श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय

Submitted by Revati1980 on 19 February, 2024 - 04:09

श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय

इसवी सनाच्या १३०३ साली मेवाड वरती अल्लाउद्दीन खिलजी याने हल्ला केला, तेंव्हा महाराणा हम्मीरचे चुलत भाऊ सज्जन सिंग यांनी कोल्हापुरात आसरा घेतला. सज्जन सिंग नंतर - दिलीप सिंग - शिवाजी प्रथम - भोराजी - देवराज जी - उग्रसेना - माहुलजी - खैलुजी - जनकोजी - सत्तुजी - संभाजी - आणि नंतर बाराव्या पिढीत राजपूत सिसोदिया कुळातील महाराणा प्रताप यांचे वंशज श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.

विजापूरचा आदिलशाह आणि मुघल या दोघांनी अहमदनगरच्या निझामशाहीवर हल्ला केला आणि निजामशाहीच्या सेवेत असणाऱ्या शहाजी राजांना शरण येण्यास भाग पाडले. तहाचा एक भाग म्हणून, विजापूरच्या आदिलशाही दरबारात शहाजीराजांना चाकरी करावी लागली. शहाजी आपला मोठा मुलगा शंभूराजे (संभाजी पहिला, शिवाजीचा मोठा भाऊ), शहाजीराजांची दुसरी पत्नी आणि धाकटा मुलगा एकोजी (व्यंकोजी), ज्यांनी नंतर तंजावर येथे भोसले घराणे स्थापन केले, यांच्यासमवेत बंगळुरूला स्थायिक झाले. शिवाजी राजे आणि त्यांची आई जिजाबाई यांना पुणे आणि सुपा येथील जहागिरीचे व्यवस्थापन करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले.

शिवाजी राजेंना, पित्यापासून वेगळे राहायला लागले म्हणून लहानपणापासून हिंदू वरच्या इस्लामिक जुलूमशाहीचा राग होता. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या तरुणांना हाताशी धरून त्यांनी सैन्य तयार केले आणि वयाच्या सतराव्या वर्षी निवडक मावळ्यांच्या मदतीने आदिलशहाच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला जिंकला. त्याच्यात सापडलेल्या खजिन्याने त्यांनी सैन्यबळ वाढवून आदिलशहाच्या राज्यावर बऱ्याच चढाया केल्या. विजापूरचा प्रसिद्ध सेनापती अफझल खानला ठार केल्यावर आणि मुघल सेनापती शाइस्ताखान याची बोटे कापून पाठवल्यानंतर मुघलांनी शिवाजीचा धसकाच घेतला. औरंगजेबाला फसवून आग्रा येथील नजरकैदेतून पळून गेल्यावर शिवाजीची आख्यायिका आणि कीर्ती गगनाला भिडली. शिवाजीने एकाच वेळी आदिलशाह आणि मुघलांच्या सैन्याशी लढा दिला आणि कुतुबशाह, पोर्तुगीज आणि इंग्रज यांसारख्या संभाव्य शत्रूंना हुसकावून लावले. अखेरीस दख्खनमध्ये स्वतःचे स्वतंत्र हिंदू राज्य निर्माण करण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुघलांना सळो कि पळो करणाऱ्या कथा, बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यांच्याकडे राजकवी असणारे कवी भूषण यांना कळल्या तेंव्हा त्यांनी आग्रा येथे शिवाजी राजेंची भेट घेतली आणि महाराष्ट्रात येण्याचा मानस व्यक्त केला. १६७० -७१ च्या सुमारास कवी भूषण शिवाजी राजेंच्या दरबारात राजकवी म्हणून रुजू झाले. शिवाजी महाराजानी युद्धात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल कवी भूषण यांनी जे काव्य रचले त्यातून शिवाजी राजेंच्या सैन्याची कर्तबगारी तर कळतेच पण मोंगलांचे आणि त्यांच्या सैन्याचे केलेले हाल याचीही माहिती मिळते. काव्यातील छंद आणि अनुप्रास यातून वीर रसाची झालेली निर्मिती रोचक आहे.

राखी हिंदुवानी हिंदुवान को तिलक राख्यो अस्मृति पुरान राखे बेद बिधि सुनीमैं।
राखी रजपूती राजधानी राखी राजन की धरामैं धरम राख्यो गुन राख्यो गुनीमैं।
भूषन सुकबि जीति हद्द मरहट्ठन की देस-देस कीरति बखानी तव सुनी मैं।
साहि के सपूत सिवराज समसेर तेरी दिल्ली दल दाबि कै दिवाल राखी दुनी में॥

हिंदूंच्या कपाळावरच्या टिळ्याचे, हिंदू धर्मग्रंथांचे तुम्ही रक्षण केले. वैदिक प्रतिष्ठा जपली हे मी ऐकले आहे. क्षत्रिय राजांच्या राजधान्यांचे रक्षण केले. पृथ्वीवर धर्माची स्थापना केली आणि गृहिणींच्या सद्गुणांचे रक्षण केले. भूषण कवी म्हणतात की तुम्ही मराठ्यांच्या हक्काच्या मर्यादांचे रक्षण केले. तुझी कीर्ती देशभर पसरली. मी हे ऐकले आहे. हे शाहजीपुत्र शिवराज. तुमच्या तलवारीने दिल्लीच्या सैन्याचा पराभव करून हिंदू राष्ट्राचे आणि जगातील हिंदूंच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले.

साजी चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ि,सरजा सिवाजी जंग जीतन चलत हैं l
‘भूषण’ भनत नाद विहद नगारन के, नदी नद मद गैबरन के रलत है ।।
छत्रपती शिवाजी घोड्यावर स्वार होऊन आपल्या चतुरंगिणी सैन्याचे नेतृत्व करत, शौर्य आणि कौशल्याने युद्ध जिंकण्यासाठी निघाले आहेत. भूषणला नगाऱ्याचा आवाज ऐकू येत आहे, मद्यधुंद हत्तींच्या आवाजाने सर्व नदी-नाले भरून गेले आहेत.

छूटत कमान बान बंदूकरु कोकबान मुसकिल होत मुरचारनहू की ओट में।
ताही समै सिवराज हुकुम कै हल्ला कियो दावा बाँधि द्वेषिन पै बीरन लै जोट में।
भूषन भनत तेरी हिम्मति कहाँ लौं कहौं किम्मति इहाँ लगि है जाकी भटझोट में।
ताव दै दै मूछन कगूरन पै पाँव दै दै घाव दै दै अरिमुख कूदे परैं कोट में॥

दोन्ही बाजूचे सैन्य धनुष्यबाण, तोफा आणि बाणांचा मारा करत होते की समोरच्या मागे असलेल्यांनाही त्यांच्यापासून वाचणे कठीण जात होते. त्यावेळी शूर शिवाजींनी उत्साहाने ओरडून आपल्या सैन्याला आक्रमण करण्याचा आदेश दिला. भूषण म्हणतो, तेव्हा मराठ्यांच्या वीरांनी शत्रूंवर हल्ला केला, जल्लोष निर्माण केला आणि वणव्याप्रमाणे त्यांचा नाश केला. सैनिक आपल्या मिशाना ताव देत मुरडत, किल्ल्यांच्या लढाईवर पाऊल ठेवून शत्रूंच्या चेहऱ्यावर जखमा करून तटबंदीवर उडी मारून किल्ला काबीज करतात.

ऐल फैल खैल-भैल खलक में गैल गैल,गजन की ठैल पैल सैल उसलत हैं ।
तारा सो तरनि धूरि धारा में लगत जिमि,थारा पर पारा पारावार यों हलत हैं ।।
गर्दीचा आवाज आणि आरडाओरडा यामुळे रस्त्यांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दारूच्या नशेत हत्तींची चाल अशी झाली की धक्का लागल्याने जवळचे डोंगरही उखडून खाली पडत आहेत. उडालेल्या धुळीमुळे सूर्यही लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखा दिसू लागला आहे.( चतुरंगिणी सैन्याच्या हालचालीमुळे) ताटात ठेवलेल्या पाराप्रमाणे जग हादरत आहे.

बेद राखे बिदित पुरान परसिद्ध राखे राम-नाम राख्यो अति रसना सुघर में।
हिंदुन की चोटी रोटी राखि है सिपाहिन की काँधे में जनेऊ राख्यो मालाराखी गरमें।
मीड़ि राखे मुग़ल मरोड़ि राखे पातसाह बैरी पीसि राखे बरदान राख्यो कर में।
राजन की हद्द राखी तेगबल सिवराज देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर मेंल

वेद आणि पुराणांचे रक्षण करून राम नामाची गोडी जिभेवर ठेवली. त्यांनी हिंदूंच्या मस्तकावरच्या शिखा आणि गळ्यातले जानवे आणि हार कापण्यापासून हिंदूंना वाचवले. मुघलांचा पराभव केला आणि त्याच्या सर्व शत्रूंचा नाश केला. त्याच वेळी, वरदानाची शक्ती आपल्या हातात ठेवली, राजांच्या राज्याच्या सीमांचे रक्षण केले आणि तलवारीच्या बळावर मंदिरांचे रक्षण केले. यासोबतच शूर शिवाजींनी प्रत्येक घराघरात स्वधर्म (हिंदू धर्म) राखला.

बाने फहराने घहराने घण्टा गजन के,नाहीं ठहराने राव राने देस देस के ।
नग भहराने ग्रामनगर पराने सुनि, बाजत निसाने सिवराज जू नरेस के ॥
शिवरायांच्या सैन्याचे फडफडणारे ध्वज आणि हत्तींच्या गळ्यात बांधलेल्या घंटांचा तीव्र आवाज यापासून विविध देशांचे राजे आणि सम्राट क्षणभरही थांबू शकले नाहीत. शिवाजी राजाच्या ढोल-ताशांच्या आवाजाने डोंगरही हादरले, गांव, खेडी रिकामी झाली.

हाथिन के हौदा उकसाने कुंभ कुंजर के,भौन को भजाने अलि छूटे लट केस के ।
दल के दरारे हुते कमठ करारे फूटे,केरा के से पात बिगराने फन सेस के ॥

शत्रू सैन्याच्या हत्तींवर रचलेले कुंभ मातीच्या घागरीसारखे फुटून कोसळले. शत्रू देशांच्या स्त्रिया घराकडे धावत असताना त्यांचे केस काळ्या भुंग्यांच्या कळपासारखे वाऱ्यावर उडत होते. शिवरायांच्या सैन्याच्या चालण्याने कासवाची मजबूत पाठ तुटू लागली आणि शेषनागाचा फणा केळीच्या पानांसारखा पसरला.

आपस की फूट ही तें सारे हिंदुवान टूटे टूट्यो कुल रावन अनीति अति करतें।
पैठियो पताल बलि बज्रधर ईरषा तें टूट्यो हिरनाच्छ अभिमान चित धरतें।
टूट्यो सिसुपाल बासुदेव जू सौं बैर करि टूट्यो है महिष दैत्य अध्रम बिचरतें।
राम-कर छूवन तें टूट्यो ज्यौं महेस-चाप टूटी पातसाही सिवराज-संग लरतें॥

आपापसातल्या वैर भावामुळे हिंदू राज्ये फुटली. अनीतीमुळे रावणाच्या वंशाचा नाश झाला. विष्णूचा मत्सर केल्यामुळे राजा बळीला पाताळात जावे लागले. शिशुपालाने वासुदेवशी वैर केले, त्यामुळे त्यांचाही नाश झाला. महिषासुर नावाचा राक्षस त्याच्या नीचपणामुळे व पापी कृत्यांमुळे मारला गेला. ज्याप्रमाणे शंकराचे धनुष्य प्रभू रामाच्या हाताला लागताच तुटले, त्याचप्रमाणे शिवाजीशी लढताना मुघल साम्राज्याचे तुकडे झाले.

इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर,रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर,ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं
जंभासुरावर जसा इंद्र आहे, समुद्रावर वडवानल आहे, रावणाच्या उद्धटपणावर रघुकुल राजा, ढगांवर वारा आहे, शंभू म्हणजेच भगवान शिव रतीचा पती कामदेवावर शंभू, सहस्त्रबाहूवर परशुराम, अरण्यावर दवनाळ, हरणांच्या कळपावर चित्ता, हत्तीवर सिंह, अंधारावर प्रकाशकिरण कृष्ण कंसावर कृष्ण, त्याचप्रमाणे म्लेच्छ वंशावर शिवाजी सिंहासारखा स्वार झाला आहे.

..................................

Group content visibility: 
Use group defaults