Chatbot : डॉक्टर व रुग्णांचा संवादी यंत्रमित्र ? (२)

Submitted by कुमार१ on 19 February, 2023 - 22:15

पूर्वार्ध इथे : https://www.maayboli.com/node/83016
****************************
उत्तरार्ध
मागील भागात आपण chatbot या नवतंत्राची रुग्णांच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता पाहिली. आता डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून याकडे पाहू.
एखाद्या डॉक्टरने रुग्णाची शारीरिक तपासणी केल्यानंतर पुढील व्यवस्थापन अशा प्रकारे असते :

• प्रयोगशाळा आणि विविध प्रतिमातंत्रांवर आधारित तपासण्या
• तपासण्याचे निष्कर्ष आणि त्याचे विश्लेषण
• अंतिम रोगनिदान
• उपचार
• उपचारांचा पाठपुरावा
• रुग्णासंबंधी तपशीलवार नोंदींचे जतन

वरील सर्व प्रक्रियांमध्ये या नव्या तंत्राचा कसा उपयोग होईल ते आता पाहू. प्रयोगशाळा तपासण्यांचे निष्कर्ष बहुतांश वेळा सरळसोट असतात (हो /नाही, अमुक एक घटकाची पातळी, इत्यादी). परंतु प्रतिमा तंत्रावर आधारित ज्या अत्याधुनिक तपासण्या केल्या जातात त्यांचे निष्कर्ष बारीक निरीक्षण करून काळजीपूर्वक काढावे लागतात. या कामी बॉटचा चांगला वापर होऊ शकतो. जेव्हा एखाद्या रुग्णाचे गुंतागुंतीच्या आजारात अंतिम रोगनिदान करण्याची वेळ येते तेव्हा विविध डॉक्टरांच्या मतांमध्ये फरक पडू शकतो. प्रत्येकाचा अनुभव निरनिराळा असतो. त्यानुसार कमी अधिक प्रमाणात मतांतरे राहतात. इथे जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला तर रुग्णाच्या लक्षणांपासून ते निदान करण्यापर्यंत एक छानशी गणिती रीत (algorithm) ठरवता येते. प्रत्येक डॉक्टरने जर त्या रीतीप्रमाणेच पावले टाकली तर मानवी चुका आणि पक्षपातामुळे होऊ शकणाऱ्या चुकांत बऱ्यापैकी घट होईल.

ज्या आजारांचा अभ्यास अनेक वर्षांपासून झालेला आहे त्यांच्या निदानाबाबत सहसा डॉक्टरांना अडचण येत नाही. परंतु काही जन्मजात आणि अन्य प्रकारच्या दुर्मिळ आजारांच्या बाबतीत एकंदरीत फारसा विदा उपलब्ध नसतो. त्यामुळे अशा आजारांच्या बाबतीत बऱ्याचदा अंतिम रोगनिदान करणे शक्य होत नाही. अशाप्रसंगी या तंत्रज्ञानाची मदत घेऊन जर ‘रिअल टाईम’ विदा सातत्याने उपलब्ध झाला तर त्याचा रोगनिदान करताना बहुमूल्य उपयोग होईल.

आता रोगांच्या उपचारांबाबत पाहू. अनेक आजारांच्या बाबतीत (उदाहरणार्थ कर्करोग) उपचारांचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्या रोगाची विशिष्ट स्थिती किंवा टप्पा आणि व्यक्तिगत डॉक्टरचा अनुभव यानुसार योग्य तो पर्याय निवडावा लागतो. काही उपचारांचे दुष्परिणाम देखील रुग्णासाठी त्रासदायक ठरू शकतात. अशा वेळेस डॉक्टरांनाही खूप जबाबदारीने ते उपचार करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. इथेही पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या मदतीने अद्ययावत विदा उपलब्ध होत राहिला तर डॉक्टरांना निर्णय घेण्यास त्याची चांगली मदत होईल.

अनेक दीर्घकालीन आजारांच्या बाबतीत रुग्णांचा सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. अशा दरम्यान डॉक्टरांच्या स्मरणशक्तीचाही कस लागतो. याबाबतीत तंत्रज्ञान मानवी शक्तीपेक्षा अधिक विश्वासार्ह ठरू शकते. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या बाबतीत असंख्य गोष्टी सातत्याने कराव्या लागतात. अशा प्रसंगी डॉक्टर अथवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून अनवधानाने किंवा नजरचुकीने काही त्रुटी राहू शकतात. त्या टाळण्यासाठी तंत्रज्ञान चांगला हात देऊ शकते.

रुग्णांचे रोगनिदान, त्यांच्यावरील उपचार आणि दीर्घकालीन निरीक्षण या सर्व गोष्टींच्या रीतसर नोंदी ठेवणे हे कायद्यानुसार बंधनकारक असते. डॉक्टरी व्यवसायातील हे दमवणारे कारकुनीचे काम आहे. रुग्णव्यवस्थापन करता करता कित्येकदा डॉक्टरांच्या सहनशक्तीचा पिट्टा पडतो. त्यातून या लेखी नोंदी व्यवस्थित झाल्या पाहिजेत याचा एक मानसिक ताणही असतो. या नोंदी उत्तम प्रकारे करण्याचे काम आपण तंत्रज्ञानावर सोपवू शकतो. रुग्णाची लक्षणे आणि तपासण्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे अगदी थोडक्यात त्या यंत्रणेत भरायचे आणि त्यातून शिस्तबद्ध तयार स्वरूपातील अहवाल आपल्याला मिळू शकेल.

med notes.jpgनवतंत्राच्या मर्यादा
१. सध्या हे तंत्रज्ञान विकसनशील अवस्थेत आहे हे आपण जाणतो. त्यामुळे सध्या त्या यंत्रणेतून काही प्रश्नांना दिलेली उत्तरे खूप वरवरची आहेत; त्याला अनुभवांची जोड नसल्याचे जाणवते. कालांतराने तंत्राच्या प्रगतीनुसार यात फरक पडावा.

२. या तंत्राच्या मदतीने शारीरिक आजारांच्या बाबतीत एक शिस्तबद्ध गणिती रीत तयार करता येते आणि त्यानुसार निर्णय घेता येतील. परंतु मानसिक आजारांच्या बाबतीत मात्र प्रत्यक्ष मानवी संवाद श्रेष्ठ ठरेल. प्रत्येक माणूस हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. जरी एखाद्या मानसिक आजाराची लक्षणे ठराविक असली तरीसुद्धा तशा रुग्णागणिक डॉक्टरांना करावा लागणार संवाद वेगवेगळा असतो.

३. तंत्रज्ञानाच्या बाबतीत कधी ना कधी काही कारणाने चुका (errors) होऊ शकतात. अशा चुका जर वारंवार होऊ लागल्या तर त्याची विश्वासार्हता कमी होते. आंतरजाल सेवा सक्षम नसण्याच्या अथवा वारंवार गंडण्याच्या समस्या विकसनशील देशांमध्ये उद्भवतात.

४. तातडीच्या किंवा आणीबाणीच्या प्रसंगी उपचाराचे निर्णय भराभर पण फार काळजीपूर्वक घ्यावे लागतात. इथे डॉक्टरच्या अनुभवाचा भाग खूप मोठा राहील. आणीबाणीतील निर्णय घेण्यासाठी या तंत्रज्ञानाला मध्ये आणण्यात काही अर्थ नाही.

५. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा. नवे तंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे वैद्यकीय व्यवसायाचे बारकाईने जर बारकाईने निरीक्षण केले तर एक गोष्ट जाणवेल. इथे निर्णय घेताना बुद्धिमत्तेपेक्षा सूज्ञपणाची (wisdom) अधिक गरज असते. त्यानुसार डॉक्टरांना अंतिम निर्णय घ्यावे लागतात. रोगनिदान करण्याची जरी एक ठराविक पद्धत असली तरी देखील त्याला स्वानुभवाची जोड द्यावी लागते. वेळप्रसंगी संबंधित रीतीचे नियम वाकवावे लागतात. बऱ्याचदा पुस्तकी पद्धतीने न जाता एक मध्यममार्ग देखील काढावा लागतो. हे सगळे पाहता बॉटचे महत्त्व डॉक्टरांचा एक मदतनीस इतपतच राहावे; न्यायसंस्थेमध्ये ‘ज्यूरी’चे जे महत्त्व असते तितकेच. अंतिम न्यायाधीश हा मानवी डॉक्टरच असला पाहिजे. यंत्रमानव संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पुढचा टप्पा म्हणजे कृत्रिम सूज्ञपणा किंवा शहाणपण हा आहे असे वाचले. सध्या तरी या संकल्पना चक्रावून टाकणाऱ्या वाटतात.

गोपनीयता

या नवतंत्रामध्ये प्रत्येक क्षणी असंख्य लोकांचे विविधांगी अनुभव भरले जाणार आहेत. रुग्णाच्या आजारासंबंधीची माहिती ही गोपनीय राहणे आवश्यक आहे. म्हणून सायबर सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यात काही त्रुटी राहिल्यास गहजब होऊ शकेल. हे तंत्र विकसित करणारे उद्योगसमूह खाजगी आहेत. त्यांना मिळालेला अनेक जणांचा विदा त्यांनी काळजीपूर्वक हाताळणे अपेक्षित आहे. परंतु ते लोक त्याचा काही गैरवापर करतील का अशी भीती पूर्वानुभवावरून वाटते. सध्या आपली कुठली ना कुठली संपर्क आणि अन्य माहिती अनेक आस्थापनांकडे असते. ती खरेतर त्यांच्या पुरतीच मर्यादित राहावी अशी आपली इच्छा असते. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नाही. विविध व्यावसायिक संघटना देखील त्यांच्या सभासदांची संपर्क माहिती व्यापारी मंडळींना विकत असतात. या सर्व प्रकारांवर कठोर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

भविष्यातील आव्हाने
समजा बॉट तंत्रज्ञानाचा रुग्णांकडून किंवा सामान्यजनांकडून वाढता वापर होऊ लागला, तर कालांतराने त्यांच्या छोट्या-मोठ्या समस्यांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांची गरज लागेल का, हा प्रश्न उपस्थित होईलच. जेव्हा रुग्ण आणि डॉक्टर दोघे मिळून या तंत्राची मदत घेत राहतील तेव्हा यंत्राने दिलेले आणि डॉक्टरांचे निष्कर्ष यात जो काही फरक असेल तोही रुग्णासमोर स्पष्ट होईल. त्यातून काही गैरसमज वाढण्याची शक्यता राहतेच. सध्याच्या डॉक्टरी सल्ला पद्धतीत डॉक्टर व रुग्णांचे एक विश्वासाचे नाते आहे. ते नव्या तंत्राचा वापर करतानाही टिकवले गेले पाहिजे. त्याला तडा जाणे हे दोघांच्याही हिताचे नाही. आज ना उद्या या तंत्रज्ञानातील सखोल विश्लेषण करणारी माहिती वापरकर्त्यासाठी फुकट असणार नाही; तिच्यासाठी पैसे मोजावे लागू शकतील. समजा विविध मोठ्या रुग्णालयांनी या यंत्रणेचा वापर सक्तीचा केला तर मग डॉक्टरांच्या योग्य वेतनाचा प्रश्नही उपस्थित होऊ शकेल. (किंबहुना हे प्रश्न समाजाच्या सर्वच क्षेत्रांना लागू आहेत).

याखेरीज वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात हेराफेरी होण्याचा धोका आ वासून उभा आहे. अर्थात हे पण कुठल्याही संशोधन क्षेत्राला लागू आहे. त्यामुळे संशोधन पत्रिकांच्या संपादकांना अधिक दक्षता बाळगावी लागणार आहे. त्यांच्याकडे आलेले शोधनिबंध अस्सल आहेत की चोरीमारी केलेले, हे शोधण्यासाठी डोकेफोड करत बसावे लागणार आहे.

सध्या या सर्व शक्यता आपल्या कल्पनेत आहेत. सामान्यजनांपासून विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींपर्यंत अनेक जण या मुद्द्यांवर आपापली मते हिरिरीने व्यक्त करत आहेत. भविष्यात प्रत्यक्ष काय होईल याची आपल्याला भीतीयुक्त उत्सुकता आहे.
***************************************************************************************************************************
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीर्घ काळ उपचार चालणारे आजार व त्या वर उपचार करणे हे मोठे कठीण काम असते.
रोग्याची माहीत कृत्रिम बुधीमता व्यवस्थित ठेवेल.
डॉक्टर चे ते काम कमी होईल.
हे बरोबर आहे.
पण अशा आजारावर उपचार करण्याची एक ठराविक पद्धत नसते .
खूप साऱ्या फॅक्टर च विचार करून उपचार केले जातात.
आणि हे कृत्रिम बुध्दीमत्ता असणाऱ्या यंत्राला जमणार नाही .
त्या साठी डॉक्टर च लागणार.
त्यांच्या कडे खूप अनुभव असतो.

छान.
>>>अंतिम न्यायाधीश हा मानवी डॉक्टरच असला पाहिजे.>>> +११

अधिकार चे एकत्रीकरण ,काहीच लोकांच्या हाती सर्व सूत्र.
हे एकमेव ध्येय घेवून भांडवल शाही पुढे चालली आहे.
यंत्र,तंत्र ह्या वर योग्य त्या स्टेज वर बंदी घालण्यात आली पाहिजे.
जगातील सर्व देशातील सरकार नी ती भूमिका पार पाडावी.
नाहीतर पुढे
स्थिती कठीण आहे

<< अंतिम न्यायाधीश हा मानवी डॉक्टरच असला पाहिजे. >>
डॉक्टरची खरी ताकद म्हणजे ability to issue prescription and perform surgery.
बाकी सर्व बाबतीत AI मदत करू शकेल, कदाचित मानवापेक्षा काकणभर सरसपणे.

उपाशी बोका ह्यांच्या शी असहमत.
दीर्घ आजारात खरेच कसोटी असते..चाचणी रिझल्ट संभ्रम निर्माण करणारे असतात..
X-ray, mri इत्यादी अनेक रिझल्ट उलट सुलट असतात.
लक्षण त्याच्या शी मिळती जुळती नसतात.
एक अनुभवी डॉक्टर च योग्य निर्णय घेवु शकतो.
त्या निर्णय घेणाऱ्या डॉक्टर शी तुल्यबळ निर्णय क्षमता कृत्रिम बुध्दीमत्ता असणाऱ्या यंत्राला देण्यासाठी खूप मोठा डेटा आणि पैसे खर्च होतील
ते पैसे मानवी डॉक्टर पेक्षा खूप जास्त असतील.
प्रतेक व्यक्ती साठी वेगळा निर्णय असतो सर सकट एकच सूत्र सर्वांना लागू होत नाही

सर्वांना धन्यवाद ! विविध मतांचे स्वागत आहे.

वैद्यकाच्या इथून पुढच्या वाटचालीत मानवी नेतृत्व आणि यंत्रमानवी सहकार्य या दोन्ही गोष्टी हातात हात घालून बरोबर चालतील असे दिसते.

एक गोष्ट समजून घ्या.
गुगल वर पण आरोग्य विषयी माहिती असते.
औषध विषयी माहिती असते.
पण ते अनेक ऑप्शन दाखवतात.
सर्व बाजू दाखवतात.
आरोग्य सेवक हे व्यापारी तत्व ठेवून यांत्रिक बुध्दीमत्ता उपचार करू लागली किंवा सल्ले देवू लागली तर .
कायद्यात बदल करणे प्रथम गरजेचे आहे.
यांत्रिक बुद्धिमत्तेचा सल्ल्याने कोणी व्यक्ती दगावला तर त्याला जबाबदार कोण हे ठरवावे लागेल.
यंत्र म्हणून सोडून देता येणार नाही.
हेतू पूर्वक मनुष्य हत्येचा गुन्हा यांत्रिक बुद्धिमान रोबोट तयार करणाऱ्या माणसावर दाखल करता आला पाहिजे.
जसा डॉक्टर वर दाखल करता येतो.
सेल्फ driving cars विषयी पण हा कायदेशीर पेच आहे.
त्या car नी अपघात केला तर खटला कोणाविरुद्ध दाखल करायचा.
पहिले कायदे बदलावे लागतील

**पहिले कायदे बदलावे लागतील >>>
वैद्यकीय क्षेत्र, यंत्रमानवी तंत्रे आणि कायदा यांचा उहापोह येथे केलेला आहे :

https://www.researchgate.net/publication/337415264_Robots_Healthcare_and...
आता हळूहळू या चर्चा वाढत्या प्रमाणात होतील.

<<<<IMG-20230221-WA0011.jpg

छान
आता ही नवी पिढी उदयास आली !

दु प्र

छान माहिती आणि चर्चा.. वाचतोय

सूज्ञपणा wisdom हा माणसांमध्ये वा तज्ञांमध्ये देखील सरसकट वा एकाच प्रमाणात कुठे असतो.
एक मुद्दा विश्वासाचाही आहेच. पेशंटचा जसा एखाद्या डॉक्टरवर विश्वास असतो त्याने खूप फरक पडतो तसे उद्या उलट होऊ शकते. मशीन चांगले ॲनालाईज करून रिझल्ट देते म्हणून पेशंटचा विश्वास त्यावर जास्त बसू शकतोच.

धन्यवाद !
****************************

अजून चॅटबॉट तंत्रज्ञान त्याच्या बाल्यावस्थेत आहे. परंतु, सध्या सुद्धा आंतरजालावरील मजकुराच्या बेधडक चोऱ्या होत आहेत. अमेरिकेतील एका नामवंत विद्यापीठातील कर्करोगतज्ञाने अशा चोऱ्या करून एक पुस्तक लिहिलेले आहे :
The Book of Animal Secrets: Nature's Lessons for a Long and Happy Life.
By : David B. Agus, MD,

या पुस्तकात एकूण 95 ठिकाणी लेखकाने अन्य ठिकाणाहून मजकुराच्या चोऱ्या केल्याचे आढळले आहे. अन्य पुस्तके तसेच विकिपीडियावरील मजकूर कोणतेही श्रेय न देता लेखकाने बेधडक वापरलेला आहे.

हे उघडकीस आल्यानंतर आता पुस्तकाची विक्री कायद्याने थांबवण्यात आलेली आहे.

https://www.latimes.com/science/story/2023-03-06/book-of-animal-secrets-...

कृपया पेवॉल असणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्स/एल. ए. टाईम्सच्या लिंक्स देऊ नयेत ही नम्र विनंती.

https://www.thedailybeast.com/dr-david-agus-book-the-book-of-animal-secr...

<< आंतरजालावरील मजकुराच्या बेधडक चोऱ्या होत आहेत >>
याच्यावर आधीपण भरपूर चर्चा झाली आहे. पण हरकत नाही, मत मांडायचे असेल तर मी पण माझे मत पुन्हा एकदा देतो.
आंतरजालावरून चोऱ्या होतात अशी भीती कुणाला असेल तर त्याने/तिने आंतरजालावर लेखन करू नये अथवा creative commons सारखे लायसन्स वापरावे ज्यामुळे स्वत:चे नाव आंतरजालावर बघायची हौस भागेल.

चॅटबॉट तंत्रज्ञान हे माझ्या मते अतिशय उपयुक्त साधन ठरणार आहे, ज्याचा वापर डॉक्टरांना १ उपयुक्त साधन (tool) म्हणून वापरता येईल.

तसेच ChatGPT वापरून सामान्य व्यक्तीला पण सुलभतेने लेखन करता येईल. मुख्य म्हणजे 'कलाकारांच्या/कॉपीरायटरच्या' व्यवसायाला धोका आहे. ChatGPT सारखे तंत्रज्ञान वापरून, 'आर्ट' हा प्रकार (संगणकावर लेखन, कविता, चित्रकला, संगीत बनवणे) सामान्य लोकांना सुध्दा त्यामुळे सहज जमू लागेल आणि creativity चे स्तोम माजवले जाते ते कमी होईल अशी आशा आहे. (प्रत्यक्षात तसे होणार नाही याची कल्पना आहे कारण कॉपीराइटचा बागुलबुवा अजून वाढेल.)

काही बिगर-इंग्लिश भाषांमध्ये प्रसिद्ध होणारे मूळ संशोधन जेव्हा इंग्लिश विज्ञानपत्रिकेत अनुवादित केले जाते तेव्हा खालील प्रकारची टीप दिलेली एका ठिकाणी आढळली. ती उल्लेखनीय आहे :

This article was translated from “XYZ” using several editorial tools, including AI, as part of the process. Human editors reviewed this content before publication.