आवळी-जावळी, ‘आवळी-आवळी’.. इत्यादी !

Submitted by कुमार१ on 27 December, 2023 - 01:55

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील 32 वर्षीय Kelsey Hatcher यांनी एका विशेष प्रकारच्या ‘जुळ्या’ मुलींना जन्म दिल्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. या बाईंना चक्क दोन गर्भाशये असून त्या प्रत्येक गर्भाशयात एक मुलगी अशा प्रकारचे त्यांचे हे गरोदरपण होते.
(https://www.ndtv.com/world-news/us-woman-kelsey-hatcher-born-with-rare-d...).

अशी घटना दुर्मिळ असून ती कित्येक दशलक्ष स्त्रियांमध्ये १, या प्रमाणात आढळते. या प्रकारे जन्मलेल्या बालकांना ‘जुळी’ म्हणायचे का आणि म्हटल्यास कोणत्या प्रकारची जुळी, इत्यादी खल प्रसूतीतज्ञांमध्ये चालू आहेत. या निमित्ताने ‘जुळी बालके’ या विषयावरील काही मूलभूत रंजक माहिती वाचकांसमोर ठेवतो.

जेव्हा एका गरोदरपणात स्त्रीच्या गर्भाशयात एकाहून अधिक गर्भ निर्माण होतात त्या प्रकाराला बहुगर्भीय (Multifetal) गरोदरपण असे म्हटले जाते. त्यामध्ये एका वेळेस दोन, तीन किंवा त्याहूनही अधिक गर्भ असू शकतात. तूर्त आपण फक्त दोन गर्भाचा म्हणजेच जुळ्यांचा विचार करू.

जुळ्यांचे वर्गीकरण
यांचे दोन मूलभूत प्रकार आहेत :
1. एकसमान जुळे (monozygotic) : यामध्ये फक्त एकाच स्त्रीबीजाचे एका शुक्राणूमुळे फलन होते. पुढे त्याचा गर्भ झाल्यानंतर त्याचे दोन गर्भांमध्ये विभाजन होते.

2. विभिन्न जुळे : (dizygotic) : यामध्ये दोन स्वतंत्र स्त्रीबीजांचे दोन स्वतंत्र शुक्राणूंमुळे फलन होऊन मूलतः दोन वेगळे गर्भ तयार होतात.
वरील प्रकारांपैकी सुमारे एक तृतीयांश जुळी पहिल्या (MZ) प्रकारची, तर दोन तृतीयांश दुसऱ्या प्रकारची (DZ) असतात.

चित्र पहा :

MZDZ twin.jpgकारणमीमांसा
१. एकसमान जुळे : याची कारणे विज्ञानाला अद्याप ज्ञात नाहीत.

२. विभिन्न जुळे : याचे मूलभूत कारण म्हणजे स्त्रीबीजांडातील एकाहून अधिक बीजांचे ovulation होते. असे होण्यास मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतील gonadotropins या हार्मोन्सची वाढलेली पातळी जबाबदार असते. अशी परिस्थिती स्त्रीच्या गरोदरपणाच्या वेळेसच्या वाढलेल्या वयामध्ये कॉमन असते. गेल्या 20- 25 वर्षात वंध्यत्वासाठी कृत्रिम गर्भधारणेच्या(assisted reproductive technology)उपायांचा वाढता वापर होत आहे. या प्रकारच्या उपचारांमुळे एका वेळेस एकाहून अधिक स्त्री-बीजांचे ovulation होण्यास उत्तेजन मिळते आणि त्यातून बहुगर्भीय गरोदरपणे वाढतात.
३. जुळ्याच्या विभिन्न या प्रकाराबाबत काही अंशी कौटुंबिक आनुवंशिकता दिसून येते.

जुळ्यांचे जागतिक प्रमाण
सर्वसाधारणपणे अचानक उत्पन्न होणाऱ्या (spontaneous) जुळ्यांचे प्रमाण ८० गरोदरपणांमध्ये १ असे आहे. एकसमान जुळ्यांचे प्रमाण जागतिक पातळीवर साधारण सारखे आहे. परंतु विभिन्न जुळ्यांच्या बाबतीत देश आणि वंशानुसार मोठे फरक आढळतात. उदाहरणार्थ,
नायजेरियात त्यांचे प्रमाण दर १००० जन्मामागे ४९ एवढे, तर
जपानमध्ये ते दर हजारी फक्त १.३ एवढे आहे.

जुळ्यांची जैविक वैशिष्ट्ये
१. एकसमान जुळे : या दोघांचेही लिंग (दुर्मिळ अपवाद वगळता) एकच असते. तसेच त्या दोघांचाही जनुकीय संच (genome) जवळजवळ (९९.९९...%) एकसमान असतो.

२. विभिन्न जुळे : यांचे लिंग एक अथवा भिन्न असू शकते. तसेच प्रत्येकाचा जनुकीय संच (अन्य सामान्य भावंडांप्रमाणे) फक्त पन्नास टक्केच समान असतो. ते एकलिंगी असले तरीही त्या दोघांच्या बाह्यरूपामध्ये काही फरक असू शकतो.

समान जुळी : गर्भाशय वास्तव्य
ती गर्भाशयात असताना त्यांचे चार विविध प्रकार संभवतात. एका गर्भाचे दोनमध्ये विभाजन फलनाच्या कितव्या दिवशी होते यावर तो प्रकार अवलंबून असतो (चित्र पहा) :
MZ subtypes.png
वरीलपैकी,
क्र. 2 सर्वाधिक(70%) आढळतो.
क्र. 4 ( जोडलेली जुळी) अर्थातच वाईट आहे. त्यातली बऱ्याचदा जन्मताच मरण पावलेली असतात. काही जिवंत जोड्यांच्या बाबतीत प्रगत शस्त्रक्रियांच्या मदतीने त्यांना सुटी करण्यात यश येते.

..
आता वर उल्लेखलेल्या Kelsey Hatcher या बाईंच्या विशेष प्रसूतीबाबत :
१. आतापर्यंत त्यांची एकूण तीन गरोदरपणे झालीत. त्यापैकी पहिली दोन ही सामान्य स्वरूपाची असून त्यामध्ये प्रत्येक वेळेस एकच बालक जन्माला आलेले आहे.
२. या तिसऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गरोदरपणाला dicavitary pregnancy असे शास्त्रीय नाव आहे.

३. या गरोदरपणाचे 39 आठवडे झाले असताना त्यांना औषध देऊन प्रसूतीस उत्तेजित करण्यात आले (induced).
४. पहिली मुलगी योनीमार्गे जन्मली तर दुसरीच्या जन्माच्या वेळेस सिझेरियन करावे लागले.

५. या बाळंतपणाची झुंज एकूण वीस तास चालली होती. दोन्ही मुलींच्या जन्मवेळेत सुमारे दहा तासांचे अंतर पडले.

अशी ही आवळ्याजावळ्यांची कथा सुफल संपूर्ण !
*********************************************************************************************************
लेखातील चित्रे जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. ती बातमी पाहिली होती.
एकसमान जुळ्यांच्या बाबत गर्भाचे विभाजन होते हे माहीत नव्हते.
रीडर्स डायजेस्टमध्ये एका वेळी सहा मुले झालेल्या स्त्रीवर लेख वाचला होता.

दूरदर्शनच्या सुंदर माझं घर या कार्यक्रमात जुळ्या मुलांना घेऊन कार्यक्रम केला गेला होता. आधी घोषणा करून जुळ्यांना संपर्क साधायला सांगितलं होतं.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
एका वेळी सहा मुले झालेल्या स्त्रीवर
>>>
होय. एका वेळेस तिळे आणि त्याहून जास्त मुलांची संख्या असण्याचे प्रमाण साधारण दर हजार जन्मांच्या मागे १.५ एवढे आहे.
IVF मुळे ते वाढते.

दूरदर्शनच्या सुंदर माझं घर या कार्यक्रमात जुळ्या मुलांना घेऊन कार्यक्रम केला गेला होता. आधी घोषणा करून जुळ्यांना संपर्क साधायला सांगितलं होतं. >>> हो, मस्त झालेला तो कार्यक्रम जाई जुई, आवळे जावळे नाव होतं.

या बाईंना चक्क दोन गर्भाशये असून त्या प्रत्येक गर्भाशयात एक मुलगी अशा प्रकारचे त्यांचे हे गरोदरपण होते. >>> असं असतं हे पहील्यांदा ऐकलं.

एक युट्युब व्लॉगर फॅमिली आहे, बहुतेक टेक्सासमधली. त्यांना एकावेळी सहा का सात मुली झाल्यात, आता आठ वर्षाच्या आहेत. त्यांना एक मोठी मुलगीही आहे, तिच्या बाबतीत थोडं वाईट वाटतं, ती लहान वयात खूप मॅच्युअर्ड आणि आई वडलांना मदत करते. छान आहे ती फॅमिली. काही व्लॉग्ज बघितले होते.

कुमार सर
छान माहिती.
माझ्या एका शाळेतील मित्राच्या मोठ्या बहिणीला 4 मुले एकदम झालेले.( चौळे? ). लोकल न्यूज पेपर मध्ये बातमी झालेली ती.
त्यातील एक दगावले आणि 3 जगले.
आता मोठे आहेत आणि तिघेही नीट तब्येतीने.

सर्वांना धन्यवाद !
चौळे?
>>>
खरंय, एका वेळेस तीन पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला असल्यास ते कुटुंब कुतुहलाचा विषय होते.
‘तिळे’ नंतर पुढील टप्प्यांना काय मराठी नावे द्यायची ?
तसे शब्द ऐकण्यात आले नाहीत.

>>>या बाळंतपणाची झुंज एकूण वीस तास चालली होती>>> बापरे....
जुळ्यांवर शालेय अभ्यासक्रमात एक इंग्रजी कविता होती...चूक एक करतो शिक्षा दुस-याला वगैरे....
एक सिनेमाही होता ... Prince and Pauper या मार्क ट्विनच्या कादंबरीवर.
हे कथानक आम्हाला शाळेत होते अकरावीत असताना.

छान माहीती.
>>> दोघांचाही जनुकीय संच (genome) जवळजवळ (९९.९९...%) एकसमान असतो.>>>> 100% का नसतो ? मूळ एकच गर्भ आहे ना

And when I died, the neighbours came
And buried brother John

And when I died, the neighbours came
And buried brother John)))

हो तो भलताच छान किस्सा आहे मार्क ट्वेन यांचा !

एकसमान 100% का नसतो ?
>>> चांगला प्रश्न.

१००% समान नसण्याची जैविक कारणे अशी आहेत :
१. जेव्हा मूळ गर्भापासून दोन वेगळे होतात त्यानंतर त्या प्रत्येकात रँडम जनुकीय बदल होऊ शकतात.
२. एकापासून दोन होण्याचा प्रकार असमतोल (asymmetric split) असू शकतो.
३. प्रत्येक गर्भातील डीएनएच्या पुनरुत्पादना (replication) दरम्यान रँडम चुका/बदल होत राहतात.

.. And when I died,.. >>>
कविता छान आहे. धन्यवाद.
पण ती Henry Sambrooke Leigh यांची आहे ना ?
https://www.poetrynook.com/poem/twins-4

मार्क ट्वेन यांचा संबंध समजला नाही.

त्या कवितेच्या ओळीवरून चि. वि. जोशींच्या 'आमचा पण गाव' या पुस्तकात मार्क ट्वेन यांचा पुढील किस्सा आहे तो आठवला...

एकदा मुलाखतीमध्ये एका बातमीदाराने मार्क ट्रेन ना त्यांचे खरे नाव विचारले तेव्हा ते म्हणाले, मला माझे खरे नाव नक्की सांगता येणार नाही. कदाचित ते मार्क असेल नाहीतर मग बिल असेल. बातमीदार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, असे कसे काय होईल.. तुम्ही नेमके कोण आहात हे तुम्हाला माहित असेलच ना ?
यावर मार्क ट्वेन उत्तरले, मी कोण आहे हे मला नेमके सांगता येणार नाही . त्याचे असे आहे की माझ्या आईला दोन जुळे मुलगे झाले. त्यातल्या एकाचे नाव ठेवले मार्क आणि दुसऱ्याचे नाव विल.
मग बातमीदार म्हणाला त्या दोन जुळ्यांमधला मार्क तो तुम्हीच ! बरोबर ना?
मार्क ट्वेन म्हणाले, ते सांगता येणं फार कठीण आहे आम्ही दोघे भाऊ दोन वाटाण्यांसारखे हुबेहूब समसमान होतो . विल कोणता आणि मार्क कोणता हे आईला देखील सांगता येत नसे. आम्ही आठ महिन्याचे असताना आमच्यापैकी एक जण मेला ... मेला तो नेमका कोण ? विल की मार्क ? हे कोणालाही सांगता येईना. सरते शेवटी घरातल्या मंडळींनी चिठ्ठ्या टाकून मनाची समजूत करून घेतली की मेला तो विल आणि जगला तो मार्क! पण या समजुतीचा काय उपयोग ? जिवंत असलेला मुलगा मार्कच आहे अशी ग्वाही देण्यास काय पुरावा आहे ? तो विल सुद्धा असू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितले ना की माझे नक्की नाव मी तुम्हाला सांगू शकणार नाही . त्याचप्रमाणे ह्या घोटाळ्यामुळे बाकीच्या लोकांप्रमाणे मला सुद्धा शंका येत आहे , की जिवंत असलेला मी खरा आहे की माझा भाऊ आहे ? मी मेलो की माझा भाऊ मेला या संदेहाने माझ्या मनात प्रचंड खळबळ उडून जाते !

असल्या माणसाची काय मुलाखत घ्यायची म्हणून बातमीदाराने तिथून पळ काढला.

अरे वा !
छान किस्सा. धन्यवाद.
..
माझ्या माहितीत एक 'लव-कुश' अशी समान जुळ्यांची जोडी आहे. अगदी लहानपणीच यांच्या आईने दोघांच्या केसांचा भांग वेगळ्या दिशेने ( डाव्या/ उजव्या) पाडायचे ठरवून टाकले.

माझ्या मामेबहिणीला जुळे मुलगे आहेत, एका नाळेचे एका वारेचे. हुबेहूब दिसतात. अडीच वर्षांचे आहेत, प्रचंड गोड आणि मस्तीखोर. कोण काय मस्ती करतो हे कसं कळतं विचारलं तर "ते खेळत असताना किंवा भांडताना मी माझी कामं उरकून घेते" असं बहीण म्हणाली Wink
गंमत सोडून देऊ, पण लक्ष ठेवणं, गोंधळ टाळणं हे सुरूवातीला खूप करावं लागलं

नेहमीप्रमाणे छान लेख.त्या आईला दंडवत!

आमच्या शेजारी एकीला जुळ्या मुली झाल्या होत्या.दोघीही सारख्या दिसायच्या.भरवताना चूक होऊ नये म्हणून एकीच्या हातात लाल आणि दुसरीच्या हातात काळा दोरा बांधला होता.कारण पहिल्यांदा जिला भरवले तिलाच परत भरवले जायचे असे त्यांचा बाबा म्हणाला होता.

>>>मार्क ट्वेन यांचा संबंध समजला नाही.>>>
मी यांची कादंबरी Prince and Pauper बद्दल लिहिले.
या कादंबरीतल्या राजपुत्राला सामान्य जीवन अनुभवायचंय . त्याच्या सारख्या हुबेहूब दिसणा-या गरीबाला तो राजपुत्र बनवून पाठवतो. मला वाटतं एक हिंदी सिनेमाही असा होता " राजा और रंक"

छान माहिती!
जुळे होणे हे अनुवांशिक असते का? माझ्या नवर्‍याचे मामा जुळे होते. तंतोतंत सारखे नाही पण ९० % साम्य होते. आता नवर्‍याच्या भाचीला जुळे मुलगे आहेत. त्यांच्यातही असेच ९०% साम्य आहे.

जुळ्याच्या फक्त विभिन्न या प्रकाराबाबत काही अंशी कौटुंबिक आनुवंशिकता दिसून येते.

स्त्रीमधील काही जनुकीय घटकांमुळे एका ऋतुचक्रात एकाहून अधिक बीजांडांचे ovulation होते.

*जुळे मुलगे आहेत, एका नाळेचे एका वारेचे.
>>> यावरून एक चांगला मुद्दा सुचला.
समान जुळ्यांच्या गर्भावस्थेतील चार प्रकारांची मूळ लेखात सचित्र भर घातली आहे.

रोचक!

रोचक +१
अपरिहार्यपणे 'अंगूर'ची आठवण झाली Happy

धन्यवाद.

अंगूर >>> हा चित्रपट आणि 'दो दुणे चार' हे दोन्ही शेक्सपियरकृत The Comedy of Errors वरून घेतलेले आहेत.

२०२४ :
आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक आरोग्यपूर्ण शुभेच्छा !

Pages