पानकोबी हेटर्स क्लब

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 December, 2020 - 05:45

मी लहानपणा पासून जेवायला वाढलं ते मुकाट्यानं खाणारा. पण गोड कमी खाणारा.
सगळ्या भाज्या आवडो न आवडो खायचो. भेंंडी, बटाटे, वांगी, फुलकोबी, कारली, कार्टुलं, फणस, चवळी, वाटाणे, वाल, गवार, लाल भोपळा, सर्व पालेभाज्या या आवडत्या भाज्या.
तोंडली, ढब्बू मिर्ची, दोडके, कद्दु (दूधी), पडवळ, वगैरे चालून जाणार्‍या भाज्या.
तर पानकोबी ही नावडती भाजी.
पण घरी सगळ्यांना आवडणारी/चालणारी भाजी त्यामुळे नेहमी केली जायची. आणि सगळ्या भाज्या खाव्यात असे आई बाबा सांगत, स्वतःही खात ते मलाही पटे. पण कितीही प्रयत्न केला तरी पानकोबीची भाजी खाणे माझ्या प्रंचंड जीवावर यायचे. मग ती डाळ घालुन केलेली असो, पीठ लावून की बटाटे घालून की कच्ची. पानकोबी आणि माझं सूत कधीच जमलं नाही. पण केली, पानात वाढली की मुकाट्याने खायचो. कधी ती भाजी खाण्याच्या बदल्यात सोबत गूळ तूप मिळण्याचे आई सोबत डील व्हायचे. त्यामुळे पान कोबीची भाजी वरुन मस्त लिंबु पिळुनही आवडत नाही हे बघून "गाढवाला गुळाची चव काय?" असे घरी कोणी म्हणण्याची सोय नव्हती, म्हटले की मी लगेच गूळ तूप मागायचो.

लहानपणापासून मला आपलं आपण वाढुन घेउन जेवायला आवडतं. पण काहीजणांना वाढायची हौस असते. आई, काकू, मावशी, आत्या आपल्या, मित्रांच्या, शेजारांच्या यांना वाढायला आवडतं किंवा प्रथा म्हणुन तरी कोणी आलं गेलं तर वाढतात. आपण वाढलेल्या पानातील न आवडणारे पदार्थ आधी संपवून मग आवडीच्या पदार्थांवर ताव मारावा असा विचार करतो. पण वाढणार्‍यांना वाटतं याने / हिने हा पदार्थ आधी संपवला म्हणजे आवडलेला दिसतोय. आपण मात्र संपवला ब्वा तो एकदाचा असे म्हणत आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला सुरवात करतो तेवढ्यात वाढणारे आपण बेसावध असताना भसकन मोठ्या पळीभर तो संपवलेला नावडता पदार्थ आपल्या पानात वाढतात.
या प्रकाराने मला खूप छळले आहे. नावडती पानकोबी आधी संपवून आवडत्या भरली वांगी / पालक पनीर वगैरेंवर ताव मारायला सुरवात देखील करत नाही तोच भसकन परत पानकोबी पानात. काय विरस होतो म्हणुन सांगू! त्यामुळे मोठेपणी आपल्या वाट्याला कधी वाढण्याचे काम आले तर लोक जो पदार्थ आधी संपवतात तो आपण होउन वाढण्याचा आगाउपणा अजिबात करायचा नाही हे माझ्या मनात बालपणापासूनच रुजले. पुढे तर मी वाढणे या प्रथेच्या विरोधात गेलो, अजूनही आहे. तसेच पानकोबी न आवडणार्‍या मुलीशीच लग्न करायचे हे सुद्धा मी लहानपणीच ठरवले होते.

इंजिनिअरींगला होस्टेलला राहीलो तिथे ही पानकोबीने माझा पिच्छा सोडला नाही, मेस मध्ये पानकोबी असायचीच.

पण नंतर मुंबईला नोकरी लागली आणि मुंबईला मेस नावाचे प्रकार कमी, हॉटेल मध्ये जाउन ऑर्डर करुन खायचे. हॉटेलच्या मेन्यु मध्ये गोबी म्हणजे फुलकोबी असायची पानकोबी नसायचीच कुठे! मला खूप आनंद झाला. पुढे पुणे मग हैद्राबादला फिरतीची नोकरी महिन्यातून पंधरा वीस दिवस टूर त्यामुळे मेस कधी लावली नाही. पानकोबी हॉटेलमध्ये कधी नावालाही दिसली नाही की मी घरी स्वयंपाक केला तर मी पानकोबी कधी आणणेही शक्यच नव्हते. अशा रितीने अनेक वर्षे मजेत गेली आणि मला पानकोबीचा पूर्णपणे विसर पडला.

इतका की लग्नासाठी मुलींना भेटायला लागलो तेव्हा बाकी गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन घेताना मला कधी पानकोबीची आठवणही आली नाही. आणि साखरपुड्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी भावी बायकोच्या घरी गेलो तर नाश्त्याला पानकोबीचे पराठे! कितीतरी वर्षांनी पानकोबी माझ्या जिभेवर आली होती. माझ्या सासुरवाडीचे सगळे पानकोबी बर्‍यापैकी आवडणारे निघाले. पण मी आता पानकोबी न खाणार्‍या मुलीशीच लग्न करण्याचा बालहट्ट सोडला आणि भाजी आणण्याचे काम आपणच करायचे, पानकोबी आणायचीच नाही असा तत्क्षणी निर्धार करुन पानकोबी मुकाट्याने घशाखाली उतरवली. लग्नानंतर एकमेकांच्या आवडी-नावडी दीड दोन वर्षे काटेकोरपणे जपल्या गेल्या आणि पुढे हळुहळु पानकोबीने आमच्या सुखी संसारात प्रवेश मिळवलाच, तो आजतागायत आहेच. मागची दोन आठवडे मी पानकोबी आणणे टाळले, आज भाजी आणायची आहे आणि पानकोबी नक्की आणाण्याचे बायकोने फर्मान सोडले आहे.

असो, तर मला खात्री आहे की माझ्या सारखे पानकोबी न आवडणारे भरपूर नसले तरी निदान काही लोक असतीलच, अशा लोकांचा हा क्लब. आपल्या पानकोबीच्या कथा / व्यथा / टाळण्याच्या युक्त्या येथे मांडाव्यात.

तळटीपः
१. I hate getting up early वगैरेंमध्ये जसा hate चा अर्थ आहे तसाच इथे घ्यावा. लेखक कुणाचाही द्वेष करत नाही, द्वेष करण्याला प्रोत्साहन देत नाही, पृथ्वीवरील सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावी या विचाराचा आहे.
२. पानकोबी लव्हर्सचे सुद्धा इथे स्वागत असेल, त्यांना या धाग्याचे निमित्ताने लिहावेसे वाटले तर नि:संकोच लिहावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन लॉलीपॉपसोबत कच्चा चायनीज कोबी देतात तो मला आवडतो पण भाजी नाही आवडत. भाजी काही वर्षांपूर्वी ठीक ठीक वाटायची पण मध्यंतरी सगळे गावी गेले असताना बाहेर डबा लावला होता तेव्हापासून कोबी अजिबात आवडत नाही.

मला आवडतो -
भाजी, कच्च्याची पचडी व थालीपीठ सुद्धा !

पहिल्यांदा पानकोबीची भाजी माझ्याएवढी आवडीची नव्हती. पण ऑफिसमध्ये सोबत असणारे माझे एक गुजराती सहकारी होते. ते डब्यात नेहमी पानकोबीची भाजी आणायचे. ती भाजी चवीला उत्तम लागायची. सिमला मिर्ची घालून केलेली ती पानकोबीची अर्धकच्ची भाजी मला खूप आवडायची. चवीला गोडसर लागायची ( त्यांच्या सगळ्या शाकाहारी भाजीत गुळ वापरलेला असायचा). मी त्यांच्या भाजीसारखी भाजी घरी बनवून बघण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला पण तो अयशस्वी झाला. पण हिरवे मटार घालून केलेली पानकोबीची भाजी छान लागते.

मला चालतो,इतकंच नव्हे तर गेल्या आठवड्यात बरेच दिवस कोबीची भाजी केली नाही म्हणून कोबी आणला गेला.

माझ्या बाबत शिजवलेली पानकोबी हि नावडती विभागात पूर्वी येऊन गेली आहे. पण तेंव्हा कोशिंबीर म्हणून ती आवडती होती.

वाढलेले सगळे खायचे असा शिरस्ता आहे. काही आवडत नाही असे नाही. पण हो काही गोष्टी फारशा आवडीने खात नाही. त्यात एकेकाळी पानकोबी सर्वात वरती होती. (बाय द वे आम्ही फक्त कोबी म्हणतो). त्याला कारण तुम्ही सांगितले तेच. होस्टेलला राहीलो असताना डबेवाला पिवळी धमक कोबीची भाजी सातत्याने आणून द्यायचा. त्यामुळे त्यानंतर बरीच वर्षे हि भाजी नको वाटायची. पण आता असे काही नाही. ताज्या चपाती सोबत आवडीने खातो. सर्वात आवडती गोष्ट म्हणजे कच्च्या कोबीची कोशिंबीर.

मला प्रामाणिकपणे असे वाटते कि ज्या भाज्या वास्तविक उत्तम सॅलड आहेत, ज्या खरे तर जेवणासोबत कच्च्या खायला छान लागतात (किंवा फार्फारतर कोशिंबीर करून) त्यांना पूर्वी कोणीतरी "धर कि उकड आणि दे तिखटाची फोडणी" ह्या चक्रात टाकायचा पायंडा पडून त्यांची पार वाट लावली आहे. कोबी, शिमला मिरची, टोमॅटो, मोड आलेली कडधान्ये, कांद्याची पात इत्यादी सॅलड म्हणून किती छान आहेत. पण नाही. अनेक घरांत त्यांच्या नशिबी उकडणेच आहे. तरी नशीब कि गाजर, काकडी यातून सुटले. नाहीतर उकडून चरचरीत तिखटाची फोडणी दिलेली काकडी चपातीसोबत खावी लागली असती Proud

असो. छान लेख. अगदी कोबीच्या कोशिंबीर सारखा खुसखुशीत Happy

ता.क.: अरे हो, उकडलेल्या कोबीपासून बनवलेल्या आवडत्या पदार्थांत 'आलू गोभी पराठा' सर्वात वर. त्याचा उल्लेख न करून कसे चालेल.

Chicken coleslaw हा माझा अतिशय आवडीचा कोबी वापरून केलेला पदार्थ आहे. कोबीच्या इतर वापराबद्दल न्यूट्रल आहे. आवडत/नावडत दोन्ही नाही.

कोबी कमी आवडतो, हेट वगैरे नाही करत अजिबात.

कच्चीपक्की भाजी फोडणीत मिरची, कढीलिंब घालून केलेली (गुळ, साखर अजिबात न घालता परतून केलेली ). पचेडी, भजी, कोबी वड्या हे प्रचंड आवडतं. थालीपीठ पण आवडतं. कोबी मसालेभात पण आवडतो.

पण हिरवे मटार घालून केलेली पानकोबीची भाजी छान लागते. >>> ही मस्त होते पण कृती वर मी लिहिलेली कोबी कच्ची पक्की भाजी असल्याप्रमाणेच हवी. साखर गुळ नको अजिबात. आमच्या शेजारी राहणाऱ्या कच्छी कुटुंबातील भाभी, कोबीच्या कच्ची पक्की भाजीत गुळ साखर घालायच्या नाहीत. त्यांचं बघून आई तशी करायला लागली. नाहीतर चणाडाळ, गुळ, गोडा मसाला घालून व्हायची जास्त आमच्याकडे.

विदर्भातील लोक पानकोबी किंवा पत्ताकोबी म्हणतात, बाकीच्या ठिकाणी फक्त कोबी म्हणतात आणि फ्लॉवर ला फुलकोबी, बाकीच्या ठिकाणीं फ़क्त फ्लॉवर.

हो.. आम्ही पण कोबी आणि फ्लॉवरच म्हणतो.
मानवजी.. तुम्ही लेख भारी लिहिलायं हे वर लिहायचं राहिलं.

मलाही नाही आवडत कोबी. त्यातून तो जून असेल तर अगदी उग्र वास येतो. कोबी भात, कोबीच्या पानात गुंडाळून केलेल्या कसल्या कसल्या वड्या असली सुगरिणीची करामत म्हणजे बलामतच.
अगदी कोवळा मिळाला तर बाहेरची पाने टाकून देऊन टोकाकडचा भाग किसून केलेली लच्छेदार रबडी अथवा कलाकंद अथवा खीर बरी लागते. पण खिरीसाठी इतर अनेक वस्तू असताना कोबी कोण कशाला वापरेल!
नाही म्हणायला स्प्रिंग रोल्स आवडतात.
लेख आवडला हे वे सां नल.

कोबी जून असेल तर प्रचंड उग्र वास येतो मात्र ह्याला अगदी अगदी हिरा. कोवळा असेल तर आणते.

रबडी, खीर, कलाकंद कोबीचा मी पहिल्यांदा ऐकतेय.

मी कोबी फ्लॉवर म्हणायच्या गटातली.>>> मीही!

पण खिरीसाठी इतर अनेक वस्तू असताना कोबी कोण कशाला वापरेल!>>+१.
कोबीच्या वड्या मस्त लागतात मात्र.

कच्छी वरून आठवलं
कांदा महाग झाल्यावर कच्छी दाबेली वाल्याला कांद्या ऐवजी बारीक चिरलेला कोबी घालताना पहिल होतं, मी २-३ वेळा विचारलं पण त्याला कोबी कसा काय, कोबी कसा काय - नो उत्तर Lol

जास्त शिजवल्यावर कोबीचा जो वास येतो तो मला तरी अजिबात आवडत नाही.

सो, मी पचडी, पराठा, अर्धी कच्ची भाजी कॅटेगरी मध्ये
बाकी मानव दा , कोणत्या कोबी विकणाऱ्याशी डील जमलीये का (किती टक्के म्हणतोय) Wink

मेसवाल्यांची अगदी आवडती भाजी Wink

मला कोबीची भाजी नाही आवडत फारशी पण त्याच भाजीची बटर, सॉस, चीझ वगैरे घालून फ्रॅंकी केलेली असली की मग मिटक्या मारत खातो Happy

मला हिवाळ्यातली ' पानकोबी' आवडते. उन्हाळ्यात बिग नो त्यया उग्र वासामुळे.मि, कढीपत्ता टाकून स्टरफ्राय आवडते. एक केरळी मैत्रीण ( ती बदलून केरळला गेली य वर्षांपूर्वी) लाल सुक्या मिरच्या व भरपूर ओ.नारळ करून करायची.इतकी सुरेख एकसारखी चिरलेली असायची. दिसायला फो. पोह्यांसारखी दिसायची आणि मी ही पोह्यांसारखी बशीत घेऊन खायचे. तशी भाजी अजून पर्यंत जमली नाही. कोशिश जारी है... चायनीज मध्ये इतर भाज्या,सॉसेसमुळे उग्रपणा दमत असावा.
सज्जनगडला पोह्या उपम्यात घालतात पानकोबी कांंद्याएवजी.

"कांदा महाग झाल्यावर कच्छी दाबेली वाल्याला कांद्या ऐवजी बारीक चिरलेला कोबी घालताना पहिल होतं, मी २-३ वेळा विचारलं पण त्याला कोबी कसा काय, कोबी कसा काय - नो उत्तर Lol "
अगदी अगदी
कांदा महाग होण्याचे एक चक्र असते. ठराविक वर्षांनी कांदा महाग झाला की हॉटेलात सलाडमध्ये भरड चिरलेला कोबी दिसू लागतो. कोबीगाजरकाकडीची मिश्र कोशिंबीर दिसू लागते. कोबीच्या पानांचे पकोडे दिसू लागतात. पट्टीच्या समोश्यांमध्ये कांद्याऐवजी किसलेला कोबी दिसू लागतो. अल्प काळाकरता कोबी कळीचा बनतो.

मंजूताई इथे मुंबईत पण अशी गावठी कोबी मिळते.. भाजी, कोशिंबीर मस्त लागते ह्या कोबीची..
मला २ /३ किलो वजनाचा भला मोठा कोबी आवडत नाही.. छोटा गावठी कोबी बघून घेते..
शिजलेला कोबी अजिबात आवडत नाही.. हॉटेलमध्ये रसम .. सांबारमध्ये घालतात.. ते शिजवूनच भाजी करतात..

लेख मस्त कोबीच्या भानोल्यासारखा..( तीळ घालून केलेल्या कोबीच्या तिखट वड्या )

फोडणीचे वरण, गरमागरम भात आणि कोबीची लसूण मिरचीच्या ठेच्यावर केलेली भाजी म्हणजे माझं कंफर्ट फूड,
नॉनव्हेज प्रेमी असूनही मी कोणत्याही वेळी / दिवशी खाऊ शकते.

ते नावडता पदार्थ आधी संपवण्या बाबतीत माझा भाऊ पण तुमच्यासारखाच आहे.

मला बर्‍याच भाज्या विशिष्ठ प्रकारे केल्या तरच आवडतात , त्यातलीच एक भाजी म्हणजे पानकोबी.
कच्चा कोबी हा कोशिंबिर आणि कोलस्लॉत - यात पुन्हा मेयोचा दर्जा आणि प्रमाण महत्वाचे. त्याशिवाय जांभळा कोबी मी लेट्युस ऐवजी / जोडीला सॅलदमधे आणि फिश टाको, चिनन बरीतो वगैरेत वापरते.
फरमेंटेड - सॉवरक्रॉट(पान कोबी) आणि किमचीत (नापा कॅबेज). हे दोन्ही घरगुती हवे.
शिजवलेला कोबी - यात कोबीची भजी, थालीपिठ, कोबीच्या झणझणीत वड्या, कोबीचा झुणका. त्याशिवाय अर्धवट शिजलेला स्टरफ्राय आणि स्प्रिंगरोलमधे.
आमच्याकडे डाळ घालून केलेली कोबीची भाजी न आवडण्याची माझ्या आई पासूनची परंपरा. कोबीची भाजी ही फक्त माझ्या आईच्या पद्धतीची, हिंग-मोहरी-हिरवी मिरचीची फोडणी त्यावर एकसारखा बारीक चिरलेला कोबी अजिबात पाणी न घालता ४-५ मिनीटे नुसत्या वाफेवर कोमेजेल इतपतच जेमतेम शिजवलेला. वरुन मीठ आणि बेताची हळद घालून थोडेसे परतायचे की बस्स!
मी लग्न ठरल्यावर विकेंडला होणार्‍या सासरी रहायला जात असे. तेव्हा पहिल्याच शनिवारी बाणेदारपणे पानात कोबीची भाजी वाढू दिली नव्हती. माझ्यामुळे छोट्या पुतण्यालाही मोरांबा-पोळीचे जेवण मिळाल्याने आमची लगेच गाढ मैत्री झाली. Happy

सर्व प्रतिसादकांचे आभार.

अतुल/Sadha manus/: हो विदर्भात पानकोबी असं म्हणतात. मला जर कोबी आण म्हटलं तर मी विचारेन "कुठली? पानकोबी की फुलकोबी?" आणि दोन्ही कोबीला आमच्याकडे स्त्रीलिंंगी संबोधतात.

प्रतिसादांतून मी खाल्ले / ऐकले त्यापेक्षा अजून बरेच प्रकार कळले कोबीचे. आणि चायनीज - व्हेज मंचुरीयन कोबीचे बनते हे मी विसरलोच होतो. ते मला थोडे फ़ार चालून जाते एखादा पीस (शिवाय ते तेलकटही फार असते).
Chicken coleslaw आणि स्वातींनी सांगीतलेले अन्य प्रकार माहित नव्हते.
कोबीची भाजी खावीच लागली तर त्यातला त्यात मटार घातले असतील तर जरा बरे वाटते.
स्प्रिंग रोल, सलॅड, बर्गर मध्ये वगैरे कोबी ऐवजी लेट्युस असेल तर अजिबात हरकत नसते मला, कच्चा लेट्युस छान लागतो.

लेट्युस... यस्स! हेच आठवत नव्हतं मघाशी सलॅड च्या यादीत.
भाजीवाल्याला वर्णन करून सांगितले निदान त्याला तरी नाव आठवेल म्हणून. तर तो म्हणाला "त्याला सलाडची पाने" असेच म्हणतात Proud
म्हणून मी शेवटी 'इत्यादी' लिहून रिकामा झालो.

कच्छी भाभी कोबी कच्ची' हे मला Tongue-twister phrase वाटते.>>> Lol
लेख मस्त! तळटीपही आवडली.
माझ्या सासरी, दिर-जावेला कोबी इतका आवडतो कि आठवड्यातून १-२ वेळा आणि वर्षभर केला जातो. त्यात माझा नवरा जे वाढले ते निमुटपणे खाणारा. इतक्यावेळा कोबी खाल्ल्यावर आपला कोबी खाण्याचा आयुष्यभराचा कोटा संपला आहे असे त्याला वाटते. लग्नानंतर आता स्वत: भाजी आणायला गेला तर कोबी कधीच आणत नाही.
कोबी शिजताना उग्र वास येतो पण खाताना त्याची तिखट भाजीही मला गोडच लागते.

Pages