'पोटतिडीक असणे' हा जीवनातील अनेक सद्गुणांपैकी, एक उत्तम सद्गुण आहे असे माझे मत झालेले आहे. एखाद्या मुद्द्याबद्दल कळवळ असणे, त्या मुद्द्याकरता, जीव तुटणे. एखाद्या व्यक्तीची मनापासून बाजू घेणे. कोणासाठी तरी जीव तुटणे, त्या व्यक्तीचे भले व्हावे, समाजाचे त्या दॄष्टीने भले व्हावे याची स्वतःला नितांत गरज वाटणे - हे निव्वळ सुंदर असते. मग एका सामान्य आईला आपल्या अपत्याचे भले व्हावे असे वाटणे असो वा समाजसुधारकांचे ध्यासपर्व असो.
नाहीतर बाकी कोमटपणा, स्वतःला तोषिसही न पडू देणे, स्वतःच्या पुरता पहाणे, कातडी बचाउ स्वभाव. हे प्रचंड दीन आहे, केविलवाणे जीणे आहे. पुरुषार्थहीन जगणे , निव्वळ मरण येत नाही म्हणुन जगण्यासारखे आहे. त्यात ना उत्कटता आहे ना प्रेम ना ध्यास ना उकळते रक्त. अंहं उत्कटतेकरता उत्कटता म्हणायचे नाही मला, तर ते स्वभावातच असावे लागते. ती प्रकॄती असावी लागते. हां काहींना ते एक्स्प्रेस म्हणजे प्रदर्शित करता येउ शकते तर काहींना नाही. पण ते असेल तर एक्स्प्रेस करणार ना! आड्यातच नाही तर पोहर्यात कुठुन येणार. अशा लोकांची चीड येण्यापेक्षा , दया यायला पाहीजे. ना फायटर स्पिरिट अर्थात लढवय्यी वॄत्ती ना जिद्द, ना महत्वकांक्षा अश्या जगण्याला जगणे का म्हणावे.
ती नागाची गोष्ट माहीत आहे ना? एक नाग म्हातारा होतो, त्याचे दात पडतात, विष संपते,व निपचित पडून रहातो. पहील्या पहील्यांदा, मुलं, बाया, माणसं सगळे टरकुन असतात. पण काही दिवसातच तो विशेष हालचाल करत नाही असे पाहून मुले त्याला बारीक बारीक खडे मारु लागतात. तरी तो काही करत नाही पाहून, काठीने ढोसु लागतात, त्याला जखमा होतात. एक बौद्ध भिक्षु तिथुन जात असतो. हा नाग त्याला म्हणतो "बाबा रे तू कोणी थोर मनुष्य दिसतोस. तर तूच मला काहीतरी उपाय सांग. मला हे लोक छळतात. मी त्यांचे काहीही बिघडवलेले नसताना, जखमा करतात, दगड मारतात. माझ्यामध्ये आता विषारीपण राहीले नाही तर मी काय केले पाहीजे? यावरती तो बौद्ध भिक्षु म्हणतो - "विष आहेअथवा नाही याने काहीही फरक पडत नाही. तुला मी असे सांगत नाही की तू चावा घे. पण अरे नुसता फणा तर काढ आणि मग चमत्कार बघ." असे बोलून तो बौद्ध भिक्षु तिथुन निघून जातो. नाग त्याने सांगीतल्याप्रमाणे फणा काढतो. आणि खरोखरच नंतर त्याला त्रास द्यायची कोणाची हिंमत होत नाही.
तात्पर्य - थोडीफार आक्रमकता लागतेच.
'फायर इन बेली' असा इंग्रजी वाक्प्रचार आहे त्याला. सहिष्णू, अहिंसक, अॅकमोडेटिंग, गोड असणे छान पण कुठपर्यंत एका मर्यादेपर्यंत. त्यानंतर या गुणांची किंमत शून्य होते. जी ए कुलकर्णींचे एक सुंदर वाक्य मी एका ब्लॉगवरती वाचलेले, पण आता ते सापडत नाही कोणाच्या वाचनात आले तर जरुर लिहा. पण त्या वाक्याचा सारांश असा होता - आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात पण आयुष्याचा एक कोपरा असा असतो जिथे तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश नसतो. मला इतकं आवडलेलं ते वाक्य. प्रत्येकाला पोटतिडीक परवडतेच असे नाही. अनेकजण या जगात येतात, तडजोडी करत कसेबसे जगतात आणि परतीचा मार्ग धरतात ना कोणाला कळते ना कोणाच्या आयुष्यात त्यांच्या जाण्यामुळे पानही हलते. असे मला नेहमी वाटते की एखादे अगदी भव्यदिव्य करण्याची कुवत असेल-नसेल, पण एक तरी आयुष्य स्पर्शून जाता यावे. जगावर लहानशी का होइना आपली एक चांगली छाप सोडून जाता यावी.
छान लिहिले आहे. आवडले.
छान लिहिले आहे. आवडले.
धन्यवाद सोनाली.
धन्यवाद सोनाली.
छान लिहिलेय , पोटतिडिक पोचली.
छान लिहिलेय , पोटतिडिक पोचली.
(मी जेव्हा पोटतिडिकीने बोलते, माझा आवाज माझ्या नकळत चढतो, बरेचदा कळकळीच्या प्रार्थना, लेखन वा संवादानंतर मला थकल्यासारखं होतं.)
I survived because the fire in me was brighter than the fire outside!!!
-Joshua Graham
हे माझं एक आवडतं क्वोट .
वाह!!! मस्त प्रतिसाद अस्मिता.
वाह!!! मस्त प्रतिसाद अस्मिता.
छाप सोडणे म्हणजे काय?
खालील लेखन कुणाला उद्देशून किंवा उपदेशपर असे नाही. लेख वाचून मनात काही स्वैर विचार उमटले ते लिहिले आहेत. मूळ लेख एका ओघात आणि आवेगात लिहिला गेला आहे आणि त्यातला वेग - आवेग आवडला आहे.
छाप सोडणे म्हणजे काय? अनेकांच्या मनात आपल्याविषयी एक कोपरा निर्माण करणे, त्यांच्या मनात आपल्याला स्थान असणे.
आणि हे अग्नीच्या दाहकतेने नव्हे तर त्याच्या स्वयंप्रकाशी तेजामुळे होते. दया, करुणा, compassion मुळे होते. मग सेल्फ respect, self esteem वाढवायला दुसरं काही करावं लागत नाही. अर्थात सामान्य माणसाच्या कुवतीला, ताकदीला मर्यादा असतात, त्या मर्यादेतच हे सर्व होऊ शकते.
No man is an island,
Entire of itself.
Each is a piece of the continent,
A part of the main...
Send not to know
For whom the bell tolls,
it tolls for thee.
छान लिहिलंय सामो.आयुष्यात
छान लिहिलंय सामो.आयुष्यात काही मुद्दे असे असतातच, जिथे जाऊदे म्हणणे, मनातलं लपवून सौम्य बोलणे किंवा दुर्लक्ष करणे यातलं काहीच करता येत नाही.आणि हे असे मुद्देच नसतील तर बहुतेक माणूस इतके मुखवटे चढवतोय की स्वतःलाच विसरलाय.(आयुष्यभर अतिशय कष्ट, त्याग, इतरांच्या आवडीचा स्वयंपाक करणाऱ्या बाईने काही वर्षांनंतर स्वतःला काय आवडतं हे विसरून जाणे, अश्यासारखं काही.)
छन लिहिलय सामो.
छन लिहिलय सामो.
अस्मिता, अनू प्रतिसाद मस्त.
कळकळ योग्य व्यक्तीसाठी असणे ही तितकेच महत्वाचे वाटते. समोरच्याला समजून घेता आली नाही तर ती व्यर्थ ठरते.
सामो..अतिशय सुंदर लिहिलं आहे.
सामो..अतिशय सुंदर लिहिलं आहे. दोन्ही प्रकारची माणसं अवतीभवती पहिली आहेत.
मी कदाचित अधेमधे आहे दोन्हीच्या!!
पण या extreme पोटतिडीक वाल्या माणसांना फार मानसिक त्रास सहन करावा लागतो!!
हे आवाज चढणं माझ्याही बाबतीत
हे आवाज चढणं माझ्याही बाबतीत नेहमीच घडतं. आणि त्याबद्दल पोटतिडीक नसणारे नेहमीच दटावतही असतात :गिल्ट: शिवाय आवाजाला अनुलक्षून माझे हातवारे आपोआपच होऊ लागतात. मग समोरच्या माणसाचं हातवाऱ्यांकडेच जास्त लक्ष जातं. हे लक्षात आल्यावर मी आवरतं घेते बहुतेक
सामो, किती बारीकसारीक गोष्टींवर चिंतन सुरू असतंय तुझं..
आंबडगोड यांच्या शेवटच्या वाक्याला अनुमोदन.
हीरा, अनु, आशु, आंबतगोड ,
हीरा, अनु, आशु, आंबटगोड , प्राचीन - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
>>>>>>>छाप सोडणे म्हणजे काय?
@हीरा, फक्त छाप सोडणे नाही मला वाटलेले एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणे, म्हणजे शिक्षक, आई, गुरु असे जे असामान्य उंचीचे लोक असतात त्यांच्यात पोटतिडिक असते. ते कळवळून तुम्हाला सांगतात, परोपरीने सांगतात. आपणही क्वचित या भूमिका निभावत असतो. पण तसेच काहीजण अगदी विशेष दखल न घेणारे, संकुचित, आपल्यापुरते पहाणारे लोकही आई, शिक्षक असलेले पाहीलेले आहेत.
@अनु - खूप मस्त उदाहरण दिलयस.
@आशु - सत्य आहे की कळकळ पोचलीच नाही तर वाया जाते. पण अशा व्यक्तींना तसा हिशोबही करता येत नाही असे पहाण्यात आहे.
@आंबटगोड - >>>>>>>>>>>>>>>>>पण या extreme पोटतिडीक वाल्या माणसांना फार मानसिक त्रास सहन करावा लागतो!!
प्रचंड अनुमोदन. अगदी अगदी सहमत आहे.
@प्राचीन - बरोबर वर्णन केलेले आहेस. >>>>>मग समोरच्या माणसाचं हातवाऱ्यांकडेच जास्त लक्ष जातं. हे लक्षात आल्यावर मी आवरतं घेते बहुतेक Proud
हाहाहा
चिंतन नाही ग. असच आपलं.
लेख वाचून मनात काही स्वैर
लेख वाचून मनात काही स्वैर विचार उमटले ते लिहिले आहेत. मूळ लेख एका ओघात आणि आवेगात लिहिला गेला आहे...+1.
सामो,नेहमीप्रमाणे छान लिहिलंय.
धन्यवाद देवकी.
धन्यवाद देवकी.
याचं थोडक्यात उदाहरण म्हणजे
याचं थोडक्यात उदाहरण म्हणजे 'स्मृतीचित्रे' लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेलं पुस्तक.
पोटतिडीक हा 'अ'कारान्त शब्द
प्र का टा.
छान ओघवता लेख आहे आणि
छान ओघवता लेख आहे आणि प्रतिक्रियाही छान!
हो सी तसेच काहीसे वाटले होते
हो सी तसेच काहीसे वाटले होते पण मला खात्री नव्हती. पण आता दुरुस्त केलेले आहे. धन्यवाद.
च्रट्जी (srd) प्रतिक्रियेबद्दल आभार.
कशाला काढलस ग? ठेवलं असतं तर
कशाला काढलस ग? ठेवलं असतं तर काय बिघडलं असतं
एक तर धागा भरकटतो नि कुठे उगा
छान लिहिलंय, साधं , सहज.
छान लिहिलंय, साधं , सहज.
नेहमीप्रमाणेच छान लिहीले आहे
नेहमीप्रमाणेच छान लिहीले आहे सामो... तुम्ही मनात येणारे विचार छान उतरवता.
पण हे एक नाही समजले..
<<<<नाहीतर बाकी कोमटपणा, स्वतःला तोषिसही न पडू देणे.....>>>
हा जो पुर्ण पॅराग्राफ आहे तो पोटतिडकी नसलेल्यांसाठी आहे का? त्याला फार नकारात्मक छटा आहे. म्हणजे असे व्यक्तीमत्व एकदम व्हिलन वा युजलेस का ठरवले आहे हे नाही कळले..
आपल्यातले कैक असतील असे. आपणही कैक वेळा असे असू. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टीकोन वेगळा. आपण ईतरांच्या दृष्टीकोणावर का टिका करावी. ते देखील त्यांच्या जगात काय चालू आहे आणि ते तसे का आहेत हे माहीत नसताना...
तुम्ही जे लिहीलेय ते सद्गुण असेलही पण सद्गुणांच्या अभावाला दुर्गुण समजू नये असे वाटते.
मी काही चुकीचे ईंटरप्रेट करत असेल तर क्षमस्व. पण मला नेहमी दुसरी बाजूही पोटतिडकीने मांडावीशी वाटते ईतकेच
बहुतांशी तिटकारा स्वतःच्या
बहुतांशी तिटकारा स्वतःच्या कोमटपणातून आलेला आहे व जो काही स्वभावात उतरलेला आहे तो औषधांचा साईड इफेक्ट आहे. तुमच्या स्वभावातील बाईट, थोडेही चढ-उतार काढून टाकतात काही औषधे. अशा अत्यंत थंड आणि टेम झालेल्या स्वभावाची अतिपरिचयात अवज्ञा झाल्यामुळे प्रचंड नकारात्मक छटा आलेली आहे. खूप व्यायाम केला की पेपी वाटतं पण मूळात शीतलता हाच स्थायीभाव करतात काही मूड स्टॅबिलायझर्स. आपल्याला वाटत रहाते अर्रे यार! आधी चांगले बरे होतो, भांडू शकायचो, अरे ला कारे करता यायचे, डोके तापायचे ... आता कुठे येउन पडलो
असो.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे ऋन्मेष.
ओके सामो
ओके सामो
छान लिहिलंय सामो.
छान लिहिलंय सामो.
स्वतःला तोषिसही न पडू देणे, स्वतःच्या पुरता पहाणे, कातडी बचाउ स्वभाव. हे प्रचंड दीन आहे, केविलवाणे जीणे आहे. पुरुषार्थहीन जगणे>>
संदीप खरेंच गाणं आठवलं,- “मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नही..”
छान लिहिलंय सामो.
छान लिहिलंय सामो.
स्वतःला तोषिसही न पडू देणे, स्वतःच्या पुरता पहाणे, कातडी बचाउ स्वभाव. हे प्रचंड दीन आहे, केविलवाणे जीणे आहे. पुरुषार्थहीन जगणे>>
संदीप खरेंच गाणं आठवलं,- “मी मोर्चा नेला नाही.. मी संपही केला नाही..”
छान लिहिलंय, सामो !
छान लिहिलंय, सामो !
ज्यांच्याबद्दल असा कळवळा वाटतो अशा अनेक व्यक्ती आहेत, याची जाणीव हा लेख वाचतांना झाली.
तू एखादा अनुभव, गोष्ट अगदी तटस्थपणे (आणि brilliantly) लिहतेस, I really admire your integrity. एक नवाच perspective दिसू लागतो, तुझे लेख वाचल्यावर.
पु ले प्र
धन्यवाद शर्मिला, राधिका.
धन्यवाद शर्मिला, राधिका.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा कोपरा असतो की जेथे तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ शकत नाही. कारण तसे करावे लागले की मग सगळे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. - हे वाक्य वाचनात आले. पण मला पुस्तक अथवा लेखक माहीत नाही.