अंमली - (पुनर्लेखन) भाग ५!

Submitted by अज्ञातवासी on 14 June, 2023 - 07:46

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83559

प्रस्तावना -

अंमली ही कथा मला खरतर पूर्णपणे डिस्कार्ड करायची होती. मी पूर्णपणे दिशाहीन होऊन ही कथा लिहित होतो, आणि भरकटत चाललेली वाटत होती.
पण आता एक नीट दिशा घेऊन लिहितोय.
या पुनर्लेखनात सगळा फोकस नायकाच्या कॅरेक्टर डेव्हलपमेंट वर असणार आहे. म्हणजे त्याची सुरुवात, नैतिकता, वैचारिकता, हे सगळं सविस्तर येईल. हा प्लॉट खूप डीप असेल.
सगळी नावे बदलतील, प्रसंग बदलतील, मूळ गाभा थोडाफार बदलेल.
...आणि जे लोक अनुराधा आणि मानस ला मिस करत असतील, त्यांच्यासाठी डोन्ट वरी, एक खूप छान सरप्राइज असेल.
या कथेला तुमचं आधीसारखं प्रेम लाभेल हीच आशा.
अजून एक, मी जास्त मायबोलीवर राहतच नाही, त्यामुळे सगळ्या प्रतिसादांना उत्तर देता येत नाही, यासाठी माफी!

विलास शिंदे त्याच्या ऑफिसमध्ये येऊन बसला. खाली गोडावून होतं. ऑफिसमध्ये मोजकेच लोक काम करत असत.
तिकडून गणेश आला.
"दादा, सापडला तो."
विलास हसला.
"तो सापडणारच होता गणेश. कुठे राहतो?"
"मुंबई नाका."
"सोबत कोण कोण राहतात?"
"कुणीही नाही. लग्न झालेलं नाहीये अजून त्याचं. एकटाच राहतो."
"बॅकग्राऊंड?"
"मॅनेजर होता, आता जॉबलेस झालाय."
"बरं. काही बोलणं झालं त्याच्याशी?"
"हो झालं."
"मग?"
"म्हणतोय मला बॉसशी बोलायचं आहे."
"काय? उडवायचं ना त्याला लगेच."
"दादा. त्याला माहिती आहे, त्याच्या हातात काय आहे ते. तरीही तो म्हणतोय, की हे मी फ्री मध्ये तुम्हाला परत देईन. फक्त मला तुमच्या बॉसशी बोलू द्या."
"अजून काय म्हटला तो?"
"अजून हेच म्हटला, की तुमच्या बॉसला सांगा, की मी केमिकल इंजिनिअर आहे, आणि इफे... इफेड्रिंक का काहीतरी पासून काय काय बनू शकतं, मला चांगलं माहिती आहे."
विलास शिंदे उडालाच.
"गणेश. ह्या व्यक्तीला भेटायला हवं. जर हा माणूस आपल्या कामाचा निघाला ना, तर आपलं आयुष्य बदलेल."
"आणि जर निघाला नाही तर..."
"आपला माल घ्यायचा, आणि त्याला उडवायचं."
"दादा तुम्ही स्वतः त्याला जाऊन भेटणं मला तरी गैर वाटतं."
"गणेश तो जे बोलतोय ना, त्यासाठी मला स्वतःलाच भेटायला हवं. चला, गाडी काढा."
विलास शिंदे गाडीत बसला, आणि ते दोघेही निघाले.
*****
मुंबई नाक्यावरच्या फ्लॅटवर तो बसलेला होता.
शांत, थकलेला, सगळं सगळं गमावलेला.
आणि ज्याने सगळं गमावलेलं असतं ना, त्याला परिणामांची चिंता नसते.
समोर पन्नास लाखाची पुडी होती, तरीही तो निवांत होता...
..कारण त्याच्या स्वप्नामध्ये, एक पूर्ण साम्राज्य होतं.
...एक असं साम्राज्य जे सगळं जग त्याच्या तालावर नाचवू शकत होतं.
एक असं साम्राज्य ज्याची तुलना फक्त एका साम्राज्याशी होऊ शकत होती.
रावणाची लंका...
...इतके दिवस रामासारखा, शांत, सुस्वभावी असलेला तो, हळूहळू त्याच्यात बदल होत होता.
...रामाच्या नाशकात, एक रावण जन्म घेत होता.
विलास शिंदे त्याच्या फ्लॅटखाली आला. त्याने गन चेक केली. गणेशला खालीच थांबायला सांगितले. लिफ्टने तो वर आला.
त्याने फ्लॅटची बेल वाजवली.
"उघडा आहे दरवाजा." मधून आवाज आला.
विलास शिंदे आश्चर्याने आत गेला.
...आत सोफ्यावर तो बसलेला होता.
त्याची नजर विलास शिंदेवर खिळली.
"तर, गणेशने तुला सांगितलं असेलच..."
"ही पुडी घ्या आधी." त्याने टेबलावरची पुडी विलास शिंदेकडे दिली.
"तुला माहिती आहे का काय आहे हे?" त्याने विचारले.
"मेथ... शुद्ध नाहीये पण..."
काय? विलास चमकला.
"हो शुद्ध नाहीये. जास्तीत जास्त ८० टक्के असेल."
तुला कसं माहिती?
"कारण एकेकाळी मी शुद्ध मेथ बनवलं आहे. आणि अजूनही बनवू शकतो."
"म्हणजे?"
"माझ्यासोबत चला."
दोघेही फ्लॅटच्या आतल्या रूममध्ये गेले.
त्याने एक चादर ओढली...
...खाली एक ड्रम होता...
"हे काय आहे माहितीये?"
विलास शिंदेनी नकारार्थी मान हलवली.
"सुडोएफेड्रीन...." तो म्हणाला.
शिंदे आता फक्त उडायचा बाकी राहिला होता...
"एकशे वीस किलो... कमीत कमी एकशे वीस किलो...आणि जर रेग्युलर मेथ बनवलं, ज्याच्यात तुम्ही भेसळ केली तरी कुणाला कळणार नाही, कमीत कमी पाच हजार कोटी."
"हा ड्रम तुला मिळाला कुठून?"
"मोठी कथा आहे, नंतर सांगेन. पण आता तुम्ही ठरवा, काय करायचं. एक साधा ड्रग डीलर राहायचं, की माफिया व्हायचं."
विलास शिंदे अजूनही धक्क्यात होता. त्याच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं... ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.
"पन्नास टक्के, समान वाटा, प्रोडक्शन माझं, सेल तुमचा. जगावर राज्य करू. आणि जर तुम्हाला मान्य नसेल..." तो म्हणाला...
...त्याने विलास शिंदेच्या नजरेला नजर भिडवली...
"... तर गोळी माराल, तर डोक्यात मारा. म्हणजे मेंदू उडून अजिबात त्रास न होता मी मरेन..."
"ये..." विलास शिंदे ओरडला.
"मला मरणाची भीती नाही आता, मला कशाचीही भीती नाही. माझी सगळी भीती, माझं सगळं दुःख, दैन्य, निराशा, हताशा, सगळं मी बासनात बांधून ठेवलंय. मला जे गमवायचं होतं, ते आधीच गमावून बसलोय. जितकं तुटायचं होतं, तितकं आधीच तुटलोय, हरलोय, संपलोय... असं समजा या जगातला सगळ्यात भिकारी माणूस मी आहे... आणि स्वतःला गमावलेला माणूस मरणाला घाबरत नाही.
... पण रावणानेसुद्धा महादेवाकडे सोन्याची लंका भिक्षा मागूनच घेतली होती...
...आणि मी, आता रावण झालोय. मीसुद्धा महादेवाकडे दररोज भिक्षा मागतोय, आणि मी माझी सोन्याची लंका बनवेनच...
त्याचा आवाज टिपेला पोहोचला..."
...विलास शिंदे वेड्यासारखा त्याच्याकडे बघत राहिला...
*****
शनिवारी रात्रीची वेळ.
कपालेश्वराला हिय्या गर्दी होती...
लोक अक्षरशः झुंडीने आरतीसाठी उभे राहिले, आणि आरती चालू झाली.
आरतीचा नाद चौफेर घुमला, सगळा आसमंत टाळ्यानी दणाणून गेला, घंटानाद, लोकांचा स्वर, अदभुतरम्य मंगल वातावरण...
तोही तिथेच उभा होता. महादेवाच्या समोर.
त्याने हात जोडले, आणि त्याचं महादेवासमोर मनोगत सुरू झालं.
' आज जे झालं, ते चांगलं की वाईट या फंदात मी पडणार नाही. रावण तुझा भक्त होता. त्याला तू हवं ते दिलं. मलाही देशील. ज्यादिवशी मी मरेन, त्यादिवशी रावणासारखा मरेन. पण त्याआधी माझं साम्राज्य बनवूनच मरेन.
...फक्त त्या साम्राज्याची राणी, त्यादिवशी मला मंदिरात भेटलेली, दिसलेली ती असू दे... तिचं नाव माहिती नाही, कोण आहे, कशी आहे, काहीही माहिती नाही. पण ती कायम माझी असू दे. तिचं नाव माहिती नाही, पण ते कायम माझ्या ह्रदयात असू दे. '
आणि त्याचक्षणी...
' प्राजक्ताssssss '
....कुणीतरी आवाज दिला....
तो आवाज त्याचा कानात घुमला...
...तो पूर्णपणे चमकला...
...प्राजक्ता... प्राजक्ता...
हेच तर नाव नसेल तिचं?
कित्येक दिवसात त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं...
....आणि त्याने घराची वाट पकडली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

<<<मी पूर्णपणे दिशाहीन होऊन ही कथा लिहित होतो, आणि भरकटत चाललेली वाटत होती.>>>
हे तुमचेच मत असावे बहुतेक कारण बरेच वाचक तर उत्सुकतेने वाचत होते आणि सकारात्मक प्रतिसाद देत होते. ते कथानक वेगवान आणि सुसंबद्ध वाटत होते.
याही कथेची उत्सुकता राहिल.
लिहीत रहा. व्यक्त होत रहा..

>>>हे तुमचेच मत असावे बहुतेक कारण बरेच वाचक तर उत्सुकतेने वाचत होते आणि सकारात्मक प्रतिसाद देत होते.>>>>
सहमत....

आता ही कथा एक नवीन कथा म्हणून वाचतो,....

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.
वेल, तीही कथा सगळ्यांना आवडतच होती, पण मलाच आवडत नव्हती, आणि तिचा शेवट डोक्यात नव्हता.
ही कथा सगळ्यांना आवडेल, अशी आशा बाळगतो...

>>>हे तुमचेच मत असावे बहुतेक कारण बरेच वाचक तर उत्सुकतेने वाचत होते आणि सकारात्मक प्रतिसाद देत होते.>>>>
सहमत....

ही कथा पण आवडत आहे.