व्यवस्थासत्ताक!

Submitted by सांज on 25 January, 2021 - 06:52

नमस्कार!
उद्या 'प्रजासत्ताक' दिवस. त्यानिमित्ताने चार वर्षांपूर्वी याच दिवशी लिहिलेला एक लेख इथे शेअर करतेय. किरकोळ बदल सोडले तर परिस्थिति आजही तीच आहे!

व्यवस्थासत्ताक!

"कुनाला भेटायचं, काय बोलायचं कायबी ठाव न्हाई बगा आमाला. तरी म्हाईती काडून गेलोचं कुटल्या सायबापुडं अन् तो, 'जा जाऊन बैस तिकडं गुमान' म्हनला तर पुना मान वर करुन काय बोलाव परश्न पडतुया आमास्नी."
६०-६५ वर्षं वय असलेल्या या निरक्षर खेडुताची वाक्यं विचार करायला लावतात. जेमतेम १-२ एकर शेत असलेल्या या काकांची २० वर्षांची मुलगी मतिमंद आहे. तिला काही शासकीय योजनांचा लाभ होऊ शकतो का बुवा याची चाचपणी करताना त्यांच्याकडून जे काही ऐकायला मिळत होतं ते खूप विषण्ण करणारं आहे.
Sovereign, Socialst, Democratic Republic अशी ओळख असणार्या देशातलं हे एकविसाव्या शतकातलं वास्तव आहे! Republic म्हणजे प्रजासत्ताक, जिथे प्रजा स्वत: राज्य करते असा देश. असं स्वत:ला Republic म्हणवून घेण्यास आपल्या देशाने ७२ वर्षांपूर्वी सुरुवात केली, देशाला एक सर्वोत्तम, सर्वंकष आणि सहिष्णू संविधान देऊ करुन. त्या दिवसाची आठवण म्हणून आपण दरवर्षी 'प्रजासत्ताक दिन' साजरा करतो. पण तो करताना आपला देश खरचं प्रजासत्ताक आहे का? इथे खरचं प्रजेचं राज्य आहे का किंवा गेला बाजार राज्य चालवताना प्रजेचा विचार केला जातोय का? या प्रश्नांचा विचार व्हायला हवा.
आपल्याकडे लोकांनी निवडलेलं सरकार आहे, सरकारी धोरणांच्या अंमलबजावणी साठी प्रचंड मोठ्या आकाराचं आणि व्याप्तीचं प्रशासन आहे. सरकार धोरणं बनवतं, योजना तयार करतं आणि त्याच्या अंमलबजावणी साठी निधी उपलब्ध करुन देतं. आता अंमलबजावणीची अत्यंत महत्वाची जबाबदारी ही प्रशासनाची असते. एकीकडे योजना आहेत, निधी आहे आणि दुसरीकडे त्यांची नितांत गरज असलेले अडाणी देशवासीय. या दोहोंमधला दुवा म्हणजे प्रशासन. सरकार आणि प्रशासन मिळुन ही जी काही व्यवस्था गेल्या ६०-७० वर्षांत आपल्या देशात तयार झालीय ती सामान्य नागरिकांना पायदळी तुडवून त्यावर स्वत:चा वटवृक्ष फुलवु पाहतेय. ज्या उद्देशाने या व्यवस्था उभारल्या गेल्या तो उद्देशच नाहीसा झाला आहे. भ्रष्ट व्यवस्था हा आपल्या देशाला झालेला असा आजार आहे ज्याने पूर्ण देशाला पंगू करुन सोडलंय. जे सरकार कडून येतं ते या व्यवस्थेत जातं आणि तिथेचं फिरत राहतं. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचतच नाही किंवा जे पोचतं ते खूप अत्यल्प असतं. याहून मोठं वैषम्य याचं आहे की ज्यांच्यासाठी ही धोरणं नि योजना असतात त्यांना ठाऊकही नसतं की आपले हक्क आणि अधिकार काय आहेत, ते कोणत्या मार्गाने आणि कसे मिळवता येऊ शकतात, याचं कुठलंच ज्ञान देशातल्या जवळपास ५०% लोकसंख्येला जे ग्रामीण भागात राहतात त्यांना नसतं. संविधान दिवस साजरा केला जातो पण त्यात नक्की काय आहे हे शिकवायला, सांगायला आपल्या व्यवस्था विसरतात. किंवा ते विसरण्यातचं त्यांना त्यांचा उत्कर्ष दिसतो. मतदाना आधी मिळणार्‍या नोटा पाहून सामान्य जन ही या गोष्टी जाणून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. हे जर वास्तव असेल तर मग प्रजासत्ताक हे बिरुद आपल्या देशाने मिरवावं का? केवळ दर पाच वर्षांनी आपण मतदान करतो आणि आपल्याकडे एक उच्च प्रतिचं संविधान आहे म्हणून? सद्यस्थिती वरुन तरी आपला देश प्रजासत्ताक नसून व्यवस्थासत्ताक असल्याचं दिसून येतं.
Karl Marx समाजाच्या अंतिम प्रगतीचं लक्षण सांगताना म्हणतो, 'The State shall wither away" म्हणजे सामाजव्यवस्था उत्क्रांत होत होत अशा टप्प्यावर यावी जिथे शासनाची गरजचं उरु नये. देशातल्या व्यवस्थाच इतक्या बळकट आणि सक्षम असाव्यात की राज्यकर्त्या वर्गाची आवश्यकताच भासू नये. गांधीजी अशाचं आशयाचं विधान करताना म्हणतात, समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचं त्याच्या जगण्यावरचं नियंत्रण अधिकाधिक वाढत जावं या दृष्टीने शासनाचे प्रयत्न असायला हवेत. पण आपली सद्यस्थिती पाहता आपण उलट्या दिशेने प्रवास करताना दिसतोय. आपल्या व्यवस्था आपल्याला आत्मनिर्भर न करता अधिकाधिक dependant बनवतायत. हे प्रगतीचं नव्हे अधोगतीचं लक्षण आहे.
शान्तिपर्वात राज्य कसं चालवावं यासंबंधी उपदेश करताना भीष्म युधिष्ठिराला म्हणतात, महर्षी व्यासांचा खूप सुंदर श्लोक आहे,
नैव राज्यं न राजासीन्न च दण्ड्यो न दाण्डिक: ।
धर्मेनैव प्रजा: सर्वा रक्षन्तिस्म परस्परम ।।
असं राज्य जिथे ना राजा असावा ना दंडविधान ना न्यायालय. जिथे प्रजाच इतकी सक्षम असेल की राज्यसंस्थेची गरज उरणार नाही.
आपण सध्यातरी अशा समाजव्यवस्थेपासून खूप दूर आहोत. तिथे पोचण्यासाठी आपल्या विचारांमध्ये जीवनशैली मध्ये अमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याही आधी अशा बदलांची आपल्याला गरज आहे हे समजण्याची, स्वत:कडे, स्वत:च्या समाजाकडे, देशाकडे डोळसपणे पाहण्याचीही आवश्यकता आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

सांज
https://chaafa.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या काकांचे वाचुन वाईट वाटले. काय उपयोग मग आपल्या साक्षरतेचा. आपणच निरक्षर आहोत. लेख फार छान व डोळ्यात अंजन घालणारा आहे. निदान गरजुची मदत करता आली तर तीच देशसेवा ठरेल, भलेही आपण युद्धभूमीवर नसु.

लावण्या, रश्मी
प्रतिसादांसाठी आभार!

रश्मी, खरं आहे तुमचं म्हणणं!