निळीची गोष्ट (बालकथा )

Submitted by मनिम्याऊ on 4 July, 2021 - 13:57

बालकथा

सध्या मी आणि माझी लेक मिनिएचर गार्डन उर्फ पऱ्यांचा बगीच्यात वेगवेगळे काहीबाही करत असतो.
https://www.maayboli.com/node/78271

आज ब्लू - बाग बनवला. मग लेक म्हणाली याची गोष्ट सांग. मग तिला ही गोष्ट रचून सांगितली. तिला आवडली. इथे शेअर करण्याची हिंमत करतेय. पहिल्यांदाच एखादी कथा रचली आहे. आवडली तर जरूर सांगा नाही आवडली तर कुठे सुधारणा करायला हवी ते सांगा.

निळीची गोष्ट
कोणे एके काळी निळ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात एक छोटीशी मुलगी रहात होती. तिचं नाव निळी. गावाचं नाव निळगाव. निळीचं गाव खूप सुंदर होतं. इवली इवली टुमदार घरे, स्वच्छ रस्ते, गावाशेजारून एक नदी वहात होती. नदीला बाराही महिने निर्मळ पाणी असे. लोक शेतात कष्ट करीत, भरघोस पीक निघे. सुखी समाधानी गाव होते.
IMG_20201119_215714.jpg
.
IMG_20201119_215758.jpg

निळीचं घर गावापासून जरा दूर शेतात होतं. घर निळ्या दगडांनी बांधलेलं. घराभोवती फुलांनी बहरलेली उंच उंच झाडे होती. घरापर्यंत जायला निळी निळी वाट होती. वाटेवर कमानी होत्या.
IMG_20210704_201538.JPG
.
IMG_20210704_201832.JPG
त्या वाटेपासूनच जरा बाजूला निळ्या तळ्याकडे जाण्यासाठी निळ्या पायऱ्या उतरत होत्या.
IMG_20210704_211037.JPG
निळ्या तळ्याभोवती सुंदर रान होतं. काठाशी हिरवेगार गवत असे. रंगीबेरंगी फुले उमललेली असत. भर दुपारी निळ्या तळ्याचं पाणी उन्हात चमचमत असे. असं वाटे की जणू तळ्याच्या पोटात खूप खूप निळे हिरे असावेत.
IMG_20210704_202402.JPG
निळीला ही जागा फार आवडायची. ती तळ्याकाठी तासंतास पाण्यात पाय सोडून बसत असे. फुलपाखरांच्या, पक्ष्यांच्या सहवासात रमत असे. IMG_20210705_220132.JPG

एका वर्षी काय झालं निळगावातल्या लोकांना वाटलं की काय सतत शेतात राबायचं? त्यापेक्षा आपल्या गावाभोवतालच्या जंगलात किती किती झाडे आहेत, आपण ही झाडे तोडून लाकडाचा व्यवसाय करू म्हणजे खूप खूप पैसे मिळतील आणि दिवसभर राबावं पण लागणार नाही. लगेच त्यांनी जंगलात जाऊन मोठी मोठी झाडे तोडली, लाकडाच्या वखारी सुरू झाल्यात. पैसाचं पैसा. लोक खूष झालेत. म्हणाले इतकी वर्षे उगीचच शेतात कष्ट केलेत त्यापेक्षा आधीच हे केलं असतं तर आपण आतापर्यंत किती श्रीमंत झालो असतो.

निळीला मात्र हे आवडलं न्हवतं. झाडांवर तिचा खूप जीव होता. तिने सगळ्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, झाडाचं महत्त्व सांगितलं, म्हणाली की झाडं तोडू नका. देवबाप्पा रागावेल आणि पाऊस नाही येणार पण त्या लहान मुलीचं कोणीही ऐकलं नाही. सगळे तिला वेडी म्हणाले. निळी खूप उदास झाली.
पण मग पुढच्य वर्षी काय झालं, निळगावावर ढग बिलकुल थांबले नाहीत. ढगांना ओळखीचं जंगलच दिसलं नाही ना. त्यामुळे अजिबात पाऊस पडला नाही. शेतात काहीही पिकलं नाही. निळं तळं आटलं. प्राणी पक्षी दूर निघून गेलेत. दुष्काळ पडला. घाबरलेले गावकरी निळीच्या घरी आलेत. तिला म्हणालेत की आम्ही तुझं ऐकलं नाही आमचं चुकलं पण आता तूच काही उपाय सांग ज्याने पाऊस पडेल आणि पुन्हा पूर्वीसारखी शेती पिकेल.

निळी म्हणाली आपल्याला आता पर्यावरणाचा वसा घ्यावा लागणार. आपल्या मातीतल्या झाडांची, आंबा, वड, पिंपळ, कडूनिंबाची लागवड करूया. बोडक्या माळरानावर जाता-येता फळांच्या बिया टाकूया. डोंगरावर चर खणूया, झऱ्यांना दगड-मातीचे बांध घालूया, नदी नाल्यांना खोल करूया, पाणी अडवूया पाणी जिरवूया.

धावणारं पाणी चालायला हवं, चालणारं पाणी थांबवायला हवं, आणि थांबलेलं पाणी जमिनीत जिरवायला हवं.

गावकऱ्यांना निळीचं म्हणणं पटलं. सारेजण जोमाने कामाला लागले. वर्षभर खूप मेहनत करून परत पावसाळ्याची वाट पाहायला लागले. आणि त्यावर्षी ढग जेव्हा निळगावावरून जायला लागले तसं ढगांना ओळखीच्या खुणा दिसल्यात. ढगांनी भरपूर पाऊस पाडला. नदी नाले पुन्हा वाहू लागले. पण आता पाणी नुसतंच वाहून जात न्हवतं तर योग्य प्रकारे अडवल्या देखील जात होतं. त्यामुळे आता वर्षभर पाणी पुरणार होतं. भरपूर शेती पिकणार होती. पुन्हा जंगल वाढणार होतं.
IMG_20210701_193939.jpg

आणि तसंच झालं. शेती पिकली, जंगल वाढलं, निळं तळं पुन्हा भरलं. प्राणी पक्षी परत आलेत. गावकऱ्यांना पर्यावरणाचं महत्व आता चांगलंच समजलंय. सगळे परत एकदा सुखात आहेत आणि आपली निळी रोज तिच्या आवडत्या तळ्याकाठी पाण्यात पाय सोडून बसतेय.
IMG_20210704_202423.JPG

टीप : या लेखात वापरलेले फोटो गोष्टीच्या अनुषंगाने माझ्याच काही जुन्या धाग्यानवरून पुन:प्रकाशित केले आहेत.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय गोड आहे हे ! Happy
पर्यावरणाचं महत्त्व सहज सांगितलंय , आवडलंच.

पर्यावरणाचं महत्त्व किती सहज सांगितलंय . खूप आवडली गोष्ट . आजच घरी मुलीला वाचुन दाखवेन.
कशी काय वाचायची राहून गेली ? सजावट किती छान केली आहे. हे पण करायचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद .

अरे वाह हे फारच मस्त आहे. कथेतली भाषा फार सुंदर आहे. लहान मुलांना नक्की समजेल आणि आवडेल हे