ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड! - चित्रपट पठाण

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 January, 2023 - 08:09

ओनली शाहरूख खान कॅन सेव्ह बॉलीवूड!

गेले वर्षभर नऊ महिने हेच ऐकतोय.

२ मार्च २०२२ ला पठाण चित्रपटाची रीलीज डेट सांगणारा विडिओ यूट्यूबवर रीलीज झाला आणि बघता बघता दहापंधरा मिलिअन व्यू त्या डेट अनाऊन्समेंट सोहळ्याला पडले.

पुढे कधीतरी त्याचा टीजर आला, ट्रेलर आला. त्यातले बहुचर्चित बिकीनीधारी दिपिकाचे गाणे आले. दरवेळी तितकीच घमासान चर्चा झडू लागली.

हल्ली एक बॉयकॉट ट्रेंड म्हणून काही सुरू झालेय. मी स्वतः कधी त्या वादात पडलो नाही, वा त्या नादात माझ्यातला चित्रपटप्रेमी मरू दिला नाही. पण तिथल्या रडारवरही शाहरूखचा पठाण आला आणि चर्चेचा भडका ऊडू लागला.

या सगळ्यात मी एक नाईंंटीज किड आणि शाहरूखचा निस्सीम चाहता या नात्याने ती सगळी चर्चा एंजॉय करत होतो. पण त्याचवेळी मनाने हे देखील स्विकारले होते की शाहरूख आता संपला आहे. मी स्वतःच "चेन्नई एक्स्प्रेस" वा एखाद्या "डिअर जिंदगीचा" अपवाद वगळता गेली कित्येक वर्षे त्याचा कुठला चित्रपट थिएटरला जाऊन बघायचे धाडस केले नाही, तर ईतरांकडून काय अपेक्षा करणार होतो.

पठाणचा ट्रेलर पाहिला आणि पुन्हा हे मागच्या पानावरून पुढे चालू होणार असेच वाटले. अ‍ॅक्शन हा त्याचा प्रांतच नाही. जी जादू त्याच्या अदाकारीत आहे ती वीएफएक्समध्ये कुठली. त्यातही चित्रपट चुकून थोडाफार चालला तर त्याचे श्रेय स्पेशल ईफेक्ट्सना जाणार, आणि पडला तर मात्र खापर शाहरूखच्या डोक्यावर फोडले जाणार याची कल्पना होती. हे सर्व ऐकायची आणि पचवायची मनाची तयारीही होती. कारण मुळात मला शाहरूख चित्रपटांच्या पलीकडे आवडत आलाय.

त्याचा ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स, त्याचा स्टेजवरचा वावर, त्याच्यातली उत्स्फुर्त एनर्जी.. या सर्वांमुळे त्याच्या मुलाखती, त्याच्या जाहीराती, त्याचे फिल्म शोमधील अँकरींग हे सारे काही नेहमीच बघायला आवडते. त्याचे चांगले चित्रपट यायचे बंद झाले तेवढ्याने माझे शाहरूखप्रेम आटणार नव्हते. आजही मी त्याचे जुनेपुराणे सिनेमे हुडकून बघतो, आणि आठ वर्षांच्या लेकीलाही दाखवतो. कारण त्यांची रीपीट वॅल्यू अफाट आहे आणि शाहरूख आवडायचे वय नसते.

लोकं म्हणायचे की त्याने आता सेकंड इनिंग सुरू करावी. खूप झाले स्टारडम. आता आपल्यातील अभिनेत्याला न्याय द्यावा. लोकांची अभिरुची बदललीय. तर त्यानेही आपली किंग ऑफ रोमान्स ईमेज बासनात गुंडाळून ठेवावी.. वगैरे वगैरे..

पण ते ही ठिकच होते म्हणा, कारण वयही झालेच होते त्याचे. त्यालाही ते कळत असावे. त्याचेही फॅन, रईस, झिरो, डिअर जिंदगी अश्या चित्रपटातून काही वेगळे करता येईल का हे चाचपणे चालूच होते. पण त्यातही कुठेही स्टारडमशी कॉम्प्रोमाईज करणे त्याला मंजूर नव्हते.

चित्रपटांची निवड चुकत होती म्हणा किंवा जे करत होता ते त्याला सूट होत नव्हते म्हणा, वा खरेच लोकांची अभिरुची बदलली असावी जे त्याचे चित्रपट आपटतच होते.

पण तरीही आत कुठेतरी सुप्त ईच्छा होती की त्याला यातून मार्ग मिळावा. आजही त्याचे जे कामाप्रती समर्पण आहे त्याला न्याय मिळावा. यातून काहीतरी सुवर्णमध्य साधला जावा. आणि तेच नेमके पठाणने केले... येस्स..! शाहरूख ईज बॅक !!

या सुपर्रस्टार खेळाडूने नेमके तेव्हाच परफॉर्म केले जेव्हा त्याच्या बॉलीवूड संघाला सर्वाधिक गरज होती.
ओनली शाहरूख कॅन सेव्ह बॉलीवूड - या चाहत्यांच्या अपेक्षांची त्याने लाज राखली.

आज जे काही मी थिएटरात बघून आलो त्याने मन तृप्त झाले. गेल्या दोन दिवसात पठाण बघून आलेल्या (तटस्थ) मित्रांनी तो छान एंटरटेनिंग आहे असे सांगितल्याने अपेक्षा किंचित वाढल्या होत्या. शाहरूखने त्या वाढलेल्या अपेक्षादेखील पुर्ण केल्या.

त्याचा तो ह्युमर, त्याचे ते चटपटीत संवाद, त्याचे ते मिश्कील हास्य, त्याचा तो रोमान्स, त्याचे ते इमोशन्स आणि भावनिक प्रसंगात बोलणारे डोळे, त्याची ती उत्स्फुर्तता... सारे काही पुन्हा जमून आले.

सिक्स पॅक आणि डोलेशोल्ले दाखवणारी बॉडी व्यायामाने बनवतात की यामागेही काही तांत्रिक कमाल असते कल्पना नाही, पण तेही त्याला सूट होत होते. डोळ्यात बदाम बदाम बदाम येत होते.
ईथे त्याचा डॉनमधील चकाचक स्मगलर लूक नव्हता की मै हू ना चित्रपटासारखा लव्हरबॉय मेजर नव्हता. तर खर्राखुरा बॉडीबिल्डर अ‍ॅक्शन हिरो लूक होता. आणि त्यातही तो जॉनसमोर कुठे कमी भासला नाही. (जॉनचे हे होमपीच असल्याने कोणी म्हटले, छे जॉनच हॉट दिसत होता तर ते ही मान्य आहे Happy )

वीएफएक्स आणि अ‍ॅक्शन कमाल होती. त्यासोबत तितकीच कमाल बॅकग्राऊंड म्युजिक होती. याआधी कुठल्या बॉलीवूड वा भारतीय चित्रपटात या तोडीचे काम पाहिले नाही. त्यामुळे तुलनेला हॉलीवूडच घ्यावे लागणार. पण तरीही मला कुठल्याही हॉलीवूड चित्रपटाआधी हा बघायला आवडेल कारण याला भारतीय ईमोशन्सचा टच आहे. तसेच आपल्या ईतिहास भूगोलाचे आपल्याला रिलेट होणारे संदर्भ आहेत. असे चित्रपट आपल्याकडेही यावेत अशी ईच्छा होतीच. जी आज खुद्ध शाहरूखनेच पुर्ण केली. (हे म्हणजे पहिले एकदिवसीय द्विशतक सचिन तेंडुलकरच्याच बॅटमधून यावे अगदी तसली फिलींग आली Happy )

अश्या चित्रपटांमध्ये खरे हिरो स्पेशल ईफेक्ट असतात, अ‍ॅक्शन सीन असतात, कॅमेरा आणि बॅकग्राऊंड म्युजिक असते. असे कितीही म्हटले तरी आणि ते तितकेच उत्तम जमून आले असले तरी, चित्रपटातील ९५ ते ९८ टक्के फ्रेम्समध्ये शाहरूख हा आहेच. त्यामुळे हा चित्रपट त्याचाच वाटतो. तो शीर्षकापासून ईत्र तित्र सर्वत्र आहे. पण तरीही जॉन, दिपिका, डिंपल वा आशुतोष राणा यांच्या कॅरेक्टरवर कुठेही अन्याय झाला नाही. सारेच छान डेव्हलप झालेत.

जॉन अगदी तसाच आहे जसा तो आवडतो. लहानपणी जेव्हा ईंग्लिश चित्रपट बघायचो तेव्हा त्यातले व्हिलन (बरेचदा हिरोपेक्षाही) स्मार्ट हँडसम आणि चिकणे बघून वाटायचे की आपल्याकडेच का क्रूरता दाखवायला शारीरीक व्यंग वा अक्राळविक्राळ चेहरे लागतात. ती वागण्यातूनही दाखवता येऊ शकतेच, जेणेकरून कोणी बाह्यसौंदर्याला भुलू नये. पण गेले काही वर्षात आपल्याकडेही हा ट्रेंड बदलला आहे. आणि अश्या व्हिलनमध्ये जॉनचा नंबर फार वरचा आहे. पठाणमध्ये तो आणखी एक पायरी वर चढला आहे. दिसण्यातही आणि अभिनयातही.

दिपिकाबाबतही अगदी हेच म्हणता येईल जे जॉनबाबत. बेशरम रंग या आयटम साँगमध्ये तिने ते केले जी पब्लिसिटी आणि मार्केटींगची गरज होती. पण चित्रपटात कुठेही ती शोभेची बाहुली वाटत नाही. तिचेही अ‍ॅक्शन सिक्वेन्स तोडीस तोड आहेत. सोबत डिंपल कपाडीया आणि आशुतोष राणा या दोघांनाही आपापल्या भुमिकांमध्ये बघून छान आणि नॉस्टेल्जिक वाटले.

बिकीनीसाँग वरून आठवले, शाहरूखचे ईतर कुठलेही चित्रपट सहकुटुंब सहपरीवार बघण्यासारखे असतात, तसाच हा देखील आहे. हे सलमानच्या चित्रपटांनाही लागू होते. त्यांना आपला टारगेट ऑडीयन्स पक्का ठाऊक आहे. त्यामुळे निश्चिंत राहा.

आमच्या थिएटरमध्ये खूप काही टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या अश्यातला भाग नाही. ते पब्लिक कशी आहे त्यावरही अवलंबून असते. पण लोकं चित्रपट एंजॉय करत होते हे त्यांच्या हसण्यावरून कळत होते. तरी शिट्ट्या आणि टाळ्या दोन जागी आल्याच. एक शाहरूखच्या एंट्रीला. पण त्याचा चेहरा दिसला तेव्हा नाही आल्या, तर त्याने झप्पकन उडी मारत त्याचा पहिला स्टंट केला तेव्हा आल्या. आणि तेव्हाच समजले, भाई ये पिक्चर मे शाहरूख कुछ स्पेशल करनेवाला है. तसेच दुसरा जल्लोष अर्थातच सलमानच्या एंट्रीला झाला. किंबहुना शाहरूखच्या एंट्रीपेक्षाही जास्त झाला. तो सीनही लोकांनी फार एंजॉय केला. तो त्याचसाठी आणि तसाच बनवला होता. शाहरूख सोबत होताच.

ईतर तांत्रिक बाबींबाबत मी फार डिट्टेलवार सांगू शकत नाही. तितका माझा चित्रपटांचा अभ्यास नाही. पण खरे सांगायचे तर सामान्य चित्रपटप्रेमींनाही फार अभ्यासू मतांशी घेणेदेणे नसते. त्यांना चित्रपट एंटरटेनिंग आहे की नाही हेच जाणून घेण्यात रस असतो. आणि मनोरंजनाच्या स्केलवर तो पैसा वसूल आहे ईतके खात्रीने सांगू शकतो.

मला आठवतेय, लहानपणी शाहरूख आवडीचा असल्याने त्याच्या नवीन चित्रपटांचे रिव्यू आवडीने वाचायचो. तेव्हा आमच्या घरी येणार्‍या वृत्तपत्रात "कुछ कुछ होता है", "दिल तो पागल है", " परदेस" या त्याच्या चित्रपटांची तर्काच्या निकषावर तूफान खेचली जायची. प्रत्यक्षात पुढे जाऊन मी ते चित्रपट कैक वेळा पाहिले. तेव्हाच माझ्या बालमनावर एक गोष्ट ठसली, की या अभ्यासू लोकांना लॉजिक शोधत बसू दे, आपण मात्र मॅजिक बघावे आणि चित्रपटांचा आनंद लुटावा Happy

तरीही चित्रपटाची एडीटींग कमाल आहे. चित्रपट वेगवान आहे आणि कुठेही कंटाळवाणा सीन येणार नाही याची काळजी घेतली आहे. फार लांबड न लावता दोन तास सव्वीस मिनिटात अ‍ॅक्शनपॅक मूवी बसवला आहे. अगदी शाहरूख-सलमानचा सीनही मस्त जमतोय म्हणून उगाच ताणला नाहीये.

अरे हो, गाणे चित्रपटात एकच आहे. बेशरम रंग. दुसरे गाणे "झूमे जो पठाण" आहे ते शेवटी चित्रपट संपल्यावर येते. ते गाणे फार श्रवणीय नसले तरीही पब्लिक पुर्ण बघते. हे त्यांना चित्रपट आवडल्याची पावती समजू शकतो. आम्हालाही आवडला म्हणूनच आम्हीही खुर्ची सोडली नाही.

असो,
जाता जाता ...
थिएटरात चित्रपट बघणार्‍या पब्लिकला दोन विशेष टिप्स -

१) सर्वात आधी दोन मिनिटे शांतता त्यांच्यासाठी जे ईंटरव्हलनंतर बरेच लेट जागेवर आले. त्यांनी सलमानची एंट्री मिसली. तुम्ही असे बिलकुल करू नका.

२) चित्रपटाच्या शेवटी येणारे "झूमे जो पठाण" गाणे अर्धवट सोडून जायचा मोह झाला तरी तो आवरा. तुमच्या शेजारचा उठला तर त्यालाही खाली बसवा. कारण गाणे संपल्यावर एक धमाल सीन आहे. तो आवर्जून बघा.
देश का सवाल है भाई, बच्चों पे नही छोड सकते!
नाही कळलं..., तुम्ही पिक्चरच बघा Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून चालणार.. कारण पिक्चरमध्ये दम आहे. नुसता मार्केटींगवर चालत नाहीये. शाहरूखची जादू पसरलीय चित्रपटभर.. करून दाखवलेय त्याने.. आज याचि देही याचि डोळा बघून आलोय लोकांमधील उत्साह

अजून चालणार.. कारण पिक्चरमध्ये दम आहे>> ओ चालणार नाही धावणार .. अशी कलाकृती होणे शक्य नाही . सगळ्या देशात एकच चर्चा आहे .
आता अटकेपार झेंडे गाडायचे आहेत . थेट धडक ऑक्सर साठी ..

एक व्हिडिओ फॉरवर्ड होतोय .
मद्रशा वर मिसाईल पडायला एक मिनिट अवकाश असतो, मदरशात ३० मुले असतात , सारुक हातात मोबाईल घेवून सैरवैर पळत असतो .
त्या मोबाईल ला टार्गेट करून मिसाईल सोडलेले असते , म्हणून सारुक मिसाईल च्या मार्गात मोबाईल फेकतो .
हवेतच मोबाईल ला मिसाईल धडकते , स्फोट होतो , मदरशातील ३० मुलांचे जीव वाचतात .
भन्नाट आयडिया !
आत्ता मला समजले पठाण मूव्ही हिट करणारे किती बुद्धिमान असतील !
कोपरापासून नमस्कार हो Happy

आत्ता मला समजले पठाण मूव्ही हिट करणारे किती बुद्धिमान असतील !
>>
सगळे मूवी हिट करणारी पब्लिक सेमच असते. कोणी परग्रहावरून येत नाही Happy
हा चित्रपट तर भारतातील एकूण एक व्यक्ती बघणार हे नक्की. तरी मी हाच सल्ला देईन की मोबाईल वा टीव्हीवर बघण्याऐवजी थिएटरलाच बघून घ्या. ईतकी भारी अ‍ॅक्शन आणि ती करणारा खुद्द शाहरूख हा छोट्या स्क्रीनवर मजा नाही देणार..

नक्की बघेन पण ott वर !
इतके कॉमेडी मी सीन कसा सोडेल ? Happy
बाय द वे वर उल्लेखलेल्या सीन बद्दल तुमचे काय मत आहे , ऋन्मेश राव ?

थेट धडक ऑक्सर साठी ..
>>>
छे, ऑस्करला आपण वाळवी पाठवूया
हे बघा
https://www.maayboli.com/node/82902

हा चित्रपट बोक्स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडणार हे मात्र नक्की.
रेकॉर्ड काय आहे आजवरचा?

बाय द वे वर उल्लेखलेल्या सीन बद्दल तुमचे काय मत आहे , ऋन्मेश राव ?
>>>>

छान आहे सीन. त्यामागील तंत्र तुम्ही लिहिले आहेच. बाकी ती मुले कोण, शाहरूख तिथे कसा पोहोचला हे अर्धामुर्धा सीन बघून समजणार नाही, मागचा पुढचा बघणे गरजेचे. ते मी इथे बोल्लो तर स्पॉईलर होईल. ते तुर्तास टाळूया Happy

पठाण आज बघितला. फुल्ल पॅक्ड थिएटर होते. आणि बुक माय शो वर ३०% बुकिंग दिसत होते, पण ऑन द स्पॉट रांगा होत्या तिकिटासाठी.
सिनेमाच्या सुरुवातीपासून नोट्स -
हेवी स्पॉयलर !!! सिनेमा बघायची इच्छा असल्यास वाचू नका.
१. थीम म्युजिक पैकी एक पिस "रंग हे नवे नवे" गाण्यासारखा आहे. म्हणजे फक्त "रंग हे नवे नवे" या ओळी इतका भाग.

२. जॉन अब्राहमचा पाठलाग शाहरुख एकटा करू शकत नाही का ? गाडीत चार पैलवान भरून कशाला जायचे बुवा ? "सर वो रही ग्रे मस्टांग" ही मदत काय ? अरे दिसतय की बॉसला पण.

३. ट्रोप १- पठाणच्या कपाळावर पिस्तूल टेकवली आहे. उगाच का वाट बघायची ? चटकन ट्रिगर दाबा. उगाच त्याला काहीतरी ऐकवण्याचा मोह आवरा. एकतर त्याचा कमबॅक डायलॉग तुमच्यापेक्षा खूप भारी असणारे आणि वरून तो वाचणार हे पण. डबल नुकसान टाळा. संधी मिळताच पहिल्या क्षणी ट्रिगर दाबा.

४. ट्रोप १.२- व्हीलन हिरोला उगाच स्टाईल मध्ये मारायचा हट्ट धरतो. त्यामुळे हिरो जिवंत राहतो. पठाण उलट्या गाडीमध्ये सीटबेल्ट ने बांधला गेला आहे. तिथेच डोक्यात गोळी का नाय घातली ? पण नाही. उलटे चालत जात असताना स्टाईल मध्ये पेट्रोलच्या डबक्यात गोळी मारणार, मग गाडीपर्यंत नीट आखलेली पेट्रोल ची रेषा जळत जाणार, मग गाडी पेटणार आणि मग पठाण मरणार. इतका कॉम्प्लेक्स प्लॅन कशाला मी म्हणतो ? जॉन ला घाई एव्हढी की जॉन पठाण मेला का नाही बघायला पण थांबत नाही. बर, एव्हढी घाई करून पण पठाण हेलिकॉप्टर घेऊन येतोच बरोब्बर काही मिनिटात जॉनच्या मागे.

५. काही साम्ये १- जॉन मास्क घालतो आणि मास्कमागचा दबलेला आवाज वैगरे सगळे प्लॉट ला काहीही संबंधित नाहीये, कारण पुढच्याच सीनमध्ये जॉन मास्क काढून आपला चेहरा दाखवतो. एकूण सगळे प्रकरण डार्क नाईट राईझेस मधल्या बेन वरून इंस्पायर झाल्याचे वाटले. म्हणजे तिथला प्रकार लेखकाला आवडला, aesthetically, श्टोरीत डायरेक्ट घातला, मग तो मास्क प्लॉट सर्व्ह करो वा न करो.

६. काही साम्ये २- उलट्या गाडीत अडकलेला पठाण जॉन त्याच्याकडे चालत येताना बघत असतो. पुन्हा, द बॅटमॅन मधल्या कार चेसची आठवण झाली.

७. दीपिका आणि बेशरम रंग -
खरखुर सांगतो. मला सिनेमांमध्ये सुंदर आणि कमी/शून्य कपडे घातलेले सुंदर कलाकार (स्त्री/पुरुष) पाहायला मनापासून आवडतात. ट्रॉय, टायटॅनिक, ३००, द रीडर, द ड्रिमर्स, मलेना, आईज वाईड शट इत्यादी सिनेमे मी अतिशय चवीने पाहिले आहेत. आयटेम साँग्ज सुध्दा काही आवडतात. कजरारे, बिडी जलायले ई. बेशरम रंग आवडले नाही. का मैत का.
तपासासाठी पठाण स्पेन का जाणार हे समजते. "पठाण काय लक्की आहे, त्यालाच नेहमी भारी ठिकाणी जायला मिळते" असे एक जण म्हणतो. पुढच्या सेकंदाला "en esta noches la vida" असे गाण्याचे खूप खूप स्पॅनिश बोल कानावर पडतात. त्याच्या पुढच्या सेकंदाला स्किंपी कपड्यात दीपिका. काही सेकंदात पठाण आणि दीपिका सेक्सी नाच करत आहेत. काही सेकंदात दीपिका पठाण ला चिकटली आहे. त्यानंतर काही सेकंदात दीपिका सजेस्टीव्ह हावभाव करत पठाणला एकांतात घेऊन जाते. असे भरभर सगळे घडते. "मुलीशी जवळीक करणे" ही मिषनची गरज आहे का, प्रश्न पडायला वेळ मिळत नाही. एकूण ते गाणे जरा जास्तच वाटले. नॉट टू मेंशन, पठाण फारसा हुशार नाही असे वाटते. (Only to be confirmed by the rest of the movie. कबीर वैगरे इतर स्पाय लोकं ही पद्धतशीरपणे विचार आणि प्लॅन करून काम करणारी आहेत तर पठाण आधी वागतो आणि मग विचार करतो असा काहीसा थेट डायलॉग आहे सिनेमात.)
पण ह्या गाण्यावेळी एक जोक झाला. थेट्रात कोणीतरी ओरडले "रणव्या डोळे मिट रे" तेव्हा सगळे हसले.

८. ट्रोप १.३- हिरोचा रस्ता अडवायला व्हिलन काही करतो, तर हीरोचा रस्ता अडवणे दूर, उलट हीरोला गाडी उडवायला मस्त रॅम्प तयार होतो. भले मग सदर जागा एक प्रचंड गोठलेला जलाशय का असेना.

९. सज्जन व्हीलन- पठाण दीपिकाला वाचवायला गोठलेल्या तळ्यात उडी मारतो. जॉन समोर उभाच असतो. वर यायला एकच भोक आहे. पठाण वर आला रे आला एका दोन मिनिटात की तिथेच टिपायचे गोळीने असा प्लॅन जॉन सहज करू शकला असता पण नाही. Chivalry is not dead yet. जॉन हा परफेक्ट जेंटलमन आहे (आतंकवादी आहे हा भाग सोडून) तो असल्या अनिथिकल गोष्टी करत नाही.

१०. पठाण आणि दीपिका ही केमेस्ट्री बिलकुल जमत नाही. जी काही बिल्ड होते ती मध्येच खचते कारण समजते की दीपिका नाटक करत होती, आणि त्याला अतिशय खराब फसवते. त्यानंतर पुन्हा बिल्डप नाहीये. त्यामुळे पठाण उगाच अत्यंत भावविभोर होऊन दीपिकाशी का बोलतो, रक्षण करीन वैगरे का म्हणतो हे समजत नाही. का रे वेड्या ? तिने तुला गुंडाळून कचऱ्यात टाकलेले की. ते आठव.

११.- रशिया आपला मित्रराष्ट्र आहे. तिथे मिशन केल्यास आणि काही विध्वंस झाल्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. (ओके.)
- पठाण न जुमानता जातोच. (ओके.)
- पठाण पकडला जातो, आणि भारतीय अधिकारी त्याला वाऱ्यावर सोडतात. (ओह! ओके.)
- पठाण ला सोडवायला टायगर (श्रॉफ नव्हे, जिंदा टायगर) येतो. (ओ....के?)
- पठाण आणि टायगर रशियन ट्रेन उडवतात. (ओ हे काय ? मित्रराष्ट्र चिडणार...)
- दोघे मिळून पन्नास एक रशियन पोलीस मारतात, एक रशियन हेलिकॉप्टर पडतात. (....)
च्यामारी. मग आधीच व्यवस्थित रशियन अधिकाऱ्यांना सहभागी करून त्यांची मदत घायची होती की. असो, गेले एक मित्रराष्ट्र. बोंबला.

१२. इल ट्रिटेड सॅक्रिफैजेस - एक नेहमीचे दुखणे-
आपण बऱ्याचदा बघतो की काहीतरी, किंवा कोणाचे तरी रक्षण करण्यासाठी हिरो संकटात उडी मारतो, आणि आपण gasp करतो, हिरो जखमी झाला आहे. संकट दूर होते, हिरो चारदोन मिनिटे कण्हतो... आणि पुढच्या क्षणी टकटकित दिसतो. ह्याने हिरोच्या बलिदानाचे महत्व शून्य होते.

आठवा. टोबी स्पायडरमॅन टॉम स्पायडरमॅन ला खून करण्यापासून अडवतो, तो गोब्लिन मागून टोबिला भोसकतो. मी ओरडलो - टोबि !!! नाही !!! पुढच्या दोन मिनिटात टोबी हसत खेळत विनोद करत होता. हाड. हे फसवणे झाले. काहीतरी consequences असूद्या ना गंभीर गोष्टींचे.
इथे जॉन कडून ट्रिगर मिळवण्यासाठी पठाण स्वतः चे रक्षण न करता ट्रिगर घेतो, आणि भोसकला जातो. आणि त्याआधी सुध्दा मारच खात असतो. पण आता त्याला नवा जोश येऊन तो जॉनला हरवतो. दोन मिनिटांत - "झूमे जो पठाण ..." ही फसवणूक आहे. आमचा ब्रूस बिल्डिंग वरून पडतो, टॅक्टिकल आरमर असूनही त्याचे पाय निकामी होतात, म्हणून आम्ही उत्सुकतेने बघतो.

१३. काही साम्ये ३ - पठाण ची केशभूषा AOT मधल्या एरेन सारखी आहे. पण शाहरुख वर शोभून दिसतेय.images (5).jpegimages (4)_0.jpeg

क्लोजिंग रिमार्क -
सिनेमा एक उत्तम अनुभव होता. म्हणजे, बघताना मजा आली, even though, हा सिनेमा म्हणून इतका काही खास नाहीये. पण थिएटर मधले वातावरण जबर होते.

स्कोर्सेजी आजोबा म्हणतात किनाई, तसे - हा सिनेमा नाहीये. थीम पार्क मधली एक राईड आहे. प्रत्येक क्षण तुम्हाला थरारून सोडेल, हसवेल, arouse करेल, राष्ट्रभक्ती चेतवेल अश्या उद्देशाने लिहीलाय. इथे पात्र निर्मिती हा उद्देश्य नाही. असला तरी पुढचा सिनेमा बनवता येईल इथपर्यंतच. इथे काही फार धीरगंभीर गोष्ट सांगायची नाहीये. इथे शेवट काय होणार आहे हे ठरलेलेच आहे - एखाद दोन मायनर मुद्दे सोडून. पात्रांचा आर्क सुध्दा माहीतच आहे. Marvel चे सिनेमे मोर ओर लेस असेच असतात. पण तरीही काही आवडतात काही नाही. पठाण सिनेमा म्हणून आजिबात चांगला नसला तरी थिएटर मध्ये पाहायला मला मजा आली.

कॉमी एकदम पटली सगळीच पोस्ट. इतका विचार करायला सिनेमा बघताना वेळ नाही मिळाला आणि म्हणूनच आवडला आणि हिट होत असणार. बाकी शारुक ला ते जॉनी डेप केस मस्त सुट होतात.
आणि व्हीलन/ हिरोला ला गोळ्या घाला, ताबडतोब मारा हे गृहितक लक्षात ठेवलं तर मग फारच कमी पिक्चर उरतील हो! Happy
हॅरी पॉटर राहील हो आमचा.

हो मस्त लिहिलंय. शेवटचा पॅरा अगदीच पटला. असे बरेच चीजी , इल्लॉजिकल वगैरे पॉइन्ट आहेत हे खरं पण मूव्ही बघताना मजा आली हे तेवढेच खरे Happy सौदिंडियन भडक सिनेमांची लाट येण्यापेक्षा असले प्रयोग बघायला आवडतील बॉलिवुडकडून.

* स्पोईलर अलर्ट *

बाकी पिक्चर चांगला आहे. पण ते बर्फात मोटारसायकल चालवताना हेल्मेट घालत नाहीत, हे खटकले. Happy

हर्पा चेहर्‍याला जस्ट स्किनकेअर मास्क लावला आणि तो जरा वाळून सेट होतो न होतो तो इथे आले व तुमची कमेन्ट वाचली. सगळा सेट झालेला मास्क हसण्यामुळे विस्कळित झाला Happy

सॉरी सामो.

कॉमी, तुमचा प्रतिसाद आत्ता वाचला. सहमत.

काल रात्री पाहिला. Entertaining!! मैत्रेयीला अनुमोदन!! शेवटचा dialogue भारी :-). खुप उशीराचा शो असल्याने कुणीच नव्हतं. आम्ही ग्रुपने गेलो होतो, त्यामुळे एकदम धमाल आली.

पण ते बर्फात मोटारसायकल चालवताना हेल्मेट घालत नाहीत, हे खटकले. Happy
>.>>

एवढे तीन चिकणे चेहरे .. कसे हेल्मेटआड झाकणार.. त्या सीनची फेसवॅल्यू कमी झाली असती ना Happy

कॉमी छान प्रतिसाद.
काही मुद्दे पटले वा काहींवर उत्तरेही देता येतील. पण मुळातच त्या वकिलीची गरज नाही. तुम्ही शेवटी म्हटल्याप्रमाणे चित्रपट बघताना या गोष्टी बिलकुल रसभंग करत नाहीत. एंटरटेनमेंट फुल्लऑन होते. पिक्चर एंजॉय करून घरी आल्यावर फावल्या वेळेत या चुकांची चर्चा करणे हा छान टाईमपास आहे. ते बोनस एंटरटेनमेंट समजावे Happy

एवढे तीन चिकणे चेहरे .. कसे हेल्मेटआड झाकणार.. त्या सीनची फेसवॅल्यू कमी झाली असती ना Happy>>>
फेसवॅल्यू!

.

Pathaan box office collection Day 5: Shah Rukh Khan film earns Rs 542 crore worldwide within extended weekend, destroys records in India and the US

.

Pathaan box office collection Day 5: Shah Rukh Khan film earns Rs 542 crore worldwide within extended weekend, destroys records in India and the US

गंमत म्हणजे ५४२ ह्या संख्येला फक्त १, २ आणि २७१ नेच निःशेष भाग जातो आणि ह्या चित्रपटात (स्टार व्हॅल्यू नुसार) बॉलीवुड मधील १, २ आणि २७१ क्रमांकाचे नट आहेत. Wink

<< गंमत म्हणजे ५४२ ह्या संख्येला फक्त १, २ आणि २७१ नेच निःशेष भाग जातो आणि ह्या चित्रपटात (स्टार व्हॅल्यू नुसार) बॉलीवुड मधील १, २ आणि २७१ क्रमांकाचे नट आहेत. >>

------- फार महत्व आहे ५४२ ला...
५(४+२) = ५६

भारतीय चित्रपट सृष्टी दर्जा हिन झाली आहे.
१४० करोड लोकसंख्या त्या मधील ७५ करोड तरी थिएटर मध्ये जावून सिनेमा बघणारे आहेत पण किती जातात सिनेमा बघायला .
दोन करोड लोक पण जात नाहीत.

विदेशात भारतीय व्यक्ती सोडला तर बाकी कोणी भारतीय सिनेमा कोणी बघत नसेल.

शरुख काय करणार.
त्याचे सिनेमे पण दर्जा हिन च असतात.
जुरासिक पार्क सारखा जनावर असणारा सिनेमा पण भारतातील मोठ मोठे ॲक्टिर,दिग्दर्शक,लेखक ह्यांच्या सिनेमा पेक्षा खूप उच्च दर्जा चा आहे

१४० करोड लोकसंख्या त्या मधील ७५ करोड तरी थिएटर मध्ये जावून सिनेमा बघणारे आहेत
>>>>

वाटत नाही. कित्येक करोड लोकं असे असतील ज्यांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असेल..

Pages