सोनल

Submitted by Kavita Datar on 28 October, 2021 - 05:43

लम्हा लम्हा दूरी यू पिघलती है ।
जाने किस आग मे ये शबनम जलती है ।।

रेडिओवर सोनल चं आवडतं गाणं वाजत होतं. नकळत तिचं मन भूतकाळात गेलं. तिला अर्जुन आठवला. अर्जुन...तिचा कलीग... त्यापेक्षा जवळचा मित्र. ग्रॅज्युएट झाल्यावर एका कम्पनीत सोनल ट्रेनी म्हणून लागली. तिथंच अर्जुन भेटला. नुकताच परमनंट झालेला. साधारण तिच्याच वयाचा. दोघांचं खूप जमायचं. लंच ब्रेक मध्ये एकत्र टिफिन खाणं, गप्पा, एकमेकांना कामात मदत करणं...खूप छान दिवस होते ते. तो दक्षिण भारतीय असल्याने इंग्लिश आणि तमिळ शिवाय कुठल्याही भाषेत त्याला संवाद जमत नसे. बाकी कलीग्ज मराठी किंवा हिंदी बोलत. सोनलचे पप्पा आर्मीत असल्यामुळे ती भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी राहिली होती. तिचे पप्पा रिटायर्ड झाल्यावर मात्र त्यांचं कुटुंब मुंबईत स्थायिक झालं. त्यामुळे तिला बऱ्याच भारतीय भाषा थोड्याफार समजत. अर्जुन सोबत तीचा संवाद इंग्लिश मधून व्हायचा. कधीतरी त्याने अनवधानाने तमीळ मध्ये बोललेलं एखादं वाक्य ऐकून सोनल ला गम्मत वाटायची. मग ती तिला जेवढं समजलंय तेव्हढं इंग्लिश मध्ये ऐकवून 'Is it right?' असं विचारायची. त्यावर दोघेही खूप हसायचे.
लम्हा लम्हा दूरी... हे त्यावेळेस लोकप्रिय झालेलं तिचं आवडतं गाणं तिनं त्याला ऐकवलं होतं. त्याला अर्थ समजावा म्हणून त्या गाण्याचा इंग्लिश मध्ये अनुवाद देखील केला होता.

कधीतरी अर्जुनशी बोलताना त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दलचं प्रेम तिला जाणवायचं. पण त्यादृष्टीने तिने कधी विचार केला नाही. त्यानेही कधी तिला तसं सागितलं नाही. मित्र म्हणून मात्र तो तिला खूप आवडायचा. सोनलचं अजयसोबत लग्न ठरलं आणि त्याच महिन्यात अर्जुन ची कम्पनीच्या दुबईतील ब्रँचमध्ये प्रमोशन वर बदली झाली. खूप आग्रह करूनही तो तिच्या लग्नाला येऊ शकला नाही.

अजयसोबत लग्न करून ती पुण्यात आली. पोलीस ऑफीसर असलेल्या अजयच्या रुक्ष, संतापी स्वभावामुळे, अहंकारी वृत्तीमुळे ती आतल्या आत मिटत गेली. पुरती कोमेजून गेली. अजय घरात असेल तेव्हा छोट्याछोट्या गोष्टींवरून चिडणं, आरडाओरडा, आदळआपट, शिवीगाळ क्वचित तिच्यावर हात उचलणं... याशिवाय तिच्या वाट्याला काही येत नसे. एकांतात असताना देखील तो तिला अक्षरशः ओरबाडून काढायचा. असा जबरदस्तीचा, एकतर्फी शृंगार तिला अगदी नकोसा व्हायचा.

सोनल तिच्या संसारात अजिबात सुखी नव्हती. पण सांगणार कोणाला? तिच्या लग्नानंतर चारच वर्षांत तिचे आई-पप्पा ६-७ महिन्यांच्या अंतराने हे जग सोडून गेले. अमेरिकेत स्थायिक झालेल्या तिच्या मोठ्या भावाला तिच्या सुखदुःखा शी काही घेणंदेणं नव्हतं. पाचसहा वर्षांतून तो भारतात आलाच तर एक-दोन दिवस भेटून जाण्या पलीकडे त्याचा सोनलशी संबंध नव्हता.

घरातील कामं, दोन मुलांचं संगोपन यात वर्षं सरत गेली. पाहता पाहता लग्नाला बारा वर्षं झाली. इतक्या वर्षांत अजय मध्ये काडीचाही फरक पडला नव्हता.

वेळ जावा म्हणून तिने तिच्या मुलांच्या शाळेतच सहा महिन्यांपासून शिकवायला सुरुवात केली होती. मुलांसोबत जायची आणि त्यांना घेऊनच परत यायची.

एक दिवस शाळेतून परत आल्यावर, घरातील कामं संपवून ती मोबाईल वर फेसबूक चेक करत होती. चॅट बॉक्स मध्ये मेसेज रिक्वेस्ट दिसल्याने तिने फेसबूक चा चॅट बॉक्स उघडला.
"Hi Sonal ! How are you ? at last, I found you.. Thanks to Facebook"
मेसेज सोबत चे 'Arjun Mani, Dubai' हे नाव वाचून आनंदाने ती उडालीच.
"Oh... Hi Arjun ! ! It's really nice to see you..."

फेसबूक वर जुना मित्र भेटल्याने सोनलला खूप आनंद झाला. अर्जुन ने त्याचा मोबाईल नंबर तिला मेसेज करून जमल्यास कधीतरी कॉल कर, असं तिला सांगितलं. तिने चॅट बॉक्स बंद करून लगेच त्याला कॉल केला. दोघांनाही काय अन किती बोलू असं झालं. अर्जुन ने तिला नवऱ्या आणि मुलांबद्दल विचारलं. नवऱ्याचा विषय टाळून, तिच्या मुलांबद्दल सोनल भरभरून बोलत होती. त्याने स्वतःच्या कुटुंबाबद्दल मात्र फार काही सांगितलं नाही. त्याऐवजी तो त्याची कम्पनी, काम याबाबत बोलत राहिला.

दोनतीन दिवसांत एकदा तरी अर्जुनशी बोलल्यावर सोनलला बरं वाटायचं. अजयच्या संशयी स्वभावामुळे तो घरी नसताना ती अर्जुन सोबत फोनवर बोलायची. अर्जुन दूर जरी असला तरी त्याचं असणं तिच्या निरस, रूक्ष संसारात एका मंद, शीतल वाऱ्याच्या झुळुके सारखं झालं होतं.

एकदा असंच बोलताना तिनं त्याला विचारलं,
"तुझ्या फॅमिली बद्दल सांग ना.."
"अप्पा (वडील) दहा वर्षांपूर्वी गेले. अम्मा (आई) माझ्यासोबत दुबईत असते.पण सध्या मुंबईत बहिणीकडे आहे. तिला घ्यायला मी दोन महिन्यांनी दिवाळीच्या आधी मुंबईत जाईन."
"What about your wife?" (तुझ्या पत्नीबद्दल काही सांग.)
धीर करून तिने अखेर विचारलंच.
"No wife..I am still unmarried." (मी अद्याप अविवाहित आहे.)
"What ? Why ??"
तिला आश्चर्य वाटलं.
"नाही मिळाली कोणी तुझ्यासारखी..."
त्याच्या या वाक्याने तिला धक्का बसला.

"होय सोनल, मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतो. अजूनही करतो. तुझ्याशिवाय मी कुणा दुसरीचा विचारही करू शकत नाही. हिम्मत करून जेव्हा तुला विचारायचं ठरवलं, त्याच वेळेस तुझं लग्न ठरलं. म्हणून मी प्रयत्न पूर्वक दुबईला शिफ्ट झालो. तुझ्या लग्नाला येणं तर मला अशक्य होतं."
त्याच्या बोलण्याने सोनलच्या अंतरंगात भावनांचा कल्लोळ उठला. घशातून येणारा हुंदका महत्प्रयासाने थोपवत, भरून आलेले डोळे पुसत, ती त्याला म्हणाली,
"चार वर्षं....चार वर्षं, आपण सोबत होतो, एकदा तरी मला बोलला असतास..."
ती पुढे काही बोलणार, तेवढ्यात स्वतः जवळच्या चावीने लॉक उघडून अजय आत आला.

पटकन फोन कट करून घाबरून ती अजय ला सामोरी गेली.
"सालं...थकून भागून घरी आल्यावर, डोअरबेल वाजवून ही तुला दार उघडता येत नाही का? झोपा काढत असशील... नाहीतर फोनवर बोलत बसली असशील...दुसरं काम काय आहे तुला...Useless.... साली..."

घरात शिरल्या बरोबर त्याच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
सोनलच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एक सुस्कारा टाकून ती किचनमध्ये त्याच्या चहा खाण्याची तयारी करायला गेली.

पुढचे चार पाच दिवस सोनल च्या मनात विचारांची वावटळ घोंघावत राहिली. अर्जुनने त्याच्या मनातील भावना वेळीच तिच्यासमोर उघड केल्या असत्या तर, आज तिचं आयुष्य काही वेगळंच असतं. या वैराण, रूक्ष वाळवंटात राहण्या ऐवजी ती हिरव्यागार वनराईत अर्जुनच्या सोबतीने बहरली असती, फुलली असती. एक स्वर्गीय, सुंदर आयुष्य तिच्या वाट्याला आलं असतं, असं राहून राहून तिच्या मनात येत होतं. पण शेवटी या जर-तर च्या गोष्टी..... तिचे कर्मभोग बाकी असतील म्हणून तर अजय सारख्या लांडग्याच्या पुढ्यात नियतीने तिला टाकले असेल. विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं.

या चार पाच दिवसांत तिनं अर्जुनला कॉल करणं टाळलं. आता तिला स्वतःचीच खात्री देता येत नव्हती. विचार करून शिणल्यामुळे दुपारी तिचा डोळा लागला. मोबाइल च्या रिंग ने ती जागी झाली. अर्जुन चा फोन होता. तिने फोन रिसिव्ह करून कानाला लावला.

"हॅलो... सोनल...are you ok ? रागावली आहेस का माझ्यावर?"
"नाही रे...मी ठीक आहे. तुझ्यावर का रागावू ?"
"एक विचारू ? खरं सांगशील ?"
"विचार ना..."
"तू खुश आहेस ना?"
"हो तर...मला काय झालंय?"
"मला कळतंय...तु खूप दुखावलेली आहेस ? मला सांगून तुझं मन हलकं होईल."

दुःखाने भरून गेलेल्या तिच्या मनाला आज अर्जुनच्या सहानुभूती ने ओथंबलेल्या शब्दांमुळे पाझर फुटला. मनाचा बांध फुटून दुःख धो धो वाहू लागलं. फोनवर ऐकायला येणाऱ्या तिच्या हुंदक्यांनी तो अस्वस्थ झाला. हजारो मैलांचं अंतर क्षणात पार करून तिच्यापर्यंत पोहचावं आणि तिला जवळ घेऊन तिचं सांत्वन करावं अशी उर्मी त्याच्या मनात दाटून आली.

अजय ने आजवर दिलेलं दुःख, होरपळ ती प्रथमच व्यक्त करत होती. ते ही तिचा जिवलग मित्र, तिच्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या अर्जुनजवळ... आतून मोकळं, हलकं झाल्यासारखं तिला वाटत होतं.

"Oh my God ! तू हे इतकी वर्षं सहन कसं केलंस ? Why didn't you dump him back ? अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणारा दोषी असतो हे तुला माहिती नाही का?"

"फक्त माझ्या मुलांसाठी मी हे सहन करत आले अर्जुन..."

"बस सोनल....बस...आता हे जुलूम अजिबात सहन करू नकोस. स्वतःचा वेगळा मार्ग निवड. तू शिकलेली आहेस, नोकरी करते आहेस. स्वतः च्या बळावर मुलांना मोठं करू शकतेस."

अर्जुनच्या बोलण्याचा ती दिवसभर विचार करत राहिली. 'अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणारा ही दोषी असतो'
हे त्याचे वाक्य तिच्या मनात घोळत राहिले.
'खरंच... अजय ने केलेला अन्याय, त्याचं आततायी वागणं... का सहन करत राहिले मी इतकी वर्ष ?आई पप्पा गेले. दादाचा आधार नाही. तरी...तरीही मी स्वतःच्या बळावर खंबीर व्हायला हवं होतं. काय उपयोग माझ्या शिक्षणाचा ? हुशारीचा ??'
ती विचार करत राहिली.
'अजय पासून वेगळं होऊन, स्वतःच्या पायावर उभं राहून, मुलांना वाढवणं सोपं जरी नाही, तरीही अशक्य तर नाहीच नाही. माझाच आत्मविश्वास, धैर्य कमी पडलं.'

स्वतःच्या असहायतेची तिला विलक्षण चीड आली. एका निश्चयाने ती उठली. कपाट उघडून तिचे बँक पासबुक्स, ठेवींच्या पावत्या तिने शोधून काढल्या. पप्पांनी तिच्यासाठी करून ठेवलेल्या गुंतवणुकीच्या पैशांचा तिने हिशेब लावला. सगळे मिळून वीस बावीस लाख तिच्या नावावर होते. आई पप्पा गेल्यानंतर त्यांचा फ्लॅट दादाने त्याच्या मेव्हण्याला तात्पुरता राहण्यासाठी दिला होता.

तिने तिच्या दादा ला फोन लावला. तिच्या परिस्थितीची त्याला पूर्ण कल्पना देऊन ती म्हणाली,
"आता नाही सहन होत हे सगळं... अजय सोबत राहणं यापुढे मला शक्य नाही. मी मुलांसोबत मुंबईत शिफ्ट व्हायचा विचार करतेय. आम्हाला राहण्यासाठी आई पप्पांचा फ्लॅट हवा आहे."
"सोनू...इतकी वर्षं तू माझ्यापासून हे सगळं का लपवून ठेवलंस ? आई-पप्पा असताना सुद्धा कधी त्यांना का बोलली नाहीस? अगं...आम्ही इतके परके झालोत का तुला ?"
"तसं नाही रे दादा...तुला उगाच का त्रास द्यायचा ? असं वाटलं मला..."
"उगाच ? आणि त्रास काय त्यात ?? मी लगेच तुझ्यासाठी फ्लॅट रिकामा करून घेतो. तू काही काळजी करू नकोस. आणि कधीही, काहीही लागलं तर मला सांगायचं. मी तुझ्या संपर्कात राहीन. जमल्यास एकदोन महिन्यांत येईन मुंबईत..."
"माझ्यासाठी लगेच धावपळ करू नकोस. मला काही मदत लागली तर मी नक्की सांगेन."
असं बोलून तिनं फोन बंद केला.

दादाच्या बोलण्याचं तिला आश्चर्य वाटलं. लहान बहीण त्रासात आहे हे समजल्याने त्याच्यातला मोठा भाऊ जागा झाला होता. ती आता एकटी नाही, तिचा दादा, अर्जुन दोघंही, दुरुन का असेना, तिच्या सोबत होते, हे जाणवून सोनलला केवढा तरी धीर आला.

पुढचे काही दिवस आपली शाळेतली नोकरी संभाळून ती न्यूज पेपर मध्ये, इंटरनेटवरील नोकऱ्यांची माहिती देणाऱ्या साइट्सवर, मुंबईतील शाळांत, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षिकेची नोकरी शोधत राहिली. तिला योग्य अशा चार-पाच ठिकाणी तिने तिचा रिज्यूम इमेलने पाठवून दिला.

यादरम्यान दर दोन-तीन दिवसांआड तिचे अर्जुन शी फोनवर बोलणं होत होतं. तिच्या हालचाली, इथला सगळा वृत्तांत ती त्याला कळवत होती.

दोन शाळांमधून तिला अपेक्षित प्रतिसाद आला. इंटरव्यू साठी तिला मुंबईला जावं लागणार होतं. अजयला काही समजू न देता, कसलाही सुगावा न लागू देता, मुंबईला कसं जावं ? हा तिच्या समोरचा मोठा प्रश्न होता. त्याला जराही संशय आला, तर सगळंच अवघड होऊन बसणार होतं. यावरही तिने तोडगा शोधून काढला.

(क्रमशः)

©कविता दातार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान सुरुवात.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

mast