भावे सर

Submitted by वावे on 3 July, 2023 - 01:14

एप्रिल १९९८. माझी नववीची परीक्षा संपली. ही सुट्टी काही खरीखुरी सुट्टी नसतेच. मी आणि माझ्याच वयाची मुंबईची माझी आतेबहीण दहावीला शंभर गुणांचं संस्कृत घेणार होतो. माझी जांभूळपाड्याची आत्या संस्कृत शिकवायची. त्यामुळे सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी आम्हा दोघींची रवानगी तिच्याकडे झाली. जांभूळपाड्याची आतेबहीण आमच्यापेक्षा एकच वर्षाने लहान. तिघींचा मस्त कंपू जमला. अभ्यास आणि मौजमजा एकत्रच होऊ लागली. अधूनमधून अभ्यास, बाकी दिवसभर टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकणं, अखंड गप्पा मारणं, बॅडमिंटन, पत्ते, संध्याकाळी टेकडीवर किंवा समोरच्याच पाली-खोपोली रस्त्यावर फिरायला जाणं यात दिवस भराभर जायला लागले. एप्रिल महिना संपत आला आणि आत्याला पालीचे भावे सर घेत असलेल्या गणिताच्या क्लासबद्दल समजलं. हा काही ’व्हेकेशन क्लास’ नव्हता, म्हणजे सगळा अभ्यासक्रम महिन्याभरात पूर्ण होणार नव्हता. पण होईल तो फायदाच, असा विचार करून आत्याने मला या क्लासला पाठवायचं ठरवलं. मुंबईची बहीण काही कारणाने लवकर मुंबईला परत जाणार होती, त्यामुळे या क्लासला मी एकटीच जाणार होते.

सकाळी लवकर उठणं, आवरून एसटीने पालीला जाणं याचा सुरुवातीला मला खूप कंटाळा यायचा. पण भावे सरांकडून शिकण्याची गोडी लागली आणि हा माझा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. गणित शिकवण्याची सरांची हातोटी खासच होती. गणित सोडवण्याच्या नुसत्या पायर्‍या ते शिकवायचे नाहीत, तर त्यामागचं तर्कशास्त्रही समजावून सांगायचे. उत्तर बरोबर येणं महत्त्वाचंच, पण ते कसं आलं हेही तितकंच महत्त्वाचं. गणितासाठी वहीऐवजी ते आम्हाला ’फूल्स्कॅप’ कागद आणायचा आग्रह करायचे. ’फूल्स्कॅप’ हाच शब्द ते वापरत. ’फुलस्केप’ हा त्याचा अपभ्रंश आहे. तो कागद विशिष्ट पद्धतीने दुमडून त्याची शंकूच्या आकाराची टोपी होते आणि ती आपल्या डोक्यावर बरोबर बसते, म्हणून त्याला ’फूल्स कॅप’ कागद म्हणतात हे त्यांनी प्रात्यक्षिकासह आम्हाला पटवून दिलं होतं! अशी व्युत्पत्ती खरोखरच आहे की नाही हे मला माहिती नाही, पण तेव्हापासून ते कागद बघितले की ती टोपी हमखास आठवते! सरांना हे फूल्स्कॅप कागद गणितं सोडवण्यासाठी अतिशय प्रिय. कारण ते पुरेसे रुंद असतात. लिहिताना डावीकडे एक समास सोडायची सवय आपल्याला असतेच. पण सर उजवीकडेही समास सोडायला लावायचे. हा दुसरा समास ’कारण’ लिहिण्यासाठी. कुठलंही गणित सोडवताना प्रत्येक पायरीसाठी उजवीकडच्या समासात ’कारण’ लिहिलंच पाहिजे हा त्यांचा दंडक होता. ज्या नियमाचा, सिद्धांताचा वापर त्या पायरीसाठी केला असेल, तो नियम किंवा सिद्धांत उजवीकडच्या समासात दिसलाच पाहिजे (नाहीतर गुण कापणार) ही त्यांची शिस्त होती. तेव्हा हे ’कारण’ लिहिणं जाचक वाटलं, तरी त्याचं महत्त्व नंतर लक्षात येत गेलं. या सवयीमुळे गणित सोडवताना पद्धतशीरपणे सोडवलं जातं. सूत्रं पाठ असतील, तरी कधीकधी ते वापरताना चुका होतात, ती शक्यता कमी होते. नंतर आपलं आपण गणित तपासणंही सोपं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते! एकंदरीतच घोकंपट्टीपेक्षा तर्कशुद्धतेवर सरांचा भर असायचा.

भावे सरांचा क्लास मुख्यतः गणिताचा असला, तरी ते फक्त गणित शिकवायचे नाहीत, तर इंग्रजी आणि विज्ञानही शिकवायचे. ते रोज इंग्रजीच्या पुस्तकातला एकेक परिच्छेद ’शुद्धलेखन’ म्हणून लिहून आणायला सांगायचे. माझं हस्ताक्षर अजिबात चांगलं नव्हतं. मराठीही नाही आणि इंग्रजीही नाही. अक्षरावरून घरच्यांचे, शिक्षकांचे बोल कित्येक वेळा ऐकूनही माझं अक्षर सुधारलं नव्हतं. भावे सरांनी पहिल्या दिवशी माझं इंग्रजी शुद्धलेखन पाहताच अक्षर चांगलं येण्यासाठी नेमकं काय करायचं, अक्षरांची उंची किती ठेवायची, प्रत्येक अक्षराचं वळण कसं दिसलं पाहिजे, हे स्वतः लिहून दाखवलं. रोज शुद्धलेखन तपासताना ते बारकाईने माझं अक्षर तपासायचे, न कंटाळता परत परत सांगायचे. न रागावता, अत्यंत प्रेमाने ते बोलायचे. एकंदरीत सरांचं बोलणं नेहमीच ऋजु असायचं. जिथे सुधारणा दिसेल तिथे ते आवर्जून कौतुक करायचे. यामुळे मला अनेक वर्षांत जे जमलं नव्हतं, ते महिन्याभरात जमलं. माझं इंग्रजी हस्ताक्षर खूपच सुधारलं!

जो परिच्छेद आम्ही लिहून आणला असेल, तोच परिच्छेद सर शिकवायचे. एकदा लिहिल्यामुळे तो आमच्या हाताखालून गेलेला असायचाच. मग त्यातल्या कठीण शब्दांचे अर्थ, त्यांना पर्यायी शब्द, त्यातलं व्याकरण वगैरे सगळं शिकवून तो परिच्छेद सर अगदी पक्का करून टाकायचे.

भावे सरांची विज्ञानाची प्रयोगशाळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. विविध प्रकारच्या प्राण्यांचे आणि वनस्पतींचे नमुने त्यांनी त्या प्रयोगशाळेत जतन करून ठेवले होते. दहावीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमातले आणि त्यासंबंधित काही जास्तीचेही प्रयोग सर आमच्याकडून रोज एक, याप्रमाणे करून घ्यायचे. ते प्रयोग करतानाही त्यामागचं वैज्ञानिक तत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त कसं पोचेल, हे ते पहायचे. मला आठवतंय, आम्हाला प्रकाशाच्या वक्रीभवनाचा नियम सिद्ध करण्याचा एक प्रयोग होता. पुस्तकातल्या कृतीप्रमाणे कागदावर काचेची वृत्तचिती (वीट) ठेवून, कागदावर टाचण्या वगैरे टोचून तो प्रयोग आम्ही तिथे केलाच, पण त्यानंतर सरांनी अजून एक गंमत दाखवली. वृत्तचिती एका पूर्ण बंद खोक्यात ठेवून, खोक्याला एका बाजूला खाच करून, त्या खाचेतून येणारा प्रकाश वृत्तचितीतून प्रत्यक्ष वळताना आम्ही खोक्याला वरच्या बाजूने केलेल्या छिद्रातून बघितला! अशी थेट डोळ्यांना दिसलेली, अनुभवलेली वैज्ञानिक तत्त्वं विद्यार्थी कशी विसरणार? आज पंचवीस वर्षांनंतरही ती वळणारी प्रकाशाची तिरीप स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर आहे.

त्याच महिन्यात भारताने पोखरणला अणुचाचण्या केल्या. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचल्या होत्याच, पण भावे सरांनी वर्गात आण्विक fusion आणि fission या अभिक्रिया नेमक्या काय असतात, हेही आम्हाला कळेल अशा पद्धतीने समजावून सांगितल्याचं आठवतंय.

मे महिना संपला आणि माझ्यापुरता भावे सरांचा क्लासही संपला. पालीच्या माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदाची प्रदीर्घ कारकीर्द गाजवून सर तेव्हा नुकतेच निवृत्त झालेले होते, पण त्यांच्यातला ’शिक्षक’ मात्र अजूनही तेवढाच उत्साही असल्यामुळे त्यांनी हा क्लास सुरू केला होता. माझे वडील शिक्षकच असल्यामुळे भावे सरांच्या ज्ञानी आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाशी ते परिचित होते. आत्याने तर अधिकच जवळून सरांची कारकीर्द पाहिली होती. भावे सरांकडून शिकण्याची संधी त्यांच्या क्लासच्या बाकीच्या विद्यार्थ्यांसारखी पूर्ण वर्षभर मला मिळाली नाही, पण महिन्याभरात जे शिकले तेही मौल्यवान होतं.

A poor teacher tells. An ordinary teacher explains. A good teacher demonstrates. A great teacher inspires. कुठेतरी वाचलेलं हे अवतरण मला अगदी पटतं.
शिक्षकी पेशात स्वतःला असं झोकून देणारे भावे सरांसारखे शिक्षक जेव्हा आपल्याला लाभतात, तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला मिळणारी प्रेरणा केवळ अभ्यासात प्रगती करण्यापुरती नसते. आयुष्यात जे काही काम करू, ते सर्वोत्कृष्ट व्हावं, यासाठी धडपड करण्याची प्रेरणाही नकळतपणे आपल्यात ते रुजवत असतात. अशा सर्व गुरुवर्यांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि भावे सरांना दीर्घायुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहिलं आहेस.
असे शिक्षक खरोखरच दुर्मिळ . _/\_ म्हणूनच आज इतके वर्षांनी ही तू त्यांच्यावर इतकं सुंदर लिहिलंयस.

सुरेख लेख.
फुल्स कॅप हे मीपण वाचलंय.

समयोचित लेख !

असे शिक्षक आम्हांला लाभते तर .... असे वाटल्याशिवाय राहिले नाही Happy

छान लेख वावे. बरेचदा असे वाटते की ह्या आणि अशा शिक्षकांनी एकदम कमी resources मध्ये कसे काय मॅनेज केले असेल सगळे? अगदी नगण्य फी, मुलींना तर पूर्ण फी माफ. हलली लाखो रुपये फी घेतात, पण विद्यार्थी घडवण्याची अशी तळमळ क्वचित दिसते.

सुरेख लेख.

फुल्स कॅप हे कुमारसरांच्या धाग्यावर वाचले होते.स्पेलिंगही वेगळे आहे.

सुंदर लिखाण. असे शिक्षक सर्वाना मिळो. या निमित्ताने मला माझ्या भावे बाई आठवल्या. त्या पण गणित शिकवायच्या. असच तर्कशुद्ध.

काय छान लिहिलस ग Happy
अशा गुरुंना ___/\___
गणिताच्या स्टेपच समासात कारण हे फार उपयोगी पडणारं असतं. हे सांगणारे अन करवून घेणारे शिक्षक खरच विरळा.

छान लिहिले आहे. आवडल.
ह्या लेखामुळे मला माझ्या मराठीच्या सरांची आठवण आली. त्यांच्या विषयी मी काही लिहावे इतकी माझी लेखणी सक्षम नाही. त्यांना एकदा भेटावे अशी मात्र खूप इच्छा आहे. पण आता अर्थात ते शक्य नाही. हा छोटासा प्रतिसाद केवळ त्यांच्यासाठीच!

Pages