कर्ज आणि ओझं

Submitted by विक्रम मोहिते on 12 January, 2024 - 23:48

एका मित्राकडून हा सोबतचा फोटो आला. म्हणे याच्या खाली लिहायला काहीतरी कॅप्शन सांग. प्रयत्न करतो बोललो आणि लिहायला पक्षी टाईप करायला घेतलं, त्यात फ्लो मध्ये जे सुचत गेलं ते लिहीत गेलो, आता वाचकांचे प्रतिसाद अपेक्षित आहेत.

"आजी तुझे दात उंदीरमामाने परत नाही दिले का गं अजून?"
चार वर्षाची माझी लेक चोपन्न वर्षाच्या माझ्या आईला विचारत होती. दोघींमध्ये तब्बल पन्नास वर्षाचा आणि एका दाताचा फरक होता... म्हणजे आजीचा एकच दात उरला होता आणि नातीचा एकच दात परवा पडला होता. तो दात उंदीरमामा घेऊन जातो आणि बदल्यात नवीन दात तोंडात बसवून जातो अशी गोष्ट आम्ही तिला सांगितल्यामुळे तिने आजीला बरोबर तसाच प्रश्न विचारला. उत्तरादाखल आजी फक्त बोळकं भरून हसली. शेवटचा दात त्यात चांदणी सारखा लुकलुकला असा मला वाटलं.
" तुझ्या उंदीरमामाचं कर्ज होतं बाई माझ्यावर, ते फिटलं नाही म्हणून त्याने दात परत न्हाई केले..." आजी.
"तुझ्यावर कसलं कर्ज, आणि असलं तरी बाबा फेडील ना, त्याने पण नाय फेडलं तर काका फेडील. मी सांगेन कि त्यांना, आजीचे दात परत आणा म्हणून..."
"गुणाची ग बाय माझी, किती इचार करते आजीचा, माझं एक जरी पोर तुझ्यावाणी असतं तर लै बेस झालं असतं..."
याच्या पुढचा संवाद ऐकणं माझ्यासाठी अवघड होतं. म्हणून कप ठेवायचा बहाणा करून मी हॉल मधून किचन मधून गेलो.
"काय हो, काय झालं?" इति आमची सौ.
"कुठे काय, कप ठेवायला आलो आत, कधी आणत नाही का माझा मी कप." मी उगाच त्रागा केल्यासारखं दाखवलं.
"हो... आणता कि,,, पण अर्धा भरलेला कप आणत नाही कधी, ते पण शून्यात बघत. बोला आता, काय झालं..."
च्यायला, या बायकांना जरा जास्तच कळतं आणि त्यात माझ्या बायकोला अजून जास्त. पण असो, नवऱ्याला ओळखणारी बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं.
"काही नाही, ते बाहेर आई जरा ज्ञानामृत पाजत होती नातीला, कि तिचा बाप आणि काका कसे बिनकामाचे आहेत..." गार झालेल्या चहाचा घोट घेत मी तोंड कडवट करत म्हणालो.
"आलं लक्षात, परत त्या कर्जाचा विषय निघाला का?"
"हम्म..."
"तुम्हाला मी किती वेळा बोलली आहे, तुम्ही खरं सांगून का टाकत नाही आईंना? किती दिवस हे ओझं डोक्यावर ठेवून तसंच दिवस ढकलणार आहेत?"
"त्याने काय होईल?"
"किमान तुम्हाला हलकं वाटेल ना..."
"आणि मग आईचं काय?"
"काय? त्यांना वाईट वाटेल असंच ना, तुमचं त्यांचं पटतंय असं मी तर बाई बघितलं नाही कधी, नवीन घर घेण्यासाठी त्यांचे माहेरून आणलेले दागिने ठेवून कर्ज काढावं लागलं याचा राग त्यांना आहे मान्य, पण आईचे दागिने तिच्या मुलाच्या कामी आले हे चांगलं नाही का? बरं आपण नंतर ते दागिने सोडवायला सुद्धा गेलेलो, पण सोनाराने मुदत संपली म्हणून ते परस्पर विकून टाकले यात आपण काय करू शकणार होतो? नाही जमत काही गोष्टी, पण म्हणून त्या आयुष्यभर मनाला लावून घेऊन चालतं का?"
"खरं सांगायचं तर तुलासुद्धा अर्धसत्यच माहित आहे, दागिने सोडवायला पैसे मुदतीमध्ये जमा झालेले आपल्याकडे कधीच, पण त्यातले अर्धे आईच्या ऑपरेशन मध्ये खर्च झाले. त्यामुळे आपण दागिने सोडवून आणू शकलो नाही वेळेत. पुढचं सगळं रामायण तुला माहीतच आहे."
"म्हणजे? आईंच्या ऑपरेशनसाठी तुम्ही जी सरकारी योजनेतून मदत मिळाली म्हणाला होतात ते?"
"तेच मी दागिने सोडवायला जमा केलेले पैसे. ते सरकारी मदत म्हणून दाखवले आणि वापरले."
"पण का- म्हणजे असं का केलंत तुम्ही?"
"अव्वाच्या सव्वा खर्च होता त्या ऑपेरेशनचा, आणि आपल्या डॉक्टरांनी आधीच आईंना माझ्यासमोरच कल्पना दिलेली, त्यात ऑपरेशन यशस्वी होण्याचे चान्सेस फक्त ३५%, तुला वाटतं आईने यासाठी कबुली दिली असती? आयुष्यभर कोणाचे उपकार न घ्यावे लागावे म्हणून जीवाचं रान केलेली बाई आहे ती... इतका पैसा लागतोय म्हंटल्यावर सरळ नकार दिला असता तिने भले जीव गेला असता तरी चाललं असतं तिला पण कोणाचं मिंधं होऊन जगणं नाही. "
"... "
"त्यामुळे सरकारी योजनेचा लाभ घेतोय दाखवून मी पैसे भरले, नशिबाने ऑपरेशन नीट झालं आणि ती परत बरी होऊन आपल्यात आली. "
"पण मला वाटतं तुम्ही हे आईंना सांगाल तर बरं होईल, त्यांचा खूप मोठा गैरसमज दूर होईल."
"पण त्यानंतर अपराधीपणाची भावना कायम मनात राहील त्याचं काय? कोणाला एकालातरी ते ओझं बाळगावं लागेलच ना, तिने माझं ओझं जन्मायच्या ९ महिने आधीपासून बाळगलं आता समज कि माझी परतफेडीची वेळ आहे. आणि आयुष्यभर ताठ मानेने कोणाचं मिंधं न राहता जगल्याच जे समाधानाचं हसू तिच्या चेहऱ्यावर दिसतं ना, त्यासाठी हे ओझं आयुष्यभर वागवायला मी तयार आहे. आपण परवा Vaibhav Joshi वैभव जोशींची ती कविता वाचली होती बघ-

शमणार कधी हि व्यथा प्यायची तृष्णा
आतली यादवी अक्षय असते कृष्णा... "

-विक्रम मोहिते.
#फोटो_वरून_सलग_लिहिलेली_कथा
फोटो क्रेडिट : यशोवर्धन पाटील

Group content visibility: 
Use group defaults

कथा छानच आहे. माझी आजी व बाबा ह्यांच्यात हे सेम संवाद नेहमी घडत. डाग डा गिणे म्हणून आजी रडा यला सुरू करायची. बाबा धुमसायचे आणी आई कावरी बावरी होउन बसायची.

ती दोन लायनीची कविता पन छान आहे.

छान लिहिलंय.
बराच वेळ बराच विचार केला या कथेवर. रिलेट झाल्या काही गोष्टी.
माझ्या सासूने त्यांच्या माहेरून मिळालेल्या बांगड्या माझ्या नवऱ्याच्या शिक्षणासाठी विकल्या. त्याचं त्यांना कायम वाईट वाटायचं. अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं. माझं नवीन लग्न झालेलं तेंव्हा असं वाटायचं की कशी आई आहे, आपल्याच मुलासाठी केलं तर इतक्या वेळेला ऐकवतात. शेवटी एकदा वैतागून मी माझा पीएफ काढून आणून त्यातून त्यांना बांगड्या घेऊन टाकल्या. त्यांना खूप आनंद झालेला. माझ्या माहेरच्या बांगड्या परत आल्या असं अनेक वेळा बोलल्या. मी त्यांना खूप कधी तरी त्या बांगड्या घातलेलं पाहिलं. नंतर लक्षात आलं की त्यांना माहेरची आठवण आली कीच त्या बांगड्या घालतात. आई, वडील, भाऊ, भावजय सगळे गेले आणि माहेर तुटलं त्यांचं. अर्थात आम्ही मुलं काळजी घेतो त्यांची, पण सून झाल्यावर मला कळतय की माहेर ते माहेर. त्यांच्यासाठी त्या बांगड्या फक्त माहेराची आठवण किंवा एक दुवा म्हणून आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीला आणि मला सांगितलं आहे की त्यांच्या नंतर या बांगड्या मलाच मिळायला हव्यात वगैरे पण मी त्या त्यांच्या मुलीला देणार आहे कारण ‘आईचा’ दागिना आणि ‘सासूचा’ दागिना यात खूप फरक असतो. जेवढ्या प्रेमाने ती घालेल तेवढ्या प्रेमाने मी कधीच घालणार नाही. कितीही झालं तरी ‘आई’ ही ‘आईच’ असते आणि माहेर हे माहेरच असतं.

कदाचित कथा नायकाची आता परिस्थिती चांगली झाली असेल तर त्याने सांगून टाकावं आईला की दागिने आणायला गेलो होतो गं पण तुला वाचवणं दागिने वाचवण्यापेक्षा महत्वाचं होतं. हवं तर आता करुन घेऊ सगळे दागिने परत. आई मरताना समाधानाने मरेल की मुलाने माझा फायदा नाही घेतला तर माझा विचार आधी केला.

छान लिहिलयं!

रीया,
किती समाधान मिळाले असेल ना तुझ्या साबाईंना!

छान लिहिले आहे. शैली आवडली.

दागिने हे स्त्रीधन यात बायकांचा जीव अडकलेला असतो या मागील माहेरचा अँगल रीयाच्या प्रतिसादामुळे लक्षात आला.

@ऋन्मेऽऽष पूर्णपणे सहमत.

@स्वाती२ धन्यवाद

@रीया, बऱ्याचदा आपल्याला वाटतं तेवढे आपण खरं बोलायला स्वतंत्र नसतो. आणि आईची तक्रार कदाचित दूर होईल, पण त्या नंतर जे गिल्ट येईल ते वाईट असेल. नात्यांची गुंतागुंत खूप वेळा माणसाला सहन करायला भाग पाडते

@ अ'निरु'द्ध धन्यवाद

@अश्विनीमामी धन्यवाद. ती कविता जगात भारी कवी वैभव जोशींची आहे

कथा चांगली आहे. विषय आणि मांडणी चांगली. पण त्या फोटोला जुळत नाहीये. ५४ वर्षाची स्त्री इतकी म्हातारी नसते ना.

छान लेख,
दागिने...... त्यात जीव, भावना, इच्छा, आनंद अडकलेला असतोच