काॅर्पोरेट धोबीपछाड

Submitted by Abuva on 2 February, 2024 - 02:01

फोन किरकिरला. दोस्त, पूर्वी आमच्याच कंपनीत मॅनेजरकी करायचा. मग बडी संधी (आणि पगार) मिळाला म्हणून गेला मोठ्या कंपनीत. "बोल भिडू"
"प्रधानजी, तुमच्या राज्यात काय चाललं आहे कल्पना आहे का?"
"अंतर्ज्ञानी तुम्ही आहात, तुम्ही सांगा"
"अरे, चित्रांगदेनं मासा गळाला लावला..."
"तिचं पण लग्न ठरलं?! काय सांगतोस?"
"लग्नं नाही रे! अर्जुन तिच्या टीममध्ये जॉईन होतोय!"
"भा..ऊ, खरं काय?"
"सांगतोय काय, मला आत्ताच कळलं!"
"पण मी आजच न्यूज ऐकली, की उलुपीचं आणि त्याचं ठरलं म्हणून..."
"आयला! काहीच्या काही..."
"येतोस का सांच्याला बांबू हाऊसला?"
"नाही रे. आज मी फेज थ्रीला आहे."
"मग अर्जुनाची बातमी कन्फर्म कर आणि मला कळव.."
फोन ठेवला आणि मी कपाळावर हात मारला. चित्रांगदा गेली तर गेलीच पण आता आमच्या स्टार परफॉर्मरला म्हणजे अर्जुनला पळवते आहे? पण मग मी त्याच्या उलुपीचा लग्नाविषयी ऐकलं ते काय आहे? मलाच धोबीपछाड घातला की काय या तिघांनी?

तर, ही स्टोरी चार-एक वर्षांपूर्वी सुरू झाली. नव्या रंगरुटांच्या बॅचमध्ये हे तिघे जॉइनले. त्यांची ओळख ना? करून देतो की...

चित्रांगदा - हाय-फ्लाईंग. भावी सीएक्सओ मटेरियल. फाडफाड इंग्लिश अन् चकाचक प्रेझेंटेशन. एकदम प्रभात रोड प्राॅडक्ट. आलं ना लक्षात?!

उलुपी - पुराणांत ती नागकन्या आहे हो. पण आपली उलुपी एक साधीसुधी सरळमार्गी मुलगी (असं आमचं मत). अगदी शनिवार-नारायण. काय कळलं ना?

राहिला तो अर्जुन - आयायटीच्या तोडीचा, चिकना-चुपडा पण भयंकर शामळू. म्हणजे केपेबिलिटी अर्जुनाची, पण एकदम बापूका देश! समझे क्या?

अहो, ही नावं पडायला वेळ लागतो ना! त्यांचे गुणधर्म कळले, काटे-कंगोरे बोचले की मग काॅर्पोरेट बारसं होतं. तर कथा आपण या तिथून सुरू करूयात.

पहिलीच ऑफिस पार्टी. तोपर्यंत अर्जुन -उलुपीला बाहेरची हवा लागली नव्हती. सगळे प्रोजेक्टचे सिनीअर्स फुकटची मिळतेय तर घ्या पिऊन या तावात. मंडळी झुलेलाल झालेली. त्यांनी या नवख्यांना घोड्यावर बसवलं. चित्रांगदाला सवय असावी. मग ती बसली की अर्जुनाच्या डोक्यावर. तो यडा दारू प्यायला तिच्या नादानं. मग झालं त्याचं विमान! उलुपी त्याला नको नको सांगत होती हां. पण त्या नव्याच्या नवलाईत त्याला शुद्ध राहिली नाही. त्याच पार्टीत आम्ही या तिकडीचं नामकरण केलं! आमचं मत होतं की चित्रांगदा अर्जुनाला जाळ्यात अडकवणार अन् आपली कामं करून घेणार. उलुपीचा मात्र ती मामा करणार.

दोनेक वर्षं झाली. यथावकाश टेक्नाॅलाॅजी, डोमेन वगैरे तिघांच्याही हातात बसलं. चित्रांगदा अर्थातच लीड झाली होती. कस्टमर काॅल्समध्ये बसायला लागली होती. अर्जुनबाळ आमच्या डेव्हलपमेंट डायरेक्टरच्या गळ्यातला ताईत झाला होता. आणि उलुपीनं यूआय डिझाईन/डेव्हलपमेंट मध्ये जम बसवला होता. प्रोजेक्टमध्ये त्रिकूट चांगलं जमलवतं, एक केमिस्ट्री जमली होती.. ऑफिसमध्ये आणि बाहेरही. मग आमच्यासारखे रिकामटेकडे मॅनेजर जोड्या जमवायला लागले - फटाकडी याला गटवणार की काकूबाई घोळात घेणार?! दोघींपैकी मागे हटणार कोण? ऑन-मनी फेव्हरिट ऑफ कोर्स चित्रांगदा होती!

मग ऑनसाईटची ऑपॉर्च्युनिटी आली. एकदम तिघांना पाठवायचं का... अशी चर्चा सुरू झाली. पण आमच्या डेव्ह डायरेक्टरनं अर्जुनाच्या जाण्याला कोलदांडा घातला. त्याला काही कामं संपवल्याखेरीज जाता येणार नव्हतं. पण कस्टमर बोंबलतोय म्हणून मग मी चित्रांगदा आणि उलुपी जोडीला पुढे पाठवायचं ठरवलं. ही सीता और गीता जोडी गेली खरी. पण सीतानं, आपलं, उलुपीनं फारच गोंधळ घातला. मी सहा महिन्यांसाठी आले होते, मी सहा महिन्यांनी परत जाणार.. एवढी वर्षं मी मुलं हाकतोय, पण उलुपीएवढा नाठाळपणा कधी पाहिला नाही. मला संशय आला की ही परत आली ते अर्जुनाकरता की काय?! लक्षणं तीच होती! मग फारच शिवीगाळ केली मी.. च्यायला, मला घोडा लावतेय ही? मग मी हट्टाला पेटून अर्जुनाला ऑनसाईटला पिटाळला! मग पुढचे आठदहा महिने चित्रांगदा अन् अर्जुन ऑनसाईट! कॅंपिंग काय अन् लास वेगास काय, मजा चालली होती दोघांची! एकंदर तिकडून येणाऱ्या बातम्यांवरून अंदाज घेता आता हे चतुर्भुज होणार या विषयी आम्ही निश्चिंत झालो होतो.

पण इकडे उलुपीची घालमेल होत होती! तिच्याही कानी बातम्या येत असतीलच की! काहीही झालं तरी या त्रिकोणाचा तिसरा कोन ती होती! तिला भरपूर तडफडू दिलं आणि मगच पाठवलं परत ऑनसाईटला. या वेळी वाजवून पाठवलं होतं - प्रोजेक्टला जरूर असेल तोपर्यंत रहायचं! आता आम्ही मॅनेजर काय उगाच होतो काय? आपल्या‌ फायद्याच्या ॲंगलनी गोष्टी फिरवायच्या हेच आमचं काम... पण तेंव्हापासून उलुपी माझ्यावर खार खाऊन होती.

लॉंग स्टोरी शॉर्ट, हा खेळ आणखी एखादं वर्षं चालला. पण मग त्रिकोणात होते तीच मारामारी सुरू झाली. दोन कोन तिसऱ्याची फरपट करू लागले. टीम वर्क बिघडलं. चित्रांगदा अन् उलुपीचं फारच फाटलं आणि अर्जुन हिच्या अन् तिच्या वाऱ्या करायला लागला. आमचा प्रोजेक्ट भरडला जाऊ लागला. ते मला परवडण्यासारखे नव्हतं. हा त्रिकोण आता तोडणं भाग होतं.

विचार केला. झक मारली अन् इतकी वर्षं हा खेळ बघत बसलो. आधीच तुकडा तोडायला हवा होता. आता ह्यापैकी कोणा एकाची टीम वा डिपार्टमेंट बदलून उपयोग नव्हता. लोण कंपनीभर पसरायचं. मग लॉस घ्यायचाच तर कमी व्हावा या उद्देशाने एक चाल खेळली. याच माजी मॅनेजरमहाशयांना गळ घातली. त्याला चांगले रिसोर्स हवेच होते. त्याच्याशी डील केलं. चित्रांगदा आणि उलुपी, दोघींना ऑफर दे, आणि कुणाही एकीला घेऊन जा. कसं आहे, हा गडी त्यांचाही कधी काळी मॅनेजर होता. त्यामुळे ह्यांचा विश्वास होता त्याच्यावर. मग यथावकाश त्यानं चित्रांगदेला फोडली अन् त्याच्या कंपनीत प्रमोशन वर घेऊन गेला. जाताना केवढी रडारड अन् सेंडॉफ पार्टी अन् कायकाय! आणि या सगळ्यात उलुपी पुढे! याचा अर्थ मी लावला की चला, चित्रांगदेनं अर्जुनाचा नाद सोडला, म्हणून उलुपी खूष!

वाटलं तिढा तर सुटला. तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी मग मी धोरणीपणे अर्जुन आणि उलुपी यांच्याभोवती भक्कम तटबंदी उभी केली. उलुपीला त्या टीमचा मॅनेजर केलं आणि अर्जुनाला तिच्याबरोबर टेक्निकल रोलमध्ये ठेवला. मुद्दा हा की उलुपी खूष तर अर्जुन खूष. आणि त्यानं वळवळ‌ केलीच, तर वेळप्रसंगी त्याला लीड पदाचं आमिष दाखवता येईल. यांचं लग्न होईल तेव्हा अर्जुनाला काढून घालू दुसऱ्या रोलमध्ये.

काही महिने गेले. आता आमच्या मॅनेजर ग्रुप मध्ये अर्जुन-उलुपी शुभमंगल होणार याविषयी शंका नव्हती. आज ते कन्फर्म झालंही. पण ही नंतरची न्यूज भलतीच शॉकींग होती! अर्जुन विरोधी पक्षाला मिळाला? त्रिकोण सोडवायला गेलो अन् त्रांगडं माझ्याच गळ्यात आलं? हे कसं झालं? माझ्या भक्कम तटबंदीला खिंडार पाडलं कुणी? चित्रांगदेनं की उलुपीनं? एवढी स्ट्रॅटेजी!

लगेचच उलुपी लग्नाच्या सुट्टीवर गेली. माझे तो प्रोजेक्ट सावरून धरताना फारच वांदे झाले. करायला गेलो एक, अन् झाले भलतेच. दोन की रिसोर्सेस सोडून गेले. आणि तिसरा रिसोर्स बिथरलेला. त्यावर किती भरवसा ठेवणार?

मग सावकाश लग्नाची सुट्टी उपभोगून परत आलेली सालंकृत उलुपी मला येऊन, भेटून रिझाईन करून जाताना सांगून गेली - आता मीपण चित्रांगदेच्या कंपनीत, तिच्याच टीममध्ये लीड म्हणून चालले आहे!

टांगा पलटी घोडे फरार!

अर्जुना, यू कॅन हॅव युवर केक ॲन्ड इट इट टू? मान गये गुरू!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच!! मुळात अर्जुन उलुपी चिंत्रांगदेची एकंदर मैत्री पाहून ऊर भरून आला(पदराने डोळे टिपले Happy )
चिंत्रांगदेला कोण कधी मिळाला हे पुढच्या भागात लिहा बरं का!!

एकदम भारीय...
( आय टी) टीम टीम की कहानी..

भारी लिहीलंय.
बेफिकीरांच्या कॉर्पोरेट बॅकग्राऊंडवाल्या कथांची आठवण झाली. वरचा त्यांचा प्रतिसाद बघून सदर कथालेखक त्यांचा डुआय असावा अशी शंका पण येत आहे. Wink Bw

धमाल Lol मजा आली.

नंतर कोठेतरी ते तिघे एका बार मधे प्लॅन यशस्वी झाला म्हणून चीअर्स करत आहेत असे डोळ्यासमोर आले Happy

नंतर कोठेतरी ते तिघे एका बार मधे प्लॅन यशस्वी झाला म्हणून चीअर्स करत आहेत असे डोळ्यासमोर आले
>>
हे एवढं सगळं तिघांचं preplanned होतं म्हणताय?

तरुण-तरुणी मैत्री, सहजीवन, आणि लग्न हा प्रवास ओल्ड स्कूल झाला! नवीन युगातले तरुण-तरुणी मित्र-मैत्री आणि फ्रीक आऊट ..इथेच त्यांचा प्रवास संपतो . साध्य तेवढेच असते. लग्न वगैरे व्यवस्थेची त्यांना फारशी गरज भासत नाही...
खूप प्रॅक्टिकल मंडळी आहेत आताची !