नदी वाहते: मराठी चित्रपट अनुभव (२०१७)

Submitted by Dr Raju Kasambe on 21 January, 2020 - 03:29

नदी वाहते: मराठी चित्रपट अनुभव (२०१७)

दि. १ फेब्रुवारी २०१७ ला मराठी चित्रपट ‘नदी वाहते’ च्या विशेष शो साठी निमंत्रण मिळाले होते.

चित्रपटाबद्दल काय वाटले ते सहज लिहून काढले. हे काही चित्रपट परीक्षण नव्हे.

तळकोकणातल्या डोंगरदऱ्यातून खळाळत वाहणारी अंती नदी. तिच्या कडेला वसलेली २५ खेड्यांची जीवनदायिनी. प्रत्येकाचं जीवन तिच्याशी जुळलेलं. त्यांच्यासाठी ती सर्वकाही. जणूकाही माय माऊलीच. डोंगरदऱ्यांचा निसर्गरम्य परिसर आणि खळाळती अंती नदी बघून शहरातल्या उद्योगपतींची ह्या परिसराला नजर लागते. एका मोठ्या उद्योगपतीला अंती नदीवर मोठे धरण बांधायचंय. त्यातून त्याला परिसराचा विकास साधायचा आहे. एक भव्य पंचतारांकित हॉटेल बांधायचं आहे. जेणेकरून हा परिसर जगाच्या ‘टुरिस्ट मॅप’ वर येईल. मग विकासासोबतच रोजगार उपलब्ध होणारच आहे. त्यासाठी नदीकाठच्या शेतजमिनी विकत घेण्याचा सपाटा तो लावतो.

गावातील आठ-दहा विचारवंत डोकी एकत्र जमतात. अंती नदीचं महत्त्व त्यांना उमगलंय. आपल्या डोळ्यादेखत नदीचा अंत कसा होऊ द्यायचा. नदीवर धरण झालं तर गावाला पाणि कुठून मिळणार?

छोट्या गावतही राजकारण आलंच. गाडी-बंगलेवाला नेता उद्योगपतींशी जवळीक साधतो. त्यांची खुशमस्करी करतो. उद्देश हाच की स्वतःच्या उच्चशिक्षित मुलाला मुंबईला चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. पण त्याचा तरुण मुलाचीच तगमग होतेय. गावाशी-मातीशी इमान राखायचं की स्वतःचं तेवढं बघायचं? मीत्रांशी-नदीशी जुडलेलं नातं तोडून टाकायचं का? की ज्या मातीत जन्मलो तिथल्या लोकांच्या भल्यासाठी आपल्या शिक्षणाचा उपयोग करायचा? मोठ्या पगाराच्या नोकरीची त्याला ऑफर येते. मुंबईला जाऊन राहायचं. गाव विसरून जायचं. गावाच्या हितापेक्षा स्वतःच्या मुलाचे हित बघणाऱ्या बापाच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची हिम्मत तो जुळवू शकत नाही. कुठला मार्ग निवडायचा? सोपा राजमार्ग की कठीण आडवळणाचा? हा निर्णय तो घेतो तो प्रसंग अतिशय सुंदरपणे चित्रपटात दाखविल्या गेलाय! निर्णय होतो. मोबाइलवर फोन करून बापाला सांगतो. मी मुंबईला जाणार नाही. मला गावातच कंप्यूटर इंस्टीट्युट काढायचंय!

अंती नदी कधी रोरावत वाहते. कधी शांत पहुडलेली असते तर कधी तीचे पात्र कोरडे असते. गावातल्या प्रत्येकाला तीने आपल्या अंगाखांद्यावर प्रेमाणे खेळवलं आहे. पशु, पक्षी, शेती सर्व काही अंतीच्या आधाराने सुखावले आहे. पिढ्यानपिढ्या तीने आपल्या कुशीत वाढवल्या आहेत.
बहुतेकांना गावाचा विकास हवा आहे. काहींना विनामेहनतीच्या पैशांची हाव आहे. शेतजमीन विकून आरामात बसून खायचे आहे. अंगमेहेनत करायला नको आहे. कोकणातल्या कष्टाळू जीवनपद्धतीची त्यांना उबग आलीय.

तर, गावातल्या ह्या आठ दहा लोकांना विकासकामाच्या नावाखाली अंती नदीवर आणि पर्यायाने गावावर येऊ घातलेल्या संकटाचा सुगावा लागलाय. त्यांनी अंती नदी आणि गावाला वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो ह्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरु केलाय. मोठ्या धरणाऐवजी छोटे छोटे बंधारे बांधले तर? गावकऱ्यांचा एक गट कामाला लागतो. संघर्ष सुरु होतो. काही युवक निसर्ग पर्यटन, साहसीक्रीडा पर्यटन आदी उद्योग सुरु करतात.

कोकणच्या कुशीत वसलेलं हे शांत गाव म्हणजे एखादी कार जरी गावात आली तरी सगळे जण चौकशी करणार. चहाच्या टपरीवर आरामात भुरके मारत बसायचे. अशा गावात अचानक ट्रक, डम्पर, महागड्या गाड्या आदींची वर्दळ वाढते. गाड्यांच्या कर्कश आवाजाने, धुळीने गावाचे रूपडेच बदलून जाते.

अनादी काळापासून खळाळून वाहणारी अंती नदी! होऊ घातलेले धरण आणि २५ गावांची जीवनदायिनीच कुणीतरी रोखून धरली तर? अंती नदी ही केवळ पाण्याचा स्त्रोतच नव्हे तर ती आपली जिवाभावाची मैत्रीण, सखी, आई आणि देवता आहे. तीला स्वतःचे असे चारित्र्य आहे.

चित्रपट बघता बघता आपण स्वतःला गावकऱ्यांच्या संघर्षात समाविष्ट करून घेतो. नदी आपलीशी वाटायला लागते. ती केवळ वाहते पाणी नसून जिवंत आहे ह्याचा साक्षात्कार होतो. अचानक चित्रपट संपतो. कुठल्याही प्रश्नांची उत्तरं न देता. अस्वस्थ मनाने आपण बाहेर पडतो. चित्रपटाने मनात निर्माण केलेलं वादळ शमत नाही. डोक्यात अंती नदी वाहत राहते. मला वाटते हेच या चित्रपटाचे यश आहे.

दिग्दर्शन, कॅमेरामनचे काम आणि सर्वच कलाकारांनी सकारलेल्या भूमिका उत्कृष्टच म्हणाव्या अशा झाल्या आहेत.
दिग्दर्शक: संदीप सावंत
वर्ष: २०१७

Group content visibility: 
Use group defaults