भेट -भाग १

Submitted by केजो on 1 November, 2023 - 02:38

पहिल्यांदाच दीर्घकथा लिहिण्याचा प्रयत्न करतेय, चूकभूल माफ असावी. ह्या कथेतली पात्र खरी की कल्पनाविश्वातली, ह्याचा फारसा खोलात जाऊन विचार करू नका. ही पात्रं आपल्या आजू-बाजूला सर्वत्र सापडतील, म्हणूनच मला त्यांना नावंही द्यावीशी वाटली नाही. ही गोष्ट आहे त्याची आणि तिची! काळाच्या ओघात हरवलेल्या अव्यक्त प्रेमाची, मैत्रीची, आणि "ती सध्या काय करते?" ह्यासारख्या सिनेमाला आठवून स्वतःच्या तरुणपणीचा काळ आठवणाऱ्या सगळ्यांचीच.

#दीर्घकथा भेट भाग १
"ह्या शुक्रवारी काय करतोयस?"
"काही विशेष नाही, बोल काय प्लॅन आहे?"
"भेटायचं का?"
"आलीस का पुण्यात? टाक ना ग्रुपवर, बघूया कोण-कोण आहे अव्हेलेबल..."
"बराच वेळ काहीतरी type करतेयस पण काहीच मेसेज नाही, कुठे अडकलीस?"
आता ह्याला कसं सांगू की ग्रुपला नाही तुला भेटायचंय एकटं. इतक्या वर्षांचं साठलेलं कधीतरी बाहेर यायला हवंय. मोकळं व्हायचंय.
"ए बाई, बोल ना. कामं आहेत मला, एवढी फॉर्मॅलिटी तुला कधीपासून लागायला लागली. विचार करून बोलणं शोभत नाही हं तुला Happy "
"अरे काही नाही लिहीत होते तेवढ्यात मुलगा आला. मी रविवारीच आलेय. बरं तू फ्री आहेस का ते सांग शुक्रवारी, ग्रुपचं नंतर बघू."
"मला काय, मी सदैव जनहितमध्ये हाजीर आहे! कुठे आणि किती वाजता भेटायचं ते सांगा, मी येईन."
"शाब्बास! शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पाषाण!"
"ठीक आहे, तुला साडे सहाला पीक करतो. वेळेवर ये!"
"अरे मी येईन की, कशाला पिकअप साठी उलटं येतोस?"
"गप बस, वेळेवर खाली उतर. चल, बायको नारळ घेऊन उभी आहे. खोवून नाही दिला तर आज इडल्या चटणीशिवाय खायला लागतील."
"ओके, बाय."
हम्म प्रत्येक वेळी बायकोचं गुणगान करायला काही थकत नाही हा. आता ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही हे ठरवलयेस ना, सोडून द्यायचं. तिनं स्वतःलाच दटावलं.
आठवड्याच्या गडबडीत त्यानी पुन्हा ग्रुपवर भेटण्याचा विषय काढला नाही, आणि तिलाही बरंच वाटलं. पण हा भेटतोय की नाही ह्याची खात्री नव्हती. शेवटी न राहवून शुक्रवारी सकाळी तिनी पिंग केलंच.
"पिंग"
" पॉंग"
"भेटतोयेस ना आज?"
"अर्रे हो, आज भेटायचं ठरलंय ना. कोण कोण येतंय? ग्रुपवर नाही बोललीस का? कुठे जायचंय जेवायला?"
"भेटलो की ठरवू ना. ग्रुपवर कोणाला बोलले नाहीये."
तो जरा शांत झाला. ते दोघं तसे शाळेपासूनच एकमेकांना ओळखायचे. मध्ये कित्येक वर्ष काहीच संबंध नव्हता. मग ऑर्कुटमुळे थोडंफार कळलं शाळेनंतर कोणी काय केलं, पण त्यानंतरही फारसं काही बोलणं नाही व्हयायचं. काही वर्षांनी आलं व्हाट्सअँप. मग कुठून कुठून नंबर्स मिळवून शाळेच्या गँगचा ग्रुप झाला. अधून मधून भेटणं व्हायचं पण सगळा ग्रुप मिळूनच. कधी फक्त मुलं भेटायची "बसायला" तर मुली त्यांची पोरा-बाळांसकट ट्रिप काढायच्या जवळच्या एखाद्या रिसॉर्टमध्ये. ग्रुपमध्ये भेटणं झालं तरी नाही म्हंटलं तरी त्यातही गट पडायचेच. त्यातून तुकड्या वेगळ्या असलेली काही मंडळी एकमेकांना अजूनही पूर्ण सामावून घेत नव्हती. त्याच्याही मनात आठवीत "ब" तुकडीत घातल्याचा राग होताच. एकदा विचार करायला लागलं की मन कुठच्याकुठे भरकटत जातं. तर ही आज एकटीच भेटणार की काय? असं डायरेक्ट कसं विचारू? पण एकटीलाच भेटलो तर घरी बायकोला काय सांगू? ती उगाच संशय घेत बसेल. पण मामला वेगळा दिसतोय खरा. ह्या आधी कधी आम्ही दोघेच भेटलो नाहीये. माझ्या मनातली खळबळ हिलाही जाणवली असेल का कधी? किती वेळा मनात आलं की, एकदा तरी आयुष्यात मन मोकळं करावं. पण त्याचे परिणाम काय होतील? आहे ती मैत्रीही संपुष्टात येईल, व्यभिचार तर नाही हा- ह्यावर मनाला लगाम घालणंच इष्ट! ह्या विचारांनी कधी स्वतःचं मन स्वतःकडेही व्यक्त होऊ दिलं नाही. तिच्या मनातही माझ्यासारखेच वेडे विचार येत असतील का कधी? असो, भेटल्याशिवाय कळणार नाही.
"काय रे, आहेस का?"
"हो, भेटू संध्याकाळी. साडेसहाला तयार राहा."
"अरे तू पण ना, येईन ना मी डायरेक्ट पाषाणला."
"मी येतोय सांगितलं ना? बरं चल, बाय फॉर नाऊ."
"बाय…"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात आवडली. लवकर लवकर नविन भाग टाका आणि कथा पुर्ण करा.
काही नकारात्मक प्रतिसाद आले किंवा प्रतिसादच आले नाहीत म्हणून कथा डिलीट किंवा अपूर्ण ठेवू नका ( या कारणांमुळे क्रमशः कथा वाचाव्याश्या वाटत नाहीत)
राग आला तर माफ करा पण हल्ली मनासारखे प्रतिसाद मिळाले नाहीत तर कथालेखकाने कथाच डिलीट करण्याचे प्रकार माबोवर वाढले आहेत.

तुमच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. वाचकांचे प्रतिसाद आले की लिहायला आणखीनच हुरूप येतो, हे तुमच्या शिवाय दुसऱ्या कोणाला कळणार. काही आवडलं, नाही आवडलं तर आवर्जून सांगा.
रोज एक भाग येत जाईल, एका आठवड्यात संपेल कथा, वाचत राहा, कळवत राहा.