नदी

Submitted by _तृप्ती_ on 24 April, 2020 - 03:34

समोर माझ्या, शांत वाहणारी नदी,
करीत होती माझ्याशी गुजगोष्टी
"बस जरा, थकलीस ना पोरी?
जनीमनीचे किती साठले गं उरी."

मायेच्या त्या हाकेने, डोळा दाटे पाणी,
तर म्हणाली, "उगी नको होऊ हळवी,
उर भरून श्वास घे आधी स्वतःसाठी,
काळजातले निर्माल्य सोड माझ्या काठी

फुलणे अन फुलवणे आहे तुझ्या हाती,
निगुतीने लिंप जरा ओली सुपीक माती
ऋतुमागूनी येती ऋतू, चक्र हे नित्याचे,
पालवी फुटण्यासाठी, गळणे हे पानांचे

उठतीलच गं, कसले कसले तरंग,
अन मिसळतील त्यात जुने नवे रंग
ऐक एक गाणे, दडले तळाशी खोल,
वाहत जाणे पुढे पुढे, गात त्याचे बोल.”

मी पुसले डोळे अन म्हटले गाईन मी गाणी,
नदीत उठला तरंग, तीही थोडी पाणावली
हलके लागली कानी,"येत जा ग अशी,
माझेसुद्धा तुझ्यावाचून दुसरे नाही कोणी."

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults