शब्दांची नवनिर्मिती

Submitted by छल्ला on 22 August, 2023 - 02:46

आपल्या मातृभाषेला समृद्ध करण्यासाठी तिच्यात अधिकाधिक नवीन शब्दांची भर टाकणे गरजेचे आहे.

हे काम आपण सर्वांनी मिळून करायला हवे. भाषातज्ज्ञ आणि अभ्यासक तर आहेतच, पण सर्वसामान्य " यूजर्स " Happy म्हणून आपणही काही भर घातली तर काय हरकत आहे?
उदा
मला मराठीतील धन्यवाद शब्द मुळीच आवडत नाही..
किती कोरडा आणि रुक्ष आहे तो !! किती कठोर व्यंजन आहेत त्यात...
या उलट,
थँक्यू! स्वतःच केस कपाळावर आधी पुढे आणून मग मागे सारण्याचा अभिनय करणाऱ्या..अल्लड किशोरी सारखा आहे!!
थँक्यू म्हणताना ओठांचा चंबू होतो, डोळे हसरे होतात..मनातली कृतज्ञता शब्दांत उमटते.
याउलट धन्यवाद ! म्हणताना.. मान ताठ होते, स्वरात एक तुच्छ बेपर्वाई आपोआप उमटते , आपणच समोरच्यावर उपकार करतोय असा एक छुपा दंभ जाणवतो.

मग असा एखादा आनंदी, उत्फुल्ल ' थँक्यू ' मराठीत का तयार करु नये आपण !

किंवा...एखाद्या भावनेला, वस्तूला एकच पर्यायी शब्द हवा असे थोडेच आहे! आपण दुसराही काही छान पर्याय सुचवू शकतो.
उदा - उत्तर, परीक्षा, बादली, खुर्ची.....यांना दुसरे मराठी शब्द मला तरी माहिती नाहीत.

आणखी एक म्हणजे - संस्कृतोद्भव असले तरच ते शब्द ग्राह्य धरले जातील असा काही नियम आहे का?
शुद्ध मराठीत नवीन शब्द तयार केला तर त्याला मान्यता कोण देते?

तुमच्या नवीन संकल्पनांच्या प्रतीक्षेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गेल्या १५-२० वर्षात नवे मराठी शब्द जरूर तयार झाले आहेत आणि वृत्तपत्रांमध्ये देखील ते वाचायला मिळतात. प्रश्न आहे की आपण किती आग्रहाने ते वापरणार आहोत ?

https://www.maayboli.com/node/58047
इथे सविस्तर चर्चा आहे व भरपूर मोठी यादी देखील.

परिणाम ह्या शब्दाला हिंदीत काही काही पर्यायी पण किंचित अर्थाभिन्नता असलेले असे काही शब्द आहेत. नतीजा, असर वगैरे. आपण निकाल हा शब्द वापरतो तो रिझल्ट ह्या अर्थाने.
ह्यावर कोणी काही मते मांडेल का?

हीरा, तुम्हाला आऊटकम अशा अर्थी म्हणायचे आहे का? Happy
कुमार सर, तुम्ही सांगितलेला धागा सुंदरच आहे. वाचते आहे.

आभारी आहे असं आहे की मराठीत थँक यू ला . पण थँक यूच बरं वाटतं . आभारी आहे हे वापरातून कमी झाल्यामुळे आणि थँक यू चा भरपूर वापर असल्यामुळेही असेल कदाचित .

इंग्लिश meaning मध्ये outcome, effect, end, result consequence,inference, conclusion, deduction असे बरेच शब्द दिले आहेत.
मराठीत इतके पर्याय ( थोड्या अर्थ छटा बदलून) दिसत नाहीत. मला फलनिष्पत्ती किंवा निष्पत्ती सुचला

राधानिशा, आभारी आहे, सुद्धा फार औपचारिक वाटतो. एखादा उस्फूर्त, छोटा, चटपटीत शब्द पाहिजे...तरुणाईला पण पटकन वापरता येईल असा.... Happy

मला असे म्हणायचे आहे की मराठीतली काही अक्षरे एकत्र करून आपण पूर्णतः नवीन शब्द नाही का बनवू शकत?
त्याला काही उर्दू अथवा संस्कृत मूळ असणे गरजेचेच आहे का?
अर्थात, तो शब्द मान्यताप्राप्त असायला हवा. ती कोण देते?

काही शब्द अनुवाद करून उसने आणले तरी त्या भाषेत रुळत नाहीत, कारण त्या भाषेचा स्वभाव त्यांच्याशी जुळत नाही. धन्यवाद हे एक उदाहरण. पु.ल. म्हणतात की थँक्यूला मराठीत पर्यायी शब्द नाही. मराठीत आपण कधी थँक्यू म्हणत नाही, तर ती भावना फक्त चेहऱ्यावरून व्यक्त होते. तिथे थँक्यू म्हणायला गेलो की ते फारच औपचारिक वाटतं. त्यामुळे धन्यवाद, आभार वगैरे शब्द बोलीभाषेत रुळणे अवघडच आहे. लेखी प्रतिसादात किंवा आभार प्रदर्शनाच्या भाषणात ठीक आहे.

(मी वसंतराव सिनेमात पुलंचं पात्र त्यांच्या हातात चहा आल्यावर चक्क धन्यवाद म्हणतं - हा विरोधाभास आहे.)

धन्यवाद, आभार सवय नसल्याने अवजड वाटतात
या उलट Congratulations हा अभिनंदन पेक्षा अवजड वाटतो का? मला अभिनंदन शब्द अधिक आवडतो.

मला वाटते मूळ संस्कृत अथवा कुठलीही भारतीय भाषा असणे गरजेचे नसावे पण ते आहे असे गृहीत धरल्या जात असावे. खरेच तसे गरजेचे असल्यास तशी अट काढून टाकावी.
नाहीतर "उपरी उपस्कर कर्षण केंद्र" असले कसलाही अर्थ न कळणारे प्रती शब्दप्रयोग तयार होतात.

भ्रमणध्वनी हा शब्द मोबाईल फोन अर्थी ऐवजी फिरताना ऐकू येणारे आवाज अर्थी अधिक वाटतो

अगदी, मानव. Happy
मला हेच म्हणायचे आहे.
मलाही अभिनंदन अधिक आवडतो.
मला वाटते शब्दाचा नाद, अक्षरांचे 'combination' , अर्थ आणि शब्द..यांच्यातला समन्वय, तो शब्द वापरायला लागणारी वारंवारिता. ....हे सगळे महत्वाचे ठरते..एखादा शब्द अधिक रुळायला.

हपा, ते त्याकाळी ठीक, पण आताच्या जमान्यात संवाद प्रत्यक्षात कमी आणि फोनवर बोलताना व सोमीवर अधिक होतात तेव्हा काही पर्याय हवा thank you ला. त्यासाठी धन्यवाद, आभार वापरतो.
तसे WA वर अनेकजण नमस्कार ईमोजी वापरतात त्यासाठी.

चलभाष शब्द भ्रमणध्वनी पेक्षा चांगला वाटला.

माझे २ पैसे :

मोबाईल आणि फोन हे पुरेसे शब्द आहेत. त्यात अजुन ओढून ताणून मराठी शब्द बनवायची गरज मला तरी दिसत नाही.

कोणतीही भाषा ही त्या त्या परिसरातील लोकांच्या रोजच्या व्यवहारात असणार्‍या वस्तू, क्रिया कल्पना इ. चे वर्णन करण्यासाठी, व त्याबद्दलचे विचार, संकल्पना, वर्णने इ. एकमेकांस पोहोचवण्यासाठी तयार झालेल्या ध्वनिचिन्हांतून तयार अन उत्क्रांत होते.

मराठी लोकांच्या चलनवलन व्यवहारात जर (उदा.) येताजाता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी "आभारी आहे" "धन्यवाद" इ. म्हणणे नैसर्गिक/कॉमन नसेल, तर ज्या भाषिक लोकांत हे वर्तन सामान्य आहे, त्यांचा थँक्यु सरळ वापरलेला चालावा. त्यास हरकत घेण्याची गरज मला वाटत नाही.

माझ्या निरिक्षणानुसार नको तिथे शुद्धिकरण करत नवे शब्द बनवण्याचा सावरकरी उद्योग बेसिकली संस्कृत मधुन शब्द उचलून मराठीत घुसवण्याचाच असतो. महापौर हा शब्द मेयर या अर्थी सावरकरांनी प्रचलित केला, आपण तो वापरतो देखिल. पण पंतप्रधान हा साजुक मराठी पेशवाई शब्द सोडून हिंदी प्रधानमंत्री वापरणंही आपणच सुरू केलं आहे. तसेच महापौर हा संकृतोद्भव शब्द आहे. अन तो नगरपालिका या मूळ भारतीय नसलेल्या संकल्पनेतील पदासाठी बनवलेला सिंथेटिक शब्द आहे.

असे कृत्रिमरित्या बनवलेले शब्द, जे चालून जातात, किंवा इतर भाषेतले शब्द जे लोक सहजतेने वापरतात, ते मराठी म्हणून स्वीकारलेत तर त्यात मला तरी काही वावगे वाटत नाही.

>>मला असे म्हणायचे आहे की मराठीतली काही अक्षरे एकत्र करून आपण पूर्णतः नवीन शब्द नाही का बनवू शकत?<<
हे असं लहान मुलं करत असतात. त्यांच्या भावविश्वातील वस्तू/व्यक्ती/घटनांसाठी स्वयंनिर्मित शब्द मुले वापरतात. पण तसला कोणताही शब्द प्रचलित झाल्याचे आठवत नाही.

बहुतेकदा नवे शब्द बनवण्याचा मान कवी लोकांकडे जातो. अनेक शब्द अशा प्रकारे तयार झालेले आहेत, जरी प्रचलीत नसले तरी.

धागा विचारप्रवर्तक आहे. प्रतिसाद नियमित वाचणार इथले.

“धन्यवाद” मराठीत फार कृत्रिम वाटते + १

आभार त्यापेक्षा बरे Happy

अभिनंदन सुटे बरे, “हार्दिक अभिनंदन” फार कृत्रिम वाटते. तसेच आभाळभर शुभेच्छा आणि सुदुपार वगैरे बोअर… चांगले शब्द सुचवले तर वापरीन Happy

हपाला अनुमोदन.

>>> मग असा एखादा आनंदी, उत्फुल्ल ' थँक्यू ' मराठीत का तयार करु नये आपण
मुळात मराठीत प्रकट आनंद आणि उत्फुल्लपणाच नाटकी किंवा अतिरंजित वाटतात त्याला काय करणार पण?! Proud

Thank you किंवा thanks बोलायचे आणि मोकळे व्हायचे. सुटसुटीत इंग्रजी शब्द असतील तर हट्टाने स्वाभिमान दाखवायला पर्यायी मराठी शब्द का वापरावे? शिक्षण घेतो ना आपण इंग्लिशमध्येच..

मी घरी बरेचदा धन्यवाद शब्द वापरतो. बाहेर मात्र thank you..
आभारी आहे कधी वापरले नाही. फार तर मंडळ आपले आभारी आहे असे फुल्ल वर्जन वापरले असावे..

सगळं वाचून लक्षात आलं आहे की आपण फक्त सुस्कारे सोडू शकतो. थॅंक्स असो, समजलं असो, हताश असो, सॉरी असो.

धागा आवडला. Happy
आधी मी बोलल्यासारखं लिहायचे, आता मी लिहिल्यासारखं बोलते, त्यामुळे लोक चमत्कारिक नजरेने बघताहेत. पण मी मग त्यांना हेमाशेपो म्हणते. Wink

स्वाती, मुळात मराठीत प्रकट आनंद आणि उत्फुल्लपणाच नाटकी किंवा अतिरंजित वाटतात त्याला काय करणार पण? हे अगदी खरे आहे.
आपली मजल ' बरे ' च्या पलीकडे जात नाही! Happy
अस्मिता आणि सगळेच, धागा आवडल्याचे कळविल्याबद्दल खूप आनंद झाला. थँक्यू. Lol

एखादा शब्द मराठी आहे हे कसं ठरवायचं? टेबलावरची मोसंबी खाऊन तो दरवाज्यातून बाहेर पसार झाला - या एका छोट्या वाक्यात निदान इंग्रजी, संस्कृत, फारसी, पोर्तुगीज या चार भाषेतले शब्द आले आहेत. मराठी लोकांनी आपल्या बोलण्यात ते शब्द आत्मसात केले, की झाले ते मराठी. ते लोक पर्यायी शब्द शोधत बसले नाहीत, तर आहेत ते शब्द तसेच्या तसे वापरले. त्यामुळे आपली भाषा ही प्रवाही आहे. त्यात पूर्वीही बदल होत राहिले होते आणि आजही होत आहेत. त्या त्या काळात ज्या भाषा किंवा भाषक जास्त प्रभावी, त्यांचे शब्द आपल्या भाषेत आले. पूर्वी संस्कृत, फारसी आणि पोर्तुगीज शब्द जास्त आले, आता इंग्रजी आणि हिंदी जास्त येत आहेत.ते नैसर्गिकरित्या येत असताना आपण त्यांना थोपवून अन्य पर्यायी शब्द सुचवायला गेलो तर ते फार काळ टिकत नाहीत. कारण आपण भाषेचा सहज प्रवाह अडवून दुसरीकडे वळवायला बघतो आहोत. तसं करायचं असेल तर थेट सरकारकडून प्रयत्न व्हायला हवेत. उदा. शिवाजी महाराजांनी काढलेला राजभाषा कोश किंवा आताच्या महाराष्ट्र सरकारचा परिभाषा कोश. पण ही खूप मोठी, अनंत काळ चालणारी प्रक्रिया आहे.

ते त्याकाळी ठीक, पण आताच्या जमान्यात संवाद प्रत्यक्षात कमी आणि फोनवर बोलताना व सोमीवर अधिक होतात तेव्हा काही पर्याय हवा thank you ला. त्यासाठी धन्यवाद, आभार वापरतो. >> ठीक आहे मानव. आभार बोलून व्यक्त करणे ही भावना मराठीला नवीन आहे. पण हळूहळू ती रुळू लागेल. कदाचित थँक्यू म्हणणं जास्त रुळेल असा माझा अंदाज आहे. धन्यवाद मित्रा किंवा तुझे खूप खूप आभार यापेक्षा थँक्स यार जास्त सहज सोपं आहे.

झगमगाट ?
किंवा... आपण तयार करुया का? ....

Pages