हेच आपलं नेहमीचंच - ४

Submitted by पाचपाटील on 11 March, 2022 - 11:25

एकविसाव्या शतकाची सुरुवात आमच्यासाठी
साधारण अशी झाली..

संवाद-१ :
"आपल्या ग्रामपंचायतीला आता इंटरनेटनं
जोडनारायत बरं गा..!''

<<< व्होय काय? ते काय आस्तंय ? >>>

"मला बी नीट काय कळलं नाय..! पन कसलीतरी
वायर टाकलीय म्हन्तेत..! फोनसारखंच आसंल..!
सगळ्या जगातनं वायरी टाकत आलेत..! आता
सोलापुरापास्नं गावागावात टाकतेल..!"

संवाद-२ :
"रिकी पॉंटिंगच्या बॅटीत स्प्रिंगा सापडल्या, ते खरंय
का रं ?? वर्ल्ड कपची फायनल बी आता आजून
येकदा खेळवनारायत म्हणं..! आता जिकत आस्तू
बग आपन..!"

<<< तरीच..!! मला बी डाउट आल्ताच लगा..!
टान्न टान्न आवाज येत हुता तेच्या बॅटीतनं..!!
नुस्ता छकड्यावर छकडी हानत हुता..! >>>

''आरं त्या बारा बोड्याच्यानं तर वाट लावली
सगळी..!! हातातला घास काडून घेतला लगा..!!
पन आसला रडीचा डाव पचत नस्तूय म्हनावं !!
आता बंदीच घालाय पायजे तेज्यावर..!
ह्या रैवारीच है ना मॅच..?? जिकतूय बग आपन
ह्याबारी..!! आपलाच हाय वर्ल्ड कप आता..!
पन तेंडुलकर काय करतंय काय म्हाईत आता..!
खेळाय पायजे लगा चांगला..!''

-------------------------****---------------------

तर समजा प्रो.प्रा. विजूभाऊ‌ परीट यांच्या दुकानामधी
बसून दुनियाभरच्या चकाट्या पिटण्याचा तो काळ..!
दुकान म्हणजे अगदीच काही दुकान वगैरे नव्हतं
तसं.! त्या टायमाला टपरीच होती ती..!
पण पुढं ऐसपैस जागा असल्यामुळं
रिकामटेकड्यांसाठी बरं होतं..

बाकी विजूभाऊ हे एक बोलबच्चन आणि अष्टपैलू
व्यक्तिमत्त्व..!
म्हणजे त्या गावात त्या काळात जी ए
कुलकर्णींसारखा मराठी लेखक आवडीने वाचून
बसलेला हा एक दुर्मिळ मनुष्य..!

शिवाय इष्कबाजी, क्रिकेट, हिंदी पिच्चर
आणि समजा मटका किंवा तत्सम आकडा वगैरे
क्षेत्रातला गाढा अभ्यासक माणूस.!
त्यामुळे अत्यंत लेटेस्ट अशा सुपरहिट हिंदी
गाण्यांचा रसिक संग्राहक..!
जीवनाचा चहुअंगांनी आस्वाद वगैरे.!

तर तिथे एकदा कच्चे धागे मधलं "जोगीयों के पीछे
जैसे जोग लग जाता है" हे गाणं मी लागोपाठ
सातव्यांदा तल्लीन होऊन ऐकत होतो..
आणि डोक्यात समजा दिपाली जमदाडेबद्दल काही
रम्य विचार चालल्यामुळे, मेंदूत एक गूढ तलम धुकं
पसरलं होतं.! परंतु विजूभाऊंना ते बघवलं नाही..!

त्यांनी त्या सुंदर सुफीयाना गाण्याचा एक नवीनच
अश्लील पैलू उलगडून दाखवला..!
म्हणजे अगदी साग्रसंगीत हालचालींसह डेमो वगैरे,
की बाबा जोगिणींना जोग असा असा लागतो..!

किंवा समजा मासूम पिच्चर मधलं,
'टुकुर टुकुर देखतो हो क्या' हे गाणं चाललेलं
असतानाच बॅकग्राऊंडला विजूभाऊंची कॉमेंट्री
ऐकायला मिळते.. उदाहरणार्थ..

{{ ही पूर्णिमा म्हणून सिंगर है बरं गा..!
तिचा आवाज बगा कसा मादक‌ है..!!
ती म्हणतीय की तू माझ्याकडं असा टुकूर टुकूर
का बघतोयस?
खरंतर 'तू मला नजरेनं का टापतोयस??' हे तिचं
ऑब्जेक्शन नाहीच है बरं गा.!
तिचं म्हणणं एवढंच है की, बाबा सलग एवढा वेळ
टापू नकोस..! असा उघड उघड टापू नकोस..!
कारण तुज्या भावना माझ्या लक्षात आल्या हैत आता..!
आता तरी नजर हटव ना तुझी..!! प्लीज..!!
नायतर विरघळून जाईन रे मी..!!
एवढं ऐकशील ना माझं??

आसं सगळं है तिच्या आवाजात..!
येक आर्त घायाळ विनंती है त्यात..! कळलं गा?

आणि आयेशा झुल्का बद्दल काय बोलायचं..!
ती म्हंजे हिंदी पिच्चरच्या इतिहासातली शेवटची
पुष्ट हिरॉईन..! आयss हायss..! येकच नंबर बरं गा..!
काय तिची डौलदार चाल..!
आणि तेच्यामुळं हितं आमच्या काळजात
उठणाऱ्या कळा..!

आयेशा झुल्कापुढं तुमच्या ह्या करिष्मा बिरीष्मा,
उर्मिला बिर्मिला काईच कामाच्या नाईत...!
सगळ्या नुसत्या चपातीसारख्या सपाट.!
हागुर्ड्या कुठल्या..! चला फुटा म्हनावं..! }}

तर हे असं काम होतं..! बाकी विजूभाऊंनी मी पुढे
कॉलेजात गेल्यावर पण लव्हगुरूचा रोल चालूच
ठेवला..!

उदाहरणार्थ रूपाली म्हणून माझी एक डाव होती,
त्या टायमाला...तिच्याबद्दल सहज वैचारिक
देवाणघेवाण करताना विजूभाऊंचं म्हणणं पडलं की..

{{ जगात दोन प्रकारच्या पोरी असतात..!
ज्या प्रेमात पडायला इच्छुक असतात आणि ज्या
प्रेमात पाडायला इच्छुक असतात..!
तुझी ही रूपाली पयल्या प्रकारातली है.!
तिला कुणी ना कुणी तरी पायजे असणारच..!
आणि तुझ्याशिवाय तिला दुसरं हैच कोण?

तू भिड बिन्दास..! तिनं किती बी हाड हुड केलं
तरी काय लाज वाटून घिऊ नको..!
बोलत रहा..! अधूनमधून विचारत रहा..!
कौतुक कर तिचं..! चांगलं चांगलं बोलून तिला
पार बोअर करून टाक..! वैताग आण तिला..!
पण तू अभ्यासाबद्दल जास्त बोलू नको बरं
का..! चांगली हुशार पोरगी है ती..!
एक आपलं सांगितलेलं बरं..!
नायतर उगाच तुज्या गंडलेल्या बॏद्धिक पातळीचं
प्रदर्शन करशील..! }}

नंतर पुढे ह्याच रूपालीबद्दल समजा मी तक्रार
केली की,

""विजुभाऊ, लय बालिश पोरगी हाय ओ ती..!
त्यो कुणीतरी वपु काळे म्हणून माणूस है..!
ही सदानकदा तेची पुस्तकं घिऊन फिरत
असतीय..! तेच्याबदल बी मला काय अडचन
नाय..! पन मला बी वाचून दाखवती..!
आयुष्य हे असं असतं न् आयुष्य हे तसं असतं..!
हे असलं कायतरी भैताड वाचून दाखवती आणि
लगीच डोळ्यातनं पानी काढती..! हुंदके देती..!
आवघडच है च्यायला..! कुठनं ही गळ्यात पडली
काय म्हाईत..! मला तर काय कळंना झालंय भौ..!""

ह्यावर देशी लव्हगुरू विजुभाऊंचं म्हणणं पडायचं
की,
{{ आरं हे आसंच आस्तंय येड्या..!
ती बालिश बोलते तर तू पण बालिश बोल ना..!
तुला कुनी अडवलंय का??
आनि जरा वेळ बालिश झालास, तर लगेच काय
जीव जानाराय का तुजा??

हे बघ भौ..!
ह्या कामात शांतपणे तासन् तास बोलत बसायची
तयारी ठेवावी लागते..! खरं म्हणजे पोरगीच बोलत असते..!
आपण ऐकतच बसायचं आसतंय..!
पण तिच्या बोलण्यात आपल्याला लय इंटरेस्ट है,
असं दाखवायचं आसतं..!
अशा टायमाला आपल्या आत लय बारक्या
बारक्या लाटा धुमाकूळ घालत असतील समजा.!
पण त्येंना थोपवून धरावं लागतं ‌.!
आपल्या आत अशी खळबळ माजवून नामानिराळं राहण्याची वाईट खोडच असते पोरींना..!

पण अशा टायमाला उगा धुसमुसळेपणा करून
चालत नाय..!
थोडा दम धरायचा..! संयम ठेवायचा..! मग
आपसूकच फळ मिळत असतं..!
जा आता भौ..! काय टेन्शन घिऊ नको..!
परिस्थितीवर आरूढ हो..! सुखी हो..!
कल्याण हुईल तुजं..! माझे आशीर्वाद हैतच..!

आणि भेटायला दात बित घासून जात जा बरं गा..! वेळ काय
सांगून येत नाय..! समजा अचानक किसला होय
म्हनली तर उगाच वांदा नगो..! हे एक आपलं
सांगितलेलं बरं..!
तुला फुडचं काय सांगायची गरज नाय म्हना..!
तसा तू लय चाबरा हैस ..! मला काय म्हाईत
नाय का तुजं?? }}

आता बरं चाललंय माझं..!
बाकी मी कदम..! सतीश कदम..!
आय एम बाँड..! जेम्स बाँड..! त्या टाईपमधलं..!

भाग-१
https://www.maayboli.com/node/81253

भाग-२
https://www.maayboli.com/node/81259

भाग -३
https://www.maayboli.com/node/81262

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol चांगलं चाललंय..
वि.स.खांडेकर ते व.पु.काळे. मग आता पुढचा नंबर चंद्रशेखर गोखले का?

वि.स.खांडेकर ते व.पु.काळे. मग आता पुढचा नंबर चंद्रशेखर गोखले का?
>>
बरेच हैत आजून पाईपलाईन मधी..!! पन ते आमचं शिक्रेट है ! Wink Lol

भारी Lol

पुढच्या सिक्रेटची उत्सुकतेने वाट बघणारा - आबा Happy

भाग २ आणि ३ चे धागे सार्वजनिक करा की...
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही. - असा मेसेज दिसतोय.

भाग २ आणि ३ चे धागे सार्वजनिक करा की...
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही. - असा मेसेज दिसतोय.<<<+११११