नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग २ (जानकी मंदिर)

Submitted by संजय भावे on 22 January, 2024 - 16:36

संध्याकाळी उठून आवरल्यावर पाच- साडे पाचच्या सुमारास आम्ही आसपासच्या परिसरातल्या भटकंतीसाठी बाहेर पडलो...
आधीचा भाग - नेपाळ : एक जीवंत सांस्कृतिक संग्रहालय - भाग १

बाहेर पडल्यावर स्थलदर्शनाची सुरुवात हॉटेल पासून अगदी जवळ असलेल्या जानकी मंदिरापासून करायचा आमचा विचार होता, पण हॉटेलच्या व्यवस्थापकाने तिथून एखाद किमी अंतरावर असलेल्या 'गंगासागर तलाव', 'बाबा भूतनाथ मंदिर 'आणि त्या परिसरात असलेली काही लहानमोठी मंदिरे आज पाहावीत आणि उद्या सकाळी आधी जानकी मंदिर, आणि राम मंदिर व दुपारनंतर तिथून तीन किमी अंतरावर जेथे श्रीराम आणि सीतामातेचा विवाह संपन्न झाला होता तो 'मणी मंडप' पाहावा असे सुचवले. प्रत्येक ठिकाणी आपले घोडे पुढे दामटण्यापेक्षा अनेकदा स्थानिकांनी केलेल्या सूचना अंमलात आणणे श्रेयस्कर ठरते असा आजवरचा अनुभव असल्याने त्याप्रमाणे करण्याचे ठरवून गंगासागर तलावाच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले.

इथे सकाळी लवकर उजाडत असल्याने संध्याकाळी अंधारही लवकर पडतो, त्यामुळे सव्वापाच-साडेपाचच्या सुमारासच जानकी मंदिरावरचे दिवे लागलेले त्याच्या समोरून जाताना दिसले.


.
अगदी रमत गमत चालूनही आम्ही जेमतेम पंधरा मिनिटांत त्या भल्या मोठ्या 'गंगासागर' तलावावर पोचलो होतो पण आरती सुरु होण्यास एक तासाहून जास्त वेळ असल्याने आसपासचा परिसर न्याहाळत हिंडत होतो. तिथे चौपाटीवर असतात त्याप्रमाणे आईस्क्रीम, भेळ-पुरी आणि अन्य काही खाद्यपदार्थांच्या गाड्या दिसल्याने हलकीशी पोटपूजा करावी ह्या उद्देशाने प्रचंड आवडणारी पाणी पुरी खायचे ठरवले. पहिली पुरी तोंडात घातली आणि काय सांगावे महाराजा... इतकी वाईट पाणीपुरी आपण ह्याआधी आयुष्यात कधीच खाल्ली नसल्याचा साक्षात्कार झाला. काहीतरी विशेष/अलौकिक असे कौशल्य अंगी असल्याशिवाय इतकी बकवास पाणीपुरी कोणाला बनवता येणे निव्वळ अशक्य!

'रन' चित्रपटातला 'कौवा बिर्यानी' फेम 'गणेश' (विजय राज) पाणचट चहा मिळाल्यावर "चाय मांगी थी बे... पानी नही" असे चहावाल्याला ऐकवत त्या ग्लासातल्या चहाने हात धुण्याचा एक प्रसंग आहे, त्याच धर्तीवर (पण इथे मूळ ऑर्डरच 'पाणी' पुरीची असल्याने तसला काही डायलॉग मारणे शक्य नसल्याने) पुढच्या पुरीतल्या अत्यंत फिकट पोपटी रंगाच्या पाण्याने हात धुवून इतकी भंकस पाणीपुरी खीलवणाऱ्या त्या महान पाणीपुरीवाल्याला कोपरापासून हात जोडून नमस्कार करावा असा विचार मनात येऊन गेला पण भावनांना थोडा आवर घालून, "बस, आता पाणीपुरी नको, एक प्लेट 'शेव बटाटा पुरी' दे" असे सांगितले. अनुभव सारखाच होता, शेव बटाटा पुरी पण अत्यंत बेचव होती. ह्या पुढे नेपाळमध्ये 'चाट' हा प्रकार कुठेही खायचा नाही असा मनोमन निश्चय करून आम्ही तिथून निघालो (पण पुढे हा निश्चय फार दिवस टिकला नाही, काठमांडूला 'पाटण दरबार स्क्वेअर' जवळ एके ठिकाणी हे दोन्ही पदार्थ चविष्ट मिळाल्याने तो मोडावा लागला 😀)

असो, तिथून निघाल्यावर 'नगर डीहवार मंदिर' पाहून मग आरतीची वेळ होईपर्यंत संपूर्ण तलावाकाठी बांधलेल्या घाटावरून चक्कर मारत त्याच्या किनाऱ्यावरची अन्य मंदिरे पाहायला सुरुवात केली.
.

.

गंगासागर तलाव आणि त्याच्या समोरच्या किनाऱ्यावर दिसणारे बाबा भूतनाथ महादेव मंदिर.


.
बाबा भूतनाथ महादेव मंदिर:

महादेवाचे हे मंदिर स्मशानात आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. मिथिला नरेश आणि सीतामाईचे पिता 'जनक' राजांच्या मृत्यनंतर त्यांच्या पार्थिवावर ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले त्या स्मशानभूमीला खेटून हे सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या आवारात शिव-पार्वतीचे कुठल्याश्या प्रसंगाचे शिल्प साकारले असून समोर एक पंचमुखी रुद्राक्षाचे मोठे झाड आणि त्यापुढे स्मशानभूमी आहे.
.

.

.

रुद्राक्षाचे झाड.

हे भूतनाथ मंदिर पाहून झाल्यावर तलावाकाठची अन्य लहान-मोठी मंदिरे पाहात आम्ही पुन्हा गंगारती होणाऱ्या ठिकाणी पोचलो तेव्हा आरती सुरु झाली होती.


.

.

.
प्राचीनकाळी हा तलाव पाण्याने भरण्यासाठी गंगाजल आणण्यात आले असल्याची आख्यायिका असल्याने गंगेसमान पवित्र मानल्या जाणाऱ्या ह्या तलावाकाठी बऱ्यापैकी भाविक आणि पर्यटक मंडळींच्या उपस्थितीत झालेली तालबद्ध गंगारती पाहून छान वाटले. आरती झाल्यावर तिथून निघालो. त्या दिवशी रक्षाबंधन होते व नेपाळमध्ये हा एक महत्वाचा सण म्हणून साजरा केला जात असल्याने कित्येक उपाहारगृहे कर्मचाऱ्यांअभावी बंद होती, त्यामुळे सकाळच्याच उपाहारगृहात पुन्हा जाऊन जेवण करून आम्ही हॉटेलवर परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करून झाल्यावर 'साडे दहाच्या सुमारास जानकी मंदिरात प्रवेशकर्ते झालो.
'

.
सुमारे १२००० वर्षांपूर्वीचा काळ मानल्या जाणाऱ्या 'त्रेता युगात' मिथिला नरेश जनक राजाच्या राजधानीचे नगर म्हणजे आजचे जनकपूर. इ.स. १६५७ मध्ये ज्या ठिकाणी सीतेची सोन्याची मूर्ती सापडली त्या ठिकाणी जानकी मंदिर बांधण्यात आले. जनकराजाला शिव धनुष्याची प्राप्ती, सीतामातेचा जन्म, तिचे वास्तव्य आणि स्वयंवर ह्या स्थानी झाल्याचे मानले जाते.

आज जे भव्य मंदिर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते ते स्वातंत्र्यपूर्व भारतातील ओर्च्छा (टिकमगढ) संस्थानाची राणी 'वृषा भानू' हिने १९१० साली बांधले आहे. त्याकाळी नऊ लाख सुवर्णमुद्रा ह्या मंदिराच्या बांधकामासाठी खर्च झाल्या होत्या त्यामुळे स्थानिक लोकं ह्या मंदिराला 'नौलखा मंदिर' ह्या नावानेही ओळखतात. मुघल, हिंदू आणि मैथिली अशा मिश्र वास्तुशैलीत, संपूर्णपणे दगड आणि संगमरवराचा वापर करून बांधलेल्या ह्या तीन मजली महालसदृष्य मंदिरात तब्बल साठ खोल्या असून त्या नेपाळचा ध्वज, रंगीत काचा, कोरीवकाम आणि मिथिला चित्रे, सुंदर जाळीदार खिडक्या आणि सज्जानी सजवलेल्या आहेत.

विवाह पंचमी हा इथला वार्षिक उत्सव असून त्यात सीता आणि राम यांचा विवाह असंख्य पवित्र संस्कार आणि विधींनी साजरा केला जातो. ह्या उत्सवादरम्यान मंदिर अतिशय निगुतीने सजवले जाते. दररोज असंख्य दिवे प्रज्वलित केले जात असून दिवसभर भजने गायली जातात. जगाच्या कानाकोपऱ्यातून यात्रेकरू आणि प्रवासी या पवित्र हिंदू मंदिराला विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये विवाह पंचमी उत्सवासाठी साठी मोठ्या संख्येने भेट देतात.

महालाच्या मध्यभागी भव्य-दिव्य असे मुख्य मंदिर असून गाभाऱ्यात अयोध्येत सापडलेल्या सीतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आज पर्यंत पाहिलेल्या असंख्य लहान मोठ्या मंदिरांपैकी मला सर्वात जास्त आवडलेल्या मंदिरांपैकी एक असल्याने त्याच्या सौन्दर्याविषयी मी फार काही लिहीत नाही, त्याविषयी मंदिराचे काही फोटोज पाहून आपले मत बनवावे.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
महालात एक सांस्कृतिक संग्रहालय आणि ऍनिमेटेड स्वरूपात सीतेचे प्रकट होणे, तिचे बालपण ते स्वयंवर आणि विवाह असे रामायणातील काही प्रसंग दर्शवणारे दालन आहे जे पाहण्यासाठी १५ नेपाळी रुपये किंवा १० भारतीय रुपये अशी नाममात्र प्रवेश फी आहे.


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
* आज २२ जानेवारी २०२४ रोजी रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त जानकी मंदिरात १,२५,००० तुपाचे दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार होता. त्या दीपोत्सवात मंदिर किती सुंदर दिसत असेल हे पाहण्यास उत्सुकता असल्याने त्याचे आजचे फोटोज मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण तूर्तास ANI ने 'एक्स' वर पोस्ट केलेला ह्या दीपोत्सवाचा छोटा व्हिडिओ येथे पहाता येईल.

ह्या लेखाची लांबी आता आणखीन न वाढवता जानकी मंदिर परिसरातील हनुमान मंदिर आणि विवाह मंडप, तिथून थोड्या अंतरावरचे राम मंदिर आणि मणी मंडपाविषयी पुढच्या भागात लिहितो.

Group content visibility: 
Use group defaults