
आमची दिवाळी ३ plots वर होत असे.
एक गावाला, बिनाफटाके बिनारोषणाई बिनामित्रमंडळींची दिवाळी. आमची अगदी नावडतीच म्हणा ना! एखाद् दोन दिवळीचं तिकडे गेलो असू. म्हणजे आम्हाला ( मी आणि बहीण) गणपती गावाला अगदी साग्रसंगीत आवडे पण दिवाळीची मजा मात्र शहरातच येई, ठाण्याला आणि आजोळी पनवेलला.
सहामाही संपल्यावर लगेच बेत ठरत किल्ला करायचे. प्लास्टिकचे, मातीचे मावळे, दगड माती जमवाजमव करायची. दोन गट, त्यात आमचा मुलींची मेजोरटी वाला एक गट. बाजुच्या बिल्डिंग मधला मोठ्या मुलांचा दुसरा. त्यांचा किल्ला फारच दिमाखदार होई, पण आमचा जेमतेम उभा राहिलेला किल्ला कधीतरी रात्री-पहाटे ती (दुष्ट) मुलं सुतळी बॉम्ब लावून फोडून टाकत. अनुषंगाने मग थोडी भांडाभांडी, कावाकावी.
तेव्हा फटाक्यांचे भारी महत्व.
आधीच्या वर्षीचे फटाके चुकुन जर कोणाचे राहीलेले असतील तर ते उन्हात ठेवायला बाहेर निघत. फुलबाज्या, तडतडी, भुईनळे, भुईचक्र, बाण, लवंगी माळ, लक्ष्मीबार, ताजमहाल, सुतळी (अटॉम्) बॉम्ब (तो मात्र आम्ही नाही फोडला कधी) सगळी सामग्री जमा होई.
घराघरांतून बेसनाचे लाडू, चकल्या यांचे खमंग सुवास दरवळू लागे.
इकडे आमचे चार दिवसांचे नवीन कपडे, साड्या हे प्लानिंग सुरू होई. आकाश कंदील, पणत्या, उटणे, कार्टूं सगळं कसं एकदम व्यवस्थित.
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकरात लवकर उठायचं. पहिला फटाका कोण फोडतो ही एक छुपी स्पर्धा. तो तर पहाटे चारलाच शत्रू पक्षातील मुलं फोडत हे सांगणे न लगे. मुंबई-ठाण्याकडे हेच थोडे दिवस काय तो गारवा! उटणे वगैरे लावून कार्टं फोडून मोती साबणाने अभ्यंगस्नान उरकायचे. (किशोर वयात) साडी नेसून छान तयार व्हायचं. तोपर्यंत साडेसहा सात वाजत. मग सगळ्या मुली आम्ही कौपिनेश्वराला जायचो. कौपिनेश्वर मंदिर, तलाव पाळी, घंटाळी मंदिर छान सजून धजून आलेल्या तरुणाईने फुललेलं असे. (कोण किती भक्ती भावाने कुठल्या देवी देवतांच दर्शन घेई हे चाणाक्षांच्या लक्षात आलचं असेल) मग तळ्याला एक राऊंड मारायची, सागरकडे पावभाजी चापायची साडेआठ नऊ पर्यंत घरी.
घरी गेल्यावर सहाजिकच फराळाचा आग्रह होई तो यशस्वीपणे मोडून काढण्यात येई. कारण आई बनवत असताना लाडू, चिवडा, चकल्यांचे बोकाणे भरलेलेच असत. त्यामुळे नाविन्य संपलेलं असे.
सात वाजता अंधार पडला की फटाक्यांना सुरूवात होई. सुती साधे कपडे घालून फटाके फोडायचे. फटाक्यांची वात काढायची, उदबत्ती घेऊन हात जास्तीत जास्त ताणून फटाक्याला लावायची. वातीची सुरसूर झाली, एखाद् ठिणगी पेटली की सुसाट पळायचं कानात बोटं घालून "फट्फट्.." फुटत असलेला फटाका बघायचा. झाड हातावर नाही ना येत आहे, भुईचक्राचं टोक आपल्या कडे तर नाही ना सगळं भान ठेवावे लागे. तरी घोळ होतंच, जसं बाणाची दिशा चुकून कधी कोणाच्या गॅलरीतच घुसे. मग परत आरडाओरडा. दुसऱ्या दिवशी आदल्या रात्री न फुटलेले फटाके गोळा करायचे आणि ते फोडायचे.
आता त्याच वयाची भाचे मंडळी पोक्तपणे प्रदूषण होतं म्हणून फटाके नाही वाजवायचे म्हणतात तेव्हा त्यांच्या समूजदार पणाच कौतुक वाटतं पण काही अंशी आपणच हि परिस्थिती तर नाही ना ओढवून आणली ह्या जाणिवेने अस्वस्थ होतं
आमच्या घरी रांगोळी डिपार्टमेंट आईकडे! ती तीन चार तास खपून फार सुंदर गालिचासारखी रांगोळी काढे.
लक्ष्मी पूजनाला आमचा दौरा आजोळी पनवेलला!
तेथे लक्ष्मी पूजन दणक्यात होई. आजीचा हात भारी सढळ. पूर्वी पोस्टमन तेलाचे मोठे चौकोनी डबे असतं, तिच्याकडे तसे रंगवलेले डबे होते. ते भरून ती चिवडा, चकल्या, करंज्या करत असे. साजुक तुपात थबथबलेले बेसनाचे खमंग लाडू ही तर तिची स्पेशालिटी होती. दुपारी जेवणे आटोपली की ती मोठ्या कढईत ओट्यावर बसून मंद आचेवर बेसन भाजत बसे. आता वाट्या मोजून बेसन (लाडू) भाजताना हात भरुन आला की तिची हमखास आठवण येते. "इतके डबा भरुन लाडू करायला तिचे हात किती दुखत असतील?"
मी जेवढा फराळ बनवते त्यांच्या पटींनी ती वाटत असे.
असो! ते आजोळचं टुमदार बंगला वजा घर होतं. दोन मोठे थाळे भरुन मातीच्या (40-50) पणत्या तयार असत. दिवेलागणीला अंगणातल्या तुळशीला एक पणती ठेवायची आणि एकेक करून घराच्या कंपाऊंडच्या भिंतीवर दिव्याची आवली तयार व्हायची. रात्रीच्या त्या गडद अंधारातील मिणमिणत्या तरीही तेजस्वी पणत्यांची ती आरास म्हणजे दिपावलीचं सात्विक रुपच जणू, अजुनही दरवर्षी डोळ्यासमोर तरळतं.
आज ते अप्रूप वाटतंय आणि तेव्हाही आवडत होतं. मधल्या शिंग फुटांयच्या काळात त्यावरुन झालेली (किंवा मी उकरुन काढलेली) नोकझोकही हटकून आठवते.
"अग आजी साजुक तूपाचा दिवा का लावतेस? आणि येवढ्या पणत्या, ते ही रिफाईंड तेलात? "
"अग पण काय देवालाच करत्ये ना?"
माझी मुक्ताफळं, " मग ते गरीबाला दे, देव माणसात असतो."
"माझं झालंय तसं करुन. आता हे देवाचंच आहे."
एकदम मान्य अडल्या नडल्याला ती करायची पण तितक्याच सढळपणे.
मग मात्र पाडवा,भाऊबीज कधी ठाण्याला कधी आजोळी करत पार पडे.
तर एकंदर दिवाळीला आमची जबाबदारी पुस्तकांचा फडशा पाडणे, फराळ करणे ( म्हणजे आईने बनवलेला संपविणे), लहानपणी किल्ला करणे तर मोठेपणी शॉपिंग करणे, नटणे मुरडणे, मैत्रीणी बरोबर भटकणे. आणि हे अगदी कॉलेजच नव्हे तर नोकरी , लग्न करेपर्यंत असंच चालू राहिलं.
माझं लग्न ठरलेलं, ऑफिस मधून डायरेक्ट सासरी फराळाला गेले. सासूबाईंनी विचारलं," काय गं आई दिवाळीचं सगळं घरी करते?" " हो, पण सगळं नाही. लाडू, करंजी, चिवडा आणि चकल्या एवढंच करते." ( इकडे माझ्या डोक्यात चिरोटे, कडबोळी, शंकरपाळी झालंच तर शेव पिंगा घालत होते)
"पण मग झालं की सगळंच. एकटी करते सगळं?"
आता मात्र मनातल्या मनात खजील झाले. येवढ्या वर्षांत आईला आपण फराळात (संपवण्या पलीकडे) काहीच मदत केली नाही ही टोचणी लागली.
आणि दरवर्षी ती टोचते.
दरवर्षी दिवाळीच्या तयारीला लागताना मनाला स्पर्शून जाणाऱ्या ह्या गोष्टी यावर्षी मात्र लिहून काढल्या. तुम्हाला पण आठवतायत का दरवर्षीच्या तुमच्या गोष्टी ?
****
हा लेख दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा प्रकाशित केलेला.
प्रतिसादात फटाक्यांची आतषबाजी
प्रतिसादात फटाक्यांची आतषबाजी आणि मुक्त रोषणाई होणार !
छान लेख छान आठवणी !
छान लेख छान आठवणी !
दिवाळीच्या आठवणी लिहायच्या तर काय लिहू आणि काय नाही असे होऊन जाईल
छान लेख
छान लेख
छान.
छान.
पहिले खरेच घर भरलेली असायची
पहिले खरेच घर भरलेली असायची खूप मजा यायची.
दिवाळी असू किंवा कोणताही सण जोशात.
प्रतेक घरात तीनचार पोर असायची.
नातेवाईक लोकांशी प्रेमाचे संबंध असायचे .
त्या मुळे सण मध्ये सहभागी खूप लोक असायची...
आता घर च ओसाड पडली आहेत.
करोडपती आहेत पण शेजारचा पण ओळखत नाही.
घरात एक मुल ते पण अती लाडवलेल.
घराचे घर पण संपले आहे.
नवरा बायको मध्ये एक मत नसते.
सर्व च एकटे पडले आहेत.
सण तेच आहेत पण तो वीस तीस वर्षे पूर्वीचा चार्म नाही.
दिवाळी फराळ पण बाहेरून विकत घेणारी लोक काय सण साजरे करणार
हो सर त्यात मोबाईलला ही घ्या
हो सर त्यात मोबाईलला ही घ्या नाती केवळ ऑनलाइन राहिली आहेत, शुभेच्छा दिल्या की झालं ,प्रत्यक्ष भेट घेणं वगैरे नाहीच, सगळं औपचारिक झालंय. पूर्वी कुणाच्या घरातला फराळ करताना कुठल्या घरातील मुलं खाऊन येतायत हेही समजायचं नाही ,करतानाच मुलं फराळ इतका खायची की जेवायची देखील नाहीत.घरांची दारं सणासुदीला नव्हे तर कायम उघडी.
लेख छान आहे.
रुन्मेष लिही रे बऱ्याच दिवसात तुझा धागा नाही आला ,तुझे आठवणींचे धागे बरे असतात .
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद!
छान लेख.
छान लेख.
बरंच रिलेट झालं. आईला मदत करायचे. आमच्यावेळी फडके रोडला मैत्रिणींनी भेटायचं वगैरे नव्हतं त्यामुळे फराळ घेऊन जवळच्या विठोबाच्या देवळात जायचं, मग घरी येऊन फराळ खायचा असं होतं. आता फडके रोड एकदम फेमस.
दिवाळीत पहाटे फटाके फोडण्यात आम्ही पुढे असायचो, डोंबिवलीत बऱ्यापैकी लवकर उठतात, फटाके वाजवतात, नालासोपारा इथे मी सोसायटीत खाली फटाके वाजवायचे तेव्हा सगळे गाढ झोपलेले असायचे. बॉम्ब वगैरे फोडायचे, आता मागे वळून पाहताना माझं चुकत होतं असं वाटत. आता पाऊस, भुईचक्र जास्त आवडतात. बॉम्ब नको वाटतात.
धन्यवाद अन्जु
धन्यवाद अन्जु
...
...
माझं ही बालपण फार सुखद होते.
माझं ही बालपण फार सुखद होते. विशेषतः उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी - म्हणजे खूप स्वर्गिय मजा असे. दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की पहील्या २ दिवसात गृहपाठ करुन टाकत असू. मग मात्र रोज आई १० ओळींचे शुद्धलेखन घालत असे तेवढेच काय ते.

आमच्या कॅन्टॉन्मेन्ट एरियात टेकडी होती. पहाटे त्या टेकडीवर चढून मॉर्निन्ग वॉक घेउन परत येणे, दुपारी कॅरम, सागरगोटे, पत्ते, व्यापार असे बैठे खेळे तर संध्याकाळी लक्षावधी मैदानी खेळ - लंगडी, लगोरी, डबा ऐस पैस, लंडन-लंडन=लंडन, कटिंग द केक, जोड साखळी, झोके, सीसॉ जंगलजिम, घसरगगुंडी, क्रिकेट, लपंडाव, टिपरीपाणी.
फटाके म्हणाल तर नरक चतुर्दशीला लवकर उठुन, आंघोळ करुन वगैरे फटाके मग मॉर्निंग वॉक मग फराळ, दुपारी दिवाळी अंक. संध्याकाळी आतशबाजीचे फटाके. त्यात बाण कोणाच्या घरात घुसला की झालं. रात्री थंडीत, आम्ही मुले शेकोटी करु. फटाक्यातली दारु एका कागदावर गोळा करुन, त्या शेकोटीत टाकणे मग तो जाळ भस्सकन असा अंगावर आल्यावर पळापळ. टिकल्या हाताने फोडणे, काही दीडशाहाणी मुलं लवंगी हातात फोडत. डब्याखाली सुतळी बॉम्ब लावणे, आपटबार वगैरे. मग आईबाबांनी हाक मारली की रात्री कुरबुरत घरी जात असू. दिवस संपे
नवे कपडे, उटणे. नव्या कपड्यांचे अप्रुप असे तेव्हा. एकमेकांकडे ताटे पोचविणे. अरे हो! आम्ही किल्ला करायचो. दगड रचून त्यावर पोते टाकायचे मग त्या ओबडधोबड आकारावर माती लिंपायची. माची वगैरे, गडाखाली विगडा, शणे-मोहरी रुजवुन त्या गडाला हरित बनविणे
मी तर आता काहीच करत नाही पण
मी तर आता काहीच करत नाही पण पाव किलो चकली करताना माझी वाट लागायची जेव्हा करत असे तेव्हा.
माझी आई ऑफीसवरून येवुन जेवण आटपुन , ३ किलो चकल्या एका रात्रीत करे. बाबा चकल्या पाडत जर घरी असले तर कारण त्याची रात्रपाळी सुद्धा असे कधी कधी.
आई कधीही आवडीनेच करे, कोणाच्याही प्रेशर खाली नसे.
आजही ती म्हणत होती , करुया का करंजी तरी घरची? आई: मी तळेन.
मी भडकले , की मला होत नाही. आणि तुला किलो किलोच्या करुन वाटत बसायचे असते. मला झेपत नाही ती कापणी/तळणी.
करंजी तर ४ किलोच्या करी आणि वाणात प्रत्येक गोष्ट ४- ४ देइ आणि मला त्या ताटल्या बिल्डिंगमध्ये वाटायचे काम आणि बाबांना मोठे डबे नातेवाईकात वाटायचे काम. आई इतकं नीट आणि भरून तरी कोण ताटं देत नसत पुण्यात तरी. पेपरात एक करंजी, चकली देणारे लोकं पाहिलीत कंजुष.
मला तर राग यायचा, ४-४ देइ नकोस , मला मिळणार नाही खायला( मा़झी बालबुद्धी).
नंतर मला वाईट वाटले तिला बडबडल्याने. पण तिचीही तब्येत यथातथा असताना कशाला करा खटाटोप. आराम करणे काही जमतच नाही तिला.
असो.
मॉर्निन्ग वॉक घेउन परत येणे,
मॉर्निन्ग वॉक घेउन परत येणे, दुपारी कॅरम, सागरगोटे, पत्ते, व्यापार असे बैठे खेळे तर संध्याकाळी लक्षावधी मैदानी खेळ - लंगडी, लगोरी, डबा ऐस पैस,>> अगदी !
फक्त आम्ही तळ्यावर जायचो. दुपारी पत्ते - not at home सकाळी खेळायला बसलो तर ४ एक तास पण चालायचा... आणि नाव व्यापार पण हे दिवाळी specific nahi म्हणून टाकलं नव्हतं. आणि एक खेळ.म्हणजे व्यापार तोही काही तास चालायचा.
काही ठिकाणी सोसायटी/ चाळी/ कॉलनीत मुलं एकाच रंगाचे / पद्धतीचे आकाशकंदील करायचे.. म्हणजे सगळ्यांच्या घरी सारखे आकाशकंदील.
आम्ही १-२ वेळाच आकाशकंदील घरी बनवलेला.. एकदा षटकोनी आणि एकदा करंज्यांचा..
काही जण सोसायटीचा खूप मोठा आकाशकंदील करायचे..
झंपी तुमच्या आईला साष्टांग
झंपी तुमच्या आईला साष्टांग दंडवत
ऑफिसमधून येऊन रात्री ३ किलोच्या चकल्या ..??
माझी मजल तुमच्यासारखीच .. पाव अर्धा जास्तीत जास्त १ किलो.
चकल्या नाहीतच.. एकदा आईकडून शिकावे म्हणून करायला घेतल्या. किती वेळ लागतो तळायला.. तेव्हा पासून कानाला खडा.
एव्हढ्या खपून केलेल्या सगळ्या वाटून टाकायच्या...
पण त्यावेळी तसं चालेच..
आजीच्या वाटपापेक्षा आईचे थोडे आटोक्यात आमचं तर एकदमच छाटछूट
ऑफिसमधून येऊन रात्री ३
ऑफिसमधून येऊन रात्री ३ किलोच्या चकल्या ..??..... बापरे,ग्रेट!
आईचा स्वभाव आहे. ‘डोक्यात
आईचा स्वभाव आहे. ‘डोक्यात “काम” करतो असा विचार न करता करत जायचे. आपल्या माणसांसाठीच करतो सणवाराला. खुप काम आहे असा विचार केला की, मग ते होत नाही.’
माझी कैक भांडणं का वैचारीक वाद झालेत ह्या तिच्या वाक्यावर.
वाक्य मलाच असायची कॉलेजच्या वयात.
दुसरे तिचे वाक्य, “त्यात काय, उभ्या उभ्या करून आवरायचे. “
मी इतकी वैतागायचे हे एकले की.
एकदा रात्रीचे दोन वाजले करंज्या करताना. आणि आईचं आपलं संपतच नाही. “इतकच राहिलय, करुया की.”
मला आलेला कंटाळा. आणि तिचं ते वाक्य आलं, “ काम करतोय असा विचार करु नकोस”.
मी रागात उठले आणि चालु पडले ‘तुच कर मग एकटी‘. १७-१८ वयात बंडखोरी असतेच.
नंतर मला बेडरूममध्ये अर्थात झोप लागलीच नाही. कारण आई एकटीच बिचारी पहाटे ३ पर्यंत आवरत होती. नशीब दुसर्या दिवशी रविवार होता.
पण इतर दिवशी तिला दुसर्या दिवशी ऑफीसला जायचे असूनही, रात्री १२- १ पर्यंत चकल्या तळ, चिवडे कर चालायचचं. असे होते ते दिवस. म्हणून तिला अगदी ह्या वयात एकतरी पदार्थ घरी करायचाच असतो. मला काहीही आवड नाही. मी गोड खात नाही आणि आईला घरचा फराळ वाटायचा असतो सगळ्यांना. मी म्हटलं, देतेस ना बाहेरची मिठाई आणून मग बस ना आराम कर.
माझं म्हणणं, काय साध्य होतं इतकं खपुन? आणि तब्येत तर इतकी खराब केलीय तिने अश्या जागरणांनी.
बरं आजकाल ना कोणाला इतका आदर, प्रेम , आपुलकी किंवा कौतुक नाही घरचा फराळ पाठवला म्हणून. मग कशाला करा किलो-किलोचा?
छंदीफंदी, धन्यवाद , त्या गोड भांडणांची आठवण आली ह्या लेखाने.
दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना!!
झंपी तुमची पोस्ट आणि आईबरोबर
झंपी तुमची पोस्ट आणि आईबरोबर चे भांडण वाचताना मला आमची नोकझोक ही आठवली
आठ आठ दिवस आई त्या फराळा मागे असते.
मला वाटते दोन दिवसात जेवढे होईल तेव्हढे केले की पुरे.
पण माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्या असे अजूनही वाटायला भरमसाठ करतात.
तुम्ही म्हणता तसा तो चिकटपणा / चिकाटी बघून आपल्याला कंटाळा येतो पण ह्यांना करून कसा कंटाळा येत नाही.
बरं आजकाल ना कोणाला इतका आदर, प्रेम , आपुलकी किंवा कौतुक नाही घरचा फराळ पाठवला म्हणून. मग कशाला करा किलो-किलोचा? >> खरं आहे.. अशा प्रकारे घाऊक सरसकट सगळ्यांना द्यायला रबर नयेच
पण बऱ्याच लोकांना असत कौतुक.. म्हणजे मला कोणी काही करून आठवणीने पाठवलं तर मला छान वाटतं किंवा मी पण कधी कधी विशेष म्हणून कुणासाठी काही करू बघते / त्यांना पाठवते.
ह्या निमित्ताने आज्या/ आत्या/ मावश्या / काकू ह्यांच्या हातचे त्यांचे असे खास पदार्थ आठवले.
माझी आई दिवाळीत पाच पदार्थ
माझी आई दिवाळीत पाच पदार्थ तरी हवेच म्हणत सगळे करायची. करंज्यांचा मोठा बोवाळ असायचा, त्यासाठी मात्र कोणीतरी शेजारीण यायची मदतीला. मजल्यावरच्या काकवा व माम्या आपापसात ठरवायच्या कोणी कुठल्या दिवशी करंज्या करायच्या आणि तसे सगळ्या घरी मॅनेज व्हायचे. करंज्या कायम छोटी तिन चार फुटी स्टिलची पिंपे भरतील इतक्या व्हायच्या
ह्या असल्या कंडिशनिंगमुळे लग्नानंतर सासरी फराळ विकत आणलेला पाहिला तेव्हा धक्काच बसला. तो धक्का यासाठी बसलेला की विकत आणलेला इवलुसा फराळ प्रत्येकजण
दुसर्या वर्षी मी सासरी जाहिर केले की तुम्हाला जे विकत आणायचे ते आणा, मी मात्र सगळे घरी करणार. नंतर कित्येक वर्षे मी दिवाळीत भरपुर फराळ बनवायचे, कमीत कमी पाच पदार्थ तरी हवेच हा नियम तोडु शकले नाही इतके कंडिशनिंग झाले होते. घरात खाणारे भरपुर होते, वाटायला व ऑफिसात न्यायलाही भरपुर फराळ खर्ची पडायचा.
पोट फुटेपर्यंत खाणार कसा ???
आता उत्साहही ओसरला आणि खावेसेही वाटत नाही. यंदा अजुन खरेदीही केलेली नाही
बालपणीच्या दिवाळीच्या रम्य आठवणी आहेत. तो काळ आता गेला. आता वर्षभर दिवाळी. ती असोशी राहिली नाही.
विकत आणलेला इवलुसा फराळ
विकत आणलेला इवलुसा फराळ प्रत्येकजण
मस्त..
पोट फुटेपर्यंत खाणार कसा ??? Happy दुसर्या वर्षी मी सासरी जाहिर केले की तुम्हाला जे विकत आणायचे ते आणा, मी मात्र सगळे घरी करणार.>>>
छोटी तिन चार फुटी स्टिलची पिंपे भरतील इतक्या व्हायच्या >>> ही आजीची पद्धत
आता वर्षभर दिवाळी. ती असोशी राहिली नाही >> पटलं.
सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती/ उरक वाचायला मजा येतेय!
मला मुळातच स्वंयपाकाची आवड
मला मुळातच स्वंयपाकाची आवड नाही पण कैक वर्षे ह्याच मानसिक कंडिंशनिंग(की फराळ घरचाच हवा, देवाला नेवेद्या बाहेरचा असु नये वगैरे) मी करायचा प्रयत्न केला. पण एकटीने करायचा सोस काही टिकला नाही.
हे सर्व तीच करु शकते.
करंजी वगैरे तर साठ्याच्याच लागतात आईला. नाहितर मजा नाही असे आई म्हणते.
जबाबदारी नसलेले जुने दिवस होते पण छान होते. मस्त येता जाता घरच्या शेव, चकलीचा बकाणा. मध्येच चिवडा, मग करंजी, मूगाचा लाडु, बेसनाचा लाडु, रव्याचा लाडु, बोरं, चिरोटे, अनारसे, नानकटाई. गोडाची आवड कमी असली तरी आईसारखी करंजी आणि सर्व प्रकारचे लाडू फक्त आईच्याच हातचे खाते.
बाकी घरच्या कामवाल्या बाया, वॉचमन, पोस्टमन, कचरेवाला ह्यांना बाहेरची मिठाई आणि पैसे देते. कपडे वगैरे द्यायची आधी पण रंग पसंत नाही म्हणून दोन तीन बायांनी तक्रार केली. म्हटलं घ्या पैसे आणि तुम्हीच तुमचं घ्या, माझ्या डोक्याला कमी त्रास,
नानकटाईला तर नंबर लावून यायला लागायचा भट्टीत , ते काम माझं. आई पाच किलोची नानकटाई करायची आणि गावापासून वाटायची.
१०-१२ प्रकार करायची आई. ते सुद्धा दररोज रात्री जेवणं आटपली की. त्या आधी मोठे डबे धुवून वालवून घ्यायचे.
मी मस्त खजुराच्या मिठाया , बंगाली , गुजराती प्रकार ऑरडर करते आणि ठेवते पुढ्यात कोणी आलच तर.
बाहेरचा आपला महाराश्ट्रीयन फराळ बर्याचदा खराब निघाला.
गोडबोले म्हणा का देशपांडे का इतर विक्रेते.. करंजी खुळखुळा. खोबरं खवट, चकली नुस्तीच कडक आणि तिखट. शेव करपलेली.... बंदच केला मग.
चितळे एकदम बंडल. ढिगभर साखर चिवड्यात नी कशातही.
ज्यास्त स्ट्रेस नाही डोक्याला डबा भरायचा.
फराळ चर्चा छान. बरेच बाबतीत
फराळ चर्चा छान. बरेच बाबतीत अगदी अगदी झाले.
आमच्याकडे सुद्धा किमान पाच पदार्थ नियम होता. आज्जीला जमत होते तोपर्यंत ठीक. नंतर आईला जॉब आणि घरची कामे सांभाळून (जे पुरुषप्रधान संस्कृतीमुळे फार कोणाची मदत नाही) फराळ भारी पडायचा.
त्यात आमच्याकडे वडिलांच्या पिढीत आठ भावंडे आईकडे पाच.. अपवाद वगळता सारे एकमेकांना फराळ पाठवायचे. त्यात आम्ही चाळीत राहणारे. जिथे शेजारधर्म फार मोठ्या प्रमाणात जपत कित्येक घरे एकमेकाकडे फराळ पाठवायचे. त्यामुळे आईचा फराळ दिवाळी आधीपासून आणि दिवाळी झाल्यावरही चालूच राहायचा. माझी मदत शेव चकली करायला. आज असे वाटते आणखीही कश्याला करता आली असती...
पहिल्या दिवशी सगळ्या व्हरायटी किमान पाच घरचे पदार्थ असायचेच असे नाही. कधीतरी मग शेव किंवा चिवडा किंवा मिठाई यातले काही विकत आणून पहिल्या दिवसाचे फराळाचे ताट भरले जायचे. पहिला फराळ आधी घरातल्या सर्वांनी एकत्र बसून करायचा. मग आम्ही चाळीतली मुले आलटून पालटून एकेकाच्या घरी ग्रूपने जाऊन फराळ करायचो. एकूणच प्रत्येकजण पूर्ण दिवाळीत घरचा फराळ १० टक्के आणि इतर घरचा ९० टक्के खायचा. आणि मला प्रत्येक घरच्या चकलीची चव पाठ होती. दिवाळीची मजा यातच असायची. किंबहुना मुंबईत जिथे राहायचो तिथे सण सार्वजनिक झाल्याशिवाय मजा यायची नाही. मग तो कुठलाही सण असो. यावर काही लिहायचे प्रत्येक सणाला आठवते. बघूया कधी मुहूर्त मिळतो
प्रत्येकजण पूर्ण दिवाळीत घरचा
प्रत्येकजण पूर्ण दिवाळीत घरचा फराळ १० टक्के आणि इतर घरचा ९० टक्के खायचा. >>
मला आठवतंय आणि वरती साधना ह्यांनी लिहिलंय tyapra.आणि aya लोकांना एकमेकींची चकली चाखायची असायची... ती बहुदा मुख्य परीक्षा असे.. त्यात मग यावेळी हे जरा चुकले च वगैरे चर्चा होई.
किंबहुना मुंबईत जिथे राहायचो तिथे सण सार्वजनिक झाल्याशिवाय मजा यायची नाही. मग तो कुठलाही सण असो.>>
वाचल्यावर जाणवलं की खरं आहे.
दसरा, संक्रांत, होळी, भोंडला( नवरात्र) प्रत्येक सणाला काही देवाण घेवाण होई, एकमेकांच्या घरी जाणे होई. (गणपतीलाही तसे होत असेलच.)
मुख्य म्हणजे दिवाळीचे कपडे खरेदी सोडली तर फार खर्चिकही काही होत नसे..तरीही खूप आनंददायी असत.
फराळाविषयी..
करंजी करायला मदत लागे.. कारण ते घट्ट पीठ कुटून घ्यावे लागे.
शिवाय, लाटणे, भरणे, आणि तळणे इतक्या कृती असत.
कामवाल्या बाया, वॉचमन,
कामवाल्या बाया, वॉचमन, पोस्टमन, कचरेवाला ह्यांना बाहेरची मिठाई >> हो मीही तसेच करत असे.
कधी कॅडबरी/ बिस्किटांचे वगैरे दिवाळी स्पेशल पॅक असत ते देई.. त्यांना पण ते आवडे कारण त्यांची मुले/ नातवंडे खुश होत बहुदा
भारी लिहिलय सगळ्यांनी!
भारी लिहिलय सगळ्यांनी!
आमच्या घरी आई नोकरी करायची त्यामुळे आज्जी बराचसा फराळ करायची. चकल्या, करंज्या, चिरोटे, साटोर्या, अनारसे, लाडू, शंकरपाळे हे आज्जीचं. आई तिला सुट्टी असेल त्या दिवशी पात्तळ पोह्यांचा चिवडा आणि शेव करायची. लाडू नेहमी नारळी पाकाचे. आज्जीचे भारी व्हायचे! आता आईचे पण छान होतात. फारच लाडाची दिवाळी असेल तर बाहेरून आणलेले मोतीचुराचे लाडू असायचे पण क्वचितच. आता वहिनी बेसनाचेही करते पण बेसनाच्या लाडवाचे कोणी फॅन नाहीत फार. मी आज्जीला करंज्या कातून द्यायला आणि कधी कधी चकल्या पाडायला मदत करायचो. तिच्या आणि शेजारच्या काकूच्या गप्पांमध्ये देवाण घेवाण झालेल्या टीप्स अजून मला आठवतात.
उदा. चकल्या तेलाचे बुडबुडे पूर्ण थांबेपर्यंत तळायच्या. काढायची अजिबात घाई करायची नाही. गोडाचे पदार्थ तुपात तळायचे आणि तिखटाचे तेलात. (आता इथे आम्ही सगळे पदार्थ तेलातच तळतो!)
एकावर्षी डोबिंवलीला दिवाळीनिमित्त पाककृतीची स्पर्धा होती. फराळाचा कुठलाही पदार्ध अशी जनरल थीम होती. आज्जीने आदल्या दिवशी घरी चकल्या केल्याच आहेत म्हणून त्या नेऊन ठेवल्या. सजावट वगैरे काही नाही, जरा बर्या दिसणार्या ताटलीत ठेवल्या फक्त. जवळ जवळ ७०० एंट्री आल्या होत्या, त्यातुन आज्जीच्या चकल्यांना पहिलं बक्षिस मिळालं! कमलाबाई ओगले स्वत: परिक्षक होत्या आणि त्यांच्याच हस्ते रुचिराचं पुस्तक बक्षिस म्हणून मिळालं. ते पुस्तक घरी अजूनही आहे. चाळीस एक वर्ष झाली ह्या गोष्टीला.
साटोर्या करण्याच्या दोन्ही आज्ज्यांच्या वेगळ्या पद्धती होत्या. एक आज्जी खव्याच्या करायची आणि दुसरी गुळाच्या. मी गुळाच्या साटोर्या खात खात खव्याच्या साटोर्यांच कौतूक केलं की आईची आई हमखास म्हणायची "जावयाचं पोर, हरामखोर!"
आमच्या घरी कधी कडबोळी झाली नाही. माझी एक काकू करायची आणि पाठवायची कधीकधी. नरकचतुर्दशीला पहाटे फराळाबरोबर पूर्वी साधे पोहे असायचे, हल्ली चिंचेच्या कोळाचे पोहे असतात. भारी लागतात ते. तुंडूंब फराळ करून मग दिवाळी अंक वाचत पडी टाकणे म्हणजे खरं सुख!
एकडून तिकडून फराळ आला तरी मी, आई आणि माझा भाऊ शक्यतो आमच्याच घरचा फराळ खायचो कारण आम्हांला तोच आवडायचा! आई आज्जीला सांगायची की वाटण्यासाठी अजून लाडू करा, पण आपल्याला पोटभर झाले पाहिजेत.
इथे आम्ही दरवर्षी जमेल तेव्हडा फराळ करतो, आत्तापर्यंत एकदाही भारतातून मागवले नाही. मोती साबणापेक्षा तो तळणीचा वासच दिवाळी आल्याची जाणीव करून देतो. फक्त होतं असं की करता करता तो पदार्थ अर्धा संपून जातो आणि पॉटलक वगैरेंना काहितरी वेगळं उत्प्पन्न करावं लागतं! दिवाळी अंक इथे पोहोचेपर्यंत थँक्स गिव्हिंग उजाडतो पण मग हॉलिडेमध्ये ते वाचून होतात.
किल्लारी-उमरग्याचा भुकंप झाला तेव्हा शाळेबि़ळेत असं सांगत होते की दिवाळी साधेपणाने साजरी करा. त्यावर्षी फटाके घेतले नाहीत. पण त्या बजेटमधून गोष्टीची पुस्तकं आणि मुलांचे दिवाळी अंक घेतले. मग तेव्हापासून तिच सवय लागली. अजूनही शाळेतले मित्र मला विचारतात की तूच ना तो
त्यावर्षीपासून आईची एक मैत्रिण 'किशोर'चा दिवाळी अंक द्यायची. गेल्यावर्षी ती भेटली तेव्हा विचारत होती की हवा आहे का अंक म्हणून.
यडाफटाक्यांच्या ऐवजी पुस्तकं घेणाराडोंबिवलीला असताना दिवाळी पहाटेचा अतिमहत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे फडके रोडवर फिरायला जाणं! मुलं दिवाळीला फडके रोडला जायला लागली की "मोठी झाली" असं मानलं जायचं.
अजूनही तिथे तेव्हडीच गर्दी असते!
असो, ह्या बाफानिमित्त फारच आठवणी आल्या आणि खूप मोठी पोस्ट झाली.
बाफानिमित्त फारच आठवणी आल्या
बाफानिमित्त फारच आठवणी आल्या आणि खूप मोठी पोस्ट झाली. >> हा धागा त्यासाठीच आहे.. दिवाळीतल्या आठवणी .
खव्याच्या साटोर्या मला अतिशय आवडतात. मला वाटतं पहिल्यांदा चितळ्याकडेच ( दुकानं ) पाहिल्या असाव्यात.
मग घरी पण एखाद वेळेला केलेल्या.
आणि दुसरा अतिशय हलका पदार्थ म्हणजे चिरोटे. बाजारचे / विकतचे नेहेमी हलके/ कमी तुपकट मिळतीलच असे नाही.
तसेच त्यातही दोन प्रकार पकडले आणि पिठीसाखरेचे.
आकारावरून गोल किंवा चपटे ( आयताकृती)
गोल ना टॉप व्यू ने गुलाबाचं फुल दिसतं तर दुसऱ्या बाजूने.
मी आणि साबा मिळून ४-५ वेळा केले होते चिरोटे.
मुलांचे छावा आणि किशोर हे दोन दिवाळी अंक असायचे.. अजूनही असतील माहीत नाही.
#Diwalifever #ममव
#Diwalifever #ममव
(No subject)