ती, मी आणि बरंच काही : ४ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 2 January, 2020 - 06:01

ती, मी आणि बरंच काही : ४ . . .

ह्या एकतर्फी पूर्णपणे एकतर्फी प्रेमाला चारच महिन्यात दुतर्फी साथ लाभणार होती हे जर मला माहित असतं तर ते चार महिने मी अतीव विरहाच्या वेदनेने रडत कुढत घालवले नसते. . .

कोणाच्या होकाराने किंवा नकाराने मनात खोलवर रुजलेलं प्रेम आतल्या आत कधीच मरत नसतं, एकदाका मनापासून रुजलं मग ते रोपटं होऊन मनात वाढत राहतंच.
तिचा नकार मला आधीपासूनच माहित होता तरीही दुखलं मनात, हेलावलं काहीतरी व्याकुळ होतं राहिलं.

त्यानंतर आम्ही नेहमी सारखं भेटायचो, फक्त त्या भेटीत पहिल्या सारखी सहजता नसायची. काहीतरी इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटायचं. माझ्या डोळ्यांत पाहणं ती पूर्णपणे टाळत होती.
आज मी ठरवूनच गेलो होतो, तिला नीट समजावून सांगेन, कारण आमच्या मैत्रीमध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण होत होता, दोन महिने ना ती पहिल्यासारखी मेसेज करायची ना कॉल वर बोलत होती. स्टेशनवर देखील मुद्दामून उशिरा यायची. काही सांगत नसायची, घरचं स्वतःचं, फक्त गाणं ऐकत बसायची. ह्या गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही हे हजारदा ठरवून देखील मला अतिशय त्रास व्हायचा . .

"तुला असं वाटतं कि तुझ्या अश्या वागण्याने रागावून मी तुझा विचार सोडून देईन??
जर असं वाटतं असेल तर तसं होणं अशक्य आहे, करतोय प्रेम करेन आणि करत राहीन, इतकंच नाही तर ते मिळवण्याचा प्रयत्नदेखील करेन. तू तुझ्या भावनांवर अन्याय करू शकशील पण मी माझ्या प्रेमावर अन्याय नाही करणार.
हे असं विखुरल्या सारखी वागतेस ना त्रास होतोय मला त्याचा, ऐकतेस? त्रास होतो. तू मैत्रीदेखील तोडतीयेस ग. मित्र तर आधीपासून आहे ना तुझा, मग आता का अशी वागतेस?
माझं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न मी तुला काहीच त्रास न देता करेन, पण तू मैत्रीत दुरावा का आणतेस??"
ती निव्वळ शांत राहिली तेही मान खाली घालून.

"मला हि मैत्रीदेखील तोडायची आहे, मला मनाच्या बंधनात गुंतायचं नाहीये, माझा एक सरळ सोपा मार्ग आहे, त्यात तू आता असं वागून माझी दिशा बदलण्याचा प्रयत्न करतो आहेस, आणि त्यामुळे माझं ध्येय पूर्ण होणार नाही, सॉरी"
ती तिथून उठणार तोच मी तिचा हात धरला घट्ट, इतकी हिम्मत कुठून आली देव जाणो पण मी अडवलं तिला हक्काने, एक कडकडीत रागीट कटाक्ष माझ्यावर पडला आणि माझी पकड आपोआप सैल झाली. तरीही हिम्मत करून म्हणालो
" मी हि इथेच असणार आहे रोज, तुझी वाट पाहत, जमलंच तर भेटू इथेच, काही लागलं तर एक मेसेज कर फक्त, काळजी घे"

काळजी घे ऐकायला ती इथे होतीच कुठे, केव्हाचीच निघून गेली होती.
मी मात्र रोज मेसेज करायचो. काय करतेस? ठीक आहेस ना?? तो विषय सोडून काहीही बोल पण बोल ना?? काळजी वाटतेय तुझी, कशी आहेस?? घरी ठीक तर आहे ना सगळं?? कधीतरी येणारे मेसेज देखील बंद झाले, माझे हाल अजून वाईट झाले.
ती लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करायला लागली आणि १.२०च्या आसपास स्टेशनवर येऊन माझ्यापासून जमेल तितकं लांब राहून निघून जायची. मी रोज तिच्या जागेवर बसून तिची वाट पाहत राहायचो.

एक दिवस मी नेहमीच्या जागेवर न बसता बाजूला राहिलो, ती आली, तिची नजर मला शोधू लागली, खूप बरं वाटलं तिची कासावीस नजर पाहून. इतके दिवस तिची वाट पाहण्याची हि किंमत मिळत असेल तर मी आयुष्यभर वाट पाहायला तयार होतो.
मी तिला मेसेज केला " प्रेम नाही करू शकत, मैत्री नाही ठेऊ शकत मग हि नजर आज इतकी बैचेन कोणासाठी??
"

डोळ्यांत जमा झालेले थेम्ब अलगद पुसले दुरून पहिले, आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण माझ्यासाठी तिच्या डोळ्यात पाणी होतं.

खूप दिवसांनी सोबत बसलो होतो, कितीतरी वेळ एकमेकांच्या नजरेला चोरून नजर देत, शब्दांची जुळवाजुळव करत.
आज ती खूप काही बोलली.

" आपल्यासाठी कोणाच्यातरी डोळ्यात पाणी असणं हि जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे, जी तुझ्यामुळे मला मिळाली. ती व्यक्ती फक्त माझी आहे, त्यानेही म्हणणं कि मी फक्त तिचाच आहे, अजून काय हवं असतं रे आयुष्यात? आजवर मम्माने माझ्यामुळे खुश राहावं, माझ्यावर प्रेम करावं, मला जवळ करावं फक्त मम्माच्या प्रेमासाठी प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नांना तुझं प्रेम तोडू पाहत आहे रे , मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेन पण त्या बदल्यात मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकणार. कदाचित मी बनलेच नाहीये त्या गोष्टींसाठी.
तू असा व्यक्ती बनला आहेस आयुष्यात कि ज्याच्यासाठी मी पूर्ण जगाला कुर्बान करेन आणि मम्माच्या एका शब्दासाठी तुझ्यासारखे हजार कुर्बान.
नाही रे होऊ शकत काही, आमच्यात जातिबाह्य लग्न मान्य अशक्य गोष्ट आहे, लोकं नावं ठेवतील, मम्मा पप्पाना, माझ्या बहिणीला देखील त्रास होईल.
माझ्या एकटीच्या सुखासाठी मी इतक्या सगळ्यांना त्रास कसा देऊ शकते?? सांग ना??? सॉरी पण माझ्याकडून तू कसली अपेक्षा ठेऊ नकोस." जागलेल्या आशा पूर्णपणे मावळल्या होत्या, कदाचित कायमच्या.

हल्ली ती नेहमी सारखी बोलायची, मी तिला i heart you बोलायचो, मी एका प्रियकरासारखीच तिची काळजी घ्यायचो, ती तिच्या मर्यादा बाळगून मला जमेल तितकं आनंद द्यायचा प्रयत्न करायची.
मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे ह्या नात्यावरून ती माझ्या प्रेमात कधी पडली हे तिला देखील कळलंच नव्हतं अजून.
पण मी तिच्याकडून ते कबूल करून घेणार होतो.
माझा वाढदिवस दोन दिवसांवर होता, तुला काय गिफ्ट हवंय तिने विचारलं तेव्हा मी तिच्याकडून तिच्याकडून पर्सनल वेळ मागितला. भांडण झालं, ती रागावली, मी रागावलो, हा ना करत तिने होकार दिला.

तिने बनवून आणलेला गाजर हलवा आम्ही त्या कट्ठ्यावर एकांतात खाल्ला, तिने मला विंड चाइम गिफ्ट दिलं, अतिशय घाबरलेली ती, सतत कुणी पाहिलं, घरी कळेल, मम्माला कळलं तर ?? ह्या भीतीने निघुयात म्हणून मागे लागली.
मी तिला विचारलं " तुझं आता तरी आहे का माझ्यावर प्रेम??"
ती नाही म्हणाली, "मग हि आपली शेवटची भेट ह्यानंतर आपल्या वाटा वेगळ्या, कारण तू सोडून गेल्यावर मी नाही जगू शकणार . . . "मी हे सगळं खोटं खोटं बोलत होतो.

तिचे डोळे पाण्याने भरले होते, ते आतल्या आत दडवायला तिला श्वासदेखील घेता येत नव्हतं, एक थेम्ब तिच्या परवानगीशिवाय तिच्या गालावर ओघळला, बांध तुटला होता.
माझं प्रेम आज माझ्या हृदयाशी लागून मूकपणे प्रेमाची कबुली देत होतं.
माझ्या हृदयावर डोकं ठेवून, मला जोरात ह्ग करून ती I LOVE YOU म्हणाली.
तिच्या नुसार माझ्या प्रेमाने तिच्या आयुष्यात यमन रागाचा आरंभ झाला होता.

माझ्यावर प्रेम करण्यासारखं असं काही स्पेशल कारण नव्हतं इतकं, ती भावनिक दृष्टीने माझ्यात गुंतली, मी तिची काळजी घ्यायचो हे एक सगळ्यात मोठं कारण होतं. मी तिला समजून घ्यायचो, ऐकायचो तिला, समजावायचो. तिला ज्या गोष्टींची ज्या प्रेमाची आपुलकीची कमी भासायची ती मी पूर्ण करत होतो.
आणि अजून एक " कोणाच्यातरी आयुष्यात तिच्या असण्याने ती व्यक्ती आनंदी राहील" हि एक भावना ना जाणे तिला काय सांगून गेली कि तिने मला सुखी ठेवायला होकार दिला.
नक्की माहित नाही काय ते पण तिने माझ्या सुखासाठी आनंदासाठी होकार दिला हे जाणवलं मला.
तरीही मम्माच्या एका शब्दावर ती मला एकदाही विचार न करता सोडून गेली असती हे देखील कळलं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults