भुजबळ साहेब काय हे....

Submitted by ASHOK BHEKE on 5 February, 2024 - 01:08

*भुजबळ साहेब काय हे....*
परवा नगरच्या सभेत *छगन भुजबळ* म्हणाले मराठ्यांच्या हजामती नाभिक समाजाने करू नयेत....! काय हे शोभतं का...! ज्या मराठ्यांच्या जिंवावर राजकीय प्रवास सुरू केला, मोठे झालात. त्याच समाजाच्या विरोधात आज नाही नाही ते बोलत आहात. कधी काळी तुम्ही आमचे नेते होता, हे सांगायला देखील लाज वाटत आहे. तुमचा स्वभाव आम्हाला पहिल्यापासून ठाऊक आहे. स्वत:च ओरबाडून खायचे आणि दुसर्‍याला भिकेला लावायचे. सुखाच्या मागे धावताना दुसर्‍याच्या घरावर नांगर फिरवीत पदे भूषविणारे तुम्ही आज मराठा समजाच्या विरोधात इतर मागासवर्गाला भडकवित आहात. त्यांच्यात कितीही विष पेरले तरी तो समाज भडकणार नाही. मराठा समाजाने इतर किंवा अन्य समाजाला परके मानले नाही आणि मानणार नाही. सुख कधी हसवते, दू:ख कधी रडवते, आयुष्याच्या वाटचालीत असे क्षण येत असतात. सुख आई वडिलांच्या पूण्याईने पदरात पडते, दू:ख हे आपल्या विक्षिप्त कृतीने चालून येते. सुखाचा साठा जतन करता आला पाहिजे. त्याला अहंकाराने ग्रासले की माणूस हवेत तरंगू लागतो. आज तुमचे असेच झाले आहे. गेली दोन चार महीने झाले तुमच्या मनातील मराठा द्वेष उफाळून आलेला दिसत आहे. नाभिक समाजाला दिलेला हजामती न करण्याचा सल्ला तो समाज खरोखर मानेल का? याचा विचार करायला हवे होते. उद्या तुम्ही चर्मकार समाजाला मराठ्यांच्या चप्पला न शिवण्याचा सल्ला द्याल. माळ्यांनी मराठ्यांच्या शेतात काम करू नका किंवा मेंढपाळांनी मराठ्यांच्या शेतात मेंढया बसवू नयेत, असेही सांगाल, हे तुमचे सल्ले तो समाज मानेल का? याचा विचार करायला हवा. पहिलाच मराठा समाज आपल्या विरोधात ठाम उभा राहिलेला असताना आता इतर मागासवर्गाला देखील निमंत्रण द्यायला उतावीळ झाला आहात. तुमचे सल्ले त्यांच्या उदरनिर्वाहावर घाला घालणारे आहेत. ज्यांचे पोट त्यांच्या व्यवसायावर निर्धारित असते. त्यांना तुमचं सल्ला गोड वाटणार आहे का...! याचा विचार करायला भुजबळ साहेब आपण सुज्ञ आहात. आज ठिकठिकाणी नाभिक समाज तुमची उलटी भादरवत आहे. वाईट वाटते, तुमचे वाभाडे गावोगावी साधी भोळी माणसं काढीत आहेत.
आपले वर्तन पाहून स्वर्गात विश्रामाला गेलेले नाभिक समाजाला संघटित करणारे महात्मा ज्तोतिबा फुले डोक्याला हात लावून बसले असतील. सत्यशोधक विचारप्रणालीचे प्रवर्तक महात्मा फुले असताना पुण्यातील तळेगांव ढमढेरे येथे विवाह कार्यात ब्राम्हणास न बोलविल्याने पुण्यात ब्राम्हण समाजाने नाभिक समाजावर बहिष्कार टाकल्याने मोठा पेच प्रसंग उभा ठाकला असताना नाभिक समाजाच्या सोबतीला मराठा समाज उभा राहिला होता. समाजातील अनीतिपूर्ण व्यवहारावर रोकठोक टीका करण्याचे सामर्थ्य दाखवणारे संतश्रेष्ठ सेना महाराज विवेकाचा आरसा दाखविताना म्हणतात.
चोरी करुनिया बांधले वाडे । झाले ते उघडे नांदत नाही ।
होऊनिया मिळविले धन । असता अवगुण वाया गेली ।।
नाभिक समाजाने महाराष्ट्राला जशी संतपरंपरा देऊ केली तशी स्वराज्याच्या काळात विश्वासू मावळे जिंवा महाला आणि शिवा काशीद दिले. छत्रपती शिवरायांसाठी आपल्या प्राणाची पर्वा न करणारे शिलेदार यांच्या आत्म्याला काय वाटत असेल.
समाजाचा विकास केलाच पाहिजे त्या अगोदर आपल्या महाराष्ट्राचा, मराठी मातीचा विकास कसा होईल, तेथील जमीन सुपीक कशी होईल, बळीराजा कसा सुखावेल या कडे लक्ष वेधण्यापेक्षा समाजात दुही माजविणार्‍या बाता मारणे गैर आहे. कुठेतरी चुकतय असे वाटत नाही का तुम्हांला....! तुम्ही आज खूप काही गमावले आहे, परत मिळेल किंवा मिळविता येईल असे वाटत नाही. म्हणून यापूढे आनंदाने जगा....!

अशोक भेके,
घोडपदेव समूह

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users