पाहुणे येती घरा...!

Submitted by छन्दिफन्दि on 17 December, 2023 - 03:43

मिली चित्रपट आठवतोय का?
मिलीच्या वाढदिवसाला लोकं येताच राहतात, अन्न कमी पडते. मग जी काय गंमत होते...
असच काहीसं कधी कधी आपल्या घरी पण होत..
***
माझी बहिण आणि मी एकदम विरुद्ध स्वभावाच्या. माझ्या मोजक्याच मैत्रिणी तर तिचा कायमच मोठा जनसंपर्क.
लहानपणची ही एक गंमत..

माझ्या ठराविकच जवळच्या मैत्रिणी असल्यामुळे त्या काही न काही निमित्ताने घरी यायच्या.
पण मग एकदा आई तिला म्हणाली " तू एकदा तुझ्याही मैत्रीणीना घरी बोलावं."
ती म्हणे, " राहू दे, खूप आहेत, कोणाला वगळता नाही येणार. तुला नाही जमणार.."
"अशा खूप म्हणजे कितीशा असणार? बोलावं सगळ्यांना."

एका दुपारी शाळा लवकर सुटते त्या दिवशी बोलवायचे त्यांचे ठरले, मी काही तेव्हा घरी नव्हते. संध्याकाळी घरी आल्यावर मी विचारलं झाला का कार्यक्रम? आल्या जा सगळ्या?

आई हसायला लागली," अग आल्या म्हणजे? थोड्या थाडक्या नाही एकदम ३३ मुली आल्या होत्या. "
"३३? अरे बापरे! पण मग एव्हढ्या सगळ्या बसल्या कुठे ? "
३३ मुली एका वेळी आमच्या छोट्या घरात कशा मावल्या असतील माझ्या अल्पमतीला काही सुधरेना.

" कुठे म्हणजे? घरभर होत्या सगळीकडे... बर तर बर मी भेळ केली होती म्हणून पुरवठ्याला तरी आली. "

मी तर घरभर विखुरलेल्या त्या निळ्या गणवेशातल्या मुली कल्पूनपण खो खो हसायला लागले. आणि आम्ही दोघी हसतोय म्हंटल्यावर ती फुणफुणत " आधीच सांगितलं होतं..." निघून गेली.

ह्या धाग्यावर अशा पाहुण्यांच्या काही गमतीशीर आठवणी/ गोष्टी लिहू या..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users