निघून जातांना..

Submitted by SharmilaR on 25 July, 2022 - 23:54

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

निघून जातांना..

मी खिडकीत बसलेय..
जाण्याच्या आधी एकदा..
पहातेय तिथूनच..
माझ्याकडे.. माझ्या अचेतन देहाकडे..
अन् माझ्या भोवती जमलेल्या लोकांकडे..

नातेवाईक.. मैत्रिणी.. खूप गर्दी जमलीय..
तसं कुणाचच काही अडणार नाहीय..
नसतच अडत कधी..
चालू रहाते जग रहाटी..

पण...... साहजिकच आहे.. धक्का बसलाय सर्वांना..
असं अचानक..? कसं झालं..? का केलं तिने असं..?
‘बोलली नाही कधीच..
बोलायचस ग.. कधीतरी.. कुणाजवळ तरी..
आम्ही होतो ना .. एवढ्या सगळ्या..’

खरच..? खरचच होतात तुम्ही..?सगळ्या..?
किंवा एखादी तरी..?
होते कुणी इथले.. माझ्यासाठी.....?

कधीतरी मी तुमच्या दारावर
केलेली टकटक ..
नाही लक्ष वेधू शकली तुमचं..?

चिउताई.. चिउताई.. दार उघड..
मी साद घालत होते..
जिवाच्या आकांतानं..

नको होता मला, आसरा तुमच्या घरात..
थोडे पंख वाळवायचे होते इतकंच..

थोडी ऊब हवी होती..
‘लागलं तर ये गं.. कधीही..
उघडेन मी दार.. देईन तुला ऊब..’
एवढाच आधार हवा होता शब्दांचा..

पण.. ‘थांब, माझ्या बाळाला तिट लावू दे..’
कधी संपलच नाही..

मग कधीतरी..
माझ्या शेणाच्या मोडक्या खिडकीत बसलेली मी..
एकाकी.. असहाय्य..
न्हाऊ माखू घालून.. तिट लावून..

तुमच्या बाळांना फिरवतांना तुम्ही..
चिमणेही होते सोबत..

रस्त्यावरून जाणारे तुमचे आवाज ऐकू आले..
‘काय गं.. पण ‘ती’ का नाही बांधत..
स्वत:च, घर मेणाचं..
कशाला हवीय ती.. आमच्या
सुरक्षित दारावर.. टकटक.. ?
ओरखडे उठतात ना.... मग आमच्या वेळेवर..’

नसतं का आवडलं..? मलाही..
माझं घर मेणाचं..?
चिमणा चिमणी चं घरट बांधायला..?

चिमणा नव्हता.. माझा कधीच..
भरकटला होता तो..
कुठल्या तरी अनोळखी प्रदेशात..
महित होतं नं हे.. तुम्हा सगळ्यांनाच..?
(तुमचे चिमणेही बोलले होते.. कधीतरी..
मग फसफस ऐकली होती मी दारूच्या पेल्यांची..)

कधीतरी ऐकली होती मी.. तुमच्यातच..
माझ्याबद्दलची चुकचुक..

वाटलं होतं मला..,
सगळे चिमणे मिळून शोधून आणतील..
एक हरवलेला चिमणा..माझा.. अन्..
आपला मानला तर त्यांचाही..
मग बसेन मीही.. सुरक्षित घरात..
तुमच्या कोंडाळ्यात..

पण तुमची ती चुकचुक होती फक्त ..
गप्पांच्या चहाच्या पेल्याभोवती..
आपलं घरट सुरक्षित ठेवून केलेली....

असं, दुसऱ्यांच काही ऐकलं की ..
अभिमान वाटतो नं..?
आपण कित्ती सुखी असल्याचा..?
सुरक्षित कोंदणात रहात असल्याचा..?

खरं तर तेवढ्या पुरतीच ऐकायच्या असतात..
काळजाला टोचणाऱ्या कहाण्या..

मग आपण जातो, जास्तीत जास्त उबेत..
व्हाटसअप फॉरवर्ड मध्ये..
टाकता येते.. आपलीही थोडी भर..

‘एवढा मोठा फिल्म स्टार..
जाण्या आधी त्याने बोलायला हवं होतं..
एवढी थोर समाजसेविका.. सांगायला हवं होतं तिने..
केवढा पैसा होता जवळ..
मोठ्या गायिकेची मुलगी..
काय कमी होतं ह्या सगळ्यांकडे.....
कधी काही कळलच नाही..

बोलायचं तरी.. सांगायचं तरी..’
.... हीच ती वाक्य..
परत परत येणारी..
दिल्या असतील धडका..
त्यांनीही तेव्हा, कुणाच्या तरी दारावर..

ऐकणारे कान आहेत का कुठे..
ऐकणारे कान..

आता माझीही चव लागेल..
एखाद्या किटी पार्टी बरोबर चहाला..

आणी मीही बनेन मग..
एक व्हाटसअप फॉरवर्ड..
बोलायचं तरी.. सांगायचं तरी.... म्हणत..
************

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह! Sad

मनाला भिडणारं आहे, वास्तवाशी जवळीक साधणार आहे

पण एक विचार मनात येतो ...
का चिमणीने एखाद्या चिमण्याची वाट पाहत बसाव, का त्याच्या सुरक्षित घरट्याची आस धरून असाह्य व्हावं.,.
पंख चिमुकले असेल आणि गरूड झेप नसली तरी उडण्याच बळ विसरू नये, चिवचिवाट तर असाही असणार आणि तसाही मग का नाही तिने मुक्त होऊन आस्वाद घ्यावा आयुष्याचा
तिच्या मृत्यूची बातमी फॉरवर्ड होण्यापेक्षा तीच जगणं होऊ दे व्हायरल.... अजूनही काही चिमण्यांना आकाश दिसेल

सुंदर प्रतिसादाबद्दल धन्यवाद manya.

आयुष्यात कितीही पॉजिटिव राहायचं म्हंटलं, तरी कधी असं जवळ कुणीच नसणं, अंगावर येतच असेल.

ह्या चिमणीची व्यथा फक्त तिचा हरवलेला चिमणा नाहीय तर मदतीला हाक देऊनही नं मिळणारा प्रतिसाद आहे.
शेवटी माणसाला एक belongingness लागतो. कुठेतरी.. थोडा आधार हवासा वाटतो. तो मिळाला असता कुठूनतरी तर मग आलं असतं तिला बळ..
तिच्या मृत्यूची बातमी फॉरवर्ड होण्यापेक्षा तीच जगणं होऊ दे व्हायरल.... अजूनही काही चिमण्यांना आकाश दिसेल >> तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण कधीतरी हे असे अंधारे क्षण येतच असतील, ज्यावर विजय मिळवायला हवा.

छान लिहीलेय.. भिडलं.. आवडलं..
आपल्याकडून कोणाबाबत असे घडले का मन आठवू लागले..

तिच्या मृत्यूची बातमी फॉरवर्ड होण्यापेक्षा तीच जगणं होऊ दे व्हायरल.... अजूनही काही चिमण्यांना आकाश दिसेल >> हे ही छान मन्या.. पण हे एखाद्यालाच जमते. सगळ्यांनाच हे शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
आणि म्हटलं तर प्रत्येक गोष्टीला एकापेक्षा अनेक पैलू असतात. सगळेच एकाच लेखात वा कथेत नाही येत, आणायचेही नसतात. जो लेखाचा उद्देश आहे, जे पोहोचवायचे आहे तितकेच लिहावे...

मी आधीच लिहल "मनाला भिडणारं आहे, वास्तवाशी जवळीक साधणार आहे"
लेखिकेने खूप छान शब्दात रचना केलीये आणि चिमणीची व्यथा पोहचवली आहे ह्यात प्रश्नच नाही
लेखा बद्द्ल टीका टिप्पणी करण्याचा बिलकुल उद्देश नव्हता
जवळून पाहिल्यात अशा गोष्टी ..... त्यामुळे वाचल्यावर प्रतिसाद देण भाग होत
आणि मी आशावादी आहे म्हणून एक वेगळा विचार मांडला

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ऋन्मेऽऽष.
सगळ्यांनाच हे शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे.>> खरं आहे. जे स्वत:च्या हिमतीने परिस्थितीवर काबू मिळवतात, ते खरोखरच स्ट्रॉंग असतात. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. आणी ज्यांना वेळेवर मदतीचा हात मिळतो ते भाग्यवान असतात. ह्या संबंधित ‘वेध’ चा एक विडिओ खूप सुंदर आहे, अस्मिता मोकाशी,विद्या गोखले आणी यशोदा वाकणकर ह्यांचा. खाली लिंक देत आहे,

https://www.youtube.com/watch?v=nfa9U04XODo

@ manya
लेखा बद्द्ल टीका टिप्पणी करण्याचा बिलकुल उद्देश नव्हता >> करायला काहीच हरकत नाही. टीकेमुळे वाईट वाटून घेण्याचं वैगेरे काहीच कारण नाही. उलट लिखाणात सुधारणा करण्यास मदतच होते त्यामुळे. जे मनापासून वाटलं ते सांगावं.
आणि मी आशावादी आहे म्हणून एक वेगळा विचार मांडला >> मला आवडला.
माझ्याही लक्षात येत असतं, मला लिखाणात बदल करायला हवाय . माझं लिखाण बरेचदा निराशावादी असतं. कारण त्या मूड मध्ये असतांनाच मला लिहायला सुचतं.
आनंदात असतांना, तो गोळा करण्यातच वेळ जातो.
हे बऱ्याच लोकांच्या सोमी वरच्या पोस्ट सारखं आहे... ते पिकनिक ला गेल्यावर धमाल फोटो टाकतात.. मी उलट करते.

धन्यवाद सामो.
अशी एकटेपणामुळे ‘निघून जाण्याची ..’ वेळ कुणावर नं येवो.

हा विषय फार महत्वाचा आहे.

बरेचदा आपल्याला हेच कळत नाही की कोणीतरी आपल्याला मदतीच्या आशेने टाहो फोडून हाक मारते आहे. अनेकदा आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने कळत न कळत अर्थात मूर्त अथवा अमूर्त मनाच्या पातळीवर केलेला असतो. पण बाहेरच्या गोंगाटात ते लक्षात येत नाही.
दुसरे म्हणजे लक्षात आले तरी काय करु शकतो हेही कळत नाही. अ‍ॅट द मोस्ट आपण त्या व्यक्तीला 'वैद्यकिय उपचारांबाबत' सल्ला देउ शकतो. किंवा तिचे ऐकून घेउ शकतो.
पण एक्स्ट्रिम केसेसमध्ये व्यक्ती बरेचदा ऑलरेडी कवचात गेलेली असते. Sad

बरोबर आहे, कधीकधी नेहमी चिवचिव करणारी आपली चिमणी चिवचिव करायच बंद करते. असेल ती गुरफटलेली तिच्या पिल्लांमध्ये असा विचार करुन बाकी जणी बसतात aapल्या घरट्यात. आणि मग जेव्हा नेह्मि साठी बंद होते चिवचिव तेव्हा म्हणतात ‘सांगायचं तर होत’!!