घोडपदेवची तेजस्विनी: मनीषा जाधव

Submitted by ASHOK BHEKE on 26 July, 2023 - 10:24

घोडपदेवची तेजस्विनी: मनीषा जाधव
प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे चांगले नसते तरी पण खाद्यपदार्थ आधी नाकाने, मग डोळ्याने आणि त्यानंतर मात्र जिभेने आस्वाद घेताना जीभ या इंद्रियाचा सिंहाचा वाटा असला तरी नाक आणि डोळ्यांना देखील बऱ्यापैकी महत्व आहे. आसमंतात दरवळणारी अशीच सुवासिक झुळूक, यांच्या धंद्याच्या कडेने जाताना आसुसलेल्या नाकाला भरपूर संतोष देऊन जाते आणि मन करते. जिभेवरची गरमागरम चव मनाला उर्जा देऊन जाते. अनेक लोकांच्या पोटाची भूक भागवणारा, खिश्याला परवडणारा तसेच मुंबईची जान असणारा हा समोसा आणि वडापाव. नकळत तोंडाला पाणी सुटतंच… तळलेली मिरचीची सोबत असेल तर नाका-डोळ्यातून उसउसून वाहणाऱ्या धारा.... कोणत्याही मौसमात अगदी हवाहवासा वाटणारा, जीभेचे चोचले पुरविणाऱ्या या समोसा वडापावचा स्वाद एकदा तरी चाखून पाहावा असा...... घोडपदेवच्या नाक्यावर नक्कीच अनुभवायला मिळेल.
कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालं आणि रोजगार नसल्यामुळे अनेकांची कमाई अचानक बंद झाल्यामुळे पोटासाठी काहीतरी करायचं तर कष्टाशिवाय पर्याय नाही म्हणून घोडपदेवच्या तेजस्विनिचा उल्लेख घोडपदेव समूहाला आवर्जून करावा लागेल. कमाईची गाडी अचानक उतरंडीला लागली असताना वळण कोणते घ्यावे. परंतु कासरा आपल्या हातात नसल्यामुळे मनाला चुटपूट लागून राहिली असताना कासरा हातात घेऊन नेमके तसे वळण देत अचानक ओढवलेल्या संकटामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या धाडसाने चमचमीत वडापाव भजीचा व्यवसाय सुरु करून कुटुंबाला धीर देणाऱ्या तेजस्विनी म्हणजे मनीषा जयेंद्र जाधव, माणसाच्या आयुष्यात चढउतार येतच असतात. आणि त्यातून आपले जीवन जगत असतो.काहीजण आपल्या आयुष्यात खूप सुखी असतात तर काहीजण दु:खात देखील सुख धुंडाळत असतात. खंबीर मनाची आणि विचाराने प्रौढ असलेली मनीषा खूप मनमिळाऊ, कष्टाळू आणि कुशल गृहिणी.
कोरोनाचे वादळ आले आणि आभाळ कोसळले. काहीना कसाबसा अर्धा पगार मिळाला तर काहींचा रोजगार कायमचाच गेला. काहींनी मात्र पूर्ण पगार दिला. पण ज्यांचा रोजगार गेला. त्यांच्यावर उपासमार आली. अशा परिस्थितीत मात्र घरच्या महिलांनी कंबर कसून कुटुंबाचे आधारवड बनायचे ठरविले. मनीषा जाधव कोठे कामाला नव्हती.नवरा, मुलगा, मुलगी जेमतेम कुटुंब सारेच घरी बसले होते. आता पुढे काय करायचे....! प्रश्नचिन्ह उभे राहिले. तीन चार महिने बंद असल्यामुळे काही करता आले नाही. पण घरातले सर्व व्यवहार बंद झाल्यामुळे खायचे तरी काय...? तिने देखील कंबर कसून भजीवडापाव सुरु केला. या निर्णयात घरच्यांनी पूर्ण साथ दिली. त्यामुळे धंद्याला गती मिळाली.
विशेष म्हणजे धंद्यासाठी लागणारा खर्च लक्षात घेऊन केवळ छोटीशी गाडीवजा बाकडा टाकून सुरुवात केली असली तरी उत्तमोत्तम गृहिणी असल्यामुळे त्यांच्या पदार्थाची चव काही दिवसातच खाद्यरसिकांना कळली त्यामुळे ग्राहकवर्ग आकर्षित झाला. लज्जतदार स्वादिष्ट भजीवडापाव ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे कुटुंबाचा उत्साह अमाप वाढला आहे. तसेच स्वच्छता आणि टापटीपता महत्वाची अंगीकारल्यामुळे ग्राहक संतुष्ट आणि समाधान व्यक्त करीत आहे.
मनीषाने मनातून पक्के ठरविले आहे की, पोटासाठी काही करायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. या व्यवसायाला अजून उंचीवर नेतील.असा तिला ठाम विश्वास आहे. व्यवसाय करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेऊन पूर्णत: धंद्यात झोकून द्यावं लागतं. कधी आनंद तर कधी कधी वाट्याला निराशा देखील येते. म्हणून खच्चून जावू नका. या व्यवसायात तुम्ही पूर्ण यशस्वी व्हाल, हा आमचा आत्मविश्वास आहे. घोडपदेवच्या तेजस्विनी म्हणून आपला आम्हांला सार्थ अभिमान आहे. त्यांचे कौतुक करताना जात्यावरच्या ओवी आठवतात.
सुंदर माझे जाते गं फिरे बहुतेक ! ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला
एकदातरी याचा आपण स्वाद घेतला तर या तेजस्विनीचा आपण आदर, सन्मान केल्यासारखे होईल. घोडपदेव समूह यांचे वतीने मनीषा जाधव आणि त्यांच्या कुटुंबाला व्यवसायात बरकत येवो, म्हणून पुढील वाटचालीस अगणित शुभेच्छा देत आहे.

अशोक भेके
घोडपदेव समूह

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults