नमो नमो .... एक अखंड गजर

Submitted by किंकर on 18 November, 2023 - 13:27

' नमो ' म्हटले कि तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. वाचण्यापूर्वीच तुम्हाला वाटेल आला आणखी एका नमो भक्तांचा लेख . पण येथे 'नमो नमो' हा भक्तीचा गजर नाही तर पोटोबाचा जागर आहे.

आणि हा लेख कोणा नमोभक्तानी लिहलेला नसून एका 'खाऊ' भक्तानी लिहिला आहे.

त्याचे असे झाले! प्रथम कोल्हापूर आणि नंतर पुणे या ठिकाणी वास्तव्य केल्यामुळे, खाण्याच्या बाबतीत - 'जगात भारी कोल्हापुरी' आणि मग 'पुणे तिथे काय उणे'
अशी माझी भावना होती. पण नंतर 'पोटासाठी भटकत अथवा दूरदेशी फिरेन, राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन .... ' या उक्तीनुसार भारत भर आणि नंतर परदेशी प्रवास व राहणे झाले, त्यामुळे अनेक विविध खाद्यसंस्कृतींचा परिचय झाला. पोटासाठी खाताना चवीने खाण्याचे भाग्य पण वाट्याला आले. जगातील विविध संस्कृती समजावून घेताना त्यामधले खाद्य संस्कृतीचे प्राधान्य आणि महत्व लक्षात आले.

आता आपण टीव्हीच्या माध्यमातून देशोदेशीचे खाद्यपदार्थ आणि खाद्यसफरी घरबसल्या पाहतो. असे कार्यक्रम पाहताना वाटते हा आनंद नेत्रांबरोबर जिव्हेला मिळाला तर ? त्याचा आनंद शब्दातीत होईल. पण मग लक्षात येते, जगभर फिरले तरी आपली वाटणारी घरची / गावची आवडती खाद्य ठिकाणे विसरताच येत नाहीत. कोल्हापूर सोडून पन्नास वर्षे, पुणे सोडून वीस वर्षे झाली तरी तेथील विविध आवडत्या डिशेस विसरत नाहीत. कोल्हापूर म्हणजे तांबडा पांढरा रस्सा, किंवा पुणे म्हणजे श्री ते भडाईत मिसळ असे विविध रोलर कोस्टर मनात नेहमीच रुंजी घालतात.

नुकतेच मी कुटुंबियांसह एका खाद्यसफरीला जाण्याचा आनंद अनुभवला. आणि हि सफर करायला कुठे दूर जावे लागले नाही. तर कॅलगरी कॅनडा असलेल्या 'नमो' या रेस्टॉरंटच्या नव्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा योग्य आला. उपक्रमाचे नाव होते 'अनंताय'!

'नमो' हा मूळ पुणेकर असलेल्या आणि त्रिखंडात फिरून खाद्य संस्कृती समजावून घेतलेल्या एका 'जाणत्या' शेफ श्री. आशिष दामले यांनी सुरु केलेला एक धाडसी उपक्रम. कॅलगरी येथे त्यांनी पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय खाद्य सेवा देणारे फ्युजन फूड (bistro) प्रकारचे ब्रेकफास्ट रेस्टॉरंट सुरु केले. त्याचे नाव 'नमो'!

आशिष यांना पूर्ण जाणीव आहे कि - Top chefs believe the way to every person's heart is through their stomach. त्यांना अन्नपूर्णेचे वरदान आहे आणि साथीला त्यांची सहचारिणी 'भक्ती' आहे. एक उत्तम फ्युजन क्विझिन देणारे रेस्टॉरंट म्हणून 'नमो' ने नाव कमावले आहे. नुकते सहा महिन्या पूर्वी त्यांनी - ' आमची कुठेही शाखा नाही ' हा अस्सल पुणेरी बाणा मोडून काढून दुसरी शाखा सुरु केली. या दोन्ही शाखा सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत फ्युजन फूड सर्व्ह करतात.

आणि आता 'अनंताय' या फाईन डाईनिंग एक्सपीरियन्स मधून आशिष अस्सल भारतीय खाद्य संस्कृतीचे दर्शन नव्या रूपात सादर करणार आहेत. पारंपरिक भारतीय पदार्थ वेगळ्या प्रकारे दाखवताना त्यांनी फ्युजन फूड एंजॉयेबल केले आहे. 'अनंताय' लोकसेवेत रुजू करण्यापूर्वी आशिष यांनी काही परिचितांना त्याचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले होते. त्याचबरोबर प्रत्येक डिश मध्ये किंवा ग्राहक सेवेमध्ये काही सूचना आहेत का याचीही विचारणा केली.

त्यावेळी आम्हाला भारतीय खाद्य संस्कृतीचा जो परिचय झाला, त्यातून आम्ही आमचे हरवलेले कोल्हापूर, पुणे नव्हे तर भारतातील ते सोनेरी दिवस परत मिळवले असेच आम्हास वाटले.

आपण त्यांच्या ' नमो कॅफे ब्रिस्ट्रो ' या संकेत स्थळावर भेट देऊन त्याच्या प्रवासाची माहिती घ्याच, पण जेंव्हा कॅलगरी कॅनडा येथे येणे होईल तेंव्हा या खाद्य संस्कृती ठिकाणचे नाव 'चुकवू नये असे काही' या सदरात नोंदवून ठेवा . आणि आपल्या मित्र परिवारासह या ठिकाणास भेट देऊन दूरदेशी स्वदेशी चवीचा लाभ जरूर घ्या.
कारण चवीने खाणार त्याला ' नमो 'देणार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दामलेंच्या धाडसास सलाम !
त्यांचा हा उद्योग यशस्वी होवो या सदिच्छा ! परिचय करून दिल्याबद्दल आभार. कॅनडाला इतक्यात जाईन असे काही वाटत नाही. पण भविष्य सांगता येत नाही. गेलोच तर नक्की भेट देईन.

रघू आचार्य - नमस्कार ,
आपल्या मनःपूर्वक प्रतिसादासाठी धन्यवाद .
आपल्या कॅनडा भेटीचा योग लवकरच येऊ दे

अरे हे तर आमच्या घराजवळील असलेल्या रेस्टॉरंट बद्दल लिहिले आहे. किती तरी वेळा इथून येणेजाणे होते. अगदी कालपरवा शेजारी असलेल्या पार्क मध्ये गेलो होतो. हे रेस्टॉरंट एका मराठी व्यक्तीचे आहे हे माहिती नव्हते. धन्यवाद ह्या माहिती बद्दल.

कॅल्गरी/ एडमंटनला आलो की नक्की भेट देईन. ओंटारिओत ही या त्यांना म्हणावं Happy
नमो वाचुन लेख उघडलाच न्हवता. Lol

नमो वाचुन लेख उघडलाच न्हवता.> +१.
पण याच कारणाने, अजुन एवढेच प्रतिसाद कसे अशी शंका आली आणि आता उघडला.

उपक्रम छान आहे.
पण कॅनडाला जाण्याची शक्यता नगण्य आहे.

कॅलगिरी, एडमंटन मधे चक्कर होईल तेव्हा जाण्याचा प्रयत्न करेन.

इंडो -चायनिज कॉम्बो खाण्याचा प्रकार आमच्याकडे सुरु केला होता, नंतर बंद झाला. Sad

नमो वाचुन लेख उघडलाच न्हवता.> +१.
पण याच कारणाने, अजुन एवढेच प्रतिसाद कसे अशी शंका आली आणि आता उघडला. Exactly

खूप छान उपक्रम

सर्वच प्रतिसाद देणाऱ्या मायबोलीकरांचे मनपूर्वक आभार . जेंव्हा शक्य होईल तेंव्हा श्री आशिष दामले आणि कुटूंबियांची ' पूर्णब्रह्म ' सेवा कशी आहे याचा प्रत्यक्ष लाभ आपण सर्वांनी जरूर घेणे .

मध्यलोक, नक्कीच. पण कॅनडात येणे होईल का शंकाच आहे.
पुढे काय होईल हे आपण कधीही सांगू शकत नसल्याने तसे लिहीले होते.

छान लेख छान ओळख
नमो नमो प्रतिसादांना +786
माझेही तसेच झाले.
पण त्यामुळेच आपले नमो नाही तर काय प्रकार म्हणत लेखाबद्दल कुतूहल सुद्धा वाढले Happy

अरेच्च्या चांगली संधी सोडली... वाईट वाटले चार महिने कॅलगरीत होतो तेव्हा काही दामलेंच्या उपक्रमाबद्दल माहीत नव्हते.... आता परत तिथे जाण्याची शक्यताही नाही असो!
नमो वाचुन लेख उघडलाच न्हवता.> +१.
जॅस्परलाही मराठी लोकांच एक हॉटेल आहे तिथे गेलो होतो.

मस्त उपक्रम आहे, कॅलगरीसोडून काही वर्षं झाली. मैत्रिणीकडून ऐकलं आहे. पुन्हा गेले (शक्यता आहेच) तर नक्की जाईन.
दसांना अनुमोदन.

पुन्हा एकदा सर्वांचे आभार ! दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ पासून सर्वांच्या साठी सुरु झालेली हि ' अनंताय ' हि भारतीय फ्युजन फूड ची संकल्पना वेगाने रुजू लागली आहे. पहिल्या आठवड्यातील प्रतिसाद उत्तम आहे , एकूण चव आणि सेवा यावर ग्राहक समाधानी आहेत . असा रिपोर्ट नुकताच मिळाला , उपक्रमास पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा !