मायबोली वर्षाविहार २०२३

Submitted by ववि_संयोजक on 23 June, 2023 - 22:31

अरे वेमांना कळवलय ना, धागा टाकायला वविचा?
ववि संयोजकचे क्रिडेंशिअल्स आले की नाही?
ते नंतर, आधी मला सांग आज कुठला टिझर फिरवू?
ए बयो, त्या तिथे स्वल्पविराम राहिलाय गं, आणि तिथे पहिली नाही दुसरी वेलांटी...!
अरे पायलट कधी करायचाय? ठिकाणे सुचवा लवकर.
जुन्या डायऱ्या उघडा, नंबर्स शोधा बसवाल्यांचे...
अब्बे, टी शर्टचे डिझाईन्स आले का?
अरे, ववि बाफचा ड्राफ्ट रेडी झाला का?
पायलटला व्हिजिट करायच्या रिसॉर्ट्स ची लिस्ट तयार आहे का?
ट्रान्सपोर्टची चौकशी कोण करतेय?

नुसता कल्ला चालू आहे मंडळी गेला महिनाभर. संयोजक मंडळींचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. का नाही वाहणार?
"नेमेचि येतो मग पावसाळा" या पंक्तीबरोबर माबोकरांना हे ही माहिती असते की "पावसाळ्याची चाहूल लागली की मायबोली ववि अर्थात वर्षाविहार येणारच."

ओलाकच्च पाऊस, हिरव्यागार डोंगररांगा, त्यात अधूनमधून डोंगरातून खळखळत वाहणारे एकेकटे निर्झर आणि विकांताला गाड्या भरभरून उंडगायला बाहेर पडणारे लोक पाहिले की जातिवंत माबोकराला सर्वात आधी डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे माबोकरांचा लाडका सोहळा "मायबोली वर्षाविहार"! आतापर्यंत फक्त आंतरजालावर भेटलेले व्यक्ती आणि वल्ली प्रत्यक्षात कसे दिसतात याची उत्कंठा, माबोवर कमेंट्समधून कायम वाद घालणारा नमुना प्रत्यक्षात कसा असेल? ही शंका आणि जुन्या जाणत्या (?) माबोकरासाठी मागच्या ववितला सगळा कल्ला पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची आस. मायबोलीवरचे लेखन, इतर अनेक उपक्रम, चर्चा, गप्पा, चेष्टा-मस्करी, विनोद (आणि येथेच झडणारी तात्विक चर्चावादळे वा मतभेद) यांबद्दल मायबोलीच्या सभासदांचे कुटुंबिय रोज काहीतरी ऐकत असतातच. मायबोलीच्या वर्षाविहार उपक्रमाद्वारे त्यांनाही ती खमंग चर्चा, धमाल-मस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळते आणि तीही इतर मायबोलीकरांसमवेत!
तो मायबोलीकर पेश - ए - खिदमत है "मायबोली वर्षाविहार २०२३".

तो पाऊस सुद्धा चार वेळा हेलपाटे घालून गेला वविची तारीख पक्की झाली की नाही हे जाणून घ्यायला. मी येतोय लवकरच, तारीख पक्की करा मग भेटून कल्ला करूच हे सांगायला. शेवटी एकदाची तारीख पक्की झाली, अगदी एकमताने. आत्ताच कॅलेंडर मार्क करून ठेवा. रविवार आहे त्यामुळे रजा नाहीये, मीटिंग आहे वगैरे ऐहिक गोष्टींना आपोआप फाटा मिळालेला आहे. जुलै महिन्यातला शेवटचा रविवार, अर्थात ३० जुलै २०२३. होवू दे खर्च, माबो आहे घरचं !

वर्षाविहाराचे (ववि) निमित्त साधून आंतरजालाच्या या आभासी जगातील अनेक आभासी आयडीज् प्रत्यक्ष रूपात एकत्र येतात, नव्या ओळखी होतात, जुन्या ओळखींचे पुनरुज्जीवन होते, काही ओळखी मैत्रीत बदलतात तर आपल्या नित्य परिचयाच्या असलेल्या मायबोलीकरांचीही एक वेगळी ओळख होते. नेहमीचे वाद, स्पर्धा, समज-गैरसमज, मतभेद इत्यादी बाजूला सारून नवीन ओळखी होतात व नवे मैत्र जुळते.

तर यावेळी ३० जुलै २०२३ रोजी, स्वर्गाचा वेन्यू ठरलाय...
यशोदा फार्म अँड रिसॉर्ट
वंजारवाडी, मुरबाड रोड, हायवे, कर्जत, महाराष्ट्र, ४१०२०१.

https://g.co/kgs/aqaq5D

पाऊस दरवर्षी असतोच, यावेळी तुम्हीदेखील या त्याच्याशी स्पर्धा करायला. कोण जास्ती कल्ला करतो, पाऊस की माबोकर !

मंडळी, हा दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणे गरजेचे आहे.

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.

वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.

- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, २३ जुलै २०२३

योग्य ते शुल्क ysk2006-1@okhdfcbank (Yogesh Kulkarni) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून पोचपावती देतील.
काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा mbvavi2023@gmail.com या पत्त्यावर ईमेल करा.

वर्षाविहार २०२३ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:

मुंबईसाठी:
प्रौढ : रु. 1700/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. 1150/-, बस: रु. 500/-, सांस्कृतिक समिती: रु. 50/-)

पुण्यासाठी:
प्रौढ : रु. 1700/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु 1150/-, बस: रु. 500/-, सांस्कृतिक समिती: रु. 50/-)

मुले (वय 3 ते 12 वर्षे) : रु. 550/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. 500/- आणि पुण्यासाठी रु. 500/-

- 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- 12 वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.
- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ३० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

गुगल फॉर्म लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc_-rBkxeKUMMhBv5BUAFAdJfwVNwDv...

वर्षाविहार २०२३ संयोजन समिती:
मुंबई
कविता नवरे (कविन)
मुग्धा कुलकर्णी (मुग्धानंद)
मंजिरी कान्हेरे (मंजूडी)
विनय भिडे (विनय भिडे)
आनंद चव्हाण (आनंदमैत्री)
निलेश वेदक (नीलवेद)

पुणे
हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल)
विशाल कुलकर्णी (विशाल कुलकर्णी)
मनोज हातळगे (अतरंगी)
योगेश कुलकर्णी (योकु)

चला तर मग, आजच नोंदणी करा!!!

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वा! तुम्ही ही घोषणा केलीत आणि मुंबईत पाऊस आला.
संयोजकांपैकी मंजूडी मायबोलीवरून गायबच झाल्यात. त्यांना इथे दर्शन द्यायला सांगा.
विशाल हा कोणता आयडी आहे? कथाकविताकार विशाल कुलकर्णींचा आयडी विशाल कुलकर्णी असाच आहे ना?

भरत. मी आहे ना Happy त्याशिवाय संयोजकांमध्ये मला कसे घेतील वेमा आणि अडमिन? Wink

तुम्ही वविला या. प्रत्यक्ष भेट होईल.

बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. 500/- आणि पुण्यासाठी रु. 500/-
>>>>

हे नाही समजले
पिकनिकच्या बस मध्ये पोरं बसतील का? Proud
आणि पूर्ण भरलीच नाही बस तर कोणी कुठेही बसेल Wink

ववि च्या दिवशी नेमका दुपार पर्यंत पुण्यात असणार आहे... दुपारी पुण्यातून निघून संध्याकाळी आलं तर चालेल का?

बसचे डिटेल मिळतील का. मुंबईत कुठे पिक अप पॉईंट असतील. किती वाजता पिक अप होईल. ट्रेनने आलो तर कर्जत स्टेशनपासून किती लांब आहे, कसे यायचे. कोणी ट्रेनने येणार आहे का, मुंबईवाले.

@mayu4u, आपण साधारण ५ पर्यंत रिसॉर्टवरुन परत यायला निघतो. नोंदणी करताना अर्धवेळासाठी वगैरे करणे शक्य नाही. तुम्ही पुर्ण दिवसभरासाठी नोंदणी करुन अर्धवेळ हजर रहाणार आहात असे म्हणत आहात का?

@चंपा आणि @किल्ली, ववि बुकिंगच्या शेवटच्या तारखेनंतर नोंदणी किती आहे त्यानुसार बस किती सिटर हे ठरवता येते. तसेच कोणत्या भागातून नोंदणी आहे आणि त्यापैकी आपल्या बसच्या रुटवर त्यातले कोणते भाग आहेत त्याप्रमाणे थांबे ठरवले जातात त्यामुळे हे सर्व काम नोंदणीचा डेटा हाती आल्यावर होते.

२३ जुलै हि ववि नोंदणीची शेवटची तारीख आहे. त्यानंतर २-३ दिवसात इथे वेगळा बाफ काढून बस आणि रुटबद्दलची माहिती दिली जाईल.

नोंदणी करताना तुम्ही दिलेल्या संपर्क क्रमांकावरही मेसेज पाठवला जातो.

प्रति ववि संयोजक,

माझी वर्षाविहाराला मनापासून येण्याची इच्छा असूनही काही महत्वाच्या कौटुंबिक कारणाने येणे शक्य वाटत नाही आहे. तर वविसंयोजनाच्या अटी व नियमाअंतर्गत माझे नोंदणी शुल्क परत होईल का? तसा मी विनंतीवजा मेल पाठवू का? तथापि मी गुगल फॉर्मवर नावनोंदणी करतांना मी माझा कोणता मेलआयडी दिला आहे हे मला अजिबात आठवत नाही. तर माझ्या इतर कोणत्याही आयडीहून मेल पाठवता येईल का?

तसदीबद्दल क्षमस्व!

@राहुल बावणकुळे, तुम्ही mbvavi2023@gmail.com या ईमेल आयडीवर नोंदणी रद्द करण्यासाठी ईमेल पाठवाल का प्लीज. आणि त्यात तुम्ही ज्या upi वरुन पेमेंट केलेत ते देखील लिहून पाठवा. तुम्हाला तुमच्या दिलेल्या upi वर पुर्ण रिफंड मिळेल आणि आमच्याही रेकॉर्डला या सगळ्याची नोंद राहील.

ववि बुकिंगच्या शेवटच्या तारखेनंतर नोंदणी किती आहे त्यानुसार बस किती सिटर हे ठरवता येते. तसेच कोणत्या भागातून नोंदणी आहे आणि त्यापैकी आपल्या बसच्या रुटवर त्यातले कोणते भाग आहेत त्याप्रमाणे थांबे ठरवले जातात त्यामुळे हे सर्व काम नोंदणीचा डेटा हाती आल्यावर होते.
>>

पटले.
परंतु थांब्यानुसार बस साठी नोंदणी करायची की नाही हे ठरवायचे आहे.
कारण बसचे शुल्क नॉन refundable आहेत (त्याबद्दल आक्षेप नाही). परंतु निर्णय घ्यायला थांब्यांची माहिती जरुरी आहे निदान बसचा रूट तरी.

उदा. जर हडपसर मधून बस एक्स्प्रेसवेला जाणार असेल तर कोणता मार्ग ठरवला आहे?
स्वारगेट मार्गे, शिवाजीनगर मार्गे, कात्रज मार्गे, इ.

अवांतर:
फॉर्म मधल्या खालील प्रश्नात लिंग तटस्थ (gender neutral) बदल करावा.

If you choose to come by bus and you are coming with a child, do you need a separate seat for him?

अवांतर:
फॉर्म मधल्या खालील प्रश्नात लिंग तटस्थ (gender neutral) बदल करावा.>> noted

रुट बद्दलचा तुमचा प्रश्न वाचला. त्यावर विचार सुरु आहे. लवकरच कळवू त्याबद्दल

@राहुल, तुमच्या ईमेलची वाट बघत आहोत. तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये दिलेल्या फोन नंबरवर काल पासून फोन लावायचा प्रयत्न करत आहोत पण फोन कायम स्विच्ड ऑफ येतोय. कृपया ईमेलवर तातडीने संपर्क साधावा हि विनंती.

मायबोली संपर्क सुविधा वापरून तुम्हाला ईमेल देखील पाठवले आहे.

@फलक से जुदा, जुने ववि धागे बघितले असता बालगंधर्व हा पहिला थांबा असतो आपला. यंदाही यात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

बाकीचे थांबे नोंदणीनुसार ठरवले जातात.

@ववि_संयोजक >>> माफ करा, मी जरा परीक्षेच्या कामात अडकलो असल्याने वेळेवर प्रतिसाद देऊ शकलो नाही. पण मला रिफंड मिळाला आहे आणि मी तेव्हाच पोचपावतीचा मेलही केला होता.

Pages