मला उमजलेले कुमार गंधर्व! संगीत आवडणाऱ्या .. न आवडणाऱ्या सगळ्यांसाठी !!

Submitted by पशुपत on 17 April, 2023 - 11:10

कुमारांच्या गायकीचे वेगळेपण त्यांच्या षड्जा च्या स्वरापासूनच सुरू होते. पुरुषांचा स्वर काळी एक - काळी दोन, स्त्रियांचा स्वर काळी चार - काळी पाच ! कुमार गंधर्व गायचे पांढरी चार मध्ये. हे सांगण्या मागचा उद्देश असा आहे की रागाकडे स्वरांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन एका स्त्री गायिकेचा किंवा एका पुरुष गायकाचा कसा असतो आपण वेळोवेळी ऐकत आलेलो आहोत, अनुभवत आलेलो आहोत. कुमारांचा स्वरांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळात पुरुष आणि स्त्री या वर्गवारीच्या वैचारिकतेच्या पलीकडचा आहे आणि तो त्यांच्या आवाजापासूनच व्यक्त व्हायला सुरुवात होते.
त्यांचा पहिला सा च् तुमचं चित्त झटकन वेधून घेतो. श्रुती वेगळ्या विश्वाचा मागोवा घ्यायला सज्ज होतात. सर्वसाधारणपणे आपण गायन काही काळ ऐकल्यानंतर मंत्रमुग्ध होण्याच्या अवस्थेकडे जायला सुरुवात होते . कुमारांचा षड्जच् हे मंत्रमुग्ध करण्याचे काम करून टाकतो, आणि त्याच्या पुढचा कुमारांचा आणि श्रोत्यांचा प्रवास हा एका वेगळ्या विश्वाचा फेरफटका करत राहतो.
आपल्याला माहिती असलेले तेच षड्ज, ऋषभ, गंधार -मध्यम हे वेगळेच् भासू लागतात . त्यांचा या अंतराळातल्या कुठल्याशा वैश्विक स्वरांशी असलेल्या नैसर्गिक नातेसंबंधाचा प्रत्यय येऊ लागतो आणि ते नाते आपल्या मनाच्या आतही कुठेतरी जोडले जात राहते.
आपल्याला माहिती असलेल्या रागाचे स्वर अगदी वेगळ्या रूपात आपल्यासमोर येत राहतात. त्या स्वरांनाही स्वतःच्या काही भावना आहेत, स्वतःच्या आनंदाच्या - दु:खाच्या कल्पना आहेत याचा साक्षात्कार ते स्वर कुमारानी गायल्यावर आपल्याला व्हायला सुरुवात होते.
कुमार गाऊ लागले की ते स्वर स्वतःच् व्यक्त व्हायला सुरुवात होते , तो राग स्वतः होऊन च रूप धारण करायला सुरुवात होते. त्यांच्या चक्षुसमोर सारं दिसायला लागलेले असते आणि ते श्रोत्यांना उलगडून दाखवत राहतात , अरे हा पाहिलास का हा मध्यम कसा आहे आणि आणि तो भीमपलासी मधे कसा दिसतोय! बागेश्रीतला मध्यम तो हा नव्हे बरं का, तो वेगळाच कोणीतरी व्यक्ती आहे ! येथे भीमपलासी मध्ये तो गंधाराचा अगदी हाताला धरून पुढे घेऊन जाणारा भावासारखा आहे... असं काहीसं कुमार सांगत राहतात .
तर कधी पटमंजरीचा षड्ज पुन्हा पुन्हा लावून त्याच्या विविध छटा किंवा त्याचा एकच मोठा ओघ सतत मनावर ठसवत राहतात. पंचमावरचा त्यांचा लगाव मध्यम गंधार यांना खुलवत राहतो पण परत षड्जा वर येऊन ते सम घेऊन आठवण करून देतात ते बाकी सर्व मित्थ्या आहे हा षड्जच् खरा पट मंजिरी आहे ! पण हाच षड्ज कौशिक कानडा गाताना बाकीच्या स्वरांचा आधार म्हणून लावत राहतात. प्रत्येक स्वराची त्या त्या रागात एक ठराविक भूमिका असते . कुमार गाताना त्या भूमिकांची थोडी अलटा पालट करून पाहत आणि कदाचित त्यामुळेच आपल्याला त्या रागाचं वेगळच रूप दिसायला लागतं. कुमारांचे सूर लावणे हा एक वेगळाच विषय असतो. स्वर अतिशय झटकन आणि अतिशय टोकदारपणे लावणे ही त्यांची महत्त्वाची लकब . स्वराची अचूकता हे त्याचे वैशिष्ट्य .
संगीताच्या प्रस्तुतीतले कुठलेच मापदंड कुमारांना अडकवून ठेवू शकले नाहीत .एखाद्या स्वराच्या वेगळ्या वेगळ्या श्रुती , रागाच्या भावाच्या अनुषंगाने शोधून त्या अधोरेखित करत राहणे हे त्यांच्या गाण्यातले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य! तीच गोष्ट आलापी आणी तानांची . अगदी शान्त आलापी , मग ताना अशातऱ्हेचा आडाखा त्यांच्या गाण्यात कधीच आला नाही . बघता बघता शांत लावलेले स्वर एकदम आक्रमतेने येणाऱ्या तानेशी जाऊन थांबत. मग अचानक तानांची बरसात होऊन जायची आणि परत शांतपणे स्थिरपणे स्वरांच्या लगावर येऊन विसावायचे. आक्रमकता फक्त तानामध्येच नव्हती तर ते स्वरांच्या लगावमध्ये सतत येत राहायची. गाता गाता मध्येच षड्जावर जाऊन ठेपले की आसमंतात खेळणारी एक शांतता हा त्यांच्या गाण्यातला एक आकर्षक भाग असायचा. त्या मधल्या काळामध्ये सुंदर जुळलेले तानपुरे जुन्या स्वरांची उजळणी करताहेत असं भासायचं. कधी वाटायचं हे तंबोरे असेच वाजत राहावेत आणि आता पुढे काय ऐकायला मिळणार ही उत्सुकता अशीच शिगेला पोहोचत राहावी ! आणि श्रोत्यांच्या अपेक्षांना छेद देत कुमारांचे स्वर वेगळ्याच कुठल्यातरी दिशेने मुसंडी मारून परत गायनात प्रवेश करायचे.
रागांनुरूप स्वरांच्या वेगळ्या वेगळ्या श्रुतींच्या वापरामुळे त्यांच्या गाण्याला साधारणतः हार्मोनियमच्या ठरवलेल्या श्रुतींच्या स्वराची साथ कधी मानवली नाही.
बंदिशींसाठीची लय हीसुद्धा कुमारांची एक विशेषता असायची. त्या बंदिशीची लय तीच कशी असायला पाहिजे हे सतत मनात भावत राहायचं! आणि गंमत अशी की हा ठेका फक्त आचरेकरच वाजवू शकतात असं श्रोतांनाही वाटत राहायचं . पुढे जाऊन मला तर कधी कधी वाटायचं आचरेकर तबल्यावर ठेका धरत आहेत हे इतकंच नाहीये तर ते तबल्यातून गातही आहेत, गायकाच्या गाण्याच्या विचाराशी, ठेका आणि तबल्याचा नाद इतका एकरूप झालेला क्वचितच दुसरीकडे कुठे ऐकायला मिळेल.
कुमार अगदी लहानपणी आठ दहा वर्षाचे असतानाच मोठ मोठ्या गवयांची उत्तम नक्कल करणारे म्हणून प्रसिद्ध पावले होते. जेव्हा नक्कल करायची असते तेव्हा आधी मूळ गोष्ट अतिशय डोळसपणे अंगीकृत करायला लागते आणि मग त्यातली वैशिष्ट्य तुम्हाला नकलेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवायची असते. कुमाराना हे तत्व पूर्णपणे आत्मसात झालेले होते . त्याचाच परिणाम म्हणून अब्दुल करीम खान साहेबांची गायकी तशी का आहे याचा त्यानी छडा लावला. अस्पष्ट शब्दोच्चार हा त्यांच्याकडून झालेला प्रमाद नसून तो मुद्दामून स्वीकारलेला तडजोडीचा भाग आहे हे त्यांनी श्रोत्यांच्या लक्षात आणून दिले. हे कशासाठी , तर शब्दांनी सुरांवर हावी होऊ नये हा त्याच्या मागचा हेतू होता असं ते मानत! अब्दुल करीम खान साहेबांची ती उत्कृष्ट गायकी एका सवई गंधर्व कार्यक्रमात, त्यांनी बुवांचीच सगळ्या जगाला आवडणारी ठुमरी
"जमुना के तीर" सादर करून श्रोत्यांना चकित करून सोडले होते!
नाट्य संगीताची रचनाच मुळी क्लिष्ट शास्त्रीय संगीत सामान्य श्रोत्यांपर्यंत आणून सोडण्याच्या उद्देशाने झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळातली बरीचशी नाट्यपदे ही शास्त्रीय संगीतातून घेतलेल्या बंदिशींवर, नाटकातल्या प्रसंगानुरूप योग्य शब्द रचून तयार झालेली होती . बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीतच नाट्य संगीताच्या स्वरूपात किती उत्कृष्टपणे मांडलं हे कुमारांनी खूप छानपणे टिपल होतं. आणि ती वैशिष्ट्य व्यक्त करण्यासाठी त्यांनी पूर्ण अभ्यास पूर्ण असा एक कार्यक्रम श्रोतांसाठी सादर केला होता..
जेव्हा भावना व्यक्त करण्याची गोष्ट असते , त्यावेळेला कुमारांचा हात धरणारा सहसा सापडणार नाही! त्यांचा स्वर जास्ती भावना व्यक्त करतो का शब्द , हे सांगणं कठीण होऊन बसते. याची उत्कृष्ट उदाहरणं म्हणजे "आज अचानक गाठ पडे" मधल्या "भलत्या वेळी" या शब्दांची त्यांनी केलेली नजाकत असो किंवा "कधी गहिवरलो कधी धुसफुसलो" या ओळी असोत! शास्त्रीय संगीतातल्या बंदिशी सुद्धा जेव्हा खूप छान काहीतरी दृश्य घेऊन यायच्या त्यावेळेला कुमार हे त्यानुरूप गात राहायचे! उदाहरणं दाखल दरबारीतली त्यांची बंदीश आहे. छोट्या रामाच्या लीलांचं वर्णन करणारी बंदिश आहे 'अनोखा लाडला , खेलनको मांगे चांद'.. कुमारांच्या स्वरामध्ये आणि आवाजामध्ये त्या छोट्या रामाच्या लीलांचं अमिनिष नेत्राने केलेलं कौतुक त्यांच्या आवाजातून व्यक्त होत राहते.

चित्रमयता हे त्यांच्या गाण्याचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. वर्षा ऋतूचे वर्णन करणारी , पावसाचे वर्णन करणारी बंदीची प्रस्तुतीकरण असो किंवा मीरेने गायलेलं भजन असो. कडाडणाऱ्या विजा आणि सणाणणारा पाऊस त्यांच्या तानातून आणि स्वरांमधून ओसंडून बरसत राहतो ! किंवा "पियाजी म्हारे नैना आगे रहियो जी" या धाव्यातली अर्तता त्यांच्या स्वरातून आणि आवाजातून व्यक्त होत राहते! कबीराचे "कौन ठगवा नगरिया लूट लीहो" हे भजन ऐकताना तर गंगेच्या मनिकर्णिका
घाटावर बसून समोरच्या कुणाच्यातरी जीवनाचा शेवटचा प्रवासाचे दृश्य आपण पाहत आहोत हा भास मला नेहमी होत आलेला आहे !
एकूणच सगुण आणि निर्गुण भजन हे कुमाराने अतिशय वेगळ्या धाटणीत श्रोतांसमोर आणले.
त्यासाठी एक शांत वेगळ्या तालाची रचना-योजना त्यांनी केली, ज्याच्यामुळे ईश्वरचरणी, ईश्वर मूर्तीमधे असो किंवा अमूर्त असो - निसर्गमय असो, त्याचे ध्यान करतोय , त्याचे चिंतन करतोय.. कुठल्याशा टेकडीवर शांत एकांतात एखाद्या वृक्षा खाली बसून त्या अमूर्त ईश्वराचा मागोवा घ्यायचा आपण प्रयत्न करतोय असा भास त्यांची सगुण आणि निर्गुण भजन ऐकाना होत राहतो.
कुमारांच्या गाण्याचा कसं आहे श्रोत्यांनी त्याबद्दल भरपूर बोलावं आणि मोकळं व्हावं म्हणजे काय होतं पुन्हा नव्याने त्यांचं गाणं ऐकून त्यातली नवीन वैशिष्ट्ये नव्या दृष्टीने टिपण्यासाठी आपली पाटी परत स्वच्छ होते..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शपथ, काय लिहिलत ___/\___
मला शास्त्रीय संगीतातले, शास्त्र फार कळत नाही पण ते संगीत भावतं नक्की. कुमारजी तर फार फार आवडते. तुम्ही उल्लेखलेली एक एक चिज, गीत, भजन आठवत गेलं, आणि म्हणूनच फार भिडलं लिखाण; आवडलंही. त्यांनी लावलेला पहिला सूर मनवर गारूड घालून जातो अन चिज संपली, तरी सूर मनात गुंजन घालत रहातात. त्यांच्या सुरांच्या हिंदोळ्यावरून खाली उतरणं होतच नाही. फार सुंदर अनुभूती देतात ते!
खूप खूप धन्यवाद

आपल्या आवडी जुळणारं कोणी सापडलं की छान वाटतं..
लेख वाचलात आणि सुंदर अभिप्राय दिलात .. धन्यवाद अवल!

अप्रतिम! ,कुमारांच्या गायकीत एक लखलखीतपणा आहे असं वाटत मला, आणि त्याच वेळी एक वेगळी झाक आहे, कारुण्याची म्हणा किंवा काही पण त्यांच्या गाण्यांचा वापर(चुकीचा शब्द आहे कदाचित, उपयोग बरोबर होईल)एक दोन नाटकांमध्ये फार खुबीनं केलाय.त्यांचं हिरना समझा हे कबीरांचं भजन अक्षरशः वेड लावतं. लेख फार आवडला.

सुंदर! रुमाल टाकून ठेवतो. इथे लिहिण्यासारखं आणि आनंद घेण्यासारखं खूप काही आहे. जरा वेळ काढून पुन्हा येईन तेव्हा सविस्तर लिहेन.

फार सुरेख लिहिलयं!
कुमारजींचे गाणे ऐकताना असे वाटत रहाते की ते जे काही नादब्रम्ह आहे त्याचे प्रत्यक्ष दर्शनच त्यांना झाले आहे आणि गाण्याच्या रुपाने त्याची सगुण रुपं च ते आपल्यासमोर मांडत आहेत.

माझा रुमाल उचलायला आज आलो Happy

कुमार जी हे भारतीय संगीताला पडलेलं एक स्वप्न होतं. प्राकृतिक देहबाधा अलौकिक प्रतिभेला लांघू शकत नाहीत हे दाखवून देणारं एक अनन्यसाधारण आयुष्य त्यांच्या रूपाने ह्या भरतखंडात घडलं. अगदी बालपणापासून मैफिली गाजवणार्‍या शिवपुत्र कोमकलीला ऐन तारुण्याच्या भरात असताना, विशीच्या आसपासच क्षयरोगाने ग्रासलं. ज्या वयात अनेक गायकांच्या गाण्यात तारुण्यसुलभ आक्रमकता, सौंदर्यदर्शन, नवनिर्मिती, शृंगार इत्यादी भावगुणांचा मिलाफ व्हायला सुरुवात होते, ज्या वयात हे गायक-गायिका आपल्या ह्या नव्याने उत्साहाने ओसंडून वाहणार्‍या गानप्रतिभेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतात, त्याच वयात एखाद्या, गायनाला सर्वस्व वाहिलेल्या गायकाचा आवाज बंद होणं हे काय असेल ह्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांची पुढील काही उमेदीची वर्षे आजारपणात गेली. गायलात तर ते जीवघेणे ठरू शकेल - असं डॉक्टारांनी सांगितलं होतं. जी कला एखाद्याची जीव की प्राण आहे, तीच जीवघेणी होईल असं ऐकल्यावर त्यांच्यावर काय आभाळ कोसळलं असेल हे प्रयत्न करूनही विचार करवत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मध्यप्रदेशात देवासला जाऊन राहिले. ते बाहेरून मुके असले तरी आत काहीतरी तपस्या चालू असणार हे नक्की. शिवाय आजारपणात पडून असताना आजूबाजूच्या मालव प्रांतातल्या लोकांचं लोकसंगीत कानांवर पडत होतं. त्यातच त्यांच्या कानावर संस्कार झाले ते नाथपंथी जोगींनी गायलेल्या कबीराच्या दोह्यांचे आणि निर्गुणी भजनांचे. आपलं संगीत म्हणजे काय, त्याच्या रागांचे भाव म्हणजे काय, त्यातल्या अमूर्त संकल्पना मूर्त उभ्या करावयाच्या असतील तर त्यांचं रूप कसं असेल, कसं असायला हवं, इत्यादी विषयांवर त्या मूकपणात प्रचंड मंथन झालं असणार. ह्या काळात त्यांच्या पत्नी - भानुमती ह्यांनी खूप काळजी घेतली. पुढे कुमारजी तिशीच्या आसपास असताना क्षयरोगावर उपाय म्हणून स्ट्रेप्टोमायसिन प्रभावी ठरतं असं लक्षात आल्यावर त्यांच्यावर ते प्रयोग झाले आणि पत्नीच्या अनमोल साथीमुळे हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत गेली. जवळपास ८-१० वर्षांच्या खंडानंतर कुमारजी पुन्हा गायला सज्ज झाले. पण आता आधीच्या आणि आताच्या कुमारजींमध्ये दोन मुख्य फरक होते. एक, त्यांच्या फुफ्फुसाची एक बाजू निकामी झाल्यामुळे त्यांना श्वास कमी पडायला लागला, आणि दोन, बाह्य अभिव्यक्ती नसलेल्या काळात चाललेल्या अंतर्गत मनन, चिंतनासह तपस्येतून बाहेर पडलेला एक तावून - सुलाखून निघालेला विचार. हा नवविचार बंधनं झुगारणारा होता. पण तेही मूळ कलेची नजाकत आणि सौंदर्य यांना बाधा न येऊ देता. सर्वपरिचित पारंपरिक रागांची अनेक अपरिचित अंगं ते श्रोत्यांसमोर उलगडू लागले. अनेक विद्वान जाणकारांना ते ऐकताना, आपल्याला परिचित राग ह तो तर आहे, पण आपण तयला अजून पुरतं ओळखलेलं नाही, ह्याची अनुभूती होत असे. त्यांनी त्यांच्या निकामी झालेल्या फुफ्फुसाच्या एका भागामुळे येणार्‍या बंधनांवरही अनेक प्रकारे विचार करून मात केली. आपल्या आवाजाला आणि श्वासाला अनुरूप होतील अश्या कित्येक नवीन बंदिशी त्यांनी बांधल्या. त्यातल्या बहुतेक सर्व बंदिशींमध्ये छोट्याश्या शब्दसमूहाने सुरुवात होऊन लगेचच सम येत असे. हमीरमधली 'अजब दुनिया' काय किंवा श्री रागातली 'करन दे रे' काय. पण त्यांची खूबी अशी की त्यांनी अशी काही करामत करून आपल्या मर्यादांनाच आपले हुकुमी एक्के बनवले आहे, हे ऐकणार्‍यांच्या लक्षातही येणार नाही. आता त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी लांबलचक पल्लेदार तानांची गरज नव्हती. कुठलीही सर्कस न करता केवळ आरस्पानी सौंदर्य फुलवणं हे त्यांना उमगलं होतं आणि त्याचीच प्रचिती श्रोत्यांना येत असे. असं म्हणतात की त्यांना सूर दिसत असत. अंतर्‍याचे आलाप गाताना आपल्या हाताची मूठ वरती उंचावून ते अशी काही खेचत असत की जणू काही तो सूर ते खेचून धरून समोरच्या श्रोत्यांवर त्याचा शिडकावा करायला सोडून देत आहेत असा भास होत असे.

त्यांची अजब दुनिया ऐकताना भल्याभल्यांनी असा हमीर कधी ऐकला नव्हता अशी कबुली दिली आहे. टीका करणारेही होतेच, पण कुमारजींचं म्हणणं असं होतं की जर एकाच स्वभावाचा माणूस देखिल वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळा वागू शकतो, वेगवेगळे सुखदु:खादि भाव प्रकट करू शकतो तर मग राग का नाही? त्याच्या रागत्वाला बाधा न आणता त्याच्या वेगळ्या रूपाचं दर्शन नाही का होऊ शकत?

त्यांची 'राजन अब तो आजा' ही तर मला फारफार आवडते. धीर न रहत कजरा आँखनमें म्हणताना त्या शेवटच्या शब्दावर जी नजाकत ते आणतात, ते केवळ ऐकण्यासारखं आहे. मी ही बंदिश जवळपास त्या सर्व कोमकली कुटंबियांची ऐकली आहे. वसुंधरा कोमकली, कलापिनी, मुकुल शिवपुत्र आणि भुवनेश कोमकली - सर्वांचीच. कुमारजी - मुकुल - भुवनेश ह्यांमध्ये पिढीनुसार आवाजात गोडवा आणि गोलाई थोडी थोडी कमी आणि बेस, खर्ज, भारदस्तपणा थोडा थोडा जास्त होत गेलेला जाणवतो. ह्याचा अर्थ त्यांचा आवाज चांगला नाही असा अजिबात नाही हां! उलट मुकुलच्या आवाजात गोलाई आणि भारदस्तपणा ह्यांचं उत्तम मिश्रण आहे. भुवनेशचा आवाज आपली छाती भारून टाकतो. पण ह्या पर्टिक्युलर बिंदिशीत 'अब न सहू रे' म्हणताना कुमारजी त्या 'रे' शब्दावर जी मींड घेतात तशी ह्या उच्च प्रतिच्या आणि त्यांच्याच घराण्यातल्या गायकांतही आढळत नाही. कदाचित ते मुद्दामूनही घेत नसतील; आपापले वेगळे विचार मांडत असतील. पण मला तो कुमारजींचा स्वर ह्याबाबतीत तरी जास्तच प्यारा आहे.

त्यांची 'राजन अब तो आजा' ही तर मला फारफार आवडते.>> मला पण मला पण. निमोरिका मोरा अशी पण एक चीज आहे ती हि सुरेख. मला कुमारजींचे गाणे मनापासून आव्डते व इतर सर्व निर्गु णी भजने सुद्धा. ते एक कलासक्त जीवनावर प्रेम असणा रे व्यक्ति सुद्धा होते. आमच्या कडे त्यांची छोटी काळी रेकॉर्ड होती त्यात त्या चार चिजा होत्या. अनेक वेळा ऐकलेल्या आहेत.

बाफ आल्या पासून लिहायचे होते. आज वेळ मिळाला. हर्पा प्रतिसाद फार छान आहे.

शिवपुत्र चे जमुना किनारे मोरा गांव सांवरे आइ जै यो पण सुरेख आहे. अगदी कुमारांपेक्षाही जास्त माइल्ड व लडिवाळ. मी हे एकदा आजुबाजुला भर पाउस पडत होता तेव्हा ऐकलेले तेव्हा माझा स्वत्;च्याच नशीबावर विश्वास बसेना. बस अब किछु नै सुनना असे झालेले.

माझे काही बाळबोध प्रश्न आहेत.
१. एखादे गाणे, एखादी चीज/राग आवडायला किंवा नावडायला, शात्रीय संगीताचे ज्ञान असणे आवश्यक आहे का?

२. जर मी डोळे बंद करून सारेगम कार्यक्रमात फुकट असो वा एखाद्या मैफिलीत तिकीट काढून असो, ऐकले आणि मला ते आवडले (कोण गायक आहे, कुठला राग आहे, षड्ज, ऋषभ, गंधार की मध्यम, काळी ४ की पांढरी पाच, मुळात यात राग आहे की नाही याची चिकित्सा न करता) तर माझा आनंद कमी होणार आहे का? कानाला गोड वाटेल ते चांगले संगीत हे बरोबर आहे का?

३. समजा कुणी शात्रीय संगीत शिकला असेल, तर त्याचा आनंद त्या गाण्यात वाढणार आहे का? समजा, गाण्यात एखादी बारीकशी चूक झाली, तर ते लगेच कळून आल्याने त्या क्षणापुरता विरस होणार नाही का?

त्यामुळे अज्ञानात सुख असते, हे बरोबर वाटते का?

टीप: हे मी पूर्णत: गंभीरपणे विचारत आहे, तिरकसपणा करण्याचा उद्देश नाही यात.

हे प्रश्न कुठल्याही कलेला लागू होतात आणि उत्तरे साधारण तीच असावीत.

मला चित्रकला अजिबात येत नाही. एक सरळ रेष काढता येत नाही. पण मला चित्रे बघायला आवडतात. Abstract चित्रे कळत नाहीत, आवडत नाहीत. पण ती न शिकता आवडणारे लोक माहीत आहेत. शिकलो तर अजून आवडेल का, हो नक्कीच. Abstract शिकायला कदाचित नाही पण आवडणार. तुम्ही म्हणता तसा चोखंदळपणा वाढेल, पण त्यानंतर जो आनंद आहे, तो जास्त छान वाटेल. पण मला ते जमलेच पाहिजे का? छ्या! ज्या आनंदात मी समाधानी आहे, तिथे उगीच आणखी कष्ट कशाला? शिकणे/न शिकणे, हे इच्छा होण्यावर, वैयक्तिक जिज्ञासेवर अवलंबून आहे. ती इच्छा नसणे ही काही वाईट गोष्ट नव्हे. आपल्याला ज्या प्रकारची कला आवडते, त्यातून आनंद घेण्याचे मार्ग आपले आपण चोखाळावे.

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, हे कुठल्याही कलेला लागू पडेल. तसेही आवड/नावड ही व्यक्तीसापेक्ष असते आणि एखादी कला न शिकलेल्या माणसाला पण लगेच कळते की छान काय आहे आणि काय नाही. चित्रकला न शिकताही, १०-१५ सेकंदात लगेच कळते की समोरचे चित्र आवडले की नाही. (नक्की काय आवडले/नावडले हे नाही सांगता येणार कदाचित.) मग प्रश्न असा पडतो की कला शिकवली का जाते? संगीत न शिकलेला किशोरकुमार पण चांगला गायक किंवा इतर कुणी चित्रकार होऊ शकतोच की. Is art overrated just to command high price for a painting or a song album?

कलेचा आस्वाद घेणे आणि अभिव्यक्त होणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अभिव्यक्त होण्यासाठी तंत्र माहीत करणे आवश्यक आहेत. लाखांमध्ये एखादाच किशोर असतो, ज्याला उपजत तंत्र अवगत असते किंवा ते स्वतःहून जाणून घेण्याची क्षमता असते. इतरांना तंत्रज्ञ लागतो. तसे नसते तर सर्वच जण गुरुविना किशोर, किंवा लिओनार्दो दा विंची झाले असते. तेही शिकून सर्वांना येईलच असेही नाही.

लेख आवडला आणि हर्पा तुमचा रुमाल उचललात तो प्रतिसादही.

उ बो - मला वाटते कला अंगभूत / उपजत असते. शिकवतात ती सादरीकरणाची पद्धत ज्याला ढोबळ मानाने क्राफ्ट म्हणता येईल.
कलेचा आस्वाद घेताना ती शिकलेली असणे अजीबात गरजेचे / अनिवार्य नाही.

पण चुका कळल्यानंतर त्या क्षणापुरता होणारा विरस आणि अज्ञानातल्या सुखापेक्षा कलेच्या ज्ञानातून मिळणारा आनंद अनेक पटीने जास्त असतो असे अनुभवले / बघितलेही आहे.
मला माझ्यासारख्या सर्वसामान्य अ-कलाकार लोकांकरता appreciation course असतील तरी पुरे होईल असे वाटते. उदा. पुण्यात Film and Television Institute of India तर्फे film appreciation course असतात त्या धर्तीवर.

हपा ,अश्विनी मामी, हार्पेन सगळ्यांचेच प्रतिसाद खूप छान आहेत.
कुमारांचं गाणं आवडणारी भावणारी ही एक वेगळी कम्युनिटी आहे असं मला आजवर वाटत आला आहे.. आणि आपण सगळे त्या कम्युनिटीचेच भाग आहोत .

कोणतेही कला ही गुणसूत्रांमधून प्रत्येकामध्ये आलेली असते . तिचा विकास करण्याचे काम गुरु करतो.
मला नेहमी हा प्रश्न लोकांच्या बोलण्यात छपलेला दिसत असतो , गुरु आणि शिक्षक या दोन भूमिका कलेच्या दृष्टिकोनात कशा वेगळ्या असतात? तर मी त्याच्याशी छोटीशी व्याख्या आशी करेन की संगीत म्हणजे काय, सूर म्हणजे काय, याची ओळख ,याचे व्याकरण हे शिकवणारे जे असतात ते शिक्षक . जे गाणं ऐकायला कान आणि गळापण तयार करतात
गुरुची गोष्ट वेगळी आहे. गुरु या कलेचा आविष्कार कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन करतो.
म्हणजे कलेचा उपयोग जीवनात काय आणि कसा आहे हे कळून देण्याचं काम शिक्षक करतो आणि जिथे उपयोगाचे काम संपतं तिथे गुरूचं काम सुरू होतं..
याला एका मोठ्या तत्ववेत्या लेखकाच्या उक्ती चा आधार आहे.
"ऑल आर्ट इज क्वाईट युसलेस!"

बोकोबा, मी पण तुझ्याच पंथातला आहे - कलेच्या आविष्काराचा आस्वाद घ्यायला आपल्याला ती कला आत्मसात असावी लागते असं अजिबात नाही. पण मग कुमारजी जेव्हा एखाद्या रागातला "वर्ज्य सूर मला खुणावत होता म्हणून थोडी जागा करून दिली" असं म्हणतात तेव्हा त्यानी नक्की काय केलं ते कळत नाही.

पुलनी याबद्दल फार सुरेख विवेचन केलंय. "सुरांचं ज्ञान नसूनही गाणं ऐकणं हे डोळे बंद करून एखादं शिल्प चाचपडण्यासारखं आहे. स्पर्शाने मूर्ती किती सुरेख आहे ते नक्कीच कळतं. पण सुरांचं ज्ञान असलं तर ते शिल्प डोळे उघडून बघण्यासारखं आहे" !!

कुमारांचं गाणं मी माझ्या लहानपणी जेव्हा ऐकले त्यात मालावती रागातलं 'मंगल दिन आज बना घर आयो' आणि ललत भटियार मधलं 'मारुजी भूलो ना माने' हे मनावर कोरले गेलेले आहेत! पैकी मालावतीतली बंदिश बऱ्याच वेळा गायली जाते माझ्याकडून रियाज करताना.

इतर गायक व कुमांरांची रेकॉर्डिंग ह्यात तबल्यात पण फरक जाणवतो. त्यांना साथ देणारा तबला वेगळ्याच पट्टीत वाजतो.

की मालावतीतली बंदिश बऱ्याच वेळा गायली जाते माझ्याकडून रियाज करताना.>> ऐकवा ना.

अश्विनी मामी, कुमारजी मी म्हटलं त्याप्रमाणे पांढरी चार या स्वरात गायचे आणि त्यांच्या साथीचा तबला हा 'ढाला' तबला ( मोठ्या व्यासाचा असणारा) म्हणून ओळखला जातो त्याला अतिशय उत्तम अशी 'आस' (सस्टेन होणारा आवाज) असते त्यामुळे तो वेगळा वाटतो .

शताब्दी वर्ष आहे हे कुमार गंधर्वांचे. समयोचित सुरेख लेख आणि सुंदर प्रतिसाद !

कुमार मला आवडतात ते त्यांच्या मालवातल्या लोकधुनांच्या, तिथल्या भाषेच्या, मोकळ्याढाकळ्या संस्कृतीच्या, कनफाटा-अवधूत-जोगड्यांच्या देशज गीत-भजनांना अभिजात संगीतात गुंफण्याच्या त्यांच्या अतुलनीय कसबासाठी. अनेक रानफुलांना गुंफून पुष्पगुच्छ दिवाणखान्यात ठेवावा तसे.

त्यांनी स्वतः रचलेल्या रागिण्यांमध्ये हे विशेष प्रतिबिंबित होते.

सुरेख लेख आणि तितकेच सुंदर प्रतिसाद..
माझ्याकडे कुमार जी अगदी लहान असतानाच्या रेकॉर्डिंग च्याच काही कॅसेट्स आहेत, आजोबा कुमारांचे भक्त होते म्हणायला हरकत नाही, त्यांचे प्रचंड आवडते गायक होते कुमारजी. त्यांची पुस्तके आणि रेकॉर्डिंग जमा करून ठेवली आहेत त्यांनी..
मला उमजलेले बालगंधर्व ही एक कॅसेट आहे, बालगंधर्वांची नाट्यगीते कुमारांच्या आवाजात ऐकायला सुरेख वाटतात..