तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2024 - 07:26

तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का? असा एक धागा मायबोलीवर यापुर्वीच आला आहे.
तर आता त्याच धाग्याला अपग्रेड करून तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का हा धागा काढत आहे.

धागा काढायचे तात्कालिक कारण म्हणजे नुकतेच माझी मुलगी टीव्हीवर झळकली. पराक्रम म्हणाल तर एक स्त्री दुसर्‍या स्त्रियांच्या सुखदुखात सामील होताना कॅमेर्‍यात कैद झाली Happy

त्याचा विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=uQkWOlM2qrI

मी स्वत: क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहता आणि (feminism) स्त्रीवादाचा पुरस्कर्ता असल्याने जितक्या आवडीने पुरुष संघाच्या क्रिकेट मॅचेस पाहतो तितक्याच आवडीने महिला संघाच्या देखील बघतो. यातूनच लेकीला सुद्धा क्रिकेटची गोडी लागली. ती क्रिकेट बघण्यापेक्षा क्रिकेट खेळणे जास्त पसंद करते. पण अध्येमध्ये स्कोअर काय झाला, कोण जिंकतेय, कोहलीने किती मारले वगैरे चौकशी करत असते. काही दिवसांपुर्वी माझ्याकडे आली आणि म्हणाली की भारत-ऑस्ट्रेलिया महिलांचे क्रिकेट सामने होणार आहेत. ते मला बघायला जायचे आहे...

ठिक आहे जाऊ म्हटले. तसे तिने अजून दोनतीन मैत्रीणी जमवल्या. पण अचानक उद्भवलेल्या परीस्थितीमुळे मला जाता आले नाही. अजून एक-दोन मैत्रीणींचे वडील सोबत असल्याने तशी चिंता नव्हती. तरी आपल्याला जाता आले नाही याची चुटपुट लागली होतीच. पण ती परत आल्यावर मला समजले की मी काय गमावले होते. वरच्या व्हिडिओत बघून ते समजेलच...

पण मी सुद्धा जर तिच्यासोबत टीव्हीवर झळकलो असतो तर ती माझ्या आयुष्यातली पहिली नाही तर दुसरी वेळ असती.

विजेटीआय कॉलेजला डिप्लोमा करत असतानाची गोष्ट. तेव्हा जितेंद्र जोशीचा कॅम्पस म्हणून एक कार्यक्रम गाजत होता. कार्यक्रमाची रुपरेषा अशी की दर एपिसोडला एखाद्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन तिथल्या पोरांबतबत धमाल करायची. आमच्या कॉलेजला ईतकी धमाल केली की त्याचे दोन एपिसोड बनले. कालपासून युट्यूबवर शोधत आहे. ईतर बरेच सापडले, पण आमचा नेमका सापडत नाहीयेत.

असो, तर आम्हीही गाणी म्हटली, नाच केला, दंगा घातला. आमच्या ग्रूपचे जय जय महाराष्टृ माझा गाणे कार्यक्रमात पुर्ण दाखवले गेले. आमच्या मुलींनी एका हिंदी गाण्याला मराठीत गायले, ते सुद्धा बहुधा दाखवले गेले. एक वाक्य दिले होते आम्हाला. आई एक नाव असतं.. याची पुढची ओरिजिनल ओळ घरातल्या घरात गजबजलेले गाव असते अशी आहे. आम्हाला आमच्या मनाने बनवायला सांगितली होती. मी म्हटलेले की पुढे बाबांचेच आडनाव असते, पण ते बहुधा सेन्सॉर कट झाले.

काही हरकत नाही. पण पुरेसा वेळ मी टीव्हीवर झळकलो होतो. माझ्या आईने कार्यक्रमाची वेळ सर्व नातेवाईक मित्रमैत्रीणींना सांगितली होती. सोबत हे सुद्धा सांगितले होते की आधी कल्पना असती तर गधड्याला चांगले कपडे घालून पाठवले असते. त्यांच्यामते मी तेव्हा फार गबाळा राहायचो. आता बायकोच्या मते मी आणि माझी मुले फार गबाळे राहतो. तरी मुलीला मॅच बघायला पाठवताना नीटनेटके कपडे आणि मुद्दाम खास केशरचना करून पाठवले होते. कारण झळकलीच टीव्हीवर तर असे एक्स्क्यूज आम्हाला देता येणार नव्हते Happy

यावेळी माझा चान्स हुकला, पण पुढच्या वेळी मी नक्की जाणार, आणि त्या अनुभवासह याच धाग्यावर पुन्हा येणार.

आणि हो, ते जितेंद्र जोशी कॅम्पस विजेटीय एपिसोड कोणाला युट्यूबर सापडला तर मला लिंक विपु करा नक्की...

बाकी माबोवर तर कैक मोठ्या हस्ती आहेत. काहीजण असेही असतील ज्यांच्यासाठी टीव्हीवर झळकणे ही नित्याची बाब असेल. पण त्यातही पहिल्या वेळेची आठवण स्पेशल असेल. माबोकरांचे अनुभव वाचायला सर्वांनाच आवडतील. तर लाजू नका. संकोच करू नका Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सहावीत असताना..
पथनाट्य सादर केलं होतं तेव्हा सह्याद्री वाहिनीवर बातम्यात दिसलेलो.. (शिर्षक वाचून दिलेला प्रतिसाद, लेख वाचते निवांत आणि देते रिप्लाय परत)

जुन्या टिव्हीला दारं होती. पिक्चर ट्यूब गेल्यावर याचा उपयोग शूज ठेवण्यासाठी केला.
त्याच्या वर छोटी गादी टाकून त्याच्यावर बसून फोटो काढले आहेत. व्हिडीओ पण काढलेत.

मॅकग्रा २३ डिसेंबर २००६ ला निवृत्त झाला त्याच्या एक दोन दिवस आधी टिव्हीवर बसून मॅच पाहिली होती ही आठवण आहे.

मीही लोकल टीव्हीवर झळकलो होतो.
WTC वर हल्ला झाला तेव्हा मी इथेच होतो, WTC च्या तळघरात मोठे सबवे स्टेशन होते तिथूनच मी ट्रेन बदलत असे. असे लाखो लोक असतील,. पण WTC हल्यातून बालंबाल बचावला अशी विनाकारण प्रसिद्धी लहान शहरात मिळाली. नंतर मी सुटीला घरी गेलो तेव्हा तिथल्या हाउसिंग सोसायटीच्या देवळात काही आति उत्साही रिटायर्ड लोकांनी माझे भाषण ठेवले. भाषण ऐकायला जेमतेम चार लोक जमा झाले होते ( त्यातल्या एकाने सतरंजी आणली असावी) माझ्या भाषणाला कुत्रेही येणार नाही हा माझ्या बहिणीचा टोमणा मात्र खोटा ठरला, एक कुत्रा कुतुहलाने पहात होता. पुढेही बरीच मजा झाली.

त्यानंतर एका लोकल टीव्ही वर माझी अर्धा तास मुलाखत झाली. काय बोललो आठवत नाही.

क्टयूट व्हिडीओ परीचा. एक्स्प्रेशन्स भारी Happy Happy अभिनंदन. जेंव्हा संपूर्ण कार्यक्रमातून चानेल एडिटर असे स्वत:हून निवडतात आपली क्लिप आणि अनायासे ती टीव्हीवर दिसते तेंव्हा तो एक वेगळाच आनंद असतो. हे एक दोन प्रसंग:

सारेगामा (कि तसाच एक कार्यक्रम) ज्यामध्ये पल्लवी जोशी सूत्रसंचालन करत असंत त्याचे फायनल एकदा पुण्यात नेहरू स्टेडियमवर झाले होते. खूप मोठा भरगच्च कार्यक्रम होता. चिरंजीव लहान होते (एक दोन वर्षाचा असेल) तेंव्हा सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या कि हा भलताच खुश व्हायचा (काय कळत होते याला काय माहित Lol ) मग मी सुद्धा त्याला मजेत उचलून धरायचो. एकदा तोच क्षण कॅमेरामनने टिपला आणि त्याच्या लाइव्ह मध्ये टीव्हीवर काही क्षणासाठी आम्ही दिसलो. दुर्दैवाने त्याचे रेकॉर्डिंग आता उपलब्ध नाही कारण तेंव्हा हि च्यानेल्स युट्युबवर नव्हती.

दोन वर्षापूर्वी एका कार्यक्रमासाठी मी आमंत्रित होतो. दोन तास कार्यक्रम झाला. त्यातले मोजके क्षण जिल्हा पातळीवरील एका चानेलने त्यांच्या बातमीत दाखवले. त्यात माझ्या भाषणाचे काही सेकंद त्यांनी निवडले होते.

>> Submitted by vijaykulkarni on 11 January, 2024 - 18:49

भारी! एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होतात की Happy

मुलीच्या शालेय प्रवेशासाठी रांगेत उभा होतो. तेव्हा कुठल्या रात्री चॅनेलने येऊन चित्रीकरण केले होते आणि माझा 'चावा' घेण्यात आला होता तो त्या चॅनेलच्या बातम्यांत दाखवला गेला होता.

माझ्या बहिणीला एक कुकरी शो गिफ्ट केला म्हणजे तिचं व तिच्या सुनेचं नाव रजिस्टर केलं होतं तो कार्यक्रम शुट झाला तेव्हा योगायोगाने मी तिच्याकडे होते. तेव्हा माझा एक बाईट घेतला होता. अमेय वाघ होता सुत्रसंचालक. परी क्युट !

सिंगापूर ला चला हवा येऊ द्या चा show होता..बघायला गेलो होतो आणि TV वर सुद्धा दिसले होते मी...लहान बहीण Home minister मध्ये सहभागी झाली होती तेव्हा तिच्या घरी होते आणि TV वर पण झळकले होते .फोटो सापडला तर देते

१ मे २०२३ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर माझ्या जर्मन भाषा शिकवण्याच्या प्रवासाविषयी ३० मिनिटांची माझी मुलाखत झाली होती
https://www.youtube.com/live/mGlxGa3dOOE

विकु, बापरे. मी ते WTC मेमोरियल नुकतेच बघितले. काटा आला अंगावर..!
बाकी पोस्ट Lol

सगळ्याच पोस्ट मस्त. Happy
अभिनंदन अतुल आणि केदार. Happy
-------
छोट्या परीताईचे अभिनंदन. Happy

कित्ती गोड. परीचं अभिनंदन.

जितेंद्र जोशी बरोबर सोनाली खरे असायची का कँपस प्रोग्रॅममधे. मी फार कमी वेळा बघितलं आहे. तेव्हा केबल नव्हती आमच्याकडे. माहेरी डोंबिवलीत आले की बघायचे, तेव्हा मी नालासोपारा इथे रहायचे.

माझा दोनदा टीव्ही चान्स हुकला. एकदा बहीण शाळेत असताना शाळेतर्फे किलबिलमधे प्रोग्रॅम होता तेव्हा ती एका डान्समधे मेन डान्सर होती. मला क्लास वगैरेला जायचं होतं. प्रेक्षकात असते नाहीतर, त्याचं सुत्रसंचालन पल्लवी आठल्ये म्हणजे आत्ताची ऐश्वर्या नारकरने केलेलं, ती बहीणीची बॅचमेट.

नंतर काही वर्षांनी माझ्या नवऱ्याचे सिलेक्शन ताक धिना धीन prgm मध्ये झालं, तेव्हा आमच्याकडे लँडलाईन फोनही नव्हता, टेलिग्राम आलेला सिलेक्शन झाल्याचा पण कधी बोलावणार काय ते नंतर बँकेच्या फोनवर कळवणार होते. तेव्हा तो एस बी आय जेकब सर्कल branch ला होता. एकदा अचानक बँकेत फोन आला, की आज शूटिंग आहे, या. सोबत दोन जण आणलेत तरी चालेल. माझा मुलगा लहान आणि आजारी, इतक्या शॉर्ट नोटिसवर कोणाकडे ठेऊन मी ना सो हून वरळीत जाणार, अचानक बोलावलं तर बँकेतलया कोणालातरी घेऊन जा हे मी सांगितलेलं त्यामुळे तो दोन जणांना घेऊन गेला. आमच्या शेजारच्या विंगमध्ये फोन होता त्यांच्याकडे निरोप देऊन ठेवला मात्र, उशीर होईल, दूरदर्शन केंद्रावर जातोय, आम्ही त्यांचा नंबर काही दिला नव्हता दूरदर्शनला, उगाच कोणाला त्रास कशाला, तसंही तो दिवसभर बँकेत असायचा त्यामुळे बँकेचाच दिलेला.

नंतर श्रीरामपुरला असताना भाऊ फोर्टला hdfc बँकेत होता, त्याची अर्थकारण संदर्भात छोटी बाईट ई टीव्हीतर्फे घेतलेली, असंच तो बाहेर जेवायला गेलेला बँकेच्या जवळ त्यावेळी, दोन तीन लोकांना विचारलेले तेव्हा, त्यात भाऊ होता. आपली मुंबई अशा मुंबईच्या रात्री बातम्या असायच्या त्यात बघितलेलं मी त्याला.

ह्या सर्वांचे रेकॉर्डिंग वगैरे आमच्याकडे काहीही नाहीये.

टीव्हीवर वेगवेगळ्या कारणांसाठी झळकलेल्या सर्वांचे अभिनंदन.

WTC वर हल्ला झाला तेव्हा मी इथेच होतो, WTC च्या तळघरात मोठे सबवे स्टेशन होते तिथूनच मी ट्रेन बदलत असे. >>> बापरे काटा आला अंगावर. सुदैवी खरोखर.

मस्त किस्से सगळ्यांचे. (विकुंचा मूळ अनुभव सोडून) परीचा व्हिडीओही मस्त. कँपस कार्यक्रमाचे काही भाग बघितले आहेत. व्हीजेटीआयचा बघितलाय की नाही ते आठवत नाही. (कँपसच नाव होतं का जितेंद्र जोशीच्या कार्यक्रमाचं? की अजून एखादा शब्द होता नावात? पूर्वी झी टीव्हीवर कँपस नावाची हिंदी मालिकाही लागायची बहुतेक)
मी इयत्ता सातवीत असताना टीव्हीवर मराठी बातम्यांमधे दिसले होते. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेतला होता. त्या प्रदर्शनाची बातमी होती. माझ्या घरी फक्त माझ्या आजीने मला टीव्हीवर बघितलं. बाबा खरं तर रोज बातम्या बघायचे, पण नेमके त्या दिवशी बाहेरच्या खोलीत होते. आईही स्वैपाक करत होती. Happy आजीने हाक मारून ते दोघे येईपर्यंत मी अदृश्य झाले. पण गंमत म्हणजे ओळखीच्या अनेक जणांनी मला टीव्हीवर बघितलं आणि नंतर आईला/बाबांना सांगितलं.

@वावे Campus fair war असं नाव होत त्या प्रोग्राम च, जितेंद्र जोशी anchor होता.

मी सिंगापूर च्या लोकल वसंथम ह्या चॅनलवर काही क्षणांसाठी झळकले होते.
एका कम्युनीटी सेंटर च्या उद्घाटना प्रसंगी मा‍झ्या ग्रूप ने भारतीय नाच सादर केला होता..(मराठी लावणी, पंजाबी भांगडा, बंगाली & गुजराथी गर्बा नृत्य) Happy

सगळ्यांचे किस्से फारच भारी आहेत.

माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्याच वर्षीचा किस्सा आहे. म्हणजे मी अनेक वर्ष कुठेच वर्तमानपत्र/रेडिओ/टिव्हीवर झलकलो नव्हतो. एक दिवस मी माझा एक व्ह्डिओ काढला आणि माझ्या मोबाईलवरून स्क्रीन मिरर करून माझ्या टीव्हीवर लावला.

परीचे अभिनंदन !

सातवी की आठवीत दूरदर्शनवर क्विझ contest hoti.नाव विसरले. शाळेतर्फे 5 जणातील मी एक होते.आम्ही हरलो यापेक्षा दुसरी टीम तगडी होती.

हपा हाहाहा.

ह्या टाईपच काहीतरी केलं मी म्हणजे, २०१२ ला आम्ही कोकणात गेलेलो तेव्हा नवऱ्याने बरेच व्हिडिओ काढलेले, मोबाईल वर आणि ते चांगले आलेले म्हणजे आत्ता जे vlogs असतात ना इकडचे तिकडचे, त्या टाइप म्हणजे कोकणातली सकाळ, आलेले सगळे गप्पा मारतोय आणि तेव्हा आम्ही आमच्याबरोबर माझ्या आईला आणि बहिणीलाही कोकणात नेलेले, बरेच जवळचे नातेवाईक, सिरियलमध्ये काम करते ती भाची असे सगळे होतो आणि काहीजण फणस भाजी करण्यासाठी फणस कापताना, बहीण सगळी झाडलोट करताना, काहीजण गप्पा मारताना असं सर्व. माझी आई, माझ्या साबा आणि मोठ्या नणंदेचे मिस्टर आता या जगात नाहीत पण त्या व्हिडिओत आहेत. अजून त्या वर्षी खूप केले अगदी कुणकेश्वर, पोखरबाव केलं तेही. इथून डोंबिवलीतून तिथे जाईपर्यन्तचेही आहेत.

हे सर्व मी डेस्कटॉपवर ठेवलेले ते मी नवऱ्याला मध्ये टीव्हीवर बघता येतील (अजून मोठा स्क्रीन) असं करायला सांगितलं आणि अस्मादिक टीव्हीवर एकदाचे झळकले.

हपा Lol
व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिलेला दिसतोय Wink
आत्ताच खुलासा होईल म्हणून चेक केलं. सिरीयस प्रतिसाद दिला तर वेड्यात निघू म्हणून जसा दिला तसाच हपाचाही प्रतिसाद पाहूना बरं वाटलं.

Pages