रेवदंड्याचं दर्शन

Submitted by पराग१२२६३ on 16 February, 2024 - 10:42

IMG_0376_edited.jpg

कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता. आम्ही सगळे जण मग सकाळी लवकरच पुण्याहून अलिबागला निघालो.

अलिबागला पोहचल्यावर दुपारनंतर काशीद बीचकडे जाण्यासाठी निघालो. काशीद बीचच्या दिशेनं पुढं जात असताना छोटी गावं/वस्त्या मध्ये लागत होत्या. थोड्या वेळानं आम्ही रेवदंड्यातून निघालो. जाताजाता रेवदंडा किल्ल्याची झलकही पाहता आली. पुढं थोड्या अंतरावर मग अचानक भोवतीनं पाणी दिसू लागलं आणि बघताबघता आमची गाडी रेवडंद्याच्या खाडीवरच्या पुलावर आली, तेव्हा विस्फारत गेले. कारण त्या खाडीचं जे दृश्य दिसलं, ते अवर्णनीयच होतं. पुलाजवळ विस्तृत पाण्यात तरंगत असलेल्या होड्या, दोन्ही बाजूंच्या किनाऱ्यावरची हिरवाई पाहून संमोहित व्हायला लागलं. रेवदंड्याच्या खाडीविषयी आणि किल्ल्याविषयी आधी थोडंफार वाचलं होतं. पण आता पहिल्यांदाच रेवदंड्याची विस्तीर्ण खाडी प्रत्यक्षात पाहत होतो. मग मी सगळ्यांना म्हटलं की, थोडावेळ इथं थांबून पुढं जाऊ.

भारताला जवळजवळ पाच हजार वर्षांपासूनचा सागरी इतिहास आहे. पण तो आपल्याला शिकवला-सांगितला जात नाही. त्यामुळं आपल्या इतिहासामधला तो महत्वाचा भाग अतिशय दुर्लक्षित राहिलेला आहे. मला या सागरी इतिहासात आणि भूगोलातही खूप रस असल्यामुळं रेवदंड्याचा किल्ला पूर्ण पाहता आला नसला तरी ती खाडी पाहिल्याबरोबर तिथं थांबून त्याचा परिसर न्याहाळण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळं पूल ओलांडून आता आम्ही रेवदंडा तालुक्यातून कोर्लाई तालुक्यात आलो होतो. मग पुढं खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर थांबलो आणि गाडीतून उतरून खाडी न्याहाळू लागलो. किती विस्तृत दृश्य होतं ते! किनाऱ्याला लागून असलेली खारफुटी, पश्चिमेला असलेला कोर्लाईचा डोंगर (त्यावरच खुल्या समुद्रावर लक्ष ठेवणारा कोर्लाईचा किल्ला आहे.) संमोहक होतं ते सगळं.

रेवदंड्याची खाडी म्हणजे कुंडलिका नदीचं मुख आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी धरणाच्या जवळ उगम पावलेली ही नदी इथं अरबी समुद्राला मिळते. तिथं साधारण अर्धा तास थांबलो. त्याचवेळी किनाऱ्यावर असलेल्या टपरीवर संध्याकाळचा गरमागरम चहा घेतला. समोर विस्तीर्ण खाडी, मागे सह्याद्रीच्या डोंगरशाखांवरची हिरवाई, डावीकडे लांब पश्चिमेला असलेला कोर्लाईचा डोंगर आणि त्याच्या बाजूला चमकत असलेला सूर्यदेव, उजवीकडे पूर्वेला दिसत असलेला JSW कारखान्याच्या भाग, संध्याकाळचा गारगार-बोचरा वारा आणि त्याचवेळी हातात असलेला गरमागरम चहा. मग आणखी काय पाहिजे होतं अशावेळी? किनाऱ्यावर चहा घेताघेता खाडीचा परिसर न्याहळत असताना डोक्यात या ठिकाणच्या इतिहासाबद्दल विचार येत होते की, कशा घटना घडल्या असतील त्यावेळी या ठिकाणी आणि पोर्तुगीज, मराठे, ब्रिटिश यांच्यातील लढाया वगैरेवगैरे.

केप ऑफ गुड होपमार्गे भारतात येण्याचा नवा मार्ग सापडल्यावर भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपलं स्थान बळकट करायला सुरुवात केली होती. जसजसे प्रदेश जिंकत जातील, तसतसे तिथे किनारपट्टीवर मोक्याच्या ठिकाणी किल्ले उभारायला सुरुवात केली. रेवडंद्याचा किल्ला त्या किल्ल्यांच्या श्रुंखलेमधलाच एक. कुंडलिका नदीतून चालणाऱ्या व्यापारावर प्रभाव स्थापित करण्यासाठी पोर्तुगीज कॅप्टन सोय यानं 1524 मध्ये कुंडलिकेच्या मुखाजवळ या किल्ल्याची उभारणी केली होती. 1806 पर्यंत हा किल्ला पोर्तुगीजांच्या, त्यानंतर 1818 पर्यंत मराठ्यांच्या आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला होता. आज या किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असली तरी त्याच्या आत पाहण्यासाठी फारसं काही शिल्लक नाही.

खाडीच्या किनाऱ्यावरून लांब समुद्रात दिसणाऱ्या टेकडीवर कोर्लाईचा किल्ला आहे. अहमदनगरच्या निजामाच्या परवानगीनं पोर्तुगीजांनी 1521 मध्ये हा किल्ला उभारला होता. रेवदंड्याच्या खाडीच्या मुखासमोरच असल्यामुळं या किल्ल्याचं व्यूहात्मक महत्व खूपच वाढलं होतं. पोर्तुगीजांच्या भारतातील वसाहतीतील चौल प्रांताचा हा किल्ला संरक्षक होता. वसईच्या किल्ल्यापर्यंतच्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी कोर्लाईचा किल्ला पोर्तुगीजांसाठी उपयुक्त होता.

आता चहा संपवून आम्ही तिथून पुढं निघालो, तरीही डोक्यात या परिसराविषयीच्या इतिहास, भूगोलाविषयीचं विचारचक्र सुरूच होतं. आपल्या सागरी इतिहासात महत्वाचं स्थान असलेला हा परिसर पाहून भारावून जायला झालं होतं.

https://avateebhavatee.blogspot.com/2024/02/blog-post_15.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, तुम्ही माझ्या गावी जाऊन आलात. एकदा खास रेवदंड्यात रहायला या. तिथल्या वाडीत फिरताना वेळ कसा जातो कळत नाही. समुद्र किनार्यावर तासनतास बसू शकते. आगरकोट किल्ल्यातील सातखणी अवश्य बघा. साळावच्या बिर्ला मंदिरात गेलात तर वरून समुद्र आणि परिसराचं विहंगम दृश्य दिसते. चौलच्या रामेश्वराचे दर्शन घ्या. हे देऊळ अनेक मालिका, सिनेमांमध्ये पाहिले असेल.

छान लिहिलं आहे.
माझं गाव रायगड जिल्ह्यात असूनही मी हा किल्ला किंवा हा परिसरच फारसा बघितलेला नाही.

छान लिहिलंय. साळाव बिर्ला मंदिर आणि नांदगावचा गणपतीबाप्पा बघायला या एरियातून गेलोय. काशीद बीच आवडतो.