लव्ह प्रॉ

Submitted by प्रकाश घाटपांडे on 28 December, 2023 - 10:09

लव्ह प्रॉ हा शब्द तुम्हाला माहित आहे का? ज्योतिष विषयक छोट्या जाहिरातीत असतो. काही ज्योतिषी या लव्हप्रॉचे स्पेशालिस्ट असतात. थोडक्यात प्रेमप्रकरणाच्या समस्या दूर करणारे ज्योतिषी. या लव्हप्रॉ म्हटलं की मला आठवण येते ती जुन्या पिढीचे सिनेनट व ज्योतिषी श्री शाहू मोडक यांची. त्यांच्या कडे जेव्हा मुंबईत मी ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता.
तुमचे काही प्रेमप्रकरण वगैरे?
मी छे छे अस लाजून म्हटले होते.
पुरुष ना तुम्ही? मग? अस म्हटल्यावर मी चमकलोच होतो. आख्या कॉलेज व होस्टेल लाईफ मधे कधी वर्गातल्या मुलींशी मी स्वत:हून एक वाक्यही बोललो नाही तिथ माझ काय प्रेमप्रकरण असणार? मुलींशी बोलायचे प्रसंग मी टाळायचो. मला भीती वाटायची मुलींची. अजूनही वाटते. आपण बोललो आन त्यांनी आपला सणसणीत अपमान केला तर? हे भय तर होतेच शिवाय आपण ग्रामीण भागातून इथे आलो आहोत हा न्य़ुनगंड होता. तिथे शाळेत मुली नव्हत्या. नंतर हायस्कूलमधे ही मुलींशी बोलायचा संबंध आला नाही. तशी गावी पद्धतच नव्हती. पुण्यात आल्यावर या शहरी मुली "वाढाव" असतात. आपला रुप, रंग, बोली, बुद्धीची झेप पहाता उगीच हात दाखवून अवलक्षण नको असा सुरक्षित विचार त्यामागे होता.मुलींच तारुण्यसुलभ आकर्षण वाटायचेच पण भय त्यापेक्षा अधिक होतं. त्यामुळे मैत्रिणी असण्याचा प्रश्नच नव्हता.सायन्सला असल्याने वादविवाद,नाटक,गाणी, वक्तृत्व वगैरे जादा ऎक्टिव्हीटी साठी वेळ ही नसायचा व औकातही नव्हती. त्याबाबत आर्टस व कॉमर्सवाले सुखी होते. अशा ठिकाणी मुलींची रेलचेल असायची व इंप्रेशन मारायला उदंड संधी असायच्या. तिथेही आमचा पत्ता कट. एकदा कॉलेज मधे एका सुंदर मुलीने रस्त्यात मला काहीतरी पत्ता विचारला होता. सांगताना माझ्या तोंडाला कोरड पडली. ततपप करीत कसा बसा पत्ता सांगितला. काय ही परिस्थिती? ज्यांच्याशी मुली स्वत:हून बोलतात त्यांच्याविषयी असूया युक्त आदर होता. पुढे बीएस्सी झाल्यावर लगेचच पोलिस बिनतारी मधे नोकरी लागली. तिथेही पुरुषांचेच राज्य. तेव्हा पोलिस खात्या स्त्रियांचे प्रमाण अगदीच नगण्य होते. त्यामुळे तिथेही काही संबंध आला नाही. प्रेमविवाह हे स्वप्नवत होते माझ्यासाठी. चित्रपटातच ते दिसायचे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यावर आत्मविश्वास, बेफिकिरी येउन स्वच्छंदी झालो. कुठली बंधन स्वत:वर लादून घेतली नाहीत. पुढे अंनिस सारख्या सामाजिक चळवळींशी थोडाफार संबंध आला तेव्हा कुठे अनौपचारिक चार शब्द मुलींशी बोललो. संपर्क- परिचय- सहवास- मैत्री- जवळची मैत्री. मग प्रेमाचा सुगावा, मग प्रेमप्रकरण मग प्रेमविवाह हे सूत्र वाटयाला आले नाही. अंनिस मधील माझा मित्र मिलिंद जोशीने माझे भाकित 1991 ला वर्तवले होते कि तुझ्यात लव्ह मॅरेज ची ऐपत,कुवत,क्षमता,झेप नाही पण तुझी होणारी बायको ही अशी असेल कि त्यात नातेवाईकात, मित्रमंडळीत तू राहशील बाजूला व तुझ्या बायकोलाच सगळे विचारतील हे ते भाकित मात्र अगदी खरे ठरले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आख्या कॉलेज व होस्टेल लाईफ मधे कधी वर्गातल्या मुलींशी मी स्वत:हून एक वाक्यही बोललो नाही तिथ माझ काय प्रेमप्रकरण असणार? मुलींशी बोलायचे प्रसंग मी टाळायचो. मला भीती वाटायची मुलींची. अजूनही वाटते. आपण बोललो आन त्यांनी आपला सणसणीत अपमान केला तर? हे भय तर होतेच शिवाय आपण ग्रामीण भागातून इथे आलो आहोत हा न्य़ुनगंड होता.>> आमचीही तीच परिस्थिती होती.

मला वाटते, बरेचदा अपोझिट सेक्स्शी बोलायची अँग्झायटी ही फक्त परिस्थितीजन्य नसून, तीमध्ये संप्रेरकांचा हातभार असतो. कॉलेजच्या दिवसातील, संप्रेरकांचे उतार-चढाव, त्यांची टायरनी(मोगलाई) ही सुद्धा कारणीभूत असते.

हा माझा कयास आहे. मी वैद्य नाही.

सामो अगदीच सहमत आहे. अपोझिट सेक्स विषयी असलेल्या सुप्त आकर्षणातून झालेल्या तीन चार सेकंदाच्या स्पर्शातून नंतर मला एका सार्वजनिक अपमानाला सामोर जावे लागले. गेली तीस वर्षे मी त्याचे विश्लेषण स्वत:शी करत आहे.साने गुरुजींचा शाम या बद्दल कीती आत्मपीडन करुन घेईल? दरोडेखोरां च्या राज्यात भुरट्या चोराने स्वत:ला किती अपराथी म्हणून शिक्षा करुन घ्यावी? असे प्रश्न पडतात खरे? कधी कधी वाटते की मला स्वत:ला व इतरांना माफच करता येत नाही. असो!

आमच्या शाळेत मुलं आणि मुली समप्रमाणात होते. तरीही आठवीत गेल्यापासून मुलं मुली एकमेकांशी बोलत नसत, असं आठवतंय. एकमेकांना अक्षरशः शत्रूपक्षासारखं पाहात. एका वर्गातले (आणि हे एका वर्गात असणं अनेकांच्या बाबतीत पहिली ते दहावी असं होतं, कारण शाळा लहान होती- दोनच तुकड्या) मुलगामुलगी घरी सख्खे शेजारी असले तर तिथेही एकमेकांशी बोलत नसत. हे चित्र आजूबाजूच्या वर्गांतही असे. रियुनियनच्या वेळी ही गोष्ट आठवून आपण तेव्हा किती वेड्यासारखं वागत होतो, हे काहींना जाणवलं, काहींच्या मुलांना हे ऐकून धक्का बसला.
हा प्रकार कॉलेजातही चालू राहिला. आमच्या अ तुकडीच्या वर्गात पाचही वर्षे ७०-७५ मुली आणि २०-२५ मुलगे असं प्रमाण होतं. तिथेही मुलं वि मुली हा शत्रूपक्ष मानला जाई. इतर तुकड्यांतली मुलंमुली एकमेकांत मिसळायची , एकत्र फिरायची.
मी शेवटच्या वर्षात असताना म वा मं चा सभासद झालो तेव्हा मुलींसोबत काम करायची वेळ आली. यात बुजरेपणा नव्हता. पण हे दोन शत्रूपक्ष का झाले ते कधी कळलं नाही.

प्रघा, खरं सांगायचे तर माझ्या औषधांनी माझा 'शेम' हा थ्रेशोल्ड, पर्यायाने गिल्ट हा प्रकार निग्लिजिबल करुन टाकलेला आहे. पूर्वी मी लहानसहान प्रत्येक बाबतीत स्वतःला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभी करत असे. पण औषधांनी ती वृत्ती १८० कोनांतून फिरवली.

अपोझिट सेक्स पासू कटाक्षाने दूर रहाण्याबद्दल, घरातून इतका दबाव होता आणि मी इतकी आज्ञाकारी होते की लव्ह मॅरेज करता पोषक वातावरणच निर्माण झाले नाही. आय हॅव्ह वन रिग्रेट - स्वतःची सेक्श्युअ‍ॅलिटी नीट एक्स्प्लोअर न केल्याचा मला पश्चात्ताप आहे. इट्स अ गिफ्ट & नीडस टु बी ट्रीटेड सच.

असो.

>>>>>तीस वर्षे मी त्याचे विश्लेषण स्वत:शी करत आहे
अजिबात विसरुन जा. झटकून टाका तो विचार.

सामो, विश्लेषणातून माझे वाचन वाढत गेले. त्याबरोबर माझा लैंगिक बुध्यांकही विकसित होत गेला. त्यामुळे आत्मपरिक्षणातून माझा अपराधगंड कमी होत गेला. एका पत्राद्वारे मी त्यावेळी हे विश्लेषण केले होते. त्याची कार्बन प्रत अगदी आता आता पर्यंत ठेवली होती. नंतर ती नष्ट केली. पण आता मला ती नष्ट केल्याची हुरहुर लागली आहे.कारण तटस्थपणे केलेले ते स्वत:चे विश्लेषण होते जे मला अपराधगंडातून मुक्त करीत होते.

>>>> पण आता मला ती नष्ट केल्याची हुरहुर लागली आहे.कारण तटस्थपणे केलेले ते स्वत:चे विश्लेषण होते जे मला अपराधगंडातून मुक्त करीत होते.
अरेरे.

श्यामसुंदर मिरजकर यांच्या एका लेखाची आठवण अशीच झाली. प्रघा जरुर वाचा. -

स्त्री मनाच्या खोल गाभाऱ्यात प्रवेशणाऱ्या कथा : आत आत आत

वाचन करता करता, या ब्लॉगस्पॉटवरती अचानक एकदा जाउन पोचले होते. या ब्लॉगलेखकांशी माझी ओळख वगैरे काही नाही. त्यांचे लेख मला आवडले पैकी 'पौगंडावस्थेतील लैंगिकतेची' काही रुपे दाखवणार्‍या एक पुस्तकाबद्दलचे परीक्षण वाचनात आले. अस्वस्थ झालेले आठवते.

ग्रामीण भागातून इथे आलो आहोत हा न्य़ुनगंड होता. >> कदाचित यामुळे असेल. रच्याकने, शाळेत असताना, आमच्या शाळेतील अनेक प्रेमप्रकरणे माहीत होती.

सामो, उत्तम ब्लॉग आहे तो! कामभावनेला पाप मानले गेले म्हणुन तो विषय टॅबू मानला गेला. साने गुरुजींच्या श्यामच्या हाती र.धों कर्व्यांचे समाजस्वास्थ्यचे अंक पडले असते तर?. . . . Lol

साने गुरुजी एका विशिष्ट संस्कारक्षम वयात त्यांच्या जागी योग्यच आहेत नंतर जीवनात यु हॅव्ह टु सॉर्ट आऊट मेनी डिटेल्स. तेव्हा कोणीही मदतीला येत नाही. यु हॅव्ह टु गार्ड युअर सॅनिटी.

सामो, यातून समकालीन असलेल्या श्री. के.क्षीरसागर यांचे यावरील विचार व र.धों चे विचार यात जुगलबंदी होती. श्री के क्षीरसागर ( 1901 ते 1980) यांचे लैंगिक नीती आणि समाज हे पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले. र धों कर्वेंचे समकालीन आहेत. लैंगिकता व नैतिकता यातील परस्पर संबंधांचा तत्कालीन उहापोह करणार्‍या त्यांच्या अनेक लेखांचा संग्रह. र.धों कर्व्यांनी आपल्या समाजस्वास्थ्य मधे क्षीरसागरांचा येथेच्छ समाचार घेतला आहे. समाजस्वाथ्य वाचणार्‍यांनी लैंगिक नीती व समाज हे पुस्तक वाचणे देखील अत्यंत गरजेचे आहे. ही पण एक समाजाची बाजू आहे. पण मला सांगायचा तो ब्रह्मचर्याची एक बाजू ज्यात होणारी घुसमट. वि.द.घाट्यांचे पांढरी केस हिरवी मने या पुस्तकात आचार्यांचे मृत्युपत्र या प्रकरणात ती उत्तम मांडली आहे.

मला सख्खी बहिण नसल्यामुळे मुलींशी बोलायची सवयच नव्हती. नात्यातल्या मुलींशी बोलताना सुद्धा जेव्हढ्यास तेव्हडे बोलून गप्प.
प्रेमप्रकरण कसले करतो डोंबलाचे!!