सुंदर अक्षर

Submitted by Athavanitle kahi on 23 January, 2020 - 23:03

आज अक्षर दिनाच्या, सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. एक शब्द दहा वेळा लिहून गिरवून घेऊन चांगलं वळण देणाऱ्या शिक्षकांना तसेच सुलेखा पाटी ज्यांनी वापरली आहे, त्यांना त्याचं महत्त्व आहेच त्याच्या निर्मात्याला, आणि मैत्रिणीच अक्षर सुंदर आहे म्हणून जीव लावून मेहनत घेणाऱ्या त्या निरागस बालमनाला, आणि थोडेसे प्रयत्न करूनही अक्षर चांगलं होत नाही म्हणून नाद सोडून देणाऱ्या मित्र-मैत्रिणींनाही अक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अगदी तसच सांगायचं म्हणजे ऑफिसमध्ये एन्ट्री करताना खूप कंटाळा यायचा दुसऱ्याच अक्षर सहज वाचताच येत नाही. आणि म्हणून छापील बिल असलेले एन्ट्री पटापट व्हायच्या. शाळा-कॉलेजमध्ये असतानाही आपण गैरहजर असल्यानंतर कोणाची वही घरी आणून ते पूर्ण करताना खूप त्रास व्हायचा. अर्थ समजून घेत, शब्दांचा अंदाज घेत ती वही पूर्ण केली जायची. का कोणास ठाऊक पण दुसऱ्याच अक्षर जर ते खराब असेल तर नाही वाचता येत मला आणि पहिल्या दोन चार ओळी वाचल्या की कंटाळा पण येतो. पहिल्यापासूनच माझ्या वह्या कधीही कोणी हातात घ्याव्यात अशा स्वच्छ टापटीप असायच्या. खोडलेल्या शब्दावर अगदी भरपूर जोर देऊन पान काळ केलेलं मला अजिबात रुसायचं नाही. दुसऱ्याच पेन मागतानाही जीवावर येई. पाठीमागून चावलेलं पेन किंवा डुग डु गणार वेगळीच रिफील घालून ऍडजेस्ट केलेलं पेन माझ्याकडे कधीच नसायचं. माझ्या पेनांच कधी टोपणही हरवत नसे. पण असो ही सर्व गम्मत केलेल्या, विद्यार्थ्यांना बालपणीच्या आठवणी लक्षात राहिल्या असतील. या अक्षर दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवी नववी दहावी च्या वह्या डोळ्यासमोरून गेल्या. प्रयोग वही, आलेख वही निबंधाची वही याची विशेष घेतलेली काळजी आठवली. सुंदर वळणदार अक्षर ही खरोखरच देणगी आहे मला तरी अक्षर चांगले होण्यासाठी फार काही करावे लागले नव्हते. परंतु अक्षर वाचण्यासारखे तरी असावे.
सुंदर वळणदार अक्षर ही आजीकडून मिळालेली देणगी लेकीला पण मिळाली याचा जास्त आनंद होत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शाळेतुन इतर शाळांमधे हस्ताक्षर स्पर्धांसाठी पाठवलं जायचं.
इतकं सुंदर अक्षर होतं तेव्हा.
आता चार ओळी लिहाव्या तर अक्षर वळत नाही तेव्हासारखं. Sad
आज आहे का अक्षरदिन? काहीतरी दहा ओळींचं शुद्धलेखन लिहिते मग मी. Happy

आज अक्षरदिन आहे हे माहीतच नव्हते. सुलेखा पाटी म्हणजे ती मुळाक्षरे गिरवण्यासाठी त्यावर पेन्ट केलेली असतात तीच का? परवाच आमच्या छोट्यासाठी शोधत होते पण जवळपासच्या दुकानात मिळालीच नाही.
अक्षरदिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

माझे हस्ताक्षर

hastakshar.jpg

टोच्या भारीच.
मला ह्या वरच्या दोन ओळी लिहायलाही वेळ लागला. Happy बोटं वळत नाहीत.

@टोच्या बोरूने लिहिलंय का की नीबवालं शाईपेन?? पण अक्षर सुरेख.
@ सस्मित तुमचं पण हस्ताक्षर सुरेख आहे अगदी.

हायला

ते प्राथमिक शाळेत पुस्तिलेखन वगैरे करून, बर्गे यांची सुलेखा स्लेट वगैरे वापरून आमचं हस्ताक्षर सुधारलं नाही ते नाहीच.

कोंबडीचे पाय नव्हते एवढंच.

शाळेत नीटनेटक्या मुलींना हस्ताक्षराचे चार गुण अधिक मिळत असत.

बाकी माझा नंबर पहिला किंवा दुसरा असे. पण हस्ताक्षराबद्दल टोमणे ऐकून एकदा मी आठवीत बाईंना सांगितलं मात्र होतं कि हस्ताक्षर "सुवाच्य नसेल पण वाच्य" तरी आहे.

बाकी दर वर्षी कुणातरी सिन्सिअर मुलाच्या वह्या घेऊन त्या वर्षअखेरीस कॉपी करून पूर्ण केल्या जात असत. त्यामुळे अक्षर अजूनच वाईट येत असे. हे असं वह्यामध्ये प्रश्नोत्तरे लिहून नक्की काय फायदा झाला हे कोडं आजतागायत काही उकललं नाही.

परीक्षा संपली कि अशी भरलेली पाने फाडून उरलेल्या वहीच्या रफ वह्या करण्यात फार आनंद येत असे.

आमचं अक्षर हे कुत्र्याचं शेपूटच राहिलं, नाही ते नाहीच सुधारलं.

एवढंच आहे, डॉक्टर असल्यामुळे आता अक्षर भिकार असलं तरी लोकानि स्वीकारलेल आहे शिवाय ते वाचता येत असल्यामुळे कधी प्रिस्क्रिप्शन कळत नाही म्हणून माझ्याकडे रुग्ण परत आलेला नाही.

बायको मात्र आदर्श विद्यार्थिनी होती. नेहमी पहिली येत असे, सुंदर अक्षर इ इ आणि दोन्ही मुलं अक्षराच्या बाबतीत तिच्या वर गेली आहेत हे त्यांचं सुदैव.

सुंदर अक्षर हि एक कला आहे

कोणतीच कला आमच्यावर कधीही प्रसन्न झाली नाही

मग चित्रकला, हस्तकला नाहीच, नकला, नाट्यकला सुद्धा नाही

आणि बाकावर बसण्यार्या शशिकला, चंद्रकला तर नाहीच नाही.

बोकलत अक्षर सुंदर आहे.
सस्मित तुमचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुरेख टपोरे आहे.
टोच्या कॅलिग्राफी मस्तच.

असा समज आहे की बुद्धीमान व्यक्तिंचे हस्ताक्षर खराब असते. कारण त्यांचा मेंदू ज्या गतीने विचार करतो त्या गतीने हाताला लिहिता येत नाही.
माझेही हस्ताक्षर खुप वाईट आहे.
Lol

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद.
हे लिहिण्यासाठी साधा दहा रुपयांवाला शाईपेन वापरलाय. त्याला कटनिब लावून लिहिलंय. बारावीला असताना माझा मित्र एक लेटरींग करायचा. ते आपल्यालाही जमावं असं वाटायचं. मग त्याने सांगितलं त्यासाठी विशेष निब सेट असतो. पण तो मिळणे शक्य नव्हते. त्याने स्वतः साध्या शाईपेनची निब कात्रीने कापून खडबडीत भिंतीवर घासून ती गुळगुळीत केली होती. मग मीही त्याचे अनुकरण केले. त्याचं बघून अक्षरे कशी काढायची याची थोडीफार प्रॅक्टीस केली. आज पुन्हा कटनिबच्या शाईपेनने तशी अक्षरे गिरवायचा प्रयत्न केला. कॉम्प्युटरवर कितीही प्रकारचे फॉन्ट उपलब्ध असले तरी हाताने रेखीव अक्षरे काढण्याची मजाच वेगळी. हे अगदीच प्राथमिक आहे. प्रॅक्टीसची गरज आहे. सध्या पेनचा वापरच नसल्यामुळे लिहिताना कंटाळा येतो. त्यामुळे शिरोरेखा देण्याचा कंटाळा येऊन अगदी मोडी लिपीसारखे काहीबाही लिहितो, जे मलाही कळत नाही. पण, ठरवले की चांगलं अक्षर काढताही येतं…
सुवाच्च्य अक्षरासाठी माझ्या एका शिक्षक मित्राने सांगितलेले काही साधे नियम..
१.दोन अक्षरांमध्ये, दोन शब्दांमध्ये समान अंतर ठेवावे.
२.प्रत्येक अक्षर एकसारखे वळणाचे काढावे. म्हणजे वरच्या ओळीतील क आणि दुसऱ्या ओळीतील किंवा शब्दातील क सारखाच असावा.
३. अक्षराची उंची समान असावी, जी एकरेघी वहीच्या ओळीतील ७५ टक्के भाग व्यापेल.
४. प्रत्येक अक्षराला टोपी घालावीच, अर्थात प्रत्येक अक्षराला शिरोरेखा द्यावी.
हे नियम पाळले तर कोणीही सुंदर अक्षर काढू शकतो.

हे नियम पाळले तर कोणीही सुंदर अक्षर काढू शकतो.

का आमच्या वर्मावर डाग देताय?

असलं सगळं करून झालं पण कुत्र्याची शेपूटच आहे नाहीच सरळ होत.

तुम्ही नशीबवान आहात. हातात कला असावी लागते ती आमच्याकडे नाहीच

<<तुम्ही नशीबवान आहात. हातात कला असावी लागते ती आमच्याकडे नाहीच>>
वर्गातील मुलींपैकी एकीच्याही नावात ‘कला’ नव्हती, हे कटू सत्य स्वीकारून आम्ही ही दुसरी कला ‘हाती’ धरली हेच ‘खरे’. यातून काय सु‘बोध’ घ्यायचा तो घ्या…

हस्ताक्षराच्या बाबतीत मी काठावर! Lol
ठरवल तर सुटसुटीत सुंदर दिसेल अस लिहीता येत नाहीतर आहेच कुत्र्याच पाय मांजराला. Sad

टोच्या शब्दांवर रेषा मारण्याचा कंटाळा येत असेल तर अक्षर लिहीताना सुरवात वरील रेषेनेच करुन पेन न उचलता अक्षराची ऊभी दांडी काढावी व मग अक्षर पुर्ण करावे. अक्षराची दांडीही सरळ न काढता किंचित वक्राकार काढावी. या पध्दतिने लिहिले तर शब्दावर वेगळी रेषा काढावी लागत नाही व अक्षराच्या वळणांवरही बऱ्यापैकी नियंत्रन मिळते.
काही महिन्यांपुर्वी सुलेखनाचे वेड लागले होते तेंव्हा काढलेले हे अक्षर आहे. वरील पद्धतिने काढले आहे.
004E2BBC-B01E-4C06-8A22-56E6A5FFF1B0.jpeg

हरिहर, मार्गदर्शनाबद्द खूप खूप धन्यवाद. तुमची कॅलिग्राफी मस्तच. मी जवळपास सतरा वर्षांनी ते लिहिलंय. आणि मी वापरलेलं पेन इतकं खराब होतं की टोपी द्यायला गेलं की शाईच यायची नाही. मग हाताने निब चोपडून शाई काढावी लागे. प्रॅक्टिस करण्यासाठी चांगला पेन घ्यावा लागेल. तुम्ही काढलं अगदी तसंच माझ्या मित्राचंही अक्षर होतं… अगदी रेखीव.

हायला
हे हस्ताक्षर वाईट?
मग आमचा हस्ताक्षर म्हणजे कोंबडीने दारू पिऊन एका पायावर केलेला नाचच म्हणायला लागेल

टोच्या तुमचे हस्ताक्षराचे वळण दिसतेच आहे वरती.
मार्गदर्शनाचे म्हणाल तर मी जीवाचा फार आटापीटा केला या कलेसाठी पण लवकरच समजले की हे काही आपल्याला साध्य होणार नाही म्हणून नाद सोडला. तुम्ही प्रॅक्टीस केली तर उत्तम कॅलीग्राफी करु शकाल.

मन्या, सुबोध खरे
वर टोच्या यांनी सांगितलेल्या नियमांप्रमाणे वरील अक्षर काढले आहे त्यामुळे जरा बरे दिसत आहे. प्रत्यक्षात माझे अक्षर फार खराब आहे. त्यात हायस्कुलला असताना सरांना शुद्धलेखनातल्या चुका चटकन समजू नयेत म्हणुन आणखी वाईट अक्षर काढायचो. त्या सवयीची भर पडली व हस्ताक्षर आणखीच वाईट्ट झालेय माझे. Lol

मग आमचा हस्ताक्षर म्हणजे कोंबडीने दारू पिऊन एका पायावर केलेला नाचच म्हणायला लागेल>>>> Lol Lol

सुंदर हस्ताक्षरे!

या निमित्ताने थोडे वाईट हस्ताक्षराबद्दल -

लहानपणी शाळेत १ली- २री च्या वर्गांसाठी हस्ताक्षर स्पर्धा वगैरे असे. स्पर्धेत नंबर आला की वर्गशिक्षिका कौतुक करत. वर्गातील २-३ मुलांचे हस्ताक्षर फार वाईट होते. त्यावरुन ओरडा बसायचा, प्रसंगी मारही पडायचा. तेव्हा काही कळत नव्हते. आता लक्षात येते त्या मुलांना असलेली समस्या मुळातून कुणीच समजून घेत नव्हते. ना शिक्षक ना पालक! या मुलांना मदत कशी करावी हे कुणालाच कळत नव्हते. ही मुले मागे पडली आणि मीही ते दिवस विसरुन गेले. तथावकाश लेक शाळेत जावू लागला. gross motor skills खूप मागे आणि fine motor skills खूप पुढे अशी समस्या आहे हे कळले. तेव्हा पुन्हा विस्मृतीत गेलेली ती मुले आठवली. माझा लेक gross motor skills खूप मागे आहे तशी ती मूले कदाचित fine motor skills मागे होती का असा प्रश्न पडला. लेकाने प्रायवेट शाळेतून सरकारी शाळेत बदली घेतली आणि माझे जग जरा विस्तारले. थेरपी म्हणून लेक ताय क्वान डो ला जात होता. एक दिवस लेक म्हणाला त्याचा मित्र रायटिंग लॅबला जातो. इतर वर्गातून देखील मुलं जातात. चौकशी केल्यावर कळले काहींना डिसलेक्सिया होता तर काहींना एडीएचडी. काहींची समस्या अनेक कारणांपोटी होती. पुन्हा एकदा ती हस्ताक्षर वाईट म्हणून मार खाणारी मुले आठवली. तिसरीत लेक अ‍ॅक्सिलरेटेड वर्गात गेला. काही मुले ओळखीची होती तर काही नवी होती. नव्या मुलांत लेक रुळला. एक दिवस त्याने सांगितले की खूप लिहायचे असेल तर 'एस' लिहित नाही, टाईप करतो. हाताने लिहिताना त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. तो रायटिंग लॅबला जातो पण तरी जोडीला टाईप पण करतो. हळूहळू त्याचे टाईप करणे कमी झाले. मेंदूतील विचार आणि हात याचा वेग जमू लागला.
नात्यातल्या मुलीला लेखन समस्या आहे. तिचे विचार ज्या वेगाने येतात त्या वेगाने हात चालत नाही. दोन शाळा बदलल्यावर तिची समस्या समजून घेणारी शाळा मिळाली. सध्या बरे चाललयं.

@मन्या, धन्यवाद.
@अप्पा तुम्ही कौतुक केलत म्हणजे साडेसाती खरोखर संपली आहे असं समजतो.

इथे प्रतिसाद देणार्यां बहुतेकांचे अक्षर सुंदर आहे असे दिसते त्यामुळे जरा न्यूनगंड आला होता. माझे अक्षर खूप काही सुंदर कधीच नव्हते पण मार्क मिळवून देण्या इतपत चांगले जमायचे. ई. १० च्या परीक्षेसाठी खास तयारीच केली होती. पण आता लिहायचे काम कमी असल्याने पुन्हा गाडी जुन्या वळणावरच गेली. कधी कधी हौस म्हणून आवडलेली वाक्य नोटबुक मध्ये लिहून ठेवतो एवढाच काय तो लिहायचा संबंध..

असा समज आहे की बुद्धीमान व्यक्तिंचे हस्ताक्षर खराब असते. कारण त्यांचा मेंदू ज्या गतीने विचार करतो त्या गतीने हाताला लिहिता येत नाही.
माझेही हस्ताक्षर खुप वाईट आहे.>> या समजामुळे हुरूप आला Happy

सस्मित व बोकलत - सुंदर सुंदर!!!
सस्मित यांचा क्ष मस्त. बोकलत यांचा च आवडला.

'ल' - मी असा काढते. तो दांडिवाला ल नाही काढत. बदामी , ढब्बा ल काढते Happy

टोच्या यांचे अक्षर टोकदार वाटले. मला गोल गोल ढब्बं अक्षर आवडतं Happy
______
पुरंदरे यांचे हस्ताक्षर आहे की टाइप्ड फाँट? मस्तच आहे.

Pages