुंडाळलेली एक पुडी होती. त्यातून दोन मंगळसूत्रं निघाली. बहिणीनं त्यातलं एक उचललं. आईनं मात्र ती पुडी खाली ठेवली. क्षणभरानं बहिणीच्या हातातलं मंगळसूत्रही घेतलं, कागदात परत ठेवलं.
अचानक थकलेल्या आवाजात ती म्हणाली, "ही दोन्ही मोडूयात. आता काय करायची आहेत?"
गतधवा आई आणि परत आलेली बहिण, दोघीही त्या पुडी मधल्या, काळ्या मण्यांत ओवलेल्या सोनेरी वाट्यांच्या माळेकडे, त्या मंगळसूत्रांकडे, निस्तेज नजरेने बघत होत्या.

स्थलकालपरत्वे न बदलणाऱ्या, परिस्थितीशरण नसलेल्या, तात्कालिक भावनांपलीकडे ज्यांचा अर्थ अक्षय असतो अशांनाच प्रतीकं म्हणतात, नाही का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गतधवा आई आणि परत आलेली बहिण, दोघीही त्या पुडी मधल्या, काळ्या मण्यांत ओवलेल्या सोनेरी वाट्यांच्या माळेकडे, त्या मंगळसूत्रांकडे, निस्तेज नजरेने बघत होत्या.>> कळवळलं.

मस्त लेख. मी पण माझं मंसु आणि नवर्‍याचं घ ड्याळ एका पेटीत ठेवुन लॉकर मध्ये ठेवलेलं आणलं घरी. परवा एक रील पाहिले त्यात आगरी
कुटुंबात सध्याच्या फॅशन नुसार भले मोठे व लांब मंसु आणले होते घरी आणून त्याची रीतसर पूजा घातली. मस्त होते ते.

खूपच सुरेख लिहीलंय.
अनेक आठवणी डोळ्यासमोर आल्या.>+११
माझी आई जाऊन २१ वर्ष झाली. माझ्या आईचं नेहमी वापरातलं मंगळसूत्र माझे वडिल घालतात, तिची आठवण म्हणून.

खूप सुरेख लिहिलयं!
>>माझी आई जाऊन २१ वर्ष झाली. माझ्या आईचं नेहमी वापरातलं मंगळसूत्र माझे वडिल घालतात, तिची आठवण म्हणून.>> _/\_

माझ्या आईचं नेहमी वापरातलं मंगळसूत्र माझे वडिल घालतात, तिची आठवण म्हणून. >>> _/\_
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद