देवदूत

Submitted by SharmilaR on 14 December, 2021 - 00:15

देवदूत

"मॅडम, तुम्हाला निघायला अजून वेळ आहे?" हातात किल्ल्यांचा जुडगा घेऊन योगेश उभा होता.

"हो अरे, अजून किमान एखाद-दीड तास तरी लागेल. असं कर, तू जा. मी लॉक करून घेईन." शलाका म्हणाली.

आज शनिवार होता. दर शनिवारी रात्री योगेश त्याच्या गावी जायचा अन सोमवारी पहाटे परत यायला निघायचा. त्याचं हे रुटीन सगळ्यांना माहिती होतं.

"पण आता सगळे घरी गेलेत. ऑफिस मध्ये कुणीच नाही. तुम्ही एकट्याच आहात. बाहेर केवढा अंधार पडलाय बघा." त्याच्या स्वरात काळजी होती.

"काही हरकत नाही. पण आज हे काम संपवायलाच हवं. तू निघ खरंच." योगेश किल्ली ठेऊन गेला. जातांना "लवकर जा मॅडम, भारी पाऊस पडणार आहे" म्हणायला विसरला नाही.

"तू नको काळजी करुस. जाईन मी व्यवस्थित. तू नीट जा." सांगितलेली अन कित्येकदा न सांगितलेलीही कामं समजून पटापट करणाऱ्या योगेश बद्दल तिला नेहमीच ममत्व वाटायचं.

खरंतर संध्याकाळी सहानंतर शलाकालाही ऑफिसमध्ये थांबायची इच्छा नव्हती. तिला नेहमी वेळेच्या आधी काम तयार ठेवायला आवडायचं. पण बाकी सगळ्यांकडून येणाऱ्या माहितीवर तिचं काम अवलंबून असल्यामुळे तिचा नाईलाज होता. तिला सगळयांचा राग येत होता. या लोकांचं हे नेहमीचंच आहे. कद्धी कद्धी म्हणून डेटा वेळेवर द्यायचा नाही. एरवी जरा मॅनेज करताही येतं. पण आता सोमवारी प्रेझेंटेशन आहे. सगळं कंपायलेशन आज व्हायलाच पाहिजे. त्यापुढे पॉवर पॉईंट......बराच वेळ जाणार. तिच्या लॅपटॉपचा स्क्रीन गेल्यामुळे तो मागच्याच आठवड्यात दुरुस्तीला दिला होता. तो रोज आज देतो उद्या देतो चालू होतं. नाहीतर हे काम घरी तरी केलं असतं. वेळच्या वेळी कामं केली तर काहीतरी शिक्षा होते , असं लोकांना वाटतं बहुतेक.

बाहेर दुपारी चार पासूनच अंधारून आलं होतं. चांगलाच पाऊस पडणारस दिसतंय. हवामान खात्यांनं कालपासून तीन दिवसांचा रेड अलर्ट दिला होता. पण काल कसलं लख्ख ऊन पडलं होतं.... "आता तीन दिवस तरी छत्री विसरायला हरकत नाही." नेहमीप्रमाणे कुणीतरी कॉमेंटही केली होती.

आज सकाळपासून सलग काम करता आलं असतं, तर किमान आतापर्यंत ते आटपत आलं असतं. पण मध्येच दोन तास चेअरमन सरांच्या बर्थडे कार्यक्रमात गेले. तेव्हा हातातलं काम थांबवणं आपोआप आलंच. आता भराभर करायला हवं. पाण्याची बाटली तोंडाला लावून परत तिनं कॉम्पुटरकडे नजर फिरवली.

काम संपवून तिनं बॅकअप घेतलं तेव्हा आठ वाजायला आले होते. बापरे! ती कामात एवढी बुडाली होती की, ना घड्याळाकडे लक्ष गेलं ना खिडकीकडे नजर टाकली. आता बघितल्यावर मात्र जरा टेन्शन आलं. सगळं आवरून ती खाली आली, तेव्हा पाऊस चांगलाच धुवांधार कोसळत होता.

"मॅडम, छत्री नाही आणली ?" रखवालदारानं विचारलं.

"आणली. पण गाडीत आहे."

"ही घ्या. मी येतो गाडीपर्यंत." त्याची जास्तीची छत्री घेऊन ती त्याच्याबरोबर पार्किंगकडे निघाली. पाऊसच एवढा वेडावाकडा येत होता, की मोठी छत्री असूनसुद्धा साडी खालूंन पूर्ण भिजली. गांवाबाहेर, मोकळ्यावर ही एकमेव इमारत होती. त्यामुळे वाराही नेहमीच खूप असायचा.

"श्शी ! आज नेमकी साडी नेसायला लागली. कार्यक्रमाचा ड्रेसकोड होता नं !" ती चडफडली. साडी नेसली म्हणून रोजच्या सवयीच्या सँडल सोडून चपलाही हाय-हिल्स च्या घातल्या होत्या. आता दुपारपासून साठलेला राग उफाळून यायला लागला होता.

"दीर्घ श्वास घे....बी कूल....मोजून पंधरा मिनटतात तू घरी असशील ...." तिने स्वतःला बजावलं.
तरी गेट बाहेर पडतांना मोट्ठ्या खड्ड्यातून गेलीच गाडी.

घर सात-आठ किलोमीटर वर होतं. दिवसाउजेडी काही नाही पण आत्ता अंधार आणी धो-धो पाऊस. जरा जपून गाडी चालवायला लागणार होती. शिवाय पक्का रस्ता अजूनही झाला नव्हता. त्यामुळे खड्डे भरपूर. रोज लागणारे खड्डे इतके पाठ झाले होते, एक हात सतत गियर वरच असायचा.

नदीपलीकडच्या भागातली हि पहिली इमारत. आता हळूहळू डेव्हलपमेण्ट ला सुरवात झालीय, पण अजूनही रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मुख्यतः पेरूच्या अन द्राक्षाच्या बागा आहेत. रस्त्याच्या कडेला दुतर्फा दाट झाडी आहे. कधीतरी या रस्त्यानं पायी चालायला काय छान वाटतं ! दोन तीन वेळा मैत्रिणींबरोबर ती रविवारची आलीही होती फिरायला. गाडी पलीकडच्या काठावर उभी केली आणि मस्त फेरफटका मारला होता. तेव्हा मैत्रिणींना कसला हेवा वाटला होता तिचा, एवढ्या छान जागी रोज यायला मिळतं म्हणून.

आता तोच निर्मनुष्य रस्ता भितीदायक वाटत होता. गुडुप्प अंधार अन धो-धो पाऊस . त्यात अर्धवट भिजलेली ती. गारव्याने हात कापायला लागले होते. मध्येच गाडीला परत गचका बसला. काहीही झालं तरी गाडी सेकंड गियर मध्येच ठेवायची, तिनं ठरवलं. जवळपास निम्म अंतर पार झालं होतं . आता हे पुढचं वळण घेतला की पुढे नदीपर्यंत अगदी सरळ जायचं. पोचू तिथपर्यंत दहा मिनिटात, तिनं स्वतःला धीर दिला.

वळण घेतेच आहे तर जोराचा धक्का बसून गाडी बंद पडली. शलाकाने किल्ली फिरवली. इंजिनचा कुठलाही आवाज येईना. भीती जरा वाढली. परत परत तिने दोन-तीनं वेळा प्रयत्न केला. पण गाडी ढिम्म. बहुतेक इंजिनमध्ये पाणी गेलेलं दिसतंय गाडी मोठ्या खड्ड्यातून गेली तेव्हा. बापरे! आता काय करायचं? देवाचा धावा करत थरथरत्या हातानी तिनं पर्स मधला फोन काढला. ज्याची भीती वाटत होती तेच झालं. फोनला रेंज नव्हती. ऑफिसच्या कंपाऊंड बाहेर पडल्यापासूनच नदीपर्यंत रेंज नसतेच कधी.

सुन्न होऊन काही वेळ ती तशीच बसून राहिली. काही सुचेचना. ती अगदी मध्यावर आली होती. पाऊस कोसळतच होता. गाडीत छत्री होती. मागं गेलं तर ऑफिसचा फोन वापरता येईल. पण फोन करून एवढ्या पावसात मेकॅनिक येणं अशक्य. शिवाय पुढंही तेवढंच अंतर शिल्लक होतं. या रस्त्यावर तर संध्याकाळी सात नंतर कुणी नसतं आणि या पावसात तर अजिबातच शक्यता नाही.

ती इथे अडकलीय हे कुणालाच कळणं शक्य नव्हतं. सारखा परगावी असण्याऱ्या नवऱ्याचा तिला संताप आला. उद्या पहाटेच्या फ्लाईटने तो यायला निघणार होता. दुपारीच फोन येऊन गेला होता , मध्यरात्री एअरपोर्ट वर जायला लागणार म्हणून रात्री लवकर झोपणार म्हणाला होता. म्हणजे आता फोन यायची शक्यता नाही. एवढ्या पावसात तिची गाडी पार्किंग मध्ये नाही हे शेजाऱ्यांच्या लक्षात यायची पण शक्यता कमी होती. ऑफिसमध्ये तर आज सगळे समारंभाच्या मूड मध्येच घरी गेले होते. ती तिथे आहे हे कुणाच्या लक्षातही नव्हतं. चीड - संताप सगळं अनावर होत होतं. खरंतर बाकी सगळ्यांमुळे आज तिच्या कामाला उशिर झाला होता. तिला खूप - खूप रडू आलं. एवढं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं तिला.

थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं. रडून चिडून काहीच उपयोग नव्हता. जे काय करायचं ते तिला एकटीलाच करायला लागणार होत. अंधारा रस्ता एकटा आणि भितीदायक असला तरी कापायचा तिला एकटीलाच होता. छत्री आणी पर्स घेऊन ती खाली उतरली. मोबाईल चा टॉर्च लावला. नशीब, गाडी कोपऱ्यावर बंद पडलीय, रस्त्याच्या मधोमध नाही. कधीतरी व्हाट्सअप वर वाचलेली "तरी बरं ....." ची पोस्ट आठवली.

खांद्यावर पर्स लावली. एका हातात छत्री, दुसऱ्या हातात साडी अन उजेडाकरता लावलेला मोबाईल घेऊन घराच्या दिशेनं चालायला तिनं सुरवात केली. दहाबारा पावलं टाकल्यावरच लक्षात आलं , हे असं चालणं खूपच अवघड जातंय साडी अन हाय-हिल्स मुळे. ओलागच्च परकर पायांना अगदी चिकटून बसला होता. त्यावर ती कॉटन ची साडी. काय करावं बरं ? ड्रेस असता तर.....एकदम तिला आठवलं. धोब्याकडे इस्तरी ला द्यायला म्हणून कपड्यांचं गाठोडं मागच्या सीट वर ठेवलं होतं. करावा का त्याचा उपयोग? काय हरकत आहे? चालणं तेवढंच सोपं जाईल. आत्ता या बाजूला कुणी यायची शक्यता नाही. (उलट तसं असतं तर मदत तरी झाली असती.) शिवाय आपण घेऊ व्यवस्थित काळजी.

ती परत मागे वळली. गाडीत मागच्या सीटवर बसून गाठोडं सोडलं. त्याच कपड्याने आधी हातपाय कोरडे पुसून घेतले. मग त्याच कपड्याचं एक टोक रस्त्याच्या बाजूच्या खिडकीच्या वरच्या हॅन्डबार वर बांधलं. दुसरं टोक मागच्या सीटच्या हेडरेस्ट वर खुपसलं. पटकन एक हलक्या वजनाचा कुर्ता अन सलवार घेतली अन भरभर बदलायला सुरवात केली. कपडे ओले असल्यामुळे जरा अवघड गेलं, पण युक्ती सुचल्यामुळे जरा उत्साह आला होता.

कपडे बदलून ती खाली उतरली तेव्हा खरंच हलकं वाटायला लागलं तिला. चपलांचं काही करता येणं शक्य नव्हतं पण आता पर्स ,छत्री अन मोबाईल सांभाळणं सोपं जात होत. आडवा - तिडवा पाऊस अजूनही चालूच होता , आणि पाण्यातून सांभाळून चालायला लागत होत,पण आता तिच्या चालण्याला जरा गती आली होती.

दहाबारा मिनिट झाली असतील. मनात देवाचा धावा चालूच होता. (देवाचं एवढी आठवण पूर्वी कधी काढली बरं! एकीकडे मनाशी चाललेला संवाद.) अचानक समोरून हेड लाईट चमकले. एकाच वेळी भीती आणि मदत मिळण्याची जाणीव झाली. ती तशीच थांबली. मोटारसायकल तिच्या जवळ येऊन थांबली.

"मॅडम, तुम्ही? पायी ? गाडी कुठं आहे" रेनकोट मधून निथळत योगेश विचारत होता.

आनंदाच्या अन सुटकेच्या भावनेनी शलाकाला भरून आलं.

"गाडी कोपऱ्यावर बंद पडलीय. पण तू इथे कसा आता ?"

"गेलो होतो बसस्टॅन्ड वर. पावसामुळे एसटी रद्द झाली. मग वाटलं तुम्हाला फोन करावा . तुमचा फोन लागत नव्हता म्हणून गेट वर फोन केला तर रखवालदार म्हणाला मॅडम आठ वाजताच गेल्या. मला काळजी वाटली मग. म्हणून निघालो. "

कोण कुठला योगेश, देवदूतासारखा धावून आला. शलाकाच्या तोंडातून शब्द फुटेना.

"बरं , बसा आता मागे. तुम्हाला घरी सोडतो. पण ओल्या व्हाल बर का. तुमची छत्री काही कामाची नाही गाडीवर "

मागच्या सीटवर बसता बसता शलाकाच्या डोळ्यातलं पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून गेलं.

***************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
कधी कधी एखादा दिवस असा परीक्षा बघणारा येतो..

धन्यवाद रश्मी, राजा, धनवन्ती, सामो.

थोडं अजून अडचणीत टाकायचं होतं .... देवदूत येणारच होता ना !!>> हे आपण रोजच्या अडचणींत समजून घेतलं तर आयुष्य किती सुखकर होईल नं.

Murphy's Law नुसार हे हमखास घडतं !

प्रसंग बारकाव्यांसह खूप छान रंगवला आहेत.. मोठ्या पल्ल्याच्या कथेची सुरुवात वाटते आहे...
माझी सजेशन आहे, असेच पुढे घेऊन जा कथेला . फार छान वाटते आहे वाचायला.

धन्यवाद रूपाली, पशुपत, अज्ञातवासी, मानिमोहर.
प्रसंग बारकाव्यांसह खूप छान रंगवला आहेत.. मोठ्या पल्ल्याच्या कथेची सुरुवात वाटते आहे...
माझी सजेशन आहे, असेच पुढे घेऊन जा कथेला . फार छान वाटते आहे वाचायला. >> सूचना चांगली आहे, पण ह्या कथेचा जीव एवढाच होता.

काय गं तो योगेश किती ....... म्हणजे काय बोलू - गुणी मनुष्य आहे खरच!>> खरंच गुणी आहे तो.

आईशप्पथ!!!!
मला आत्ता आठवलं, तो योगेश माझा असिस्टंट होता. खरं म्हणजे त्याच्या वरूनच मला ही कथा सुचली होती.
पण आठवलं ते हे की, तो मला देव मानायचा अन् माझ्याकरता जगाशी (आमचं जग आमचं ऑफीस) भांडायला तयार असायचा.
हिच कथा योगेशला भेटलेला देवमाणूस (/देवीबाई) म्हणून खपवता येईल.