डाॅक्टरांनाही चकवा देणारा माझा ह्रदयरोग !

Submitted by पुरंदरे शशांक on 11 August, 2023 - 01:47

डाॅक्टरांनाही चकवा देणारा माझा ह्रदयरोग !!

नुकताच मी हार्ट अॅटॅकमधून केवळ सुदैवाने बाहेर पडलो. अतिशय अभ्यासपूर्ण वैद्यकीय लेख लिहून सर्वसामान्यांमधे वैद्यकीय माहितीचे उत्तम प्रबोधन करणारे सुप्रसिद्ध असे मायबोलीकर डाॅ.कुमार1 यांचा ट्रोपोनिन हा लेखच या अॅटॅकमधून बाहेर पडण्याकरता कारण ठरलेला होता.

मला ह्रदयरोगाचा जो अचानकच त्रास झाला त्यासंबंधी काही माहितीवजा लेख लिहित आहे. हा त्रास सगळ्याच हार्ट अॅटॅकवाल्यांना होत असतो का नसतो हे मला माहित नाही, पण केवळ एक केस स्टडी म्हणून वाचकांनी याकडे पहावे ही विनंती.

माझ्याविषयी थोडक्यात...
वय - 63 वर्षे पूर्ण.
वैवाहिक - विवाहित,आम्हाला दोन मुली आहेत व एक नातू आहे.
उंची - पाच फूट सात इंच
वजन - 65 कि.
बारीक अंगकाठी

माझी हार्ट अॅटॅकची लक्षणे -
जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात सकाळी दहा...सव्वा दहाला माझ्या छातीत दुखू लागले. छातीत म्हणजे अगदी थेट ह्रदयातच वेदना सुरु झाल्या. त्या वेदना काही काळातच इतक्या वाढत गेल्या की माझ्या अंगातले त्राणच जाऊ लागले. ते इतके की मला हातापाय आहेत ही जाणीवही पूर्णपणे गेली होती. फक्त बोलू शकत होतो व बघू शकत होतो व ऐकू शकत होतो. पण अजिबात घाम आला नव्हता. मी पूर्ण शुद्धीवर होतो. नकळत का होईना लघवीला वा शौचाला झाली नाही वा तसे फिलिंगही आले नाही. ह्रदयातल्या वेदना इतक्या प्रमाणाबाहेर होत्या की कुठल्याही क्षणी मी संपणार हीच भावना होती, पण सुदैवाने मी घाबरलेलो नव्हतो वा अखेरची काही ऐहिक इच्छाही मनात येऊ शकली नाही.

या ह्रदयरोगाच्या मरणप्राय वेदना कशा काय अचानक थांबल्या व मी पूर्णपणे रिवाईव कसा झालो हे मला तरी एक कोडेच आहे. सुमारे पाऊण..एक तास वेदना होत्या. त्या जेव्हा पराकोटीला गेल्या होत्या तेव्हा माझे बोलणे, पहाणे व ऐकणे सोडले तर अंगातील त्राण पूर्णपणे गेलेले होते.
जसजसे ते त्राण परत आले तसतसा मी बोटे हलवून खात्री करुन घेत होतो व हळुहळू हात पायही हलवू शकलो तेव्हा मीही केवळ आश्चर्य चकीत झालो होतो. अंदाजे वीस एक मिनिटातच मी पूर्ण रिवाईव झालो.
रुग्णालयात दाखल केल्या केल्या माझा ईसीजी काढला गेला, बीपी चेक केले गेले व ब्लड शुगरही चेक केली गेली. आणि आश्चर्यकारकरित्या हे तिन्हीही नाॅर्मल होते.
मी जेव्हा रिवाईव झालो त्यानंतर परत हे तिन्ही चेक केले असता (पहिला ईसीजी व नंतरचा यात सुमारे तासाभराचा अवधी होता) परत तिन्हीही नाॅर्मलच होते. हे सर्व पाहून तेथील डाॅ.ना माझी केस ही मानसिक ताणाचीच वाटली. व रुग्णालयात दाखल केल्यापासून सुमारे दीड..दोन तासांनी मला डीस्चार्जही देण्यात आला. मीच ट्रोपोनिन टेस्ट करा असा हट्ट धरल्याने डिस्चार्ज पेपरवर डाॅ.नी अगदी माझा हट्ट म्हणून ट्राॅप्टी असे लिहून रात्री साडेनऊ अशी वेळ टाकून दिली.

ही ट्राॅप्टी म्हणजेच ट्रोपोनिन टेस्ट त्याच दिवशी रात्री स्ट्राँग पाॅझीटीव आली. त्यामुळे त्या क्षणाला मी एकदम अत्यवस्थ ह्रदयरोगी झालो.

दुसर्‍या दिवशी अँजिओग्राफीत ह्रदयाला रक्त पुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यात चार मेजर ब्लाॅकेजेस आढळले. चार स्टेंट्स टाकून माझे ह्रदय पूर्ववत करुन डाॅ.नी मला तीन दिवसांनी घरीही पाठवून दिले.

असे हे सारे भराभर घडले व आपुले मरण पाहिले म्यां डोळा (श्रीतुकाराम महाजांबाबत तो नक्कीच विलक्षण असा सोहळा होता, पण माझ्याबाबत म्हणाल तर नुसताच सावळा गोंधळा) असा अनुभव माझ्या पदरात पडला.

माझ्या सवयी -
सिगरेट, दारु, तंबाखू, इ. कुठलेही व्यसन नाही.
पूर्ण शाकाहारी. हाॅटेलिंग - महिन्यातून एखादे वेळेस.
या आधी बी पी वा डायबेटिसचा कसलाही त्रास नाही.
नियमित व्यायाम करणारा - पी टी सारखे व्यायाम.
नेहमी लिफ्ट/एलिवेटर टाळून जिने चढणारा - अगदी सात, सात मजलेही.

2018 पर्यंत सिरम इन्सिट्यूटमधे नोकरी.
2018 पासून पूर्ण वेळ सामाजिक कामात व्यस्त.
रुग्णालयातील तपासण्यांमधे कोलेस्टेराॅल थोडेसे वाढलेले व ट्रायग्लिसराईड मात्र जरा जास्तच वाढलेले दिसले.
रुग्णालयातील रिपोर्ट्सनुसार -
cholesterol -201
triglycerides - 285
HDL - 33.9
LDL (direct)-146
VLDL - 57

हे सगळे इथे सविस्तर देण्याचे कारण म्हणजे माझ्यासकट माझे सर्व मित्र, नातेवाईक यांना प्रचंड आश्चर्य वाटले की याच्या सारख्या फिट माणसाला कसा काय हार्ट अॅटॅक आला !
(मी अधून मधून पर्वतीवरही जातो.. व सुमारे पाच..साडेपाच मिनिटात वाटेत न बसता, पण हळुहळु करत - पायथ्यापासून शिवमंदीर- पर्वती चढू शकतो) जानेवारी का फेब्रुवारी 2023 मधे पर्वतीवर गेलो असताना धाप लागली नाही, पण खाली उतरल्यावर पायात व मांड्यात जरासे गोळे आल्यासारखे वाटले - जे या आधी कधीही झाले नव्हते. एक..दोन दिवस पाय दुखत होते व मग ते दुखणे आपोआप थांबले.

माझे घर हे ग्राउंड प्लस वन असे आहे. त्यामुळे तळ मजल्यावरुन गच्चीत जाण्याकरता पस्तीस पायर्‍या चढाव्या लागतात - त्या मी दिवसातून अनेकवेळा चढत उतरत होतो. हे करताना मला एकदाही धाप लागली नाही का छातीतही दुखले नाही वा गळून गेल्यासारखेही झाले नाही.
दुसरे असे की या आधी मला ना कधी व्यायाम करताना वा जिने चढता..उतरताना घाम आला ना धाप लागली ना अस्वस्थपणाही जाणवला !!

मी कार्डियॅक डाॅ.शी याविषयी अगदी सविस्तर बोललो - तर ते म्हणाले केवळ हा एक अपघात होता समजून सोडून देणे. त्यांच्याकडे मॅरेथाॅन रनर्स, सायकलिस्ट, व्यायामपटू, उत्तम खेळाडू वगैरें सारखी फिजिकली अगदी फिट अशी माणसे येतात ज्यांना स्टेंट टाकावे लागतात किंवा कधी कधी पार बायपासही करावी लागते.

माझ्या दृष्टीने तरी हार्ट अॅटॅक हा अगदीच छुपा प्रकार असून रुग्णाला कसली काहीही कल्पना न देता तो डाव साधतो. नशीब जोरावर असले तर रुग्ण वाचतो, नाही तर क्षणात सर्व संपलेले असते. कधी कधी बर्‍याच जणांना हातात वा जबड्यात दुःख जाणवते, तर काहींना जिना वा चढ चढताना धाप लागत असते. काहीजण ही गोष्ट सिरियसली घेतात तर काही याकडे दुर्लक्षही करतात.

सध्या तरी मला वीस मिनिटे चालणे एवढाच व्यायाम सांगितलेला असून तो व्यायाम हळुहळू वाढवत पन्नास मिनिटांपर्यंत न्यायचा आहे व मग पुढे ब्रिस्क वाॅकिंगची सवय लावायची आहे - दहा मिनिटाला एक किमी.
बाकी खाण्यावर काहीच बंधने नाहीयेत. पण शक्यतो घरचेच खाणे घ्या असे सांगितले आहे.

अनुवंशिकता हे एक ह्रदयरोगाचे कारण असू शकते असे माझ्या काही डाॅ.मित्रांचे म्हणणे पडले. तर काहींच्या मते प्रत्येकाचा एक जेनेटिक आलेख ठरलेला असतो - ज्यात कधी सतत होणारा मुतखड्याचा त्रास, तर कधी कॅन्सर तर कधी अजून काही त्रास - जे की तुमच्या जनुकीय कुंडलीतच लिहिलेले असते - असेही काही डाॅ.चे म्हणणे पडले.
वैद्यकीय संशोधनात हार्ट अॅटॅकशी संबंधित अजूनही भरपूर घटक सांगितलेले आहेत - जे वाचताना माझीही दमछाकच झाली.

एकंदरीत माझे त्रेसष्ट वर्षाचे आयुष्य बघता मला शारिरिक वा कौटुंबिक वा मानसिक वा आर्थिक अशा कुठल्याच बाबतीत फार मोठ्या अडचणी/संकटांना सामोरे जावे लागले नाही. चारचौघांसारखेच सर्व सामान्य जीवन मी जगलो. व जे काही जगलो त्याबाबत माझी अजिबात तक्रार नाहीये. वा हे असले दुखणे माझ्या वाट्याला/नशिबी का आले असेही मला वाटत नाहीये.
त्रेसष्ठ वर्षे निरोगी रहायला मिळणे ही माझ्या दृष्टीने तरी खूपच मोठी गोष्ट आहे. व यापुढील आयुष्यही मी समाधानाने, सकारात्मकरित्या निःशंकपणे व उत्साहानेच व्यतीत करीन असा आत्मविश्वासही आहे.

सर्व मायबोलीकर व वाचकांना उत्तम आरोग्यासाठी पुन्हा एकदा ह्रदयपूर्वक अनेक शुभेच्छा.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः

धन्यवाद.
-----------------------------------------
डाॅ.कुमार यांचेही पुन्हा एकदा ह्रदयपूर्वक आभार व असेच अभ्यासपूर्ण लेखन त्यांच्याकडून व्हावे याकरता त्यांना निरामय दीर्घायुष्याच्या अनेक शुभेच्छा !!

मायबोलीमुळेच डाॅ.कुमार व इतरही अनेक मित्र-मैत्रिणी भेटले - याकरता मायबोलीचे वेमा यांचेही अगदी मनापासून आभार.

याविषयावरील माझ्या पहिल्या लेखावर अनेक वाचकांनी मला उत्तम आरोग्याकरता भरभरुन शुभेच्छा दिल्या - त्या सर्वांचेच प्रेम व आपुलकी पाहून मला अतिशय भरुन आले. त्याविषयी शब्दातून काही मांडणे अवघडच आहे. तरीही सर्वांनाच ह्रदयपूर्वक धन्यवाद व निरामय दीर्घायुष्याकरता भगवंताचरणी प्रार्थना.

ॐ नमः शिवाय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेख सर्वांसाठी eye opener आहे. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा.

शशांकदा, झालेल्या वेदनांचे नेमके,तपशीलवार वर्णन तुम्ही केले आहे.घडलेल्या अनपेक्षित घटनेचा कार्यकारणभाव शोधताना अतिशय तटस्थपणे सर्व गोष्टींकडे पाहिले आहे; हे महत्त्वाचे व विशेष आहे.उपयुक्त लेख.

बाप रे !
तुमच्या बालकविता वाचून वाटले नव्हते तुम्ही साठी पार असाल. तिशीतले असाल असे वाटत होते.
तुम्ही सुखरूप आहात, संकटातून बाहेर आलात हेच समाधान आहे. डॉ. कुमारच यावर सविस्तर लिहू शकतील.

हरी नरके यांच्याबाबत काहीसे असेच झाले असावे अशा चर्चा आहेत. काळजी घ्यावी.

१९९२ ला माझा ही हार्ट अटॅक( trans arterior miochordial infarction) पहिल्या हॉस्पिटल मधे डिटेक्ट झाला नव्हता. डिसचार्ज द्यायच्या वेळी एका व्हिजिटिंग डॉक्टरांना नाडीचे ठोके व ताप यांचा काहीतरी ताळमेळ लागत नाही असे वाटल्याने मला प्रयाग हॉस्पिटल मधे पाठवले. तिथे ईसीजी काढला तर मला थेट आयसीयुतच हलवले. हे सर्व वयाच्या तीसाव्या वर्षी. त्याच वर्षी लग्न झाले होते. त्याच वर्षी मोटरसायकलवरुन अपघात झाला होता. अपघाताच्या वेळी टाके टाकताना coagulation of blood साठी इंजेक्शन दिले होते. त्यानंतर दोन महिन्याने हार्ट अटॅक व पुढे anticoagulation of blood ची ट्रीटमेंट. angiography केली होती. angioplasty ची गरज वाटली तर त्याच टेबलवर लगेच करु असे ठरले. पण angiography मुळे डॉ म्हणाले प्लास्टी वा अन्य सर्जरीची गरज नाही. मेडिकेशनवर होईल. अत्यंत त्रासाचे वर्ष होते १९९२, असो एक जीवन अनुभव.

सविस्तर सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
पुढील निरोगी आयुष्यास परत एकदा शुभेच्छा.

माझी डॉक्टरांना चकवा देणारा पण नसलेल्या हृदयरोगाची १५ वर्षांची कहाणी आहे. त्यात एकदा आयसीयूमध्ये दाखल आणि तासाभरात डिस्चार्ज, अनेकदा TMT, दोनेक वेळा ट्रोपोनिन आणि शेवटी २०१७ ला अँजिओग्राफी असा प्रवास झाला. (२०१७ पर्यंत हृदय नव्हता पण पुढे होण्याची शक्यता अर्थात नाकारता येत नाही. ) माझा रेस्टिंग इसीजी, आणि TMT स्ट्रेस मधील इसीजी अनेकदा हा हार्ट ऍटॅक येत असलेल्या / नुकताच येऊन गेलेल्या व्यक्तीच्या इसीजी सारखा येतो तर कधी पूर्णत: नॉर्मल येतो.

विलक्षण अनुभव
छान शब्दबद्ध केलात.
तुम्हाला झटका यायचे कारणच नाही खरेतर
पण तुमचे कार्डियॅक डाॅक्टर बोलले तसे एक अपघात होता समजून सोडून देणे हे अवघड आहे.
तुम्हाला येऊ शकतो तर कोणालाही (मलाही) येऊ शकतो असे वाटून काही काळ खिन्नता दाटून आली.

शशांक
छान सविस्तर वृत्तांत.
तुमच्या बाबतीत मधुमेह आणि व्यसनांचा भाग नाही हे चांगले परंतु लिपिड प्रोफाइल मात्र बिघडलेला आहे. त्याची पातळी खालील प्रमाणे असल्यास चांगले :
१. LDL-c
Less than 100 mg/dL >> हे सर्वोत्तम ठरते.
100-129 mg/dL >>> ठीक.

२. Triglycerides
40-160 mg/dL (पुरुषांसाठी).

त्यामुळे तुमच्या बाबतीत रक्तातील वाढलेल्या मेदाचा आजाराशी संबंध आहे.

मी हार्ट अटॅक कसा असतो ह्याचा अनुभव घेतला आहे.
पण तो अटॅक नव्हता तो फक्त भास होता.

मागे पण मी हा अनुभव शेअर केला होता.
एक सहा सात वर्ष पूर्वीची गोष्ट असेल.
ऑफिस पार्ट्या ,आणि मित्र मंडळी ह्या मुळे ड्रिंक चे प्रमाण वाढले होते.
त्या मुळे सौभाग्य वती नी कोठून शोध लावून आयुर्वेदिक औषध आणले ..ड्रिंक सुटावी म्हणून.
आणि ते प्रचंड महाग पण होते powder स्वरूपात.
मला सांगून च.
ती एक पुडी रोज घेतली की ड्रिंक विषयी तिरस्कार निर्माण होईल असा दावा होता.
पण तसे काही घडत नव्हते.
एक दिवस ते औषध चालू असतानाच ड्रिंक घेतली.
आणि त्या औषधाने आपला रंग दाखवायला सुरुवात केली.
छातीत दुखणे हे सोडून बाकी सर्व heart अटॅक ची लक्षण दिसायला लागली.
घाम आला,अस्वस्थ वाटायला लागले, मेंदू नीट काम करणास झाला,.
भीती ची भावना निर्माण झाली.आणि बरेच काही जे शब्दात सांगता येत नाही.
लगेच फॅमिली डॉक्टर ना घरी बोलावले त्यांनी प्राथमिक बीपी, हार्ट बीट वैगेर चेक केले.
आणि काही नाही.
थोड्याच वेळात बरे वाटेल हे अगदी आत्मविश्वास नी सांगून निघून गेले .
पण मला खूप अस्वस्थ वाटायला लागले म्हणून हट्ट करून खास हार्ट care hospital मध्ये लगेच भरती झालो.
तिथे अगदी खुर्ची वर च icu मध्ये घेवून गेले.
Ecg आनी काय काय टेस्ट केल्या . अगदी ब्लड टेस्ट पण केल्या
टेस्ट ok.
तीनचार तास असे च तिथे थांबवून घेतले.
आणि परत ब्लड टेस्ट केली मला वाटत ती ट्रोपोनिन चीच टेस्ट असेल.
ती पण ok.
आता मात्र डॉक्टर च गोंधळात पडले.
तो पर्यंत मी नीट झालो होतो.
मग डॉक्टर ना त्या आयुर्वेदिक औषधाची माहिती दिली.
त्यांनी लगेच वैतागून डिस्चार्ज दिला.
पण अनुभव घेतला अटॅक कसा असतो त्याचा

लेख संपूर्ण वाचला. कार्य कारण शोधण्याचा प्रयत्न आणि निरिक्षणे नोंदवून ठेवणे हे नेहमीच शास्त्र संशोधनासाठी उपयोगी असते. ते तुम्ही करून वैद्यकीय शास्त्रास मदतच केली आहे.

"मला ह्रदयरोग का झाला किंवा मला तो का कळला नाही" यावरच डॉ. अभय बंग यांनी एका दिवाळी अंकात ( सकाळ किंवा कालनिर्णय आठवत नाही २००० च्या आसपास) लेख लिहिला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की परदेशी प्रमाणांवर मी माझे LDL,HDL,,वय,उंची,वजन पाहून मी सेफ आहे हे ठरवत होतो ते चूक होते. भारतीय लोकांना ते लागू नसावेत. धोक्याचा इशारा देणाऱ्या पातळ्या वेगळ्या हव्यात. या लेखाचे नंतर पुस्तक आले आहे.

अलोपथी शास्त्राप्रमाणे ह्रदयरोग होऊन गेला की ह्रदयाचे स्नायू कायमचे अधू होतात,पुर्ववत करणे अशक्य असते. पण आयुर्वेद तसं मानत नाही. (वैद्यनाथ प्रकाशन,नागपूर) . सतत औषधे घ्यावी लागत नाहीत. उपाय आहेत.

बाकी एक मुद्दा सांगतो की माझ्या माहितीतील तीन जण योगासने /व्यायाम शिकवणारेच ह्रदयरोगाने आजारी पडलेत. म्हणजे योगासने ह्रदयरोगप्रतिबंधक ठरवता येत नाहीत. तर बरं करणारी नसतीलच. रोजची कामे करत राहणाऱ्यांना जो शरिराला व्यायाम मिळतो तो पुरेसा असतो .
पोटातील वायू हा ह्रदयाचा सर्वात मोठा शत्रू.
खाण्याचे पदार्थ आणि सवयी म्हणाल तर एक गोष्ट लक्षात येते की पूर्वीचे लोक चांगलं पौष्टिक खात होतेच आणि रोजच्या अंगमेहनतीने अन्न जिरत होते. आता आपण सर्वच शहरी व्यवस्थेत मुरलो आहोत. खाणे चांगलेच घेतो पण त्याप्रमाणात मुरवत नाही.
न पचलेलं,जिरवलेलं शिजवलेलं अन्न दोष उत्पन्न करतं. घरी पाळलेल्या प्राण्यांचीही हीच अवस्था आहे. वन्य प्राणी अन्न कच्चेच खातात आणि मोकळ्या वातावरणात भटकतात.
असो.
लवकरच बरे व्हा आणि रोग विसरून जा.

कोणत्या ही आजाराचा संबंध मुल जन्माला आल्या पासून च सुरू होते असे मला वाटत.
त्याची अनुवंशिकता.
त्या मुलाचा आहार.
त्या मुलाचा शारीरिक व्यायाम.
त्या मुलाची व्यसन..
घरातील वातावरण.
शिक्षणाचा स्ट्रेस .
बाकी आर्थिक स्थिती चा स्ट्रेस किंवा भविष्याची चिंता.
ह्या सर्व गोष्टी शी असतो.
अचानक काहीच घडतं नसते.प्रतेक गोष्ट घडन्या साठी ठराविक वेळ जावा च लागतो

शशांकजी, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या ज्ञानाचा आणि मदतीस तत्पर असलेल्या स्वभावाचा अनेकांना लाभ मिळत राहो..

शशांकजी, इतकी सात्विक दिनचर्या असताना असं का व्हावं ! पण शरीराची गूढं सोपी नसतात याचा पुन:प्रत्यय देणारं हे लेखन. योग्य सल्ले मिळणं हाही ईश्वरी कृपेचाच भाग. लवकर बरे व्हालच _/\_

हल्ली इतक्या सार्‍या केसेस वाचायला मिळताहेत की हार्ट अ‍ॅटॅकचे आश्चर्य वाटेनासे होईल असे वाटतेय.

तुमच्या हृदयात दुखत होते म्हणजे हार्ट अ‍ॅटॅक होता हे नि:संशयच. पण इसिजी व बिपि नॉर्मल आले याचे आश्चर्य वाटतेय. ट्रॉप्टी केली नसती तर आपल्याला काहीच झालेले नाही समजुन परत त्रास होईपर्यंत तुम्ही आरामात राहिला असता.

तुमचे जे ब्लॉक्स होते ते आधीपासुनच होते आणि ते असुनही तुम्हाला काहीही त्रास होत नव्हता. तुम्ही सगळी धावपळ, नातवामागे पळापळ, जीना चढ ऊतार करत होता. कदाचित ब्लॉक्स असतानाही हृदयाला आवश्यक रक्तपुरवठा करण्याची सवय शरिराने लाऊन घेतली होती. या घटनेमुळे तुमचे ब्लॉक्स कळले व त्यावर उपचार करता आले.

ही घटना घडली नसताना तुम्ही रुटिन चेक म्हणुन २डि एको, इसिजि वगैरे केले असते तर हे ब्लॉक्स कळले असते का?

डॉ कुमार यांनी लिहिलेय की ट्रॉपोनिन रक्तात आढळण्याची इतर कारणेही असु शकतात. मग तुमच्या बाबतीत ट्रोपोनिन केवळ त्या घटनेमुळे रक्तात आले की इतर कारणांमुळे आले हे कसे कळायचे? ही शंका मनात यायचे एकच कारण - तुम्हाला हृदयात खुप दुखले, अगदी मृत्युच्या दारात गेल्याची जाणिव झाली पण कुठलेही उपचार न करता सर्व त्रास तासाभरात थांबले, तुम्ही परत नॉर्मल झालात आणि हे सगळे घडताना तुमचे बाकी पॅरॅमिटर नॉर्मल होते.

cholesterol -201
triglycerides - 285
HDL - 33.9
LDL (direct)-146
VLDL - 57

The formula for Total Cholesterol is
Total Cholesterol = HDL+LDL+ Triglycerides/5

So your total cholesterol should be
33.9+146+ (285/5) = 236.9

237 Total cholesterol is a significantly high number. To prevent heart disease, it needs to be < 150
Indian diet high in carbohydrates (even if totally vegeterian) typically causes high Triglycerides.

Apology for writing in English.

ECG रिपोर्ट ..किंवा असे काही रिपोर्ट तिथे मानवी संबंध येतो
Ecg आणि सोनोग्राफी.
मला माहित असलेले.
ECG मध्ये सर्व पॉइंट नीट शरीराला चिकटलेले असावेत तेव्हा करेक्ट रिडिंग मशीन घेवु शकते .
असे अनुभवान वाटतं
ते पॉइंट नीट चिकटले नसतील तर चुकीचा रिपोर्ट येवू शकतो.
मी दोन lab मध्ये काही अंतराने एकदा ecg केला आणि दोन्ही रिपोर्ट वेगळे आले .
इथे मानवी चूक आहे.
सोनोग्राफी मध्ये पण तेच आहे कुशल आरोग्य सेवक नसेल तर चुकीचा रिपोर्ट येवू शकतो.
ह्या मानवी चुका पण लक्षात घेतल्या पाहिजेत
.साधे बीपी मोजणे पण खूप लोकांना जमत नाही.
असा सर्व्हे आहे

बाप रे!!!
दाढेतुन बाहेर पडलात . आपल्याला उदंड व निरामय आयु लाभो.

अ तिशय सकारात्मक व्यक्तीमत्वा ची झलक दिसते आहे. शेवट चे चिंतन फार आवडले.
न च मात्सर्यम ना लोभो नाशुभा म ति
श्लोक आठवला.

धक्कादायक आहे.
तुम्हाला निरामय जीवनासाठी शुभेच्छा.

नरेंद्र गोळे यांनी मनोगत वर आपल्या हृदयविकाराच्या अनुभवावर ३० भाग लिहिले आहेत. शिवाय त्यांच्या https://aarogyasvasthata.blogspot.com/ या ब्लॉगवर भरपूर आरोग्यविषयक लिहिले आहे. उत्तम ब्लॉगर आहेत. जरुर वाचावा.

रक्त वाहिन्या न मध्ये फॅट जमा होतात आणि नंतर त्याचे रूपांतर कॅल्शिअम मध्ये बनून रक्त वाहिन्यांच्या आतील बाजूस ते जमा होते.
.
रक्त पुरवठा व्यवस्थित होत असतो त्या मुळे त्रास जाणवत नाही.
थोडी जागा अरुंद झाली की रक्त वाहण्यास अडथळा निर्माण होतो आणि लक्षण दिसतात.
हे सर्व स्टेप wise होते.
पण आत मध्ये जमा झालेला कॅल्शिअम चा थर अचानक कोसळला तर मात्र काहीच लक्षण न दिसता अटॅक येतो.
रक्त heart कडे जाणे अचानक थांबते.
हा कॅल्शिअम चा थर कधी कोसळेल चे सांगता येत नाही.
म्हणून आपण बघतो ना ..चांगला तंदुरुस्त होता आणि अचानक अटॅक आला .
त्याला हे एक कारण आहे

मी कार्डियॅक डाॅ.शी याविषयी अगदी सविस्तर बोललो - तर ते म्हणाले केवळ हा एक अपघात होता समजून सोडून देणे. त्यांच्याकडे मॅरेथाॅन रनर्स, सायकलिस्ट, व्यायामपटू, उत्तम खेळाडू वगैरें सारखी फिजिकली अगदी फिट अशी माणसे येतात ज्यांना स्टेंट टाकावे लागतात किंवा कधी कधी पार बायपासही करावी लागते.>>>> या विषयी एखाद्या अनुभवी हृदयरोग तज्ञाने लिहायला हवे. तुम्हाला काही मानसिक ताण,बेचैनी,चिंताअसे काही निमित्त वा कारण असावे असे काही डॉक्टर बोलले का? असल्यास तसे काही होते का? काही त्रास नसलेल्या माणासाच्या तपासणीत हार्ट काही ब्लॉकेजेस आढळतात का? डॉ नीतू मांडके हे तर हदयरोग तज्ञ होते त्यांनी बाळासाहेब ठाकर्‍यांवर शस्त्रक्रिया केली होती. त्यांना व त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देखील हे समजले नसेल वा समजले असले तरी काही उपाय करु शकले नसतील तर सामान्य माणसांचे काय असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता त्यावेव्ळी. माझ्या हार्ट अटॆक वेळी ही अपघात होता असे समजून सोडून देणे असेच सांगितले होते.