मेळघाटातला एक दिवस (भाग-५ अंतिम)

Submitted by अरिष्टनेमि on 24 May, 2020 - 17:00

या सगळ्या भानगडीत आंघोळीला वाजले १०. मस्त कोमट-कोमट पाण्यानं आंघोळ केली. ऊन चांगलंच कावलं होतं. पुन्हा सर्पसिंहासनात आरुढ झालो. हाताशी दुर्बीण ठेवली. हो. असलेली बरी. खूप वेळा काहीही अनपेक्षित दिसू शकतं.

माझ्याकडं ऑलिम्पस कंपनीची 10X50 दुर्बिण आहे. ही स्वस्त आणि उत्तम आहे. मग तसं घेऊ गेलो तर यापेक्षा चांगल्या आणि महाग पण मिळतात. पण आपलं काम या दुर्बिणीनं भागतं म्हटल्यावर काय! सहजच आता विषय निघाला म्हणून सांगतो. 10X50 मध्ये 10 ही आहे दुर्बिणीची वर्धनक्षमता (magnification power) आणि 50 आहे समोरच्या भिंगांचा व्यास मिलीमीटरमध्ये. आता ५० ला १० नं भागलं तर ५ येतं. म्हणून ५ मिलिमीटरची लख्ख प्रतिमा आपल्या डोळ्याला दिसते. आधी मी 20 X 50 वापरत होतो. यात मिळणारी प्रतिमा ५० भागिले २०, म्हणजे २.५ मिलिमीटरची मिळत होती. मग उजेड कमी असला तर डोळे फोडून दुर्बिणीत बघावं लागे. ती उत्तम वापरल्यावर एकदा नागझि-यात वाघिणीच्या नादात काटेथुव्याचा बंधारा उतरताना दगडावर आपटली आणि आतला त्रिकोणी लोलक हलून दोन-दोन प्रतिमा दिसू लागल्या. मी घरीच दुरुस्त करून पुढं भरपूर वापरली. पण हळूहळू ५-७ वर्षात तिनं जीव सोडलाच. असो. यानिमित्तानं मी दुर्बिण झकास दुरुस्त करायला शिकलो. बाकी दुर्बिण घेताना काचांचं लेपन, किती कोनातलं दृष्य दिसतं या गोष्टी पण पहाव्या लागतात. पण ते शेपूट लांबत जाईल, इथंच थांबवूयात.

समोर जंगलात आता पक्ष्यांची हालचाल कमी झाली होती. पण बंद नाही. जंगल कधीच झोपत नाही. झोप ही रानात नाहीच, जे आहे त्याला आराम म्हणू शकतो आपण. खरी आणि अनुभवसिद्ध गोष्ट आहे बरं.

शिवाय माणूस सोडला तर कोणताच जीव शांत झोप घेत नाही. आपल्याला गाढ झोप झाल्याशिवाय झोपलो असं वाटतंच नाही. पण जनावरं, पक्षी यांच्या झोपा म्हणजे अर्धवट जागेपणी घेतलेल्या निव्वळ डुलक्या. कधी गर्दगाढ झोपलेलं जनावर, पक्षी मला दिसला नाही.

आता ऊन चटचटत होतं. तरी मी उठून समोरच्या पायवाटेनं फेरफटका मारायला निघालो. धांडोळा घेतला की काही ना काही दिसू शकेल. अशा वेळी उंबराच्या, कुसमाच्या सावलीत, पक्षी दिसणारच. झाडाच्या ढोलीत, बेचक्यात, पाण्याच्या टाकीच्या सावलीला, डेझर्ट कुलरच्या बाजूला, पाणवठ्याशी असणा-या खड्ड्यात, बिळात, दगडाच्या खालच्या सापटीत, अशा नामी ठिकाणी पक्षी बसतात. पर्णपक्षी, निरनिराळे माशीमार वगैरे जे चपळ, लाजाळू पक्षी तुम्ही कधीच नीट पाहिले नसतील, ते पाहण्यासाठी या उत्तम जागा.

पेंचमध्ये एका नाल्याकाठच्या उंबराच्या झाडाच्या मुळाशी, जमिनीला लागून असणा-या पोकळीत मी चक्क मोठाच्या मोठा मलबार धनेश पक्षी उन्हाच्या कारानं दुपारी धसलेला पाहिला आहे. नाल्याच्या काठाच्या गुहेत अनेक पर्णपक्षी बसलेले पाहिले आहेत. असो. पक्षी निरीक्षणाची उत्तम वेळ सकाळ किंवा संध्याकाळ यात वाद नाही. पण पक्षी जवळून निवांत अनुभवायचा असला तर अशा उन्हाच्या वेळी संधी मिळते.

ते पहा, त्या सागाच्या खालच्या झुडपात काही आहे. दिसला? हा बुजरा सुभग. सकाळी छान गाणी म्हणून गेला. मुठीएवढासुद्धा नाही, पण आवाज? जीवाच्या मानानं दसपट असेल. याला गाठणं तसं अवघड. एरवी झाडांच्या वरच्या फांद्यांमध्येच रमतो. पण आता हा निवांत आहे. त्याला खूप त्रास नाही द्यावा. डुलकी मोडली त्याची.

42.jpg

ही वाट अशीच पुढं उजवीकडं वळून जाते. पण त्या वाटेनं उन्हाचं फिरण्यात काही हशील नाही. नदी काठानं गेलेलं उत्तम. इतक्या उन्हाचं आता काही येणार नाही पाण्यावर, पण पाखरं गारव्याला येतात. समोर किंचित उजव्या हाताला जंगलाच्या या भगभगत्या तपकिरी पार्श्वभूमीवर तो निळा ठिपका म्हणजे आपल्या कामाची गोष्ट दिसते.

बघा. मी म्हटलंच होतं. आहेच ती. सकाळी नदीत जिच्या आवाजामागं खुळावून मी फिरलो, ही तीच निलीमा. आळसावून बसली आहे इथं. पण हे तिचे ‘अहो’ आहेत. दस्तुरखुद्द सौ. इतक्या चमकदार नसतात.

29.jpg

तोवर बुलावा आला. ‘खाना तय्यार है.’

‘आलू-वांगा आणि घडीची पोळी’ असा बेत होता. खरं तर मी गेल्या अनेक वर्षांपासून वांगं ब-याचवेळा कायमचं सोडलं आहे………..पण वांगं मला सोडायला तयार नाही. वांग्याचा माझ्यावर जीव अपरंपार.
‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ ऐवजी मी हळूहळू ‘जेथे जातो तेथे तू माझा वांगाती’ असं म्हणू लागलो होतो.

काहीही असो, वांग्याचा आणि माझा वैयक्तिक वाद असला तरी जेवण ‘ब्येष्ट’ होतं. तर असं ते जेवण करुन मी आळसावलो. मग सकाळचे फोटो कसे आलेत ते पहात पलंगावर खिडकीशी बसलो. हळू हळू गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावानं माझ्या डोळ्याच्या पापण्या आणि पाठ दोन्ही खाली खाली जाऊ लागले. बाहेर उन कावलं होतं. ४६ डिग्री म्हणजे काय हो? काहीच्या काही झालं ना! अशा वेळी खोलीतल्या कुलरच्या थंड थंड हवेनं मला धरलं. कुलर मला सोडेचना. जेहत्ते काळाचे ठायी मी धराशायी होऊ लागलो. मग कॅमेरा ठेवतोय तोवर दोन वाजले. बा कुलरा! या झाडाला आता सोड. आता पुन्हा एक चक्कर मारायची होती. कॅमे-याच्या बॅटरीचं तब्येतपाणी पाहिलं. हातपाय धुवून कपडे बदलले आणि निघालो.

मेळघाट म्हणजे घाटांचा मेळ. इथं सलग सपाट जमीन नाहीच. जंगल छान दिसत होतं. एरवी हिरवंगार दिसणारं जंगल आता रंगीत दिसत होतं. साग, धावडा, सालई, मोईन, ऐन, पळस, पांगारा, सावर, तेंदू, बिजा, चिचवा, मोह, लेंडीया, कुसूम, कुचला, आवळा, चार, बेहडा, हिरडा, वगैरे वगैरे समस्त जन हर त-हेच्या रंगांनी शोभा वाढवत होते.

38.jpg

आता या इथं हे सारे लाल बावटावाले कोण दिसतायेत हे सूज्ञ वाचकांनी ओळखलंच असेल.
नाही, नाही, नाही. हे पळस म्हणत असाल तर ते हे नाहीत.
या सावरी किंवा पांगारेसुद्धा नाहीत.
जंगलात गुलमोहोराचं नाव घेऊ नका.
हे सारे लालूमिया आहेत कुसूम.

कुसूमाचं झाड मोठं कामाचं या वेळी. उन्हं तापतात तेंव्हा याला सुरेख लाल पालवी फुटते. उन्हाळा तापत जातो तसं झाड हिरवं होत जातं आणि मग ऊन जेंव्हा मी म्हणत असतं, तेंव्हा कुसमाच्या सावलीसारखं दुसरं काही नाही. पाण्याच्या ठिकाणी कुसूम असला तर ओल्या अंगानं वाघोबा याच्याखाली हक्कानं बसतात.

अशा उन्हात कोणतंच जनावर बाहेर निघत नाही. ऊन थोडंसं उतरायला लागलं की मग हालचाली वाढतात. तोपर्यंत शोध घेत राहणे.
हे एक चुकार सांबर पळालं. सुरुवात झाली होती.

39.jpg

एरवी अत्यंत देखणा दिसणारा हा प्राणी उन्हाळ्यात पाहू नये. पूर्ण अंगावरचे केस लूत भरल्यासारखे गळून जातात. कातडी दिसू लागते. झाडं जशी कमी पाण्यात जिवंत राहण्यासाठी पानं सोडून देतात, तसं उन्हाळा सोसावा म्हणून ही सांबरं केस गाळतात. नाहीतर पावसाळ्यानंतर खाऊन माजलेला पुष्ट शिंगाडा हिरव्या वाटेनं जाताना मागं वळून आपल्याकडं पाहतो यासारखं रुबाबदार दृश्य क्वचितच.

पण हे जंगलातलं मूर्ख, भैताड जनावर. याचे खूप किस्से आहेत. एक माझा स्वत:चा अनुभव. सांबरामागं १०-१२ कुत्रे लागले होते. अशा वेळी सांबर हमखास पाण्यात घुसतं. तसं ते घुसून उभं राहिलं. कुत्रं जवळ काठाशी आलं की सांबर ठाक करून पाय आपटत होतं. आम्ही साताठ जणांनी दोन गटात होऊन कुत्रे पळवले. सांबर दुस-या बाजूला हाकललं. हे भैताड तळ्याला चक्कर मारून परत कुत्र्यांमागंच गेलं. दुरून पहात उभं राहण्याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हतं.
असो. पाणवठ्याशी उभं राहिलं तर बरीच जनावरं दिसतात.

ही भेडकी मुलखाची संशयी. पाणवठ्याशी येऊन कधीची दगड होऊन उभी आहे झुडपात.

1_1.jpg

ही मादी आहे. ही हरणं जंगलात एकेकटीच राहतात. इतर हरणांसारखी कळपानं नाही. आता जोवर तिला इथं माणूस दिसतो आहे तोवर ती या पाण्यावर येणार नाही.

पुढं निघालो. उंचावरून खाली काटेरी झुडूपांत चरणारा गव्यांचा कळप मोठा अद्भुत दिसत होता. हे दृश्य मोहिनी घालणारं होतं. हे किती तरी वेळ पहात राहिलो.

43.jpg

चरत चरत हा गवा येतो आहे.

35.jpg

थोडं पुढं निघालो तर एक एकांडा गवा रस्त्याकडेला दिसला. हा त्या कळपाचा सदस्य नाही. याचा सवता सुभा दिसतो आहे. एकटाच आहे म्हणजे हा कोणाच्या बापाला घाबरणार नाही. पण आपण शांत राहिलो तर तो काही करणार पण नाही. चरत-चरत तो गाडीकडं बघत जवळ आला.

3_1.jpg

शिंगानं हवेतच माती उकरल्यासारखं केलं. गाडीत आपण सुरक्षित आहोत ही भावनाच त्यानं उखडून टाकली होती. हे आक्रमकतेचं लक्षण होतं. आधीच इथून निघायला हवं होतं. धडधड वाढू लागली. गाडीला खेटला असता तर त्याचा खांदा गाडीच्या टपाला टेकला असता. एक-सव्वा टनाचा हा ऐवज होता. अशा गव्याच्या नादी वाघसुद्धा सहसा लागत नाही. शिकार उलटू शकते. सहा महिन्यांपूर्वी ताडोबात गव्यानं चक्क वाघीण मारली. वाईट मारली.

या गव्याचं छातीपर्यंतचं शरीरच फक्त मला दिसत होतं. डोकं गाडीच्या टपाच्या वर. तो काय बघतो आहे ते समजायला मार्ग नाही. श्वास, आवाज, हालचाल, कॅमेरा सारं बंद. इतकी भीती वाघ असता तर नक्कीच वाटली नसती. सुदैवानं कोणतंही मानवी गैरकृत्य न करता सुजाण पाशवी प्रवृत्तीनं गाडीला सावकाश वळसा घालून तो रस्ता ओलांडून गेला सुद्धा. ‘मानवी’ प्रवृत्ती कृत्रिम आणि षड्रिपूंनी बाधित असते, ‘पाशवी’ प्रवृत्ती सहज आणि नैसर्गिक असते.

ही ठिपकेवाली चितळं. कांचनमृग. सर्वांगावर सुरेख ठिपके; ठिपक्यांची रांगोळी काढताना नवख्या पोरीनं रांगोळीची चिमट सैल सोडावी असे. कधीतरी चांदण्या रात्री पावसानं रानात कळप झोडपला आणि सा-या चितळांनी पावसातल्या चांदण्या अंगावर धरून ठेवल्या. पडत्या पावसात हिरव्यागार गवतातला चितळांचा कळप मोठा अद्भुत दिसतो. असाच यांचा मोह सीतामाईलाही टळला नाही अन् इथून रामायणाच्या ‘कहानीमे ट्वीस्ट’ आला. ही जंगलात भरपूर आणि सर्वत्र दिसतात. यांचं कौतूक जंगलात पहिल्यांदा जाणा-याला. नंतर नंतर ही अगदी सवयीची होऊन जातात. इथं बारमाही पाण्याच्या आधारानं गवत मुबलक. बारा महीने हिरवं.

हा अडनिड्या वयाचा एक पोट्टा शाणपणा करत एकटाच इकडं गवताशी रेंगाळला होता.

4_1.jpg

मानेवरच्या जखमांचे व्रण त्याच्या बंडखोरीचे साक्षीदाऱ होते. कळपातल्या एखाद्या मादीच्या अंगाला अंग घासत त्यानं नको तेवढी केलेली लगट त्याला भोवली होती. माद्यांवर हक्क सांगणा-या जुन्या जाणत्या नराला त्यानं ललकारलं होतं. घसरणारे खूऱ जमिनीत घट्ट रोवून त्यानं खडाखडी केली असेल. पण त्याच्या अंगावर जेवढे ठिपके नाहीत तितक्या झुंजी समोरचा बलशाली नर लढला होता. अशा किती नवशिक्यांना त्यानं आसमान दाखवलं असेल! अखेरीस मानेवर टोकदार शिंगांचे घाव घेऊन यानं जीव वाचवून माघार घेतली असेल.

अशाच झुंजी हा खेळत राहील, हारत राहील. वाघा-बिबट्यापासून, सोनकुत्र्यांपासून राहिला तर मग एके दिवशी याच्याही अंगात तेच बळ येईल, शिंगं तशीच जाणत्या नरापेक्षा थोराड फुटतील. झाडांवर घासून त्यांना मग भाल्यासारखी टोकं काढून हा परत मैदानात उतरेल. कदाचित त्या दिवशी जुन्या नराला हा चीत करील. वय उताराला लागलेला आणि यानं ताकदीनं भोसकलेला नर कुठंतरी भेलकांडत कोल्हया-कुत्र्याचं धन होईल. कळप याला शरण जाईलही. कोणी सांगावं?

या जंगलात मधुबाज खूप. हा पोळ्यातून मधमाशांच्या अळ्या काढून खातो. म्हणून याची चोच बाकदार पण लांबट आहे. याला रंगानं ओळखाल तर फसाल. हा कुठं कशा तर कुठं कशा रंगाचा. तसा असतो तपकिरीच आणि पांढराच म्हणा, पण त्यात अनेक फॅशन्स. शेपटीवर पट्टा अन् लहान चपटं डोकं ही याची पक्की खूण.
34.jpg

अनेकदा पाहिलेलं एक दृश्य इथं वेगळं दिसलं. नाचणारा मोर. थोड्याशा मोकळाणात हा मोर पिसारा फुलवून नाचत होता. चार-सहा लांडोरी बाजू बाजूनं चरत त्याला वाकड्या मानेनं निरखत होत्या. हळू हळू लांडोरी पांगल्या. हा एकटाच नाचत स्वयंवरातल्या वरपरीक्षेचा सराव करत होता. झाडाच्या खाली नाचता नाचता तो वरून येणा-या उन्हाच्या कवडशात आला अन् त्याचे रंग झळाळून ऊठले. हे असं निखळ सौंदर्य पाहून डोळे निवतात.

37_0.jpg

भरपूर जनावरं दिसली होती, भेडकी, चौशिंगा, अस्वल, रोही, रानडुकरं. जंगल मोठं प्रेमळ आणि लेकुरवाळं दिसत होतं. बाहेर उन्हानं होणारी तलखी इथं जाणवत नव्हती. शिवाय आता सूर्य खाली उतरल्यावर वातावरण सुखद होऊ लागलं. परतीला लागलो.

घाटरस्त्यानं डोंगराच्या लाटांवर लाटा दिसत होत्या. नाल्यातून निघताना कहू तपासला तर त्याच्या फांदीवर बसलेलं मोठं मासेखाऊ घुबड दिसलं. दिवसभर ढोलीत आळसावलेलं ते ढोलं घुबड दोन शेंड्या अर्ध्या-अर्ध्या उभ्या करुन बसलं होतं. आता ते अंधाराची वाट पहात होतं. सूर्य बुडाला की खाली नाल्यात उतरणार. किर्र रात्री नाल्यातल्या दगडावर चमकणारे दोन डोळे मी कित्येकदा पाहिले होते.

32.jpg

परतीचं अंतर बरंच होतं. अंधार जेमतेम पडला. थोड्या वेळानं गाडीचे हेडलाईट चालू झाले. एकदम समोर रस्त्याकडेच्या झाडावर काही झपकन येऊन बसलं. पाहिलं तर बटबट्या डोळ्यांनी गव्हाणी घुबड माझ्याकडं पहात होतं.

2_1.jpg

हा एक दिवस माझ्या खोलीत पाहुणा म्हणून राहून यत्र, तत्र, सर्वत्र संचार करून गेला होता. लहानपणी याच घुबडांना खडे मारताना आजीनं सांगितलं होतं, “घुबडाला दगड नाही मारायचे. ते दगड झेलतं आणि नदीकाठी जाऊन दगड चोचीत पकडून घासत बसतं. जसा जसा दगड झिजत जातो, तसा तसा दगड मारणारा माणूस खंगत जातो. दगड संपतो त्या दिवशी माणूस मरतो.” आम्ही जाम टरकलो. मग लपून लपून बारीक नजरेनं दोन दिवस त्या घुबडांच्या जोडीवर नजर ठेवली. कोणाच्याच चोचीत कधीच खडा दिसला नाही. जीव वाचला होता. मग परत आयुष्यात कधीच घुबडाला खडा मारला नाही.

घुबडापासून आता पुढं निघालो. मी खूश होतो. नव्या नव्या कॅमे-यात छान फोटो आले होते. गाडी धुरळा उडवत पळत होती.

दूर पुढं वाळलेल्या गवतात काही चमकलं. पुन्हा दिसेनासं झालं, पुन्हा चमकलं. ‘कोणीतरी आहे तिथं.’ गाडी जशी जवळ जवळ गेली तसं दिसलं की ते दोन ठिपके आहेत. हिरवे दोन ठिपके. काय असेल? जरा बरं दिसावं अशा अंतरावर पोहोचलो तर हा आजच्या दिवसाचा क्लायमॅक्स होता.
वाळल्या गवतात दोन हिरवे डोळे होते आणि अधून मधून दिसणारे काळे-पिवळे ठिपके. गवतात दांडगा-व्हंडगा बिबट मस्त बसून होता.
वाघ अनेक बघितले. पण असा माजलेला अन् न पळता बसणारा बिबट दिसण्याचा योग दुर्मिळ. त्याला काही कुठं जायची घाई नव्हती. फक्त पहिल्या जागेवरनं तो उठला आणि आणखी अलीकडं येऊन थोड्या मोकळ्या जागेत बसल्या-बसल्या आळसावला.

30.jpg

बहुधा त्यानं तिथंच आजूबाजू गारा केला असावा. भरल्या पोटानं तृप्त होऊन तो बसला होता. बाकी त्यानं जागा अशी ती सोडलीच नाही. किती वेळ त्याला बघत राहिलो. देवाला सोडलेल्या वळूसारखी त्याची मस्तवाल मजबूत गर्दन होती. त्याच्या प्रत्येक हालचालीत रुबाब ठासून भरला होता.
शेवटी मोह आवरला आणि निघालो.

पुढं झाडावर डोळे चमकले. नक्कीच रातवा असावा. गाडी झाडाशी पोहोचल्यावर पाहिलं तर आज जॅकपॉट लागला होता. उडती खार त्या झाडावर होती.

33.jpg

काही तरी शोधशोधून खात होती. चरत चरत खार शेंड्याला पोहोचली. अजून रात्र बाकी होती. तिला चरायला अनेक झाडं धुंडाळायची होती. तिनं शेंड्यावरून पंख पसरून सूर मारला आणि तरंगत तरंगत तीस – चाळीस मीटरवर दुस-या झाडाच्या खोडावर उतरली. खार उतरली; मी अजून तरंगतच होतो. क्या बात! क्या बात!! अंधारामुळं फोटो नाही चांगले काढता आले. पण नजरेला या खारीनं तृप्त केलं.

परत विश्रामगृह गाठलं. वा! वा!! वा!!! आजचा दिवस मात्र भारीच होता.

परत आंघोळ केली. दिवसभर अंगावर उडालेला धुरळा धुतला. खुर्चीत बसलो. ‘त्याच’ खुर्चीत बसलो. मनात अजून हरणं चरत होती, गवे टकरी खेळत होते, गरुडाच्या भीतीनं पाखरं किलकिलाट करत होती, बिबट मिशा पुसत होता, खार पॅराशूट उघडून तरंगत होती. मनात अजून धुरळा उडत होता. काढलेले फोटो बघत बसलो. तोवर रामलाल विचारत आलाच, “सायेब खाना?”

ब-यापैकी उशीर झाला होतं. आता त्यानं जेवण बनवून इकडं आणण्यापेक्षा मीच जाऊन शेजारी स्वयंपाक सुरु होता तिथं जाऊन बसलो. रामलाल समोर अंगणात भिंतीशी दोन पायावर बसून चुलीवर मक्याच्या भाकरी टाकत होता. गरमा-गरम भाकरी मी टेबलवर मनोभावे हाणत होतो. भाकरी चुलीवर टाकून भाजताना, उन्हात टाकलेल्या गव्हाशी आलेल्या कावळ्याला हाकलावं तसं त्यानं मध्येच एक लाकडाची ढलपी पुढं भिंतीशी फेकून मारली आणि चुलीच्या धुरानं बारीक डोळ्यांनी अंधारात पहात म्हणाला, “सायेब साप.”

समाप्त

लेखात वापरलेल्या बोली भाषेतील प्राणी / झाडं यांची सामान्य भाषेतली नावं

सोनकुत्रे - रानकुत्रे
रोही - नीलगाय
मधुबाज - Honey buzzard bird
कहू - अर्जूनाचं झाड
गव्हाणी घुबड - Barn owl
गारा - शिकार
रातवा - Nightjar bird

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रर्र ! अंतिम भाग इतक्यातच ?! असो.
अतिशय सुंदर भाषेत लिहिलेल्या आणि देखणी प्रकाशचित्रे असणाऱ्या या छोट्याश्या लेखमालिकेने खूप आनंद दिला. धन्यवाद आणि पुलेशु !

छान सफर घडवून आणलीत. भविष्यात अशाच शॉर्ट आणि स्विट ट्रीपच्या प्रतीक्षेत.
रच्याकने Light 1 घ्या, तुम्ही वांग्यासोबत जगायची तयारी करून घ्या, कारण असे दिसते आहे की त्याची तयारी दिसते आहे तुमच्या सोबत जगायची. Wink

मेळघाटाचे हे वैभव बघायला वेगळा वेळ काढून जाणे कधी होईल देव जाणे!

अफाट सुंदर झाली ही मालिका! सगळे फोटोज एकदम सुंदर!
अर्रर्र ! अंतिम भाग इतक्यातच ?!
असंही झालंच

लिहित रहा.

वा!वा! अप्रतिम सुंदर झाली मालिका.
एकूणएक सगळे फोटो सुंदर.
घुबडाची ही दगड घासण्याची गोष्ट मला वाटतं श्रीनिवास विनायक कुलकर्णींंच्या 'डोह' पुस्तकात आहे.
मधुबाजाची ४९ रूपं आहेत असं श्री. किरण पुरंदऱ्यांकडून ऐकलंय. तुम्ही काढलेला फोटो सुंदरच आलाय.
1610-2019-0200383185848165040504.jpeg
हा चक्राता कँपमध्ये आम्हाला दिसलेला मधुबाज

अप्रतिम मालिका!! फोटो सुद्धा उत्तम. संपली Sad
लवकरच दुसरी मालिका येऊ द्या.
तुम्हाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!

काय लिहिता तुम्ही मस्त!
शेवटही कसला भारीय, "सायेब साप!!"
ते दगड झिजवण्याच्या घुबडाबद्दल मीही वाचलयकुठेतरी. बहुतेक चितमपल्लींच्या पुस्तकात.
ही लेखमालिका संपल्याचं वाईट वाटतय.

भाकरी चुलीवर टाकून भाजताना, उन्हात टाकलेल्या गव्हाशी आलेल्या कावळ्याला हाकलावं तसं त्यानं मध्येच एक लाकडाची ढलपी पुढं भिंतीशी फेकून मारली आणि चुलीच्या धुरानं बारीक डोळ्यांनी अंधारात पहात म्हणाला, “सायेब साप.”

समाप्त >>>>>

हे समाप्त चुकून पडलंय... क्रमशः पाहिजे ना !!

किती लवकर संपवलीत मालिका !!

परत आठवून बघा नीट..... अजून साताठ प्रसंग आठवतीलच...

मनःपूर्वक धन्यवाद... Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लिहायला अजून हुरुप येतो Happy

@ मऊमाऊ
कॅमेरा - Canon 70 D
लेन्स - Tamron 150-600
Canon 18-135
असं हे वापरलं आहे.

हर्पेन, वर्षा, किशोर मुंढे, पुरंदरे शशांक
मालिका लवकर संपवल्याबद्दल दिलगिरी. सध्या लिहायला वेळ मिळत नाही. पण लवकरच पुन्हा एखादा लेख लिहिन.

प्रतिसाद वाचून लिखाणाला बळ येतं. मग वेळ काढावाच लागतो. : )